रंग जीवनाचे!

रंग जीवनाचे!

रंग आणि माणूस यांचं गहिरं नातं आहे. निसर्गात अनेकानेक रंग आहेत. प्रत्येकाचा रुबाब वेगळा, मोहकता वेगळी. मूळ रंग कितीही असोत पण एका रंगात दुसरा मिसळून जे मिश्रण बनतं ना त्याला तोड नाही. ढोबळ मानाने रंग दोनात विभागावे वाटतात.

भडक रंग आणि फिकट रंग! भडक रंग डोळ्यात पटकन जातात पण सुखावतातच असं नाही. याउलट फिकट मंद रंग मनाला शांत करतात, खुणावतात, मोहवतात! त्यांची सुंदरता मनाला भुरळ घालते. तसंही रंग आणि भावना यांचं जवळचं नातं आहे.

भडक लाल रंग डोळ्यात भरतो. जो शक्ती, युद्ध आणि धोका यांचं प्रतिक आहे. आज रंगांचा वापर वास्तुशास्त्रातही करुन घेतात. येणार्‍या लहरी या कायम चांगल्या असाव्यात, हा उद्देश! लिहिताना दोन रंगांचा आपण उपयोग करतो, पांढरा आणि काळा. पांढर्‍यावर काळं होतं आणि मग ते मनभर पसरतं. शुभ रंग आणि अशुभ रंग असंही रंगाचं वर्गीकरण करतात. दृष्टिकोनातूनही ज्यांच्यात्याच्या. काळा रंग याच पठडीतला, भयानक आणि काळा हे अलिखीत समीकरणच!

माणसाच्या स्वभावांनाही रंग असतात. कधी ते भडक असतात, कधी मवाळ, कधी मृदु मुलायम तर कधी दुष्ट खुनशी. त्यांच्या रंगानुसार त्यांचं वर्तन असतं. मानवी रंगांचा हा खेळ मात्र कधीतरी जिवघेणा ठरु शकतो. त्यांच्यासाठी आणि दुसर्‍यांसाठी पण! हीच माणसं सरड्यासारखी रंग बदलतात तेव्हा त्या रंग बदलाची घृणा वाटते. माणसानं कसं नितळ असावं. पार्‍यासारखं शुद्ध!
निसर्गातल्या अनेक रंगछटा माणसाला निसर्गाच्या अधिक जवळ नेतात. प्रेम करायला लावतात. निसर्गात वाढणारी अनेक फुलझाडं, फळझाडं, वृक्ष-वेली, त्यांची फुटणारी पालवी, त्यांची सुकलेली पानं. सगळ्यांचे रंग् वेगळे, छटा आगळ्या! अगदी गवत फुलापासून ते सुगंधी किंवा बिनसुगंधी फुलांचे रंग पाहून मन आश्चर्यानं भरुन जातं. ही किमया मनाला थक्क करते. आकाशातला उडता चमत्कार म्हणजे पक्षी. त्यांच्या पिसांचे रंग पाहताना परमेश्वराने त्यांना दिलेल्या जादुई किमयेची कमाल जाणवते. पक्षी पाहताना आकाशातील निळाई खुणावते. काळेपांढरे ढग त्या निळ्या चादरीवर नक्षीदार होऊन सरकतात. सूर्यास्त आणि सूर्योदय होताना क्षितिजावरची ती रंगांची पखरण विलोभनीय असते. संध्याकाळी जांभळ्या काळोखात उडणारी बगळ्यांची माळ लक्ष वेधून घेते.
सागराचे रंगही कधी गहीरे-निळे, कधी नितळ-काळे. वाळूत पावलं रुतली की तिच्या पोताचा स्पर्श पायांना होतो आणि चमचमती, सोनेरी, पांढरी वाळू सुखावते. कातळावरुन कोसळता शूभ्र धबधबा जमिनीवर आला की रंग बदलतो. काय आणि किती सांगावं रंगांबद्दल? विज्ञानाने कितीही दाखले दिले तरी इंद्रधनुची सप्तरंगी कमान डोळ्यांसाठी मेजवानीच असते. आपल्यापाशी डोळे असायला हवे आणि डोळ्यांपाशी नजर हवी. बाकी सगळं निसर्गानं भरभरून दिलेलं आहे.

-नीता जयवंत
अंबरनाथ
9637749790

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “रंग जीवनाचे!”

  1. balaji Dhage.

    सुन्दर मासिक विचार प्रवर्तक लेख. अप्रतिम. वाचनिय मजकुर.
    संग्राह्य सुन्दर अंक*?

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा