सु(संवाद)…

सु(संवाद)...

‘‘ए मूर्खा तुला काय कळतं की नाही, ठेव ते बाजूला!’’
‘‘जरा म्हणून अक्कल नाही…’’
‘‘ये म्हातार्‍या जरा ऐक की…’’
‘‘चल हो बाहेर, सगळी वाट लावली…’’

‘‘अरे नीट खा की, सगळं कपड्यावर सांडवलं की…’’

‘‘चल उरक की लवकर…’’

दररोज सकाळी ऑफिसला जायची गडबड एका बाजूला चालू असताना खालच्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून तावातावात चालू असलेली जुगलबंदी अगदी नको नको म्हणत असताना कानावर आदळत असते. आता या गोष्टीची इतकी सवय झालीय की एखाद्या दिवशी भांडणाचे आवाज आले नाही तर चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं…

या जुगलबंदीत फक्त काकूंचा आवाजच टिपेला गेलेला असतो. काका मात्र अगदी हळू आवाजात वाद घालत असतात; पण माझा अंदाज आहे की ते जे काही बोलत असावेत त्याने काकूंचा पारा अजूनच चढलेला असतो. निदान आवाजाच्या वाढत्या टीपेवरून तरी तसं वाटत राहतं!

या दरम्यान माझी सौ. नेमकी किचनमध्ये असते आणि खालच्या किचनमध्ये चालू असलेली ही जुगलबंदी माझ्यापेक्षा तिला जास्त स्पष्टपणे ऐकू येत असते.

सुरूवात झाली की सौ. मला हमखास हाक मारुन सांगते…

‘‘झाली बघा सुरू जुगलबंदी! किती भांडतात हो दोघे?’’

मग मीही तिला चिडवत ऐकवतो…‘‘बघ, ते भांडण ऐकून ऐकून तू ही माझ्याशी म्हातारपणी असं वागू नको म्हणजे झालं!’’

आम्हा दोघांसाठी दररोज सकाळी हा एक विनोदाचा विषय असतो…

ऑफिसला जायची गडबड असते त्यामुळे तपशीलात कधी गेलो नाही; पण हेच काका-काकू मला सोसायटीत फिरताना दिसले की ते भांडणारे काका-काकू हेच आहेत का अजून कुणी? असा प्रश्न पडावा! कारण काकू हातात काठी घेऊन टेकवत टेकवत पुढे चाललेल्या असतात आणि काका अगदी हळूहळू त्यांच्या मागे मागे चालत चाललेले असतात. काकू त्यांची वाट बघत थांबतात. त्या दोघांच्या नजरेत एकमेकांबद्दल दिसत असलेला स्नेह नक्कीच विचार करायला लावतो…

एक दिवस सुट्टी घेतली होती त्यामुळे निवांत बसलो होतो आणि अचानक ती जुगलबंदी चालू झाली. माझं कुतूहल मला शांत बसू देत नव्हतं, त्यामुळं मी खालच्या फ्लॅटमध्ये त्या दोघांना कळणार नाही अशा पद्धतीनं डोकावलं आणि आश्चर्यानं पहातच राहिलो…

बहुतेक काका आत्ताच आंघोळ करून बाहेर आलेले असावेत आणि काकू टॉवेलनं त्यांचं डोकंखसाखस पुसून देत होत्या! एका बाजूला त्यांची तोंडाची टकळी चालू होती…

‘‘अरे बहिरटा, जरा डोकं खाली घे की! डोकं जर ओलं राहिलं तर बसशील खोकत आणि हो, लगेच गरम गरम पोहे खाऊन घे! मग फिरायला जाऊ! ये येड्या ऐकतोय ना?’’

तो त्यांचा सुसंवाद ऐकून मला खरं तर खूप हसू आलं! मी तेथून काढता पाय घेतला…

या जोडप्याबद्दल कुतूहल होतं त्यामुळं दुसर्‍या शेजार्‍याबरोबर थोडी चर्चा केली…

या दोघांचं एकेकाळी जवळच्या तालुक्यात प्रचंड कमाई असलेलं दुकान होतं. वय झाल्यावर ते दुकान विकून आपल्या एकुलत्या एक मुलाबरोबर ते कोथरुड येथे मोठा बंगला घेवून रहायला आले. पुढं मुलाचं लग्न थाटात झालं. मोठ्या घरातून आलेल्या सुनेनं सासूच्या फटकळ बोलण्यावरून दररोज भांडण सुरू केलं आणि दररोजची कटकट नको म्हणून मुलानं आपल्या आईबापाला या फ्लॅटमध्ये आणून ठेवलं आहे.

आता काकूंचे गुडघे गेलेत तर काकांना दिसण्याचा आणि ऐकण्याचाही प्रॉब्लेम आहे. आपल्या तरुणपणी प्रेमविवाह करून शून्यातून आपलं विश्व साकारणारे हे दोघे आज एकमेकांना छान सांभाळून घेत आनंदानं जगताहेत. एकमेकांचं दुखलं-खुपल तर एकमेकांची काळजी घेतात. नियमित फिरणं, आहार-विहार या बाबतीत जागरूक असलेलं हे जोडपं आपली नवी इनिंग मस्त जगताहेत! आणि हो… ती सकाळी-सकाळी चालू असलेली जुगलबंदी म्हणजे त्या दोघांचा अगदी नेहमीचा प्रेमळ संवाद असतो…!

-प्रल्हाद दुधाळ
मार्केट यार्ड, पुणे
9423012020

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा