चिंता करितो विश्वाची…

चिंता करितो विश्वाची...

मासिक साहित्य चपराक, डिसेंबर 2019

सज्जनगड… सोळाव्या शतकापासून ते आजतागायत प्रभू श्रीरामाच्या उपासनेत आकंठ बुडालेला हा गिरीदुर्ग. इथल्या प्रत्येक दगडात समर्थांचा आजही वास आहे. जगद्उद्धारासाठी स्वतः परमेश्‍वर जेव्हा भूतलावर वास्तव्य करु शकत नाही तेव्हा त्याची विचारधारा घेऊन प्रत्येक वेळी अशा विभूतींनी जन्म घेतला आहे, ज्यांनी समाज घडवला.

माणसाला माणूस बनवण्याचे कार्य केले. समर्थ रामदास स्वामी हे त्याच विभूतींचे जनक म्हणले तर वावगे ठरणार नाही. जालना जिल्ह्यातील जांब गावी सूर्याजीपंत ठोसर यांच्या घरी या विभूतीचा चैत्र शु. 9 शके 1530 (24 मार्च 1608) रोजी जन्म झाला. अत्यंत ईश्‍वर उपासक आणि श्रद्धाळू दांपत्याने या सूर्यवरदानी बालकाला रामनवमीच्या दिवशी माध्यान्ही जन्म दिला आणि पुन्हा राम पृथ्वीवर अवतरले. बाळ नारायण इतरांपेक्षा वेगळा होता. तो प्रभू रामचंद्राची हुबेहूब प्रतिकृती होता. प्रचंड हुशार, दृढनिश्‍चयी, बुद्धिमान, खोडकर आणि श्रद्धाळू होता. हाती घेतलेले काम तडीस नेणे त्याच्या रक्तातच होते. खेळ आणि शिक्षण हे नारायण स्वतःच्या मर्जीप्रमाणेच करी.

लहान असताना एकदा खेळता खेळता लपून बसलेला नारायण कोणालाच सापडला नाही. खूप शोधाशोध करुन झाल्यानंतर सारे हताश झाले. अखेर एका फडताळात नजर जाता नारायण गंभीर चिंतनात दिसला. आईने त्याला ‘‘काय करत होतास?’’ असे विचारताच ‘‘चिंता करितो विश्‍वाची’’ असे उत्तर आले आणि पुढे या विश्‍वचिंतेने बेभान होऊन हा बालनारायण बोहल्यावरुन वयाच्या 12 व्या वर्षीच पळून गेला, तो पुन्हा कधी कुटुंबास दिसलाच नाही. संसारात अडकायचे नाही हे ठाम मत बांधून नारायणाने कुटुंब, संसार यास रामराम ठोकला आणि पुढे नाशिक येथे पंचवटीत प्रभू रामचंद्राच्या दर्शनाठी आले. आपल्या साधनेसाठी तसेच घोर तपश्‍चर्येकरिता नाशिक येथे टाकळीतील नंदिनी नदीच्या काठावर असणारी गुहा निवडली. वयाच्या बाराव्या वर्षी नारायणाने विद्यार्थी दशा स्वीकारली. नाशिक येथे ‘समर्थ’ या नावाने वावर सुरु झाला. खरे तर शारीरिक आणि मानसिक बलसंवर्धन हे याच वयात केले जाते. समर्थांनी एक आदर्श शिक्षणपद्धती प्रस्थापित केली. आज ती बलोपासना म्हणून कार्य करते. नाशिक येथील अज्ञातवासात समर्थांनी कठोर तपश्‍चर्या केली. रोज पहाटे 1200 सूर्यनमस्कार, त्रयोदशाक्षरी राम नामाचा जप तसेच गायत्रीमंत्र समर्थ नित्यनेमाने करु लागले. या काळात 6 तास नामस्मरण करु लागले. समर्थ केवळ 5 घरची भिक्षा स्वीकारीत. त्याचा नैवेद्य प्रथम प्रभू रामचंद्रांना दाखवीत. भिक्षेतील काही भाग पशुपक्ष्यांना देत व उरलेला आपण ग्रहण करीत. उरलेला सर्व वेळ वेद, उपवेद, उपनिषदे, प्राचीन ग्रंथ आणि शास्त्रे यांच्या अध्ययनात घालवीत. यातूनच रामायणासारख्या रचना लिहिल्या.

श्रीरामांच्या आर्तनेने केलेल्या प्रार्थनांतूनच करुणाष्टके जन्माला आली. व्यायाम, उपासना आणि अध्ययन यावर जीवनाची मूर्ती घडवण्याचा दृढ निश्‍चय समर्थांनी केला. 12 वर्षे घोर तपश्‍चर्या केल्यानंतर भारतभ्रमण करीत तीर्थयात्रा केल्या. अनेक ठिकाणी तत्कालीन परिस्थिती जाणून घेण्यास वास्तव्य केले. निरिक्षण केले. तेव्हा त्या समाजाकडे पाहून समर्थ हतबल झाले. त्यामुळे त्यांच्यातील वैराग्याचा एक सुप्त गुण जागा झाला. हिमालयातून प्रवास करत असताना इथूनच मोक्षाकडे वाटचाल करावी, असे विचार करु लागले आणि एकदा प्रभू रामचंद्राचा साक्षात्कार झाला. प्रभू रामचंद्र त्यांना म्हणाले, ‘‘जगद्उद्घारासाठी निर्मिलेल्यांचे शरीर आमचे असते. गेली दोन तपे या शरीराचे पालन आम्ही करतो आहोत हे फक्त ईप्सित साह्यासाठी, धर्मसंस्थापनेसाठी.’’ त्यानंतर समर्थांना स्वकार्याची व जबाबदारीची जाणीव झाली. भगवंताने आपल्याला हे शरीर देश, देव, धर्माच्या सेवेकरता दिले आहे, असे ते मानू लागले.

