आगीतून उठून फुफाट्यात!

आगीतून उठून फुफाट्यात!

आकुर्डीच्या कंपनीतील नोकरी मी सलग पाच वर्षे केली परंतु रोज 70-80 किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास मला नंतर नंतर पाठदुखीने त्रस्त करू लागल्यामुळे मी पुण्यातल्या संगम पुलाजवळील एका पॅकेजिंग मशीन बनवणार्‍या कंपनीत 1994 च्या सप्टेंबरला रुजू झालो. चांगला दीड वर्ष म्हणजे 1996 पर्यंत मस्त रुळलो होतो. मस्त मजेत चालले होते सगळे. नुकताच कुठे माझा जम ह्या कंपनीत बसू लागला होता. कलकत्ता, दिल्ली, चंडीगड अशी महाराष्ट्रभर माझी फिरतीही चालू होती.

1996 ला मी एक जुनी फियाट गाडीही घेतली होती. ही गाडी म्हणजे माझ्या आयुष्यातील पहिली चार चाकी होती. जुनी का होईना पण त्याकाळी चार चाकी गाडी असणारा आमच्या खानदानातील आणि मित्रमंडळीतील मी एकमेव होतो. खूप धमाल करत होतो आम्ही त्या काळी. फियाट गाडी आल्यापासून तर आम्ही भिंगरीसारखे फिरत होतो. जरा सुट्टी मिळाली की चालले फिरायला! आख्खे कोकण पिंजून काढले होते त्यावेळेस.

ह्याच कंपनीत काम करणार्‍या माझ्या दोन सहकारी मित्रांनी सोलर सेल बनवण्याची एक कंपनी, कंपनीच्या मालकांच्या मदतीने काढली होती व मला त्या कंपनीमध्ये येण्याची विनंती केली होती, जी मला टाळता आली नाही व मित्रांच्या सोलरच्या कंपनीत रुजू झालो.

अमेरिकेच्या अक्षय ऊर्जास्तोत्र साठीच्या औद्योगिक मदतीच्या धोरणानुसार ह्या सोलर कंपनीच्या प्रकल्पाला काही अनुदान मिळाले होते. प्रकल्प खरचं खूपच चांगला होता. अमेरिकेत प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या चाचणीनुसार प्रयोगशाळेत अतिशय उत्तमरित्या सोलर सेल बनवण्यात ही मंडळी यशस्वी झाली होती आणि म्हणूनच त्यांना भारतात ह्या सोलर सेलचे उत्पादन करण्यास सांगण्यात आले होते. ह्या प्रकल्पासाठी लागणारी जागा पाच वर्षाच्या भाडेपट्टीवर सिंहगडरोडवर सध्याच्या राजाराम पुलाजवळ मिळाली होती. बाकी मशीन आणि इतर सामुग्री एक एक करून बनवून घेण्यात येणार होते व त्यासाठी लागणारा पैसा हा काही प्रमाणात अमेरिकेच्या मदतीने मिळणार होता व काही कंपनीच्या संचालकांच्या गुंतवणुकीतून येणार होता.

एकंदरीत हा प्रकल्प फारच आशावादी होता व यशस्वी झाला तर भारताचे नाव तर उज्ज्वल करणारा होता तसेच आमचे सगळ्यांचेही भवितव्य घडवणारा होता पण त्याचे काय आहे ना, आपण जे समजतो, योजतो, ठरवतो, कल्पना करतो, प्रयोजन करतो आणि स्वप्नरंजन करतो अगदी तसेच घडले तर काय?

1996 ते 1197 हे एक वर्ष सर्व योजना सूत्रबद्ध पद्धतीने आखून ती नीटपणे प्रत्यक्षात उतरवण्यात गेले. खरी कसोटी होती ती ह्या प्रकल्पास लागणार्‍या यंत्र सामुग्रीची. योग्य ती साधनसामुग्री पुण्यातच बनवून घेण्यात आली. सोलर सेल बनवण्यासाठीचा कच्चा माल म्हणजे (विशिष्ट) प्रकारच्या काचा, सोडियम सल्फाईड आणि कॅडमियम टेलूराईड तसेच खासकरून बनवलेली ग्राफाईटची आणि चांदीची पेस्ट अमेरिकेहून मागवण्यात आल्या. आता फक्त ह्या मशीनची चाचणी घेणे व लवकरात लवकर उत्पादन करणे एवढेच राहिले होते.

एक भले मोठे हवेची पोकळी असलेले मशीन बनवण्यात आले होते. त्यात ह्या 100 द 100 मिलीमीटरची विशिष्ट पद्धतीने स्वच्छ केलेली एक एक काच एका मागून एक अशी एका पट्ट्याद्वारे सोडायची. ही एक एक काच एका विशिष्ट ठिकाणी आली की साधारण 700 डिग्री तापमानावर तापवलेल्या सोडियम सल्फाईडचा तिच्यावर एक नाजूक थर दिला जायचा व तिच काच पुढे तशीच पुढे जावून पुन्हा एकदा 700 डिग्री तापमानावर तापवलेल्या कॅडमियम टेलूराईडच्या थराने भरायची व तशीच मशीनमधून पुढे जायची. अशा एकामागून एक 100 काचा गेल्या की हे मशीन बंद करायचे व ते थंड झाले की ह्या काचा काढून घेऊन पुढील प्रक्रिया करायला म्हणजे ग्राफाईटचा एक थर लावायला पाठवायाचा. तो थर झाला की शेवटी चांदीचा थर लावायचा. त्यांनतर लेझरने काही विशिष्ट खुणा केल्या जायच्या, ज्यामुळे हा सोलर सेल तयार व्हायचा. तो तयार झाला की प्रयोगशाळेत त्याची तपासणी करायची व त्यानंतर तो विक्रीसाठी तयार केलेल्या वेष्टनात गुंडाळून ठेवायचा. इतके साधे आणि सोपे गणित होते.

पण आमच्या अथक प्रयत्नांना ह्या सगळ्यात कधीच यश आले नाही. कधी कधी काचा आतल्या आत फुटायच्या तर कधी तापमान प्रचंड वाढून काचा मशीन मध्येच वितळून जायच्या. सुरवातीला वर्ष दीड वर्षे हे सगळे असेच चालू होते.

माझ्या ह्या उत्पादन विभागात आधी फारच थोडा सहभाग असायचा पण नंतर नंतर काही इंजिनियर मंडळी कंटाळून सोडून जायला लागली व प्रकल्पाच्या कामावर त्याचा वाईट परिणाम व्हायला लागला. मग काय, जिथे कमी, तिथे आम्ही ह्या संकल्पनेनुसार माझ्यावरही रात्रपाळीच्या उत्पादनाची जबाबदारी टाकण्यात आली. मी आणि माझे सहकारी मित्र, रात्रभर मान मोडेस्तोवर काम करायचो.

पण आमच्याही कामाला यश येत नव्हते. माझ्या निरीक्षणात एक गोष्ट आली की हे जे मुख्य मशीन आहे त्यात काही ठराविक बदल करणे गरजेचे आहे. ज्यासाठी आम्ही एनसीएलमध्ये सुद्धा जाऊन काचा कशा गरम करतात व त्या कशा हाताळतात हे पाहून आलो होतो. थोड्याफार बदलाने हे मशीन नंतर काम करायला लागले व थोडेफार उत्पादन करू लागले परंतु सोलर सेल तयार होण्यासाठी लागणार्‍या सोडियम सल्फाईड आणि कॅडमियम टेलूराईडच्या थराचे गणित कुठेतरी चुकत होते.

एक दिवस मी चांदीचा थर देणार्‍या मशीनवर काम करत असताना एक काच मशीनमध्ये अडकली. ती काढायला मी एक पट्टी घातली तर ते मशीन जोरात खाली आले व माझा डावा हात त्या मशीनखाली सापडला. जिवाच्या आकांताने मी ओरडत होतो. मला भोवळ यायला लागली होती. तेवढ्यात माझ्या एका सहकार्‍याचे लक्ष गेले. मी त्याला पहिले मशीन बंद करण्यास सांगितले. मशीन बंद केल्यावर वीस मिनिटांनी अथक प्रयत्नांती माझा मशीनखाली अडकलेला हात काढण्यात आला व मला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आले.
नशिबाने माझा हात शाबूत होता, मोडतोड नव्हती. फक्त सूज होती पण त्यामुळे मला परत मशीनवर काम करण्याची मुभा नव्हती.

आम्ही सगळे मिळून 4-5 जणांची टीम ह्या प्रकल्पासाठी दिवसरात्र खपत होतो. नोकरी न समजता अगदी स्वत:चाच प्रकल्प असल्यासारखे आमचे वागणे होते. सगळे अगदी एकरूप होऊन काम करत होतो.

ह्या प्रकल्पाने आम्हाला खूप काही शिकवले. कागदावर कितीही आयोजन केले, नियोजन केले तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य त्या तंत्रज्ञानाची, योग्य त्या कौशल्याची, आर्थिक नियोजनाची आणि योग्य त्या मनुष्यबळाची खूप गरज असते अन्यथा हे कागदावरचे नियोजन कागदावरच राहते किंवा केलेल्या कष्टांचे चीज होत नाही.

त्यातच आम्हाला आर्थिकदृष्ट्या खूपच अडचणी येऊ लागल्या. शेवटी व्यवस्थापनाने हा प्रकल्प बंद करण्याचे ठरवले व 1999 साली माझ्यावर पुन्हा एकदा नव्याने नोकरी शोधण्याची वेळ येवून ठेपली.

आलीया भोगासी, असावे सादर असे म्हणून मी परत एकदा झाले गेले सगळे विसरून नवीन नोकरी शोधायला सुरवात केली. अथक प्रयत्नांती ती मिळालीही पण ह्यावेळेस ती होती गुजरातमधील वापीमध्ये. माझा नाईलाज होता. काय करणार! हसतमुखाने ही नोकरी मी स्वीकारली आणि वापीला रुजू झालो.

रविवारी सुट्टी असायची म्हणून मी दर शनिवारी संध्याकाळी वापीवरून मुंबई मार्गे पुण्यात यायचो व रविवारी रात्री परत वरुणच्या बसने वापीला जायचो व सोमवारी सकाळी कामावर हजर रहायचो. तीन महिने कसे बसे हे केले पण तिथे सुद्धा त्या कंपनीतील काही स्थानिक लोकांच्या राजकारणामुळे, माझ्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष स्वभावामुळे मला अडचणी येऊ लागल्या. मला एकंदरीत सगळे कसे असुरक्षित वाटू लागले. तिथल्या वातावरणाचा आणि लोकांचा त्रास होऊ लागला. काही केल्या माझे मन ह्या नोकरीत रमेना. मग काय, नाईलाजाने वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्या संमतीने ह्या कंपनीलाही राम राम ठोकून परत एकदा पुण्यात नशीब आजमावायला निघून आलो. म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग.

माझे नशीब मला पुन्हा पुन्हा आगीतून उठून फुफाट्यात टाकत होते. मी परत तितक्याच उमेदीने परिस्थितीस सामोरे जात होतो.

-रविंद्र कामठे
पुणे
9822404330

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा