सावरकरांची कविता: आत्मबल -सौ. सुषमा राम वडाळकर, बडोदे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्या लेखनातून व आजवर वाचलेल्या त्यांच्याबद्दलच्या प्रत्येक लेखातून, पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते ती त्यांची प्रखर देशभक्ती, ओजस्वी बुद्धिमत्ता, त्यांची काव्यप्रतिभा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे ‘आत्मबल’ होय.

या आत्मबलाच्या जोरावरच तर ते मार्सेलिसच्या समुद्रात जहाजाच्या हातभर रुंद खिडकीतून 20 फूट उंचावरून अथांग समुद्रात उडी टाकू शकले होते व याच आत्मबलाच्या जोरावर अंदमानासारख्या ठिकाणी एका अंधार्‍या कोठडीत, अनन्वित शारीरिक तसेच मानसिक छळ सहन करू शकले होते. ‘आत्मबल’ या त्यांच्याच कवितेत त्यांनी मृत्युला केलेले एक भीषण आव्हान आहे व तेही राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी झपाटलेल्या वृत्तीमुळे.काय असेल त्या वेळी त्यांची गलबलवणारी मनोदशा जेव्हा त्यांनी केवळ मायभूमीच्या ध्यासाने सागरात उडी टाकली असेल?
समोर अथांग सागर, दाहीदिशांनी साद घालणारा मृत्यू, ब्रिटिश शिपायांच्या गोळ्यांच्या रुपाने, हाडं थिजवणार्‍या थंडीने, खार्‍या पाण्याने अंगावरच्या जखमांना होणार्‍या दाहामुळे, विकराळ लाटांच्या रुपाने  मृत्यू त्यांना प्रत्येक क्षणी गिळू पाहत होता परंतु त्या क्षणी त्यांना मरणही परवडणारे नव्हते.

विकट प्रसंगी, अनेक अडथळ्यांना पार करत, अक्षरश: मृत्युला मात देऊन ते फ्रान्सच्या किनार्‍यावर पोहोचू शकले ते केवळ आत्मबळाच्या जोरावर. तिथे पोहोचल्यावर त्यांनी लिहिलेली ही कविता. कवितेतून ते स्वत:चे मनोबळ वाढवताना ते म्हणतात,
अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला ।
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ॥
मला ‘आदि’ नाही म्हणजेच प्रारंभ नाही व अंतही नाही. माझा वध होऊ शकत नाही. मला मारू शकणारा शत्रू अजून जन्मलेला नाही.
अट्टहास करित जई धर्मधारणी ।
मृत्युशीच गांठ घालू मी घुसे रणी ॥
एका झुंजार लढवैयासारखे ते मृत्युशी लढत होते. अट्टहास त्याला हरवण्यासाठी होता, तोही अभिमानाने नव्हे तर ध्येय सिद्ध करण्याच्या निश्चयाने. मृत्युशी गाठ घालूनच ते रणांगणात शिरले होते; त्यामुळे त्यांना मृत्युची भीती अजिबात नव्हती.
ते म्हणतात,
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो ।
भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो ॥
खुळा रिपु तया स्वये ।
मृत्युच्याच भीतीने भिववू मजसी ये ॥
मला अग्नी जाळू शकत नाही वा खड्गही छेदू शकत नाही. भ्याड  म्हणजे भितरा मृत्यू देखील मला पाहून पळतो तर खुळ्या शत्रूची काय मजाल?
तो कसा काय मला भिववू पाहण्याचे धाडस करतोय? भगवत्गीतेत भगवंताने सांगितलेले सार, आत्मा अमर असतो हे त्यांनी अंगी बाणले होते. देह नश्वर असला तरी आत्मा अमर आहे, त्यातील विचारही चिरंतन राहतील.
लोटी हिंस्र सिंहांच्या पंजरी मला ।
नम्रदाससम चाटिल तो पदांगुल ॥
मला हिंस्र सिंहाच्या पिंजर्‍यात जरी टाकलेत तरी तो माझे काहीच बिघडवू शकणार नाही; उलट माझाच दास होऊन राहील व माझे पाय चाटेल.
त्यांची नितांत देशभक्ती व त्यातून उपजणारे हे आत्मबल. पारतंत्र्याच्या बेड्या सोडवून राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छाशक्ती.
कल्लोळी ज्वालांच्या फेकिसी जरी ।
हटुनि भवति रचिल शीत सुप्रभावली ॥  
मला ज्वालांच्या कल्लोळात जरी फेकलेत तरी माझ्याभोवती आपोआप शीत सुप्रभावली अर्थात् थंडगार महिरप रेखिली जाईल.
क्रूरता, शत्रुत्व, द्वेष, राग असा कुठलाही अग्नी माझ्या भोवती टिकू शकणार नाही. शांतता, स्थैर्य, बंधूत्व हे सारे आपोआप रेखाटले जाईल.
संकटात सापडले असतानाही त्यांना सुचणारा हा प्रचंड आशावाद, हीच त्यांची ताकद होय.
ते पुढे म्हणतात,
आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते ।
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते ॥
तुम्ही कितीही मोठे सैन्य आणा, आग ओकणारे यंत्र, अस्त्र शस्त्र आणा (जो पर्यंत माझे आत्मबल माझ्या सोबत आहे तोपर्यंत कुठलाही शत्रू काही करू शकणार नाही.)
ते म्हणतात,
हलाहल त्रिनेत्र तो ।
मी तुम्हासी तैसाची गिळुनि जिरवितो ॥
जितक्या सहजतेने शंकराने हलाहल गिळून टाकले तितक्या सहजतेने मी तुम्हाला गिळून टाकेन. क्रूरतेचे व शत्रुत्वाचे जहर मी जिरवून टाकेन व माझ्या मातृभूमीवर शांतता, सौहार्दता यांचे अमृत पसरवेन.
दुर्दम्य इच्छाशक्ती, ध्येय प्राप्तीसाठी सदैव झपाटलेले त्यांचे तन, मन मायभूमीसाठी तळमळत होते.
अंत:करणात असलेली मातृभूमीची ओढ, निस्सीम प्रेम यांचे अजोड संमिश्रण म्हणजेच सावरकरांच्या नसानसातून वाहणारे रक्त होय. ब्रायटनमधे समुद्राशी संवाद साधणारे, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ म्हणणारे वीर सावरकर वेळी त्यालाही धमकावू शकत होते की अगस्ति ऋषींना एका आचमनात त्याला प्राशू शकण्याचे सामर्थ्य होते.
अशा या थोर देशभक्ताला, अखंड भारताचे स्वप्न शेवटपर्यंत जपणार्‍या व त्याचसाठी लढणार्‍या, प्राण पणाला लावणार्‍या भारतभूच्या लाडक्या सुपुत्राला शतशः प्रणाम.

-सौ. सुषमा राम वडाळकर, बडोदे

(प्रसिद्धी ‘साहित्य चपराक’ मासिक जून २०२४)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा