सुख आले माझ्या द्वारी!

सुख आले माझ्या द्वारी!

पुण्यातील कर्वे रस्त्यावरील मृत्युंजयेश्वर मंदिरात भजनाच्या कार्यक्रमाला गेलेल्या मंगलाताई भजन संपल्यानंतर घरी निघाल्या. सोबतच्या मैत्रीणींनी थोडे थांबावयास सांगितले म्हणून बसल्या. आज मैत्रिणींची विशेष सभा असावी असा त्यांनी विचार केला. हो! आज विशेष सभा आयोजित केली होती. विषय होता घरातील ताणतणाव. मग एकीने प्रस्तावना केल्यावर प्रत्येकीने आपल्या घरात घडणार्‍या घटनांचे वर्णन सांगण्यास सुरुवात केली. घटनांचा केंद्रबिंदु, अर्थातच सूनबाई.

मी किती चांगली आहे, मी किती कष्ट करुन मुलाला मोठे केले. त्याला चांगले शिक्षण दिले. हौसेने त्याचे लग्न करुन दिले, वगैरे वगैरे. आधी मुलगा किती चांगला होता, आईवडिलांना मान देत असे, प्रत्येक गोष्ट विचारुन करत असे. ही बाई आली अन् सगळंच तंत्र बिघडलं. एकवेळ तेही मान्य करु पण आता या सूनबाईचा आपलाच तोरा सुरु झाला. तुम्ही सारखे मला असे कर तसे कर अशा सूचना करु नका. मी लहान नाही. मला सगळं करता येतंय. मला माझ्या आईने शिकवले नाही असे यांना वाटते काय? तुम्हीच काय कष्ट करुन मुलाला वाढविले. आमच्याही आई वडिलांनी तेच केले, त्यात काय एवढे विशेष? असा यांचा भाव असतो.
अहो मी आपल्या घरची पद्धत म्हणून सांगत होती कमलाबाई म्हणाल्या.
आपल्या वागण्याची, दिसण्याची कुचेष्टा होते अशाही तक्रारी सुरु झाल्या. यातून मोठे वाद झाले. घरातील वातावरण फार खराब झाले. अहो, आपलेही चुकतेच. आपण जास्त अपेक्षा करतो. जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. अतिउत्साह दाखवतो ते त्यांना पसंत नाही अन् त्यातून असं घडतंय बघा. त्यावर नलिनीबाई म्हणाल्या, हो खरेच आहे तुमचे म्हणणे. आपले जे झाले नाही ते त्यांच्यासाठी आपण करायचा प्रयत्न करतो, मंजीरीताई म्हणाली. अशाच प्रकारची चर्चा झाली.
आजची विशेष सभा कमलाबाईंसाठी होती. त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. चांगले ठरवून, तोलामोलाची मुलगी सुन म्हणून घरी आली. कमलाबाई अगदी आनंदात होत्या. हा आनंद एक महिनाच टिकला कारण राजाराणीच्या संसारात दोन म्हातार्‍यांची अडचण वाटायला सुरुवात झाली. रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद सुरु होऊन त्याचे मोठ्या भांडणात रुपांतर होत होते. हे सहन करण्याची शक्ती इतक्या लवकरच संपली. स्व:तचे घर असूनही बाहेर जाण्याची वेळ आली. आता कसे करावे, काय करावे याबद्दल त्यांना मैत्रिणींचे मार्गदर्शन पाहिजे होते.
हे सर्व ऐकताच मंगलाताईंना दरदरून घाम फुटला. अस्वस्थ वाटायला लागले.त्यांनी ‘बरे वाटत नाही, मी घरी जाते’, असे सांगून मैत्रिणींची माफी मागितली व त्या सरळ रिक्षा करुन घरी आल्या. सोफ्यावर अंग टाकून डोळे बंद करुन घेतले. त्यांना थोडा वेळ काहीही सूचत नव्हते. अगदी बेचैन झाल्या. कमलाबाईंनी सांगितलेले भयंकरच होते. अशी परिस्थिती सगळीकडे आहे याची कल्पना त्यांना होतीच. ते सर्व ऐकल्यामुळे, आपल्यावरही अशी वेळ येऊ शकते याची तयारी आपण केली होती, असे त्यांना आठवले.
सगळ्यांचे अनुभव ऐकून, वेगवेगळे मराठी, हिंदी सिनेमे पाहून स्त्रिया आपल्या मनाची तयारी करतात. तसेच मंगलाताईंचेही होते. सुबोधला, त्यांच्या मुलाला लग्न लवकर कर असा आग्रह सुरु केला. दोन मुलीनंतर तो झाला होता. मुलींची लग्ने झाली होती. त्यामुळे त्याच्या लग्नाची घाई त्यांनाच झाली होती. शेवटी त्याला मुलगी पसंत पडली. नयना सावळी पण गोड मुलगी होती. ती पुण्याच्या सिंहगड कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती. अर्थातच पगार भरपूर होता. दोघांनाही चांगला पगार होता. दोघे एकमेकांना अनुरूप असे होते. त्यामुळे दोन्हीकडील मंडळी खूश होती. लग्नही थाटात होणार होते.
मंगलाताई तशा आनंदीच होत्या पण शंकेचा किडा वळवळत होता कारण आपण एकदा मत बनविले त्यावर ठाम राहतो तसे त्यांचेही झाले होते. त्यांनी वंदना गुप्ते या अभिनेत्रीचा मराठी सिनेमा पाहिला होता. त्यातील एक्झिक्युटीव असलेल्या सूनेच्या व शिक्षिका असलेल्या सासूच्या संबधाचा परिणाम त्यांच्या डोक्यात अगदी फीट बसला होता. मी तर साध्या शिक्षकाची साधी गृहिणी आहे. आपले सूनेशी पटणार नाही, आपण दूरच राहणार. त्यामुळे त्यांनी आपल्या मनाची पूर्ण तयारी केली व बिनधास्तपणे लग्नाच्या तयारीला लागल्या.
लग्नसोहळा अगदी उत्तम झाला. फुलांचा मंद सुगंध, मंजुळ आवाजात जुनी मराठी गाणी सुरु होती. लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची हे गाणे ऐकल्याबरोबर मंगलाताई एकदम चमकल्या. या घरची लाडकी लेक त्या घरची लाडकी सून होऊ शकेल? क्षणभरच असा प्रश्न त्यांच्या मनात आला.
विहीणीच्या पंगतीमध्ये नातेवाईकांच्या आग्रहाने नयनाने उखाण्यांची साखळीच सुरु केली.
‘‘संसाराच्या गीताला दोन मनाचा जुळावा लागतो प्रास, सुबोधरावांना देते जिलेबीचा घास, पंचपक्वान्नांच्या पंगतीला सप्तसुरांची संगत, सुबोधरावांनी घास घ्यावा जमली आहे खाशी पंगत, नव्या घरची नवी सून आग्रह मानते थोरांचा, सुबोधरावांना घास देते जिलेबीचा, सासर-माहेरच्या प्रेमस्नेहाने पंगत बसली खास, सुबोधरावांना देते बर्फीचा घास’’ या अशा नवलाईच्या उखाण्यांनी पंगतीत वेगळीच रंगत आली. वातावरण कसे प्रेमळ अन् घरगुती स्वरुपाचे झाले. दोन्हीकडील मंडळी प्रसन्न झाली. नयनाचे भरभरून कौतुक झाले. सासूबाईंची कॉलर थोडी टाईट झाली.
लग्नाची घाईघर्दी संपली. पूजेनंतर नवरा-नवरी बाहेर फिरायला गेली. तिथूनच ते पुण्याला नोकरीवर हजर झाले. सासू, सूनबाई फार कमी वेळेसाठी सोबत असल्यामुळे मंगलाताईना नयनाच्या स्वभावाचा काही अंदाज आला नाही. त्यांनी तसा प्रयत्नही केला नाही. मंगलाताई आणि वसंतराव आता घरी दोघेच होते. कधीतरी सुबोधचा फोन येत असे. त्यावेळी नयना थोडी बोलत असे. तिच्यासोबत काय बोलावे असा गहन प्रश्‍न त्यांना पडत होता. कारण नयना उच्च विद्याविभूषित असल्याने मंगलाताई सांभाळूनच बोलत असे. (वंदना गुप्तेंच्या सिनेमाचा परिणाम). तिकडे ते दोघे खूश, इकडे हे दोघे खूश. सगळेच आनंदी. लग्नानंतरचे तीन-चार महिने असेच मजेत गेले.
एकेदिवशी त्या जेवण करुन आराम करत असताना बेल वाजली. यावेळी कोण येणार असा विचार करुन त्यांनी दार उघडले नाही. परत एकसारखी बेल वाजली. आता मात्र दार उघडावच लागेल, कोण कडमडले आरामाच्यावेळी असे म्हणत, चरफडत त्यांनी दार उघडले आणि त्यांना आनंदाचा, आश्चर्याचा धक्का बसला. दारात सुबोध, नयना उभे होते. ‘‘अरे असे कसे अचानक न सांगता आलात? सर्व ठीक आहे ना? काही गडबड तर नाही?’’ मंगलाताईनी प्रश्‍नांची सरबत्ती सुरु केली.
‘‘अगं आई, आम्हाला आत तरी येऊ देतेस की नाही?’’ सुबोध.
‘‘अरे माफ कर, तुम्हाला पाहून आनंदही झाला अन् मी जरा घाबरलेही असे अचानक आलेले पाहून!’’ मंगलाताई म्हणाल्या.
दोघे घरात आले. ‘‘अगं आई याचसाठी तर आम्ही असे आलोत. ही कल्पना तुझ्या सूनेची, नयनाची आहे. तिला तुमची मजा पहावयाची होती…!’’ सुबोध म्हणाला.
‘‘बापरे, भारीच! मजा आली का गं नयना…’’ मंगलाताई.
‘‘हो, आई मला खूप बरे वाटले, तुमच्या चेहर्‍यावरचे भाव मला पहायचे होते…’’ नयना म्हणाली.
मंगलाताईंना काही कळेना. ही असं का म्हणत आहे. सुबोध,वसंतराव मजेत सासू-सूनेचा संवाद ऐकत होते. दोन दिवस सगळ्यांचे मजेत गेले. सकाळी चहा घेताना सुबोध म्हणाला, ‘‘आईबाबा इकडे या. आम्हाला तुम्हाला काही सांगायचे आहे. नयना तुच सांग, तुझीच इच्छा आहे…!’’
‘‘हो, मीच सांगते. आईबाबा मला असे वाटते की, तुम्ही आता आमच्यासोबत रहावे. तुम्ही दोघे आमच्यासोबत चला’’ नयनाने आपले विचार सांगितले.
थोडा वेळ मंगलाताईना काही कळले नाही, विश्वास बसत नव्हता. त्या काही बोलत नाही हे नयनाच्या लक्षात आले. मग ती मंगलाताईंच्या जवळ बसून म्हणाली, ‘‘आम्हाला तुमची सोबत पाहिजे, वडीलधारे घरी असल्यावर घराला घरपण येते.’’
मंगलाताईंच्या चेहर्‍यावर काळजी स्पष्ट दिसत होती, तसाच काही क्षण आनंद झालेलाही दिसत होता. त्या म्हणाल्या, ‘‘हे बघा, मला माहीत असलेल्यांचे अनुभव ऐकून मला भीती वाटते अन् मी अशी वेंधळी. नको बाई नको! आठ पंधरा दिवसांसाठी मी येते. मी आणि माझे घरच बरे.’’
मग नयनाने त्यांचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले, ‘‘हो! मला माहिती आहे तुम्हाला वाटत असलेल्या भीतीची! या वयात इतरांच्या अनुभवावरुन आपण कसे वागावे याचा विचार आपण करीत असतो. तुमचेही तसेच आहे पण तुम्ही निश्चिंत रहा. तुमच्या बाबतीत तसे काही होणार नाही. मी तुम्हाला खात्री देते. नाहीतर तुम्ही असे करा, आधी एक महिन्याच्या तयारीने चला. आपले जमले तर फारच छान. नाही जमले तर या परत आपल्या घरी. कोणाला वाईट पण वाटणार नाही पण मी खात्रीने सांगते की ती वेळ येणारच नाही.’’
नयनाचा आत्मविश्वास पाहून सगळे अचंबित झाले. ‘‘तुम्ही आता येणार म्हणजे येणार.’’ मंगलाताईना तर गदगदून आले. त्या काही बोलू शकल्या नाहीत. मग वसंतरावांकडे येऊन नयनाने विचारले, ‘‘येणार ना बाबा आमच्यासोबत?’’
वसंतराव साधे शिक्षक, सरळमार्गी. त्यांना प्राध्यापिका सूनेचे मोठे कौतुक, अभिमान वाटला अन! म्हटले, ‘‘माझे काय मी कुठेही रहायला तयार आहे. तुझ्या सासूचीच संमती घे.’’
यावर सुबोधने अंतिम निर्णय दिला, ‘‘उद्या आपण पुण्याला जात आहोत. तयारीला लागा.’’ मंगलाताईंना विश्वास बसत नव्हता की असे काही होईल.
वसंतरावांनी तयारी सुरू केली. औषधी, कपडे, पुस्तके, पोथ्या सर्व आठवण करुन दोन सुटकेसमधे वेगवेगळे भरले. घराकडे लक्ष ठेवण्यास शेजार्‍यांना सांगितले. घर सोडताना मंगलाताईंना भरुन आले. मुलाकडे-सूनेकडे जाण्याचा आनंदही होत होता. पुण्याला पोहचल्यावर कर्वे रस्त्यावरील निलायम अपार्टमेंटमधील, सुबोध नयनाच्या फ्लॅटमधे आल्यावर नयनाने त्यांची बेडरूम दाखवली. इतकी व्यवस्थित बेडरूम असू शकते का असा प्रश्‍न दोघांनाही पडला. नयना सर्व तयारी करुनच त्यांना नेण्यासाठी आली होती. ‘‘आईबाबा ही तुमची बेडरूम! माझ्या कल्पनेप्रमाणे तयार केली. तुम्हाला काही पाहिजे असल्यास मला सांगा…’’ नयना.
‘‘अगं नयना, इतक्या सोयींची आम्हाला सवय नाही, आवश्यकता पण नाही. धन्यवाद तुझे.’’
‘‘हे बघा असे काही बोलायचे नाही. तुम्ही इथे आलात आम्हाला सगळे काही मिळाले. आता आम्हाला काय करायचे ते तुम्ही करु द्यावे म्हणजे झाले…!’’ नयना.
हे ऐकून मंगलाताईं एकदम प्रसन्न हसल्या. नयना, सुबोध, वसंतरावांच्या चेहर्‍यावर समाधान पसरले. सुबोधने मनात म्हटले चला सुरुवात छान झाली. घराची सर्व माहिती नयनाने मंगलाताईंना करुन दिली अन् म्हटले, ‘‘आईबाबा हे घर तुमचे आहे मस्त एंजॉय करा.’’
तो दिवस त्यांनी एकत्र काढला. संध्याकाळी चौघेही बाहेर फिरायला गेले.जाताना सुबोध दोघांना जवळपासच्या ठिकाणांची माहिती देत होता. मृत्युंजयेश्वर मंदिर, यशवंतराव चव्हाण सभागृह, बालशिक्षण सभागृह, डेक्कन जिमखाना अशी महत्त्वाची ठिकाणे दाखवली. बाहेरच जेवण करुन सर्व घरी परतले. मंगलाताई, वसंतराव तृप्त झाले. ‘‘काय आईबाबा, कसा गेला पहिला दिवस?’’…नयना.
‘‘फारच मस्त,’’ मंगलाताई वसंतराव एकदमच बोलले.
नयना मंगलाताईजवळ आली अन् त्यांच्या हातात पाच हजार रुपये देत म्हणाली, ‘‘आई, हे तुमच्याजवळ असू द्या. घरात सर्व काही आहे पण तुम्हाला काही लागले तर म्हणून ठेवा.’’
‘‘अगं अगं हे काय करत आहेस? एवढे पैसे मला कशाला? घरात सर्व काही आहे, लागले तर तुला सांगेल ना! मला नको’’ असे म्हणत त्या मागे सरकल्या. नयनाने जबरदस्तीने पैसे त्यांच्या हातात ठेवले.
थोड्या वेळाने सुबोध आला. बाबा हे पैसे तुमच्याजवळ ठेवा असे म्हणत त्यानेही पाच हजार वसंतरावांना दिले. ‘‘बाबा इथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खर्च करा. नाटक पहा, पुस्तके घ्या अन् हो इथे मोगर्‍याच्या फुलांचे गजरे छान मिळतात. संध्याकाळी फिरुन येताना दोन गजरे आणत जा.’’ हे ऐकून नयना म्हणाली ‘‘दोन कशाला? रोज ताजा मिळेल ना?’’
‘‘अगं आईसाठी एक अन् दुसरा तुझ्यासाठी. मला ऊशीर होतो म्हणून मी आणू शकत नाही…’’ सुबोध.
‘‘ईश्श! काही तरीच काय बोलतोस!’’ नयना लाजून म्हणाली पण मनातून खूश झाली.
वसंतराव बोलले ‘‘अगं आजपासून आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरु झाली. आतापर्यंत जे पाहिले नाही ते पाहुया.’’
‘‘हो बाई तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. देवाची लीला अगाध आहे… असे वाटते की मी स्वप्नच पाहत आहे, हे कधी संपूच नये’’ मंगलाताई म्हणाल्या.
रात्री झोपताना वसंतरावांनी बेडच्या बाजूची खिडकी उघडली अन् प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध खोलीत पसरला. ‘‘ये मंगला बघ, किती मस्त सुगंध येत आहे आपल्या घरासारखा!’’ असे ओरडतच सांगितले. त्यांच्या आवडीचा सुगंध येत असल्याने दोघेही फार प्रसन्न झाले. झोप छान लागली.
सकाळी फिरायला जाण्याची सवय दोघांनाही होती. पहिला दिवस असल्याने सांभाळूनच, दूर न जाता फिरुन आले. येताना पूजेसाठी फुले आणली. सोफ्यावर बसल्यावर पाच मिनिटात चहाचे दोन कप घेऊन नयना आली. सकाळचा पहिला धक्का मंगलाताईंना बसला. त्यांनाही अपेक्षा नव्हती. चहा घेतला अन् शब्द निघाले, ‘‘मस्त, छान चहा झाला गं नयना!’’
नवीन घरी सुरुवात छान झाली होती. सुबोध, नयनाचे रुटीन सुरु झाले. ते त्यांच्या कामासाठी बाहेर पडले. मंगलाताई, वसंतराव यांनीही नवीन घरी रुळायची तयारी सुरु केली.
संध्याकाळी आधी नयना आली. आल्या आल्या तिने विचारले, ‘‘आई बाबा दिवस कसा गेला? करमले की, नाही?’’
‘‘अगं एवढी काळजी कशाला करते? आम्ही काय लहान आहोत न करमायला? छान, मस्त वाटले… इथे काहीच कामे नाहीत. सगळ्या कामाला बाई आहे ना…’’ मंगलाताई.
एकदा कॉलेजमधून नयना उशिरा घरी आली. थोडा आराम करुन, फ्रेश होऊन बाहेर आली तर टेबलवर चहा बिस्किटे तयार असलेली पाहून ती आनंदाने म्हणाली, ‘‘आई खरेच याची मला आज फार गरज होती, धन्यवाद.’’
‘‘ए बाई, धन्यवाद वगैरे म्हणू नकोस! तू थकून आली आहेस तेव्हा हे आवश्यकच आहे!’’ मंगलाताई.
‘‘बाबा, आपल्या बाजूच्या कॉलनीजवळ वाचनालय आहे. मी तुमच्यासाठी वर्गणी भरली आहे. तुमच्या आवडीची पुस्तके तुम्ही घेऊन येत चला.’’
‘‘अरे, इतकी घाई कशाला केली? मी गेलो असतो ना!’’ वसंतराव म्हणाले.
‘‘मला माहीत आहे, आईने तुम्हाला जाऊ दिले नसते…’’ सुबोध.
मग वसंतरावानी मोगर्‍याच्या फुलांचा गजरा सुबोधजवळ दिला. ‘‘वा, बाबा, तुम्ही सुरु पण झाले छान छान!’’
‘‘हो, सायंकाळी मृत्युंजयेश्वर मंदिरात गेलो होतो, येताना घेऊन आलो!’’
‘‘बरे केले, आता सासू-सून दोघीही खूश होतील…’’ सुबोध हसून म्हणाला.
‘‘फारच प्रसन्न वाटते बुवा मंदिरात. बरेच कार्यक्रम पण होत असतात तिथे. तुमच्यासाठी, आईसाठी चांगले आहेत. दुपारी, सांयकाळी जात जा…’’ सुबोध.
‘‘हो! नक्की जाऊ.’’ पटकन मंगलाताई म्हणाल्या. ते ऐकून नयना, गालात हसलेली पाहून सुबोधला बरे वाटले.
मंगलाताई, वसंतराव यांनी ढोबळमानाने आपली दिनचर्या ठरविली. सकाळी पाच साडेपाचला उठून प्रणायाम, व्यायाम सर्व आटोपून चहा घेऊन फिरायला दीड दोन किलोमीटरपर्यंत जायचे. पुण्यातील रम्य, थंड सकाळ पाहून दोघेही एकदम खूश झाले होते. येताना मंदिरात जावून देवदर्शन घ्यावे, मंदिरातील प्रसन्न वातावरणामुळे सकाळची सुरुवात छान होत होती. येताना फुले, आवडीचा पेपर घेऊन यावे. नयना, सुबोध यांच्या सकाळच्या गडबडीपासून दूर रहायचे म्हणजे त्यांना त्रास होणार नाही एवढी काळजी घेतली की झाले. ते दोघे ऑफीसला गेल्यावर नाष्टा, चहा घ्यावा. पेपरच्या बातम्या, टीव्हीवरच्या बातम्या वाचून, पाहून झाले की आरामात स्नान, देवपूजा. मग बाराचे नंतर दोघेही सोबत सावकाश जेवायला बसायचे.
वसंतराव व मंगलाताईनी ठरविले होते की, यापूर्वी नोकरीमुळे सोबत जेवणे शक्य नव्हते. ते आता शक्य आहे तर का नाही जेवायचे? जे करायचे राहून गेले ते आठवून आठवून सर्व करायचे. या साध्याशा गोष्टी करण्यात मिळणारा आनंद ते दोघे मस्त एंजॉय करत होते.
नयना-सुबोधला सुट्टी असेल तेव्हा पुण्यातील आजूबाजूची कोणती ठिकाणे पहायची आहेत, याची यादी केली व त्याप्रमाणे फिरणे सुरु केले. बाकीच्या दिवशी पुण्यात कार्यक्रमाला काय कमी आहे? प्रसिद्ध ठिकाणे पहाणे, वेगवेगळ्या मंदिरात जाणे, झेपेल तेेवढे फिरणे, सिनेमा, नाटके पाहणे अशा प्रकारची सेंकड ईंनींग एंजॉय करणे सुरु होते.
एके दिवशी जेवण झाल्यावर आराम करत असताना अचानक एकसारखी बेल वाजली. वसंतराव घाबरून गेले. काय झाले, कोण आले त्यांना काही कळेना. घाबरल्यामुळे दार उघडणेही सुचले नाही. मंगलाताईंनी गडबडीत दार उघडले. दारात थरथरत उभी असलेली नयना दिसली. त्यांनी घाबरून विचारले ‘‘अगंबाई नयना तू? काय झाले गं? ताप आला वाटते.’’
हात लाऊन पाहिले तर काय? भयानक चटका बसला. त्यांनी नयनाला हात धरून घरात नेले, पलंगावर झोपवले, पाणी दिले. नयना बोलण्याच्या मन:स्तिथीत नव्हती. तिच्या हावभावावरुन त्यांना अंदाज आला. ताप मोजला, 104 डिग्री होता. माहीत असलेले औषध दिले, कपाळावर थंड पाण्याच्या पट्टी ठेवणे सुरु केले. वसंतराव, मंगलाताईंनी विचार केला ताप कमी नाही झाला तर डॉक्टरांकडे जावू पण काम पडले नाही. ताप कमी होईपर्यंत ते दोघेही बेचैन होते. नवीन ठिकाण जास्त काही माहिती नाही. काही वेळानी नयना शांत झोपली. तिचा तापही कमी झाला. आता रिलॅक्स वाटत होते. रात्री सुबोध आल्यावर त्यांनी नयनाच्या तापाबद्दल सांगितले तेव्हा तोही घाबरून गेला. त्याने नयनाला हळूच उठवले. नयनाला काय झाले, आपण घरी कसे आलो, नंतर काय झाले काहीच आठवत नव्हते. सुबोधनी, आईबाबांनी केलेल्या उपचाराची माहिती दिल्यावर तिला सगळे कळले. या सर्व काळात चार ते पाच तासात त्यांची स्थिती कशी झाली असेल हे तिच्या लक्षात आले व तिला रडू आले. मंगलाताई म्हणाल्या, ‘‘ये पोरी अगं रडतेस कशाला? काळजी करू नकोस, ताप कमी झाला. तू एकटीच आलीस. अशावेळी कोणाला तरी सोबत आणायचे ना! एकटी गाडी घेऊन आली रस्त्यात काही झाले असते तर?’’
‘‘सुबोध तिला आधी डॉक्टरकडे घेऊन जा.’’ बाबा म्हणाले.
लगेच सुबोध म्हणाला, ‘‘मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांना घरीच बोलवतो.’’
मग त्याने फोन करुन डॉक्टरांना लवकर येण्यास सांगितले. डॉक्टर आले. त्यांनी तपासून सांगितले, मुदतीचा ताप आहे. केलेले उपचार योग्य आहेत. मी औषधी लिहून देतो. जवळील ईंजेक्शन दिले. काही दिवस पूर्ण आराम पाहिजे, असे बजावले. नयना सर्व मुकाट्याने ऐकत होती. आईबाबांनी घेतलेली काळजी पाहून तिचे मन भरुन आले. आज ते घरी होते म्हणून हे झाले. आपण त्यांना आग्रहाने आणले हे फार बरे झाले. नकळतच तिचे डोळे भरून आले. तिच्या डोळ्यात पाणी पाहून मंगलाताई म्हणाल्या,
‘‘अगं रडू नकोस! तू काही काळजी करु नकोस.’’
‘‘आता फक्त आराम करायचा अन् औषधी घेणे एवढेच कर! पहा कशी लवकरच ठणठणीत होते की नाही’’ असे ममतेचे, आधाराचे बोल ऐकून नयना आणखीच रडायला लागली. असा भावनिक प्रसंग पाहून सुबोधलाही गलबलून आले, त्याचेही डोळे पाणावले.
मंगलाताईंच्या काळजीने केलेल्या प्रयत्नांनी लवकरच नयना ठीक होऊन ऑफीसला जायला लागली. या घटनेने नयनाला आपण, आईबाबांना घरी आणले या निर्णयाचा फार आनंद होत होता. आता घर कसे भरल्यासारखे वाटत होते.
ते नसताना फक्त दोघे होते. घरी आल्यानंतर काही तरी कमी असल्याचे तिला नेहमीच वाटत होते. आईबाबांचे आनंदी चेहरे पाहून तिला मनापासून आनंद होत होता अन् हे पाहून सुबोधही सुखावला. घर कसे आनंदी होते.
दुपारच्या जेवणानंतर मंगलाताई, वसंतराव गप्पा मारीत असताना दोघेही एकदमच म्हणाले ‘‘देवाने सर्व सुख दिले आता घरी छोटे बाळ पाहिजे.’’ दोघांच्या मनात एकच विचार आला याचे त्या दोघांना आश्चर्य वाटले. वसंतराव म्हणाले ‘‘हा विचार आला, मला हा शुभसंकेतच वाटतो.’’ दोघेही खूप प्रसन्न झाले. शुभसंकेत, योगायोग मानणे न मानणे हा अनुभवाचा विषय आहे.
संध्याकाळी काहीशा वेगळ्या मूडमध्ये नयना घरी आली. खूप थकलेली दिसत होती. नेहमीप्रमाणे आनंदी नव्हती. आल्या आल्या ती आपल्या खोलीत निघून गेली. मंगलाताईंना वाटले कॉलेजमध्ये जास्त काम असेल किंवा काही कुणासोबत वाद झाला असतील. असा प्रसंग कधी पाहण्यात न आल्यामुळे त्यांना उगाचच अपराधी वाटत होते. बराच वेळ झाला तरीही नयना बाहेर आली नाही. मंगलाताईंना आता वाट पाहणे असह्य झाले. खोलीत जाऊन पाहायचे ठरवले. भितभितच खोलीचे दार ढकलले, दार आतून लावले नव्हते. नयना अस्वस्थपणे पडलेली दिसली. ते पाहून मंगलाताईंना गलबलून आले. त्या नयनाजवळ गेल्या तरी नयनाला कळले नाही. त्यांनी नयना हात लाऊन विचारले,
‘‘अगं नयना काय झाले गं? आज तू इतकी उदास कां आहेस?’’ मंगलाताईनां पाहून नयना कशीबशी उठून बसली अन् म्हणाली, ‘‘काही नाही आई तुम्ही काळजी करु नका. थोडे अस्वस्थ वाटत आहे बस काही नाही!’’
‘‘ए बाई काळजी करु नको म्हणजे काय! तू नेहमी आनंदाने येणारी आज अशी आली अन् इतकी अस्वस्थ कधीच नव्हतीस. म्हणून काळजी वाटते’’ त्यांनी नयनाला जवळ घेत म्हटले. झाले! नयना रडायला लागली. थोडी शांत झाल्यावर मंगलाताईंनी तिला काय झाले ते स्पष्टपणे सांगण्यास सांगितले. रडत रडत नयना काय झाले, काय होत आहे ते सांगू लागली. सुरवातीला काळजीने व्यापलेला मंगलाताईंचा गंभीर चेहरा हळूहळू प्रसन्न होत गेला अन् त्यांना एकदम हसू आले. हे पाहून नयना कावरीबावरी झाली. आपले काय चुकले हे तिला समजेना. ‘‘अहो आई असे काय हसत आहात तुम्ही? मला खूप त्रास होत आहे हे तुम्हाला खरे वाटत नाही का?’’
कांहीशा नाराजीने तिने विचारले. मंगलाताई म्हणाल्या, ‘‘अगं तसं नाही गं बाई. तुला त्रास होत आहे हे अगदी खरे आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तुला असा त्रास व्हावा असेच वाटत होते.’’
नयनाला काही समजेना या आज अशा का वागत आहेत. यांना आनंद काय होतो, हसू काय येते, देवावर विश्वास काय, काहीच कळत नाही. शेवटी ती म्हणाली, ‘‘आई तुम्ही आज अशा का वागता मला लवकर सांगा ना!’’
मंगलाताईंनी नयनाला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हटले, ‘‘माझ्या मुली, मी याच दिवसाची वाट पाहात आहे. बाई गं पोटात ओटीपोटात दुखणे, जीव घाबरणे, अस्वस्थ होणे ही लक्षणे कशाची आहेत हे तुझ्या मैत्रिणींनी तुला सांगितले नाही काय? अगं वेडाबाई, मुली तू आई होणार आहेस! आम्ही या बातमीची किती वाट पहात होतो!’’
हे ऐकून नयना लाजून मंगलाताईंच्या कुशीत शिरली. तिला काय बोलावे सुचत नव्हते. आनंदाने डोळे भरभरुन वाहत होते. मंगलाताईंचा पदर ओला झाला. त्यांनी नयनाला घट्ट धरले. त्यांनाही आनंदाश्रु आवरत नव्हते. कितीतरी वेळ त्या दोघी सारख्या बसून होत्या. मंगलाताईंना धन्य धन्य झाल्याचे समाधान मिळाले. नयनाला आठवले, सीमाने तिच्या मैत्रीणीने तिला आलेला अनुभव सांगितला होता. आपल्या कसे लक्षात आले नाही याचे तिला आश्चर्य वाटले.
मंगलाताई ही आनंदाची बातमी वसंतरावांना सांगण्यास बाहेर आल्या. तोच सुबोधही घरात आला. मंगलाताईंचा आनंदी, हसरा, प्रसन्न चेहरा पाहून दोघेही चकित झाले. आज काय घडले आहे की मंगलाताई एवढ्या खूश आहेत. दोघांनीही एकदम विचारले, ‘‘कोणती आनंदाची बातमी आहे? लवकर सांग.’’
‘‘अरे हो! तेच तर सांगण्याची मलाही घाई आहे. ऐका तर, सुबोध तू बाबा होणार आणि अहो, तुम्ही आजोबा होणार आहात. आहे की नाही आंनदाची बातमी!’’
हा आनंदी संवाद दाराआडून ऐकत असलेली नयना सर्वांनाच दिसली. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. मंगलाताईं सुबोधला म्हणाल्या, ‘‘माझा अंदाज शंभर टक्के बरोबर आहे याची मला खात्री आहेच. आपण उद्या लेडी डॉक्टरकडे जाऊन तपासणी करुया.’’
सर्वांना आजचे जेवण विशेष वाटत होते. नयना, सुबोध यांनी जेवण करुन आपल्या खोलीत पळ काढला.
दुसर्‍या दिवशी लेडी डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली.
मंगलाताईंनी सांगितलेले खरेच होते पण काळजीचे कारणही होते. जुळे होणार होते. आता मंगलाताईंनी व नयनाच्या आईने नयनाला आवश्यक त्या सूचना, काय करावे अन् काय करु नये याची यादीच करुन दिली. ती पण त्याप्रमाणे व डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागत होती. घरात आधीच आनंदी वातावरण होते. त्यात आता वेगळ्या खूशीची, उत्साहाची भर पडली. नयनाची काळजी घेण्याची, तिला आनंदी ठेवण्याची शर्यतच लागली होती.
आधी घरी नयनाचे डोहाळजेवण साधेपणाने पण सुरेख केले. तिच्या माहेरी पण सुंदर कार्यक्रम झाला. नयनाच्या सर्व इच्छा मंगलाताई व नयनाच्या आई पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असे.
जुळे असल्याने नयनाच्या दिनचर्येत थोडी गडबड होत होती. कोणतीही कुरकुर न करता शांतपणे, आनंदात आपली नेहमीची कामे करुन ती कॉलेजला जात असे. तिच्या या कामाच्या पद्धतीचे मंगलाताईना मोठे कौतुक वाटे. सुबोध आधी खूप आळशी होता पण बाबा होणार या बातमीने त्याचा आळशीपणा गायब झाला. पूर्णपणे नयनावर अवलंबून होता. आता आपली कामे करुन, नयनाला कशी जास्त मदत करता येईल हे पहात होता. त्याच्यातील बदल पाहून नयनाला, आईबाबांना आश्चर्य, आनंद होत असे.
दोन्ही आईंचे अनुभवी मार्गदर्शन, डॉक्टरांचा सल्ला, मैत्रिणींचे सल्ले या सगळ्या गोष्टींचे व्यवस्थित पालन करुन नयना गरोदरपणा एन्जॉय करत होती. सर्व काही सुरळीत सुरु होते. नयना सातव्या महिन्यापर्यंत कॉलेजला गेली. जुळे असल्यामुळे नंतर जाण्या येण्याचा, उभे राहून शिकविण्याचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांच्या सांगण्यावरुन घरातील कामात व्यग्र झाली. सर्वांच्या आनंदाचा प्रसंग बरोबर पूर्ण दिवसानी आला. दोन्ही घरची मंडळी आनंदाचे स्वागत करण्यासाठी दवाखान्यात हजर होती. डॉक्टर बालाजी तांबे यांचे पुस्तक वाचून त्यातील सुचनांचे तिने पालन केले होते. कसलाही त्रास न होता नॉर्मल डिलिव्हरी होऊन दोन गोंडस बाळांना जन्म दिला.
मुलगा, मुलगीचे आगमन झाल्याची बातमी बाहेर येताच सर्वांचे चेहरे आनंदाने प्रफुल्लीत झाले. सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला? अर्थात नयनालाच. आई झाल्याने स्त्री जन्माचे सार्थक होते म्हणतात. मुलांना पाहून तिला अतीव आनंद झाला.
नवजात बालकांच्या आगमनाचे मस्त सेलिब्रेशन झाले.
तीन दिवसांनी आई-मुलांचे घरी आगमन झाले. घराची शोभा एकदम वाढली. घर कसे भरल्यासारखे झाले. मुलांच्या नाजूक रडण्याचे आवाज ऐकून घरातील माणसे व घरही धन्य झाले होते.
मंगलाताईंना आता वेळ कमी पडू लागला. दोन मुलांचे करायचे आहे हे माहीत असल्याने त्या तशा तयारीत होत्याच.
वसंतराव – मंगलाताई, आपण, आजी आजोबा झालो या जाणिवेनच धन्य धन्य झाले होते. आता आपले दुसरे कर्तव्य करण्यासाठी मनापासून सज्ज होतेच. नयनाने कॉलेजमध्ये जाण्यास सुरुवात केल्यानंतर, नातवांचे संगोपन करण्यात दोघांना वेळ कसा जातो हे समजत नव्हते.
नातवांच्या बाललीला पाहून आजी-आजोबा झाल्याचे समाधान काही वेगळेच असते. येत असलेला थकवा जाणवत नाही. नयनाने केलेल्या आग्रहाने आपण इथे आलो, आपल्या येण्याची कधीही खंत झाली नाही याचे समाधान मंगलाताईंना झाले.
मंदिरातून आल्यावर या सर्व प्रसंगाची मालिका त्यांच्या बंद डोळ्यासमोर उभी झाली. नकळत त्यांचे डोळे वाहू लागले. हे आनंदाश्रू होते. देवा तू मला भरभरुन सुख दिले. मी तुझी जन्माची ऋणी आहे अन् ‘सुख आले माझ्या द्वारी’ हे शब्द अतीव समाधानाने, आनंदाने बाहेर पडले.

-प्र. ना. भास्करवार
नागपूर
9823732624

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “सुख आले माझ्या द्वारी!”

  1. Vinod s.Panchbhai

    छान….सुंदर कथा.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा