शब्द हे भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. प्रेम, माया, विश्वास, सुख, दु:ख, राग, आनंद, वैताग, विचार या मनातील भावना पुढच्या व्यक्तिपर्यंत बर्याचदा शब्दांच्या मार्फत पोहोचवल्या जातात. लेखक, कवी, विचारवंत, वक्ता यांचे तर शब्द हेच सामर्थ्य आहे. विश्व, ब्रह्म आहे तरीही प्रत्येक जण बोलत असतोच की शब्दाविनाही बरेच काही!
अगदीच तान्ह्या बाळाला कुठे काही सांगता येते? आई मात्र सारे काही समजून जाते. तसंही स्वतःचे मुल कितीही जाणते असले तरीही लेकराच्या भावना समजायला किमान आईला तरी शब्दांची गरज भासत नाही.
आपल्या मूक अभिनयातून चार्ली चाप्लिनने हास्याचे मळे फुलविले. वेंधळा चार्ली! छोटी बोलर टोपी, मोठे बूट, हातात काठी, फेंगडी चाल, ढगळ विजार आणि तंग कोट, विटलेला शर्ट टाय आणि आखुड मिशा. तो पडतो, धडपडतो. त्याच्यावर काही ना काही आदळतं किंवा तो कोणावर तरी आदळतो. कितीतरी करामती. तरीही चेहर्यावर काहीच न घडल्याचा निर्विकार भाव. त्याचा मूक अभिनय बघत आपण हसतच राहतो पिढ्यानपिढ्या.
अशी हसणारी आणि हसवणारी माणसे सगळ्यांनाच भावतात, आवडतात. मला ना अशी माणसे शरद ऋतुतल्या चांदण्यांसारखी भासतात. अंधाराला झाकोळून टाकणारी. स्वतः तेजाळणारी आणि दुसर्यांनाही तेजाळून टाकणारी. त्यांचं मंद धुंद स्मित चांदण्यांसारखंच शितल, मृदु, हळूवार, आल्हाददायक वाटतं कितीतरी लोभस. समोरच्याला सुखावणारं! पण हे हसणारे चेहरेही कधी लपवत असतात दु:खाचा गहिरा सागर आपल्या मनात. फक्त ती गाज प्रत्येकाला ऐकू येईलच असं नाही.
इतक्यातच, सोशल मीडियावर एका मनसोक्त हसणार्या चिमुरडीचा फोटो व्हायरल झाला. अंगावरील कपड्यांवरून जरी गरीबी झळकत असली तरी तिच्या चेहर्यावर दिसणारे निरागस, समाधानी हास्य मात्र एखाद्या कोट्यधीशाला हेवा वाटावे असेच होते.
साधारण 2005 च्या दरम्यान ‘सकाळ’ वर्तमानपत्रात छायाचित्र काय बोलते या नावाने एक सदर यायचे. दिलेल्या छायाचित्रातील भावना वाचकांनी शब्दबद्ध करायच्या. काही मोजक्या प्रतिक्रियांना प्रसिद्धी मिळायची. मी सगळ्या प्रतिक्रिया नुसतीच वाचायची. आपणही काही लिहावे असे कधी वाटले नाही पण एका छायाचित्राने मात्र मला हेलावून टाकले. किळकटलेली, फाटकी साडी, अत्यंत कृश, कदाचित दिवसभराची उपाशी असावी, रापलेला पण चेहर्यावर थकवा कदाचित भिकारी किंवा मनोरुग्ण वाटावी, डोक्यावरील केसांचा पिंजारा झालेला. कितीतरी दिवस अंघोळ केलेली नसावी. पलीकडे कचर्याचा ढिगारा साठलेला, एकंदरीत तिच्याकडे बघून किळसवाने वाटावे अशी एक मध्यमवयीन स्त्री आपल्याजवळ असलेल्या अर्ध्या भाकरीतील एक तुकडा प्रेमाने कुत्र्याला भरवित होती. मी मात्र ते छायाचित्र बघून खूप कासावीस झाले. शब्दातून व्यक्त झाले. सकाळ वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या माझ्या आयुष्यातील पहिल्यांदाच प्रकाशित झालेल्या त्या चार ओळी. त्या नि:शब्द छायाचित्राने मला शब्द दिले. खरेच, स्वतः उपाशी असूनही एका मूक प्राण्याची भूक जाणणारी करूणा स्तिमित करणारी होती.
दूरदर्शनवर प्रसारित झालेली आर. के. नारायण लिखित मालगुडी डेज ही मालिका मला खूप आवडायची पण त्यापेक्षाही जास्त आवडायचे ते मालिकेचे शीर्षक संगीत. जणू त्या मालिकेतील स्वामी या पात्राचे सगळे भाव उमटत जायचे त्या संगीतातून शब्दाविनाही!
माझ्या घराजवळच एक मध्यमवयीन हडकुळी, उंच, काळी सावळी, आखीव रेखीव पण बोलता न येणारी स्त्री रहायची. सगळे तिला मुकी अशीच हाक मारायचे. तिला शब्द उच्चारता येत नसले तरी आवाजाच्या चढ उतारातून बोलण्याचा प्रयत्न करायची पण तिचा आवाज खूप घोगरा यायचा. आई सांगते की, अगदीच तान्ही असताना ती मला जवळ घ्यायला बघायची पण मी मात्र तिला खूप घाबरायची. कदाचित तिच्या घोगर्या आवाजामुळे!
पण मला जसे समजायला लागले तसे तशी मुकी मला कितीतरी प्रश्न विचारायची अन् मी तिला सगळं सांगायची सुद्धा. मी शाळेतून येताना वाटेवर थांबायची गप्पा मारायला. गोड हसायची. माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवायची.
अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या शब्दाविनाही वाचता येतात. आंधळ्या व्यक्तीच्या डोळ्यातही बोलके भाव असतात. फक्त वाचणार्याचं मन तेवढं डोळंस हवं!
एखाद्या निरागस बालकाचा गाल फुगवून बसलेला रूसवा, एखाद्याचे मौनातले प्रेम. सतत प्रगल्भतेची कातडी पांघरलेल्या माणसातील अल्लडपणा, पु. ल. देशपांडेंनी रंगवलेल्या अंतू बर्वासारखे काटेरी फणसाच्या आतील मऊ मधाळ गरासारखे एखादे गोड हृदय, काटेरी कुंपणातही मनसोक्त स्वातंत्र्य लुटणारं एखादं स्वच्छंदी फुलपाखरू, एखाद्याच्या काळजातली काळजी, शब्दाविनाही कृतीतून व्यक्त होणारी अबोल भाषा, कुणाचं हसरं दु:ख, तर कुणाचं दुखरं सुख. कुणाला संध्यासमयी काहूर करणारी कातरवेळ तर कुणाच्या राकट चेहर्यामागची हळवी काळजी! कोणाच्या रूक्ष चेहर्यावरची नकाराची भाषा तर कोणाची हतबल अगतिकता! आईच्या विरहाने व्याकूळ झालेलं अबोल फूल तर कधी भूकेने व्याकूळ, वाट पाहणारी अधीर आशा. एखादी हळवी वेदना, कधी चांगुलपणाच्या मुखवट्याआड दडणारा निर्लज्जपणा, एखाद्याच्या हास्यातला खळाळता झरा, कोणाच्या अव्याहत बडबडीमागचा एकटेपणा तर कोणाच्या मौनात सामावलेला भावनांचा गाव!
वाचता येतोच की शब्दाविना!
-मीनाक्षी पाटोळे
राजगुरूनगर
9860557125