शांतीने, सलोख्याने प्रश्‍न सुटत नाहीत तेथे शस्त्रसज्ज व्हावे लागते ही रामदासांची शिकवण होती. यासाठी समर्थांनी गुप्ती वापरण्यास सुरुवात केली. ही बाहेरुन दिसण्यास कुबडी होती परंतु आत होती धारदार तलवार. तिच्यावर बगल ठेवून ते तासन्तास जप करीत. भारतभ्रमण काळात समर्थांनी मारुतीची 11 मंदिरे स्थापली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने तरुण वर्गाने मारुतीची उपासना करावी, असे समर्थ शिकवत. शरीराचे बळ आणि मनाचे बळ असणे किती अनिवार्य आहे हे रामदासस्वामींच्या चारित्र्यावरुन समजते. या काळात समर्थांनी ज्ञानचक्षुसारख्या अनेक विद्या संपादित केल्या. संत एकनाथांची पत्नी समर्थांची मावशी होती. त्यामुळे संत शिकवणीचा वारसा आपसूकच होता. स्वतःला भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर सर्व जनतेलाही परमार्थ दृष्टीने वाटचाल करण्यास प्रवृत्त करावे, असे समर्थांना मनापासून वाटू लागले. तिथून समर्थांचे अनुयायी जन्माला आले. अनेक ठिकाणी मठ उभे राहिले आणि रामदास संप्रदायाची निर्मिती झाली. त्या काळात जनता हीन, दीन, त्रस्त आणि लाचार जीवन जगत होती. काडीमात्र सुरक्षितता नव्हती. अमानुष अत्याचाराला बळी पडत होती. श्री छत्रपती शिवाजी महाराज या दीन-दुबळ्या रयतेसाठी अगदी निष्ठेने काम करीत होते. रयतेला सुखी करण्याचा प्रयत्न करत होते. भारतभ्रमण करीत असताना सातार्‍यातील एका गडावर शिवराय आणि समर्थांची भेट झाली. राजांच्या या कार्याकडे पाहून समर्थ भरुन पावले. आपल्या कार्याचा वारसा चालविणारी व्यक्ती मिळाल्यामुळे किंचित निश्‍चिंत झाले. शिवरायांच्या विनंतीनुसार समर्थांनी चाफळ येथे उर्वरित आयुष्य व्यतित केले. सज्जनगड प्रभू रामचंद्रमय घडवला. मातेचे मंदिर उभारले. आपल्या विचारांतून समाजस्थापनेचा निर्धार केला. लोकांना एकत्र आणून शक्तीचा दृष्टांत देणे, हरवलेले अस्तित्व, आत्मविश्‍वास पुन्हा जागृत करणे हे कार्य केले.

हे कार्य करत असताना समर्थांचे लिखाणही अखंड सुरु होते. अनेक देवादिकांच्या आरत्या, स्तोत्रे, अष्टके आणि दासबोध यासारखे ग्रंथ त्यांनी लिहिले. समर्थांच्या लेखणीला समाजाच्या तळमळीची आणि भगवंताच्या भक्तीची जाण होती. त्यानुसारच त्यांचे लेखन होत गेले. अतिशय प्रगल्भ विचार, तेजपूर्ण शब्द, साधी सरळ भाषा, स्पष्ट मांडणी करुन साहित्यनिर्मिती केली. मोगलांच्या आक्रमणानंतर धुळीस मिळालेली संस्कृती आणि साहित्य समर्थांनी पुन्हा जिवंत केले. पुन्हा समाजात रुजवले. श्री गणेश, श्री शंकर, श्रीविठ्ठलाची आरती या रचनाही त्यांनी केल्या व समाजात रुजवल्या. त्या आजही भक्तांच्या ओठावर देवाची प्रीत फुलवतात. समर्थांचे श्रीमनाचे श्लोक भुजंगप्रयास वृत्तात लिहिले असून तो अत्यंत सोप्या भाषेतील मौलिक शिकवणीचा साठा आहे. त्यांच्या शिकवणीचे सार म्हणजे कर्म, उपासना, ध्यान, विवेक, ज्ञान, भक्ती, प्रयत्न आहे. अशा शिकवणीतून समर्थांनी राष्ट्रनिर्मिती केली.

‘जय जय रघुवीर समर्थ’ हे संत वचन समर्थ रामदासस्वामींसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रात समर्थांचे एकूण 1100 मठ आहेत. यातून समर्थांचे अनुयायी रामदास संप्रदाय चालवतात. शिकवण पुढे सुरु ठेवतात, दुःख निवारणाचे कार्य करतात. अनाथ, निराधारांना तसेच दुर्बलांना आत्मसन्मान मिळवून देतात. दुःखाचे कारण आपले मन असल्याचे पटवून देतात. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले मन जेव्हा मोकळे होते तेव्हा बहु परिश्रमाने ईप्सित साध्य करता येते. त्यासाठी धैर्य राखावे अशी समर्थांची शिकवण आहे. अशा एक ना अनेक शिकवणींतून आज समर्थ उपासक अनेक बहुमोल गोष्टी शिकत आणि शिकवित आहेत. अशा या संतश्रेष्ठास कोटी कोटी प्रणाम!!
(या लेखातील समर्थांचे चित्रही डॉ. रसिका जाधव यांनीच साकारलेले आहे.)

– डॉ. रसिका देशमुख (जाधव)
नाशिक 9422781984

मासिक साहित्य चपराक, डिसेंबर 2019

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “चिंता करितो विश्वाची…”

  1. Mahesh Kulkarni

    Farach Chaan Lekh aahe!!!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा