1984 ला लॉ कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होतो तेव्हाची ही गोष्ट. मी आणि माझा एक मित्र त्याच्या स्कूटरवरून एका गुरवारी लॉ कॉलेजवरून परत येता येता गरवारे कॉलेजवरून येत होतो. खंडूजी बाबा चौकातून पुढे गरवारे पुलावरून जात असताना, माझ्या मित्राला सायकलवरून चाललेली एक मुलगी खूप आवडली आणि तो मला म्हणाला ‘‘रव्या तिला आपण तिचे नाव विचारायचे का?’’
मी त्याला म्हणालो ‘‘कशाला उगाच गडबड करतो!’’
मला म्हणाला ‘‘मला ती फारच आवडली आहे,’’ असे म्हणून त्याने स्कूटर त्या मुलीच्या सायकलच्या जवळ नेली. तोपर्यंत आम्ही गुडलक चौकात पोचलो होतो आणि नेमका त्याच वेळेस चौकात लाल सिग्नल लागला होता. मित्राने स्कूटर त्या मुलीच्या सायकलजवळ उभी केली आणि तिच्याकडे बघून हसला! तिने दुसरीकडे तोंड फिरवले आणि आमच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने तिला इंग्रजीत हॅलो केले आणि सरळ सरळ तिचे नाव विचारले. ती मुलगी एक सेकंद गोंधळून गेली. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला. आम्ही पुढे त्यांच्या मागे फर्ग्युसन कॉलेज रस्त्याला जायला लागलो.
आता मात्र मी मित्राला म्हणालो की; ‘‘जरा गाडी त्या मुलीच्या जवळ घे!’’ त्याने स्कूटर जवळ नेल्यावर मी त्या मुलीला सरळ सरळ विचारले की, ‘‘रूपालीत येतेस का? तुझ्याशी जरा बोलायचे आहे.’’
तुमचा विश्वास बसणार नाही! जी मुलगी मघाशी आमच्याकडे ढुंकून बघायला तयार नव्हती ती चक्क ‘हो’ म्हणाली! मनातल्या मनात स्वत:ला शिव्या घालत होतो. ‘‘कशाला उगाच झक मारली राव! आपल्याला जर त्या गावाला जायचेच नव्हते तर कशाला त्या गावाच्या गाडीची चौकशी केली! आता भोगा आपल्या कर्माची फळे!’’
गमती जमतीत जाता जाता माझ्या मित्राने केलेला हा खेळ आपल्या अंगांशी तर येणार नाही ना! ह्या भीतीनेच माझी घाबरगुंडी झाली होती. मला ह्या मुली जरा बिनधास्तच वाटल्या. त्यातल्या त्यात जिला मी रूपालीत येतेस का? असे विचारले होते, ती एकदमच घारी-गोरी आणि दिसायला खूपच सुंदर होती. माझ्या मनाची थोडीशी चलबिचल झाली पण मित्राला ती आवडली असल्यामुळे, मी थोडी माघारच घ्यायचे ठरवले होते व तसेही माझ्यात अजूनतरी असले काही उद्योग करण्याचा साधा विचारही मनात डोकावलेला नव्हता आणि येणेही शक्य नव्हते.
आमची नजरा नजर झाली. ती गालातल्या गालात हसली आणि तिच्या डाव्या गालाला पडलेली खळी पाहून तर माझा जीवच कासावीस झाला, हे मात्र मी अतिशय प्रांजळपणे कबूल करतो.
बसता बसता तिने आपणहूनच मला स्वत:ची ओळख करून दिली व तिने नावासहित आपले कोकणस्थी आडनाव सांगितले आणि मला नाव विचारणार तेवढ्यात माझ्या मित्राने, तिला आधी त्याचे कोकणस्थ आडनाव सांगून स्वत:ची ओळख करून दिली आणि नंतर माझी! ते सुद्धा चक्क खोट्या आडनावाने! म्हणजे एका क्षणात माझे नाव रवी देशपांडे झाले होते… का तर ती मुलगी कोकणस्थ होती आणि मी मराठा होतो हे तिला समजले असते तर ती आमच्याशी बोललीच नसती म्हणे!
ह्या प्रकारामुळे मी माझ्या ह्या मित्रावर अतिशय चिडलो होतो परंतु त्यांच्या ह्या पहिल्याच भेटीत उगाचच तमाशा नको म्हणून आमच्या मैत्रीखातीर गप्प राहिलो. ती मुलगी ह्या पहिल्याच भेटीत का कोण जाणे माझ्याशीच बोलण्याचा प्रयत्न करत होती. मला राहून राहून वाटत होते की तिला ओरडून सांगावे की माझे नाव रवी कामठे आहे, देशपांडे नाही!
आमची एकमद छान मैत्री जमली होती. दर गुरवारी आमच्या गाठीभेटी ठरल्याप्रमाणे रूपालीत होत होत्या. असेच अजून काही दिवस गेले आणि एक दिवस तिने मला जरा बाजूला घेवून ‘‘आज संध्याकाळी जरा भेट’’ म्हणाली. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघं लॉ कॉलेजच्या मैदानावर भेटलो. ह्या भेटीत तिने मला जे सांगितले ते ऐकून तर माझी अवस्था त्रिशंकूसारखीच झाली होती. ती सांगत होती की, मी तिला पहिल्याच भेटीत आवडलो होतो आणि माझ्याशी लग्न करण्याची इच्छा तिने व्यक्त केली होती. आमची ओळख झाल्यावर जेव्हा जेव्हा आम्ही भेटत होतो तेव्हा तेव्हा फक्त मी बोलावतो आहे म्हणून ती भेटायला येत होती ह्याचा मला त्यावेळेस उलगडा होत होता.
आता आली का पंचाईत राव!
मला ह्या मुलीच्या ह्या धारिष्ट्याचे खूपच कौतुक वाटले होते. आमच्या दोघांच्या घरच्या परिस्थितीत जमिन अस्मानाचा फरक होता. त्यात ती ब्राह्मण, मी मराठा कसे जमेल आमचे? लग्नाचा विचारही माझ्या मनाला अजून तरी शिवलेला नव्हता! त्यात माझ्या मित्राने माझे खोटे आडनाव सांगून तिची फसगत केलेली होती व मला तिचा अजिबात विश्वासघात करायचा नव्हता. अगदी तिने माझ्याशी मैत्री तोडली तरी चालेल ह्या विचाराला त्या क्षणाला मी आलो होतो. तसेही माझ्या मित्राबरोबरच्या मैत्रीला तर तिने केव्हाच पूर्णविराम दिलेला होता.
बोलता बोलता मी ह्या गोड मुलीला विश्वासात घेऊन जे काही खरे आहे ते सांगितले आणि मी तिच्यासाठी कसा योग्य नाही हे पटवून देत होतो. तिची समजूत घालता घालता माझी तर पुरेवाट लागली होती. तिला नाही सांगताना माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले होते हे आजही आठवले तरी मन हळहळते. ती रडता रडता हातातल्या काडीने मैदानावर एक खड्डा करत होती, ज्या खड्ड्यात आमच्या दोघांच्या, सुरूही न होता संपलेल्या प्रेमाची कहाणी गाडली जात होती…
तास दोन तास आम्ही आमच्या ह्या सुरूही न झालेल्या प्रेमकहाणीचा अंत कसा करायचा ह्याचा विचार करत होतो. एकदाचे तिचे चित्त थोडे थार्यावर आले. तिने माझ्या बोलण्यावर गांभीर्याने विचार केला. मी तिला का नाही म्हणतोय हे पटले व ती शांत झाली.
निरोप घेण्याची वेळ जवळ आली तशी ती एकदम भावूक झाली. तिने माझे, माझ्या प्रांजळ विचारांचे व माझ्यावर असलेल्या सुसंकृत संस्कारांचे तोंडभरून कौतुक केले आणि तिला मी फारच मोठ्या समस्येतून बाहेर काढले म्हणून माझे मन:पूर्वक आभार मानले होते.
मला तुझ्यासारखा प्रांजळ मित्र लाभला हे सांगून, निघताना आयुष्यात परत कधी भेटलास तर ह्या मैत्रिणीला ओळख दाखवायला कचरू नकोस असे म्हणून सायकलला टांग मारून माझ्या डोळ्यासमोरून निघूनही गेली. भरल्या डोळ्यांनी मी आमचे हे सुरूही न होता संपलेले प्रेम काळजाच्या एका कप्प्यात बंद करून, किल्ली तिथेच मैदानावरच्या त्या ‘खड्ड्यात’ ठेवून निघून आलो.
अशीच दोन वर्षे गेली असतील… आमची लॉ कॉलेजच्या मित्रांची 12-15 जणांची टोळी गणपती बघायला रात्री बाहेर पडली होती. आमच्या ह्या टोळक्यात माझी होणारी बायको आणि तिची एक मैत्रीणही होती. आम्ही आमच्याच धुंदीत नारायण पेठेतून गप्पा ठोकत चाललो होतो आणि अचानक समोरून माझी ही गोड मैत्रिण अवतरली. ‘‘रवी, ऐ रवी’’ म्हणून तिने मला हाक मारली. एवढ्या रात्री आपल्याला कोण मुलगी हाक मारते आहे असे म्हणून मी बघतोय तर काय समोर ही उभी…! तिचे ते लाघवी हास्य आणि डाव्या गालावर पडणारी ती खळी पाहून, एक क्षण मी अजूनही लॉ कॉलेजच्या मैदानावरच आहे की काय असाच मला भास झाला!
मी एकदम भानावर आलो. तिची आणि माझ्या होणार्या बायकोची ओळख करून दिली. अर्थात माझ्या होणार्या बायकोला आमच्या ह्या सुरूच न होता संपलेल्या प्रेमकहाणीची थोडीशी कल्पना असल्यामुळे माझ्या आयुष्यात पुढे येणारा फार मोठा पेचप्रसंग टळला होता हेही तितकेच खरे आहे हो…!
-रविंद्र कामठे
पुणे
9822404330