पुणे, (प्रतिनिधी) : ‘चपराक‘ने प्रकाशित केलेल्या सुनील जवंजाळ लिखित ‘काळीजकाटा’ या कादंबरीला ऑगस्टमध्ये दोन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे. 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरी, गदिमा प्रतिष्ठान व नारायण सुर्वे कला अकादमीच्या वतीने मृत्युंजय साहित्य पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार सांगोला तालुक्यातील चोपडीचे सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ या कादंबरीला जाहीर झाला आहे.
रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व ग्रंथ भेट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा सोहळा भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात संपन्न होणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रसिद्ध कलाकार सुबोध भावे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, पानिपतकार विश्वास पाटील, साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, गदिमा प्रतिष्ठानच्या विश्वस्त शितल माडगूळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, गदिमा प्रतिष्ठानच्या विश्वस्त शितलताई माडगूळकर व मसापचे अध्यक्ष मुरलीधर साठे यांनी कळवले आहे. तसेच, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सिन्नर, जि. औरंगाबादच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट वाङ्मयाला साहित्य पुरस्कार दिला जातो. यावर्षी उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी ‘चपराक’च्या ‘काळीजकाटा’ कादंबरीची निवड करण्यात आली असल्याचे संयोजक रवींद्र कांगणे यांनी कळवले आहे.
या कादंबरीस महाराष्ट्र साहित्य परिषदेचा साहित्यविश्वात मानाचा समजला जाणारा ग. ल. ठोकळ उत्कृष्ट ग्रामीण साहित्य पुरस्कार, सोलापूर येथील मनोरमा साहित्य पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा विशेष पुरस्कार यासह इतर सात पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे. सदर कादंबरीच्या यशाबद्दल ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले, ‘चपराक प्रकाशन’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके,मसापचे जिल्हा प्रतिनिधी कल्याणराव शिंदे, पद्माकर कुलकर्णी, विद्या मंदिर परिवारातील सर्व शिक्षकांनी व साहित्य वर्तुळातील असंख्य वाचकांनी सुनील जवंजाळ यांचे अभिनंदन केले.
खुप छान बातमी सर जी आभारी आहे