रवीन्द्र भट यांची संत नामदेवांच्या जीवनचरित्राचा वेध घेणारी ‘घास घेई पांडुरंगा’ ही रसाळ व प्रासादिक शैलीतील सात्विक आनंद देणारी कादंबरी 1994 मध्ये प्रसिद्ध झाली. रवीन्द्र भट संस्कार शिबिराच्या निमित्ताने पंढरपूरात असताना संत नामदेव समाजोन्नती मंडळाचे कार्यकर्ते श्री प्र. द. निकते शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेवांच्या चरित्रावर आधारित कादंबरी लिहावी अशी विनंती करतात.
सायंकाळी धूपारतीच्या वेळी राऊळाच्या गाभार्यात रवीन्द्र भट यांच्या मनात या कादंबरीचे बीज रूजते. ‘इंद्रायणीकाठी’ कादंबरीचे लेखन करत असतानाच संत नामदेवांचे एक धूसर चित्र त्यांच्या मनात तरळत होते. संत नामदेवांच्या अभंगगाथेचा व विपुल संदर्भग्रंथाचा सूक्ष्म अभ्यास करून संत नामदेवांचे लालित्यपूर्ण व विश्वसनीय चरित्र रेखाटण्याचा प्रयत्न कादंबरीकाराने केला आहे.
पंढरपूर, मंगळवेढे, नरसीबामणी, औंढ्यानागनाथ, अंबेजोगाई, पंजाबमधील घुमान या तीर्थस्थळांना त्यांनी भेट दिली आहे. संत नामदेवरायांच्या कार्याचा गौरव करताना प्रस्तावनेत कादंबरीकार म्हणतात, ‘ज्ञानदेवांनी दिलेला माणूस धर्माचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणून तो बहुजन समाजामध्ये रूजविण्याचे अलौकिक कार्य करणारे नामदेव हे ‘आद्य प्रचारक’ आहेत. दासी जनीला जवळ करून तिला संतपदी नेणारे आणि तिच्यावर सोवळे प्रेम करणारे नामदेव हे ‘स्त्रीमुक्तीचे आद्य उद्गगाते’ आहेत. ज्ञानदेवादी भावडांची आणि समकालीन संतांची अभंगरूप चरित्र लिहिणारे नामदेव हे ‘आद्य चरित्रकार’ आहेत. पांडुरंगासमोर चोखोबांची समाधी बांधणारे नामदेव हे ‘आद्य अस्पृश्योद्धारक आहेत. परधर्मियांच्या लाटा थोपवण्यासाठी सीमेवरच्या नाजूक अशा प्रातांत सतत वीस वर्ष राहून भागवत संप्रदायाचे व्यासपीठ उभे करणारे नामदेव हे ‘आद्य समाजकारणी’ आहेत. उत्तरेकडील भाषांमधून अभंगरचना करणारे नामदेव हे ‘भारतीय एकात्मतेचे आद्य उद्गाता आहेत’.
निसर्गवर्णनाने कादंबरीची सुरूवात झालेली असून कलियुगातील अत्याचार, व्रत-वैकल्ये, उपभोगी राजा, जुगारीचे वाढलेले प्रस्थ, शूद्रांना मिळणारी अन्यायी वागणूक पाहून ध्यानस्थ गहिनीनाथांना गुरू गोरक्षनाथ ‘निवृत्तिला गुरूमंत्र द्यावा’ असा उपदेश करतात. पाठशाळा चुकवून पुंडलिकाच्या राऊळात लपून बसणार्या नामदेवाला शोधण्यासाठी थोरली बहीण आऊबाई वाळवंटात येते. पुंडलिक छप्पापानी खेळायला येईल असे बालनामदेवाला वाटते. बाबा घरी नाही म्हणून नामदेवाला नैवद्य घेऊन राऊळात पाठविले जाते. जनाबाई त्याच्या बरोबर मंदिरात येते. पुजारीबुवा जनाईला राऊळात जाऊ देत नाही याचे नामदेवाला वाईट वाटते. देव सनातन पवित्र असल्यामुळे तो विटाळणार नाही असे तो पुजार्याला सांगतो. पांडुरंगाष्टक म्हणून नामदेव भक्तिभावाने पांडुरंगाची पूजा करतात व
घास घेई पांडुरंगा, श्रीधरा अनंता।
वेळ भोजनाची झाली, त्वरा करी आता॥
अशी विनवणी करतात. नामदेवाचा प्रेमभाव पाहून देव सगुणरूपात प्रकट होऊन नैवद्य स्वीकारतात. मूळ स्वरूप बालनामयाला सहन होणार नाही म्हणून त्याला डोळे बंद करायला लावतात. नामदेव व जनाबाई आनंदाने घरी येतात.
‘नामयाची जनी’ म्हणवून घेणारी जनाबाई पहाटे लवकर उठून घरातील कामे उरकते. नामदेव मोठा होऊ लागतो. कर्मकांड, शिवाशिव, वैदिक धर्म याविषयी विचार करू लागतो. नामदेवांच्या मनातील विठ्ठलप्रेमाची गंगोत्री दुथडी भरून वाहू लागते. नामगजर करता-करता नामदेव कीर्तन करू लागतात. नामदेवाची भावावस्था कादंबरीकाराने सूक्ष्मपणे रेखाटली आहे. जात, पात, वर्ण, पंथ, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद नामदेव मानत नाहीत याचे चित्रण रवीन्द्र भट यांनी केले आहे.
नामदेवांचे लग्न व्हावे म्हणून गोणाई माहेरच्या म्हाळसाईला विनवणी करते व नामदेवाला कर्तव्याची जाणीव करून देते. आईच्या सांगण्यावरून नामदेव शिवणकाम करतात. दामाशेटी व्यापाराची सर्व माहिती तपशीलवार सांगतात व व्यापारात शक्यतो उधारी नसावी असे पटवून देतात. विठ्ठलाचे भजन करत नामदेव बाजाराला निघतात. झाडाखाली शिदोरी खात असताना एक कुत्रा नामदेवांची भाकरी खातो. त्यावेळी नामदेवाला त्या कुत्र्याकडे पाहून भूक म्हणजे काय हे जाणवते. मंगळवेढ्याच्या आठवडे बाजारात नामदेव उपेक्षित गोर-गरीबांना आपल्या जवळील विकण्यासाठी आणलेले कपडे वाटून टाकतात. मानवतेची उदात्त शिकवण देणारे नामदेवराय कादंबरीकाराने सात्त्विकतेने रेखाटले आहेत.
सदावर्ते यांच्या राजाईबरोबर नामदेवांचा विवाह होतो. सदावर्त्याची राजाई रिळेकरांची सून होते. जनाबाई राजाईला चिडवू लागते. नामदेवांच्या कीर्तनाला मंगळवेढ्याहून चोखोबा व अरणभेंडीहून सावता माळी येतात. चोखोबांची काव्यरचना व विठ्ठलभक्ती पाहून नामदेव भारावून जातात. नामदेवांची संसारवेल बहरते. पहिल्या नारायणाच्या पाठीवर महादेव, गोविंद, विठ्ठल, लिंबाई होतात. पांडुरंगाने आपल्या संसाराचे वाटोळे केले असे राजाईला वाटते व ती माहेरच्या मेसाईला आपली संसारव्यथा सांगते. पांडुरंग रूप बदलून चार पोती ज्वारी व गव्हाचे एक पोते नामदेवांच्या घरी टाकतात. राजाईचा जनाबाईविषयीचा स्त्रीसुलभ मत्सर जागा होतो पण प्रत्यक्ष पांडुरंग जनीसवे दळण दळत आहेत हे पाहून ती जनाबाईचा आदर करते.
विसोबा खेचर नामदेवाला उपदेश करतात. ‘चराचरसृष्टी व्यापून उरलेले आत्मतत्त्व तूच आहेस’ असा उपदेश ते नामदेवाला करतात. औंढ्या नाखनाथच्या शिवमंदिरात चमत्कार घडवून शैव व वैष्णव एकच आहेत हे संत नामदेव आपल्या कीर्तनातून तेथील जनसामान्यांना पटवून देतात. लोकजागृती करत नामदेव पंढरपूरला येतात. चोखोबावरील होणारा अन्याय पाहून त्यांचे मन भरून येते. बहुजन समाजात नामभक्तीचा विचार संत नामदेव पोहोचवितात. ज्ञानदेवांबरोबर संतमंडळ उत्तरेची तीर्थयात्रा करते. नामदेव भक्तीच्या सामर्थ्याने चमत्कार घडवून आणतात. ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी प्रसंगी नामदेवांना अतीव दुःख होते. मंगळवेढ्याला जाऊन नामदेव चोखोबांच्या अस्थी आणतात व पंढरपूरला चोखोबांची समाधी बांधतात. भक्तिप्रेमाची कावड घेऊन नामदेव उत्तर भारतात जातात. पंजाबमध्ये आपल्या विचार व कार्यातून संत नामदेव भागवत धर्माची पताका अभिमानाने फडकवितात. पंजाबमध्ये विविध जाती जमातीमधील शिष्य परिवार त्यांच्या भोवती जमा होतो. नामदेव भक्तीचे महत्त्व पटवून देतात व भागवत धर्माची अस्मिता जागृत ठेवण्याचे भरीव कार्य करतात. पंढरपूरला परत आल्यावर नामदेवराय पांडुरंगाच्या सानिध्यात समाधी घेतात.
रवीन्द्र भट यांनी संत नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पदर श्रद्धाळूपणे ‘घास घेई पांडुरंगा’ कादंबरीतून उलगडून दाखविले आहेत. विठ्ठलाशी भांडणारे, अत्यानंदाने नाचणारे, विठ्ठलाचा विरह सहन न झाल्यामुळे कासावीस होणारे, पंढरीच्या वाळवंटात कीर्तन करणारे संत नामदेव कादंबरीकाराने भाविकतेने चित्रित केले आहेत. श्रीविष्णुचा अवतार ज्ञानदेव व सनतकुमार म्हणजे नामदेव अशी दैवी अवताराची मांडणी केल्यामुळे कादंबरीकार नामदेवांचे व्यक्तिमत्त्व सात्विकतेने व अलंकारिक शैलीत शब्दबद्ध करतात. रवीन्द्र भट यांच्या काव्यरचना कादंबरीत प्रासादिक वाटतात. कादंबरीचे सौदर्य वाढवतात. आईने दिलेले नैवेद्याचे ताट घेऊन बालनामदेव विठ्ठलाच्या राऊळात येतात. नामया आर्ततेने विठ्ठलाला विनवू लागतो,
घास घेई पांडुरंगा, श्रीधरा अनंता।
वेळ भोजनाची झाली, त्वरा करी आता॥
या रचनांमुळे कादंबरीचे सौदर्य वाढले आहे.
एकूणच परंपरागत चरित्रांच्या आधारे श्रीविठ्ठलाच्या सानिध्यात नामाचा गजर करणार्या व मानवतेचा उपदेश करणार्या संत नामदेवांचे जीवनचरित्र रवीन्द्र भट यांनी आदरयुक्त भावनेने व श्रद्धाळूपणे रेखाटले आहे. संत नामदेव समजून घेण्यासाठी सदर कादंबरी वाचकांनी अवश्य वाचावी.
घास घेई पांडुरंगा
लेखक – रवीन्द्र भट
प्रकाशक – इंद्रायणी साहित्य
– डॉ. राजेंद्र थोरात
पुणे
9850017495