बी पॉझिटिव्ह

असं म्हणतात आयुष्यात दोन-चार ठेचा खाल्याशिवाय माणसाला शहाणपण येत नाही. जो चुकतो तोच शिकतो आणि पुढे जातो. जो चुकतो पण शिकत नाही तो तिथंच राहतो आणि जो कधी चुकतच नाही तो माणुसच नसतो.

 

आत्तापर्यंतच्या माझ्या थोड्याथोडक्या सेल्स आणि मार्केटींगच्या अनुभवावरून मला तरी असं वाटतं की तुमचा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातो. अगदी सेल्सच्या भाषेत सांगायचं तर साठ-सत्तर टक्के शिक्षण तुम्हाला तुमच्या अनुभवातूनच मिळते आणि राहिलेलं तीस-चाळीस टक्के तुम्हाला इतर गोष्टीतून मिळतं.

आता सेल्स म्हटलं की वेगवेगळ्या गंमती जमती आणि किस्से नाही म्हटलं तरी कानावर येतातच. त्यातले उदाहरणादाखल एक-दोन किस्से तुमच्या सोबत शेअर करतो.  सेल्स व्हिजीटला गेल्यावर प्रत्येक वेळेस सगळेच ग्राहक तुमच्याशी चांगले वागतीलच ह्याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. एवढंच काय एकच ग्राहक दोन वेगळ्या भेटीच्या वेळेस एकाच प्रकारचं वर्तन करेल असं पण नाही, पण विक्रेत्याला नेहमी नम्र रहावं लागतं. ग्राहक कितीही वाकड्यात शिरू दे!

असाच एक ग्राहक होता. त्याला काहीही बोलू दे, तो नेहमी वाकड्यात शिरायचा. एकेदिवशी असंच तो नेहमी कसा वाकड्यात शिरतो हे दाखवण्यासाठी मी माझ्या ऑफिसमधील सहकार्‍याला माझ्याबरोबर घेऊन गेलो. सकाळची वेळ होती. वातावरण पण मस्त होतं. आम्ही त्याच्या केबिनच्या दरवाजावर ठोठावून आत गेलो. आता कोणालाही भेटल्यावर आपण प्रथम नमस्कार मराठीमध्ये आणि गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून इंग्रजीमध्ये म्हणतो. हा एक शिष्टाचार आहे. म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘‘गुड मॉर्निंग सर!’’ माझ्या ह्या वाक्यावर त्यांनी एकदम त्रासिक चेहर्‍याच्या भावाने माझ्याकडं बघितलं आणि म्हणाले, ‘‘व्हॉट इज सो गुड अबाऊट धीस मॉर्निंग?’’ त्यांच्या ह्या प्रश्नाने मी थोडा गोंधळलो आणि मित्राकडे बघितलं. प्रामुख्याने दोन भाव माझ्या चेहर्‍यावर होते. एक म्हणजे आजची पण सेल्स व्हिजीट वाया गेली कारण ग्राहकाचा मूड ठीक नव्हता आणि दुसरा म्हणजे बघ मी म्हटलो नव्हतो हा नेहमी वाकड्यात शिरतो ते. बघ पुराव्यानिशी दाखवलं की नाही असा होता. मी काही न बोलता मागे होणार इतक्यात माझ्या खांद्यावर मित्राने हात ठेवत मला थांबवलं.  ’’सर, ऑन धिस लव्हली मॉर्निंग यू आर अलाईव्ह, वुई आर अलाईव्ह, इजंट इट गुड अबाऊट धिस मॉर्निंग अँड वुई गेट टू सी वन मोअर डे ऑफ अवर लाईफ.’’

मित्राच्या  या वाक्यावर तो ग्राहक अवाक झाला. त्यांनी एक स्मित दिले. बस्स! मग काय पुढचं काम करायला मला वेळ नाही लागला आणि आम्ही त्याच्याकडून ऑर्डर घेऊनच बाहेर पडलो.   त्यादिवशी मित्राला एक फक्कड चहा पाजला. ‘‘तुला हे ऐनवेळेस कसं काय जमलं?’’ मी मित्राला विचारलं.   ‘‘काही नाही रे, माणसाने नेहमी सकारात्मक रहावं; कारण ’नाही’ मध्ये पण पुढची संधी लपलेली असते. आपल्याला ती बघता आली पाहिजे आणि प्रत्येक संधी आपल्याला काही ना काही शिकवून जाते.’’

‘‘तुला अनुभव म्हणायचंय का?’’

‘‘हो, तू जर एखाद्या संधीचं सोनं केलंस तर ती एक आठवण बनून जाते, एक चांगला अनुभव आणि तेच जर तू त्यात अयशस्वी झालास तर तुला धडा शिकवून जाते. एक वाईट अनुभव पण मानवी स्वभाव असा आहे ना की अनुभव म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा वाईट अनुभव आठवतात. पण संधी हा शब्द असा आहे की, त्याच्याकडे सगळे लोक अगदी 99% लोक चांगल्या नजरेने बघतात कारण तो शब्दच तसा आहे. पॉझिटीव्ह! त्याच्यामुळे मित्रा ’बी पॉझिटीव्ह.’ मग तुला सगळीकडेच संधी दिसतील. अगदी ’नाही’मध्ये सुद्धा!’’
‘‘खरंच बरोबर तुझं. मानलं तुला मित्रा.’’
‘‘बी पॉझिटीव्ह!’’

निखिल भोसकर संपर्क: 9921792127

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा