आरोग्यम् धनसंपदा…

आरोग्यम् धनसंपदा...

‘‘धर्मार्थकाममोक्षानाम् मुलमुक्तम् कलेवरम्।
तच्च सर्वार्थसंदिद्धयै भवैद्यदि निरामयम्॥

अर्थात धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरूषार्थ साधण्याला मुख्य साधन मानवाचे शरीर आहे. ते निरोगी असेल तर वरील चारही पुरूषार्थ साध्य होतील, हे त्रिकालाबाधित तत्त्व अनेक साचार, अनुभवी, निरपेक्ष ऋषिंच्या आणि संतांच्या वचनांनी सिद्ध झाले आहे.

वरील श्‍लोकाचा अर्थ लक्षात घेतल्यास आपले शरीर आरोग्यसंपन्न असणं किती आवश्यक आहे याची खात्री पटते. शरीर निरोगी असेल तरच आपले मन प्रसन्न व निर्मळ राहणार यात शंका नाही. मात्र आज आपण बघतो या संगणक युगात कुठलाही आजार जडला नाही अशी आरोग्यसंपन्न व्यक्ती अभावानेच आढळून येते. कारण आजचं जीवन अत्यंत धकाधकीचं आणि धोकादायक झालं आहे. त्यामुळे माणसाची एकंदरीत दिनचर्याच बिघडून गेली आहे. जगण्याची आधुनिक प्रणाली अंगीकारल्यानं रात्ररात्र जागरण करणं, दिवसा झोपणं, खाण्याच्या अनियमित वेळा, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे सर्वसामान्य माणसाचं आरोग्य आज धोक्यात आलं आहे.

‘आपलं आरोग्य आपल्या हातात’ या न्यायानं आपण वेळीच खबरदारी घेऊन आपल्या आरोग्याची काळजी निश्‍चितच घेऊ शकतो. त्यासाठी ह. भ. प. डॉ. दत्तोपंत पटवर्धनबुवा यांनी लिहिलेलं आणि दिलीप कस्तुरे काका यांनी परिश्रमपूर्वक संपादित केलेलं ‘आर्यांची दिनचर्या’ हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. 1956 पासून हे पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हतं. चैतन्य ज्ञानपीठात सेवाभावी वृत्तीनं काम करणार्‍या सुश्री लिमये ताई यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जुन्या प्रतीच्या आधारे दिलीप कस्तुरे काका आणि ‘चपराक प्रकाशन’चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांनी परिश्रम घेऊन ‘आर्यांची दिनचर्या’ या पुस्तकाची नवीन आवृत्ती वाचकांसाठी आकर्षक स्वरूपात नुकतीच प्रकाशित केली आहे.

रोग झाल्यावरच औषध घेण्यापेक्षा तो होऊच नये यासाठीचं अमूल्य मार्गदर्शन तसंच माणसानं निरोगी राहण्यासाठी काय करावं, काय खावं, प्यावं, नित्यक्रम कसा असावा याबाबत सविस्तर विवेचन ‘आर्यांची दिनचर्या’च्या माध्यमातून करण्यात आलं आहे. जगाचा व्याप सांभाळण्यासाठी शासनव्यवस्था असते त्याचप्रमाणे आपलं शरीर चालण्यासाठी निसर्गाने उत्तम व्यवस्था केली आहे. कोणतेही विजातीय द्रव्य किंवा पदार्थ आपल्या शरीरात गेले असता ते नैसर्गिकरित्या बाहेर टाकण्याची निसर्गाची धडपड सतत कार्यरत असते. म्हणजेच निसर्ग होऊ घातलेल्या रोगाशी अविरतपणे झगडत असतो. त्याला अगदी कमी प्रमाणात मदत करणं इतकंच औषणाचं कार्य असतं. अशाप्रकारचं तत्त्व अलीकडेच पाश्‍चात्य देशातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनीसुद्धा मान्य केलं आहे. त्यामुळंच निसर्गोपचारानं रोग आटोक्यात आणणार्‍या रूग्णालयांची संख्या भारतातच नव्हे तर विदेशातही वाढताना दिसते.

आपल्या शरीरात रोगांची निर्मिती कशामुळे होते याबाबत ‘आर्यांची दिनचर्या’ या पुस्तकात खालील अतिशय समर्पक श्‍लोकाचा आधार घेत प्रभावीपणे मांडले आहे…

अत्यंबुपानाद् विषमाशनाच्च दिवाशयात्
जागरणाच्च रात्रौ॥
संरोधनान्मूत्रपुरीषयोश्‍च षडि प्रकारैः प्रभवन्ति रोगाः॥

अर्थात, अतिशय पाणी पिणे, पचनास कठीण असे न मानवणारे विषम पदार्थ विषमवेळी खाणे, दिवसा झोप घेणे, रात्री जागणे आणि लघवी व शौच यांचा अवरोध करणे या सहा कारणांनी रोग निर्माण होतात.

वर दर्शविल्याप्रमाणे उपयुक्त अशा अनेक श्‍लोकांचा दाखला देत या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे आरोग्य उत्तमप्रकारे कसे अबाधित राखता येईल याबाबत मुद्देसूद विश्‍लेषण केले आहे. झोपेचे प्रमाण किती असावे, अगदी बालपणी, विद्यार्थी दशेत, तरूणपणी तसेच वृद्धापकाळात किती झोप घ्यावी आणि केव्हा उठावे याबद्दलही मार्गदर्शन केले आहे. आजकाल रात्रीचा दिवस करणे आणि दिवसा मात्र लोळत पडणे असे प्रकार सररास वाढले आहेत. ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासि आयुरारोग्य भेटे। लवकर निजे, उठे त्यास ज्ञान, बलारोग्य निश्‍चये भेटे॥ हा आपल्या पूर्वजांनी तळमळीने सांगितलेला संदेश आपण आज विसरूनच गेलो आहोत.

स्नान, नेत्रस्नान, मुखमार्जन त्यानंतर सूर्यनमस्कार, प्राणायाम, निरनिराळे व्यायाम, स्त्रियांसाठीचे व्यायाम याबाबतची सविस्तर विवेचनात्मक माहिती सहज, सोप्या भाषेत ‘आर्यांची दिनचर्या’मध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपला आहार कसा असावा, पाणी कधी प्यावे, त्याचे प्रमाण किती असावे, गायीचे दूध किती प्रमाणात घ्यावे, व्यायामानंतरचा पौष्टिक आहार कोणत्या प्रकारचा असावा, चहा-कॉफी घ्यावे की घेऊ नये याबाबत खूप छान मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. तसेच आपली वेशभूषा कशी असावी, कुठल्या प्रकारची वस्त्रे वापरावीत हेही यात दिलेले आहे.

‘सामान्य उपचार व औषधे’ हे एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात दिले आहे. या प्रकरणात मलावरोध-शौचाची तक्रार, अग्निमांद्य, खोकला, दमा इत्यादी रोग, खरूज, इसब इत्यादी, दंतरोग, रक्तदाब, प्रदर, आर्तव दोष इत्यादी स्त्रियांचे विकार, ऍनिमिया, रक्तक्षय, भाजणे, सामान्य जखमा, गळवे इत्यादी रोग. स्त्रियांना दूध येण्यास उपाय, मातेच्या दुधाअभावी मुलांचे पोषण याबाबत उपचार व औषधांची माहिती यात दिली आहे. तसेच तुळस, दूर्वा, बेल, कडूनिंब, आवळा, गोमूत्र यांचे आश्‍चर्यकारक फायदेही या पुस्तकात वाचायला मिळतात. मालिश प्रकाराने शरीराची निसर्गोपचार पद्धत कशाप्रकारे अमलात आणावी याबाबतचे मार्गदर्शनही उपयुक्त ठरणारे आहे.

‘आर्यांची दिनचर्या’मध्ये शेवटी दिलेल्या परिशिष्टात लेखक दत्तोपंत पटवर्धनबुवांचे आप्त, स्वकीय व परिचितांची मनोगते, प्रतिक्रिया आणि काही लेख दिले आहेत, जेणेकरून बुवांच्या कार्यकर्तृत्वाचा सर्वसामान्यांना नीट परिचय व्हावा. या पुस्तकातील माहिती आरोग्यप्रबोधनासाठी दिलेली असून प्रत्येकाने आपापल्या प्रकृती धर्मानुसारच योग्य तो वैद्यकिय सल्ला घेऊन या माहितीचा उपयोग करावा असेही या परिशिष्टात नमुद केले आहे.

या पुस्तकास आचार्य स्वामी गोविंददेव गिरी यांचा शुभचिंतन संदेश तसेच वसंत अनंत गाडगीळ आणि पंडित विश्‍वासशास्त्री घोडजकर यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. आर्यांच्या दिनचर्येचे सखोल, वाचनीय आत्मनिवेदन तसेच कस्तुरे काकांचे नव्या आवृत्तीच्या निमित्ताने केलेले प्रवाही मनोगत वाचून वाचक भारावल्याशिवाय राहणार नाहीत.

एकंदरीतच हे पुस्तक आपल्या आरोग्याच्या दृष्टिने अत्यंत उपयुक्त असल्याने प्रत्येक वाचकांजवळ ते संग्रही असावे असे मनापासून वाटते.

प्रकाशक – चपराक प्रकाशन

या पुस्तकासाठी संपर्क – 7057292092

पाने – 192, किंमत – 200 रूपये.

विनोद श्रा. पंचभाई

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “आरोग्यम् धनसंपदा…”

  1. P.N.Bhaskarwar

    नमस्कार,
    फार उपयोगी,माहिती आहे. मी नक्की घेईन.तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.फार चांगले काम केले आहे.
    स्वप्नपूर्तीचा आनंद अवर्णनीय असतो. तुमचे हार्दिक अभिनंदन !!!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा