पायी वारीचा इतिहास

पायी वारीचा इतिहास

महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वारी’ हा वारकरी संप्रदायाचा आचार मार्ग आहे. समृद्ध परंपरा असलेली पंढरपूरची वारी वारकर्‍यांना पिढ्यान-पिढ्या आत्मिक समाधान देत आहे. कोणतेही निमंत्रण नसताना लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय यांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जातात.

आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या वारीबरोबरच दर एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी वारकरी जात असतो. वारकरी संत, वारकरी संप्रदाय यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे व यापुढेही होणार आहे. पंढरपूरची पायी वारी भारतातील संशोधकांबरोबरच परदेशी संशोधकांसाठी अभ्यासाचा विषय होत आहे. आषाढी वारी, पालखी सोहळ्याविषयी विविध संशोधकांनी तसेच विचारवंतांनी ग्रंथरूपाने लेखन केले आहे. प्रा. नीता टेंगले यांनी ‘पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास’ विशेषतः आषाढी वारी संदर्भात या ग्रंथामधून संशोधनात्मक लेखन केले आहे.

यशोदीप पब्लिकेशनने हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. संशोधनात्मक ग्रंथ लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना प्रा. नीता टेंगले म्हणतात, ‘वारीचा इतिहास, वारीचे तत्त्वज्ञान, वारीचे सामाजिक व धार्मिकदृष्ट्या योगदान, तसेच सध्याच्या परिस्थितीतील आवश्यकता, वारीच्या वाढत्या व्याप्तीबरोबर निर्माण झालेल्या काही समस्या व त्या समस्यांचे निरासन यासारख्या मुद्यांचा अभ्यास झाल्याचे दिसून येत नाही. वारीला जाणारा असंख्य समुदाय याविषयी अज्ञानी आहे. त्यामुळे या दृष्टिने वारीचा अभ्यास झाल्यास असंख्य लोकाना या परंपरेविषयी माहिती मिळेल. संशोधनासाठी प्रकाशित व अप्रकाशित साधनांचा उपयोग करतानाच प्रत्यक्ष वारीतील वारकर्‍यांशी लेखिकेने संवाद साधला आहे.

पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास प्रा. नीता टेंगले यांनी एकूण पाच प्रकरणातून विशद केला आहे.

1) पंढरपूरच्या वारीची पार्श्वभूमी
2) पंढरपूरच्या वारीचा ऐतिहासिक मागोवा
3) वारीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व
4) वारीमार्गातील समस्या
5) उपसंहार

नेमकेपणाने व अभ्यासपूर्ण लेखन केल्यामुळे संशोधनात्मक ग्रंथ असूनही वाचनीय झाला आहे.

‘पंढरपूरच्या वारीची पार्श्वभूमी’ या पहिल्या प्रकरणातून लेखिकेने भारताची आध्यात्मिक परंपरा, धर्म ही संकल्पना, भक्तिमार्ग याविषयीचे तपशीलवार विवेचन केले आहे. भागवत संप्रदाय हा माळकरी संप्रदाय कसा आहे याविषयी र. रा. गोसावी, शं. वा. दांडेकर यांचे संदर्भ देऊन विवेचन केले आहे. वारकरी संप्रदायातील वारीचे स्थान व वारीचा अर्थ स्पष्ट करताना प्रा. नीता टेंगले म्हणतात, ‘पंढरीची वारी केल्याने विठोबाचे दास झाल्याने आत्मसुख सापडते. या वारीतून भक्तांना मिळणारा आनंद हा इतर आनंदाहून अतिउच्च असे आत्मिक सुख देणारा असतो. म्हणूनच तो आनंद मिळविण्यासाठी विट्ठल भक्त वर्षानुवर्षे पंढरीची वारी करताना दिसतात.’

दुसर्‍या प्रकरणातून पंढरपूरच्या वारीचा ऐतिहासिक मागोवा प्रा. नीता टेंगले यांनी घेतला आहे. चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी या चार वार्‍या आहेत. यामधील आषाढीची वारी वारकर्‍यांना अधिक प्रिय आहे. आषाढी वारीचे वर्णन करताना लेखिका म्हणतात, ‘ही यात्रा आषाढात म्हणजे ऐन पावसाळ्यात भरते. पेरणी करून बहुतेक शेतकरी या यात्रेस आलेले असतात. कष्टकरी शेतकर्‍यांना वर्षातील इतर वार्‍या करण्यास वेळेअभावी शक्य झाले नाही तर त्या शेतकर्‍यांना आषाढ महिन्यातील वारी सोयीस्कर ठरते’. आषाढी वारीमध्ये लाखो भक्तांबरोबरच पाश्चात्य अभ्यासकही सहभागी होतात.

पंढरपूरचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाविषयी विविध समीक्षक संशोधकांचे संदर्भ देत तपशीलवार विवेचन लेखिकेने केले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पूर्वीही वारी होती याविषयीचे वर्णन आढळते. नारायण महाराजांचे पालखी सोहळ्यातील योगदान लेखिकेने तपशीलवार लिहिले आहे. ‘नारायण बाबांनी तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरची वारी केल्यास दिंडीत तुकाराम महाराज आहेत असे टाळकरी समजतील व त्यांच्या दु:खाची तीव्रता कमी होईल असा विचार करून इ. स. 1685 च्या सुमारास पंढरपूरकडे देहू येथून जाणार्‍या दिंडीत पालखीची परंपरा सुरू केली. त्या पालखीमध्ये देहू येथे संत तुकारामांच्या पादुका तर आळंदीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवून पंढरपूराकडे पालखी घेऊन जाण्याची परंपरा वारीत सुरू झाली. त्यामुळेच ज्ञानोबा-तुकोबा पालखीत आपल्याबरोबर आहेत त्यांच्या समवेत आपण पंढरपूरला चाललो आहोत ही वारकर्‍यांची धारणा असते’.

वारीतील रिंगण, वारकर्‍यांचा धावा, न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजात पालखी सोहळ्याविषयी दिलेले व्याख्यान, पालखीतील वाद, पालखी तळ व पालखी मार्गात झालेले बदल, पंढरपूर देवस्थान कायदा, संत तुकाराम महाराजांच्या आरतीचा वाद इ. संदर्भात प्रा. नीता टेंगले यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. जिज्ञासू वाचकांनी हे विवेचन मुळापासून वाचणे आवश्यक आहे.

वारीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व या तिसर्‍या प्रकरणातून वारीतील कीर्तन व प्रवचन, भजन, भारूडातून होणारी समाजजागृती, स्त्री वारकरी आणि पंढरीची वारी या विषयीचे विवेचन केले आहे. ‘वारीमध्ये काही दिवसांचा प्रवास स्त्री-पुरुष एकत्रपणे करतात. अशावेळी कोठेही स्त्रियांच्या बाबतीत गैरप्रकार घडल्याचे आढळत नाही. वारीमध्ये सर्व स्त्रियांना माता-भगिनीसारखी वागणूक दिली जाते’ असे महत्त्वाचे निरीक्षण लेखिकेने नोंदवले आहे. वारीतील शिस्त, सामाजिक एकतेसाठी पंढरपूरची वारी कशी गरजेची आहे यासंदर्भातील माहिती प्रा. नीता टेंगले यांनी दिली आहे. पंढरपूरच्या वारीमुळे अनेक वारकरी व्यसनापासून दूर झाले याविषयीचेही दाखले लेखिकेने दिले आहेत.

‘वारीमार्गातील समस्या’ या चौथ्या प्रकरणातून लेखिकेने पंढरपूर व वारीमार्गातील अस्वच्छतेवर प्रकाश टाकला आहे. उष्ट्या पत्रावळीचे ढीग, फळांच्या साली, केरकचरा, मलमूत्र विसर्जन यामुळे सार्वजनिक स्वच्छता कशी धोक्यात आली आहे हे स्पष्ट केले आहे. वारकर्‍यांचे आरोग्य, पिण्याच्या पाण्याची समस्या, वाहतूक समस्या या संदर्भात प्रा. नीता टेंगले यांनी लेखन केले आहे.

पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास समजून घेण्याच्या दृष्टिने प्रा. नीता टेंगले यांचा हा संशोधनात्मक ग्रंथ महत्त्वाचा आहे.

‘पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास’
प्रा. नीता टेंगले
प्रकाशक – यशोदीप पब्लिकेशन, पुणे
पृष्टे – 152, मूल्य – 280

-डॉ. राजेंद्र थोरात
पुणे
9850017495

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा