समर्पण

समर्पण

एकदा संत कबीर महाराजांकडे एक युवक आला. त्यानं कबीरांना विचारलं, ‘‘महाराज विवाह करणं योग्य आहे की अयोग्य?’’ ते ऐकून न ऐकल्यासारखं करत कबीरांनी प्रथम त्या युवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने युवकाने अधीर होऊन परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळीही कबीरांनी काही उत्तर न देता आपल्या पत्नीला हाक मारली व म्हणाले, ‘‘अगं आतून जरा कंदील घेऊन ये.’’

तेव्हा युवकाला मोठं आश्चर्य वाटलं. न राहवून तो म्हणाला, ‘‘महाराज आता दिवसाढवळ्या कंदिलाची काय गरज आहे? एवढ्या उजेडात तर सगळं काही स्वच्छ दिसतंय ना!’’

त्यावर कबीरांनी हसतच उत्तर दिलं, ‘‘बेटा हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. विवाह करताना पूर्ण समर्पणाचा भाव असणं आवश्यक आहे. तेथे तर्क-वितर्क अशा प्रकारच्या क्षुल्लक गोष्टींना अजिबात जागा नकोच. मी माझ्या पत्नीला आतून कंदील आणायला सांगितला, तिनं तो लगेच आणला सुद्धा! ‘कशाला पाहिजे?’, ‘दिवसा कंदिलाची काय गरज?’ अशाप्रकारचे प्रश्न विचारुन तिनं शंका उपस्थित केली नाही. मला कंदील तात्काळ आणून दिला. अशाप्रकारचा समर्पण भाव संसार करताना दोघातही असायला हवा. हा समर्पण भाव तुझ्यात आणि तुझ्या होणार्‍या अर्धांगिनीत असल्यास तू निश्चितच विवाह करू शकतोस!

या प्रसंगावरुन आपल्या असं लक्षात येईल की, संसार करताना समर्पण अन् विश्वास किती गरजेचा आहे! आजच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनात एकमेकांवरील विश्वासाची भावना कमी होताना दिसत आहे. त्याऐवजी आजकाल निरनिराळ्या शंकाकुशंका विचारून एक दुसर्‍याला भंडावून सोडणे, क्षुल्लक कारणांवरुन भांडणे असे प्रकार सररास होताना दिसू लागले आहेत. याला कारणंही तशीच आहेत… आपल्या आजूबाजूला नित्यनेमाने घडणार्‍या दुर्दैवी घटना, माध्यमांद्वारे प्रसारित होणार्‍या अतिरंजित बातम्या तसेच दूरचित्रवाणी संचाच्या विविध वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्‍या ताणतणाव वाढवणार्‍या मालिका यामुळे नाही म्हटलं तरी सर्वसामान्य जनतेच्या भावना विचलीत होतातच. त्यामुळे मग काही प्रमाणात का होईना आपले विचार कुंठित होण्यास वाव मिळतो. एकदा का आपली सारासार विचार करण्याची शक्ती आणि बुद्धी भ्रमित झाली तरी तेथे निरनिराळ्या शंकाकुशंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. हेच आजचं कटू वास्तव आहे यात शंकाच नाही!

दुसरं असं की, सध्याच्या अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे अतिसुशिक्षित माणूस एकप्रकारे आत्मकेंद्रित होऊ लागला आहे. कधी नव्हे इतका तो आपमतलबी सुद्धा होत चालला आहे अन् त्यामुळे जवळच्या नात्यातील दुरावा वाढत आहे असंही आपल्याला हल्ली निदर्शनास येईल. कधीकाळी आपल्या मित्रपरिवारात किंवा आपल्या नातेवाईक मंडळीत सुद्धा आनंदानं रमणारा हा माणूस आज मात्र भलताच आत्मकेंद्रित झालेला दिसून येतो! हा झालेला बदल अचानक एका रात्रीत घडणे शक्य नाही. त्याची निरनिराळी कारणं असल्याचं आपल्या लक्षात येईल. आजूबाजूची परिस्थिती, आयुष्यात अचानक घडलेल्या अप्रिय घटना, जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा मृत्यू तसेच ऐकीव माहितीच्या आधारे इतरांविषयी झालेले गैरसमज या गोष्टीही कारणीभूत ठरु शकतात. त्याचप्रमाणे विविध मालिकांच्या भडिमारामुळे, त्यातून दाखवल्या जाणार्‍या परिणामकारक दृश्यांची हा शिकला सवरलेला माणूस आपल्या खासगी आयुष्याशी तुलना करू लागतो. अशावेळी मात्र तो आपली सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवतो. तसंच माध्यमांमार्फत सतत कानावर पडणार्‍या बातम्या, वृत्तपत्रांतून वाचण्यात आलेले प्रसंग याचाही त्याच्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

आज आपणा सर्वांनाच माहिती आहे, महिन्याला लाख-दीड लाख रूपये उत्पन्न असणारी व्यक्ती सुद्धा सुखासमाधानात जगताना दिसत नाही. सारखी अस्वस्थता, निद्रानाश, ताणतणाव, साशंकता, भीती इत्यादी कारणांमुळे त्याच्या स्वभावात एकप्रकारचा चिडचिडपणा निर्माण होतो. कालांतराने मग अशी व्यक्ती नैराश्याच्या आहारी जाते. याउलट अगदी हातावर पोट असणारा मजूर वर्ग मात्र आपल्याला शांतपणे जगताना दिसतो. दिवसभर शारीरिक श्रमाची कामे करुन तो रात्री शांतपणे झोपी जातो. त्याला ना चोरांचं भय असतं ना कुठली चिंता असते. रात्री त्याला ना चॅटिंग करण्यात स्वारस्य असते ना तो कुठला क्रिकेटचा सामना बघत जागतो. तर जमिनीवरच मस्तपैकी ताणून देतो कारण हातावर पोट असलेल्या त्याला सकाळी लवकर कामावर जाण्याची घाई असते. जेवढे आपण जास्त श्रम करू तेवढे जास्त प्रमाणात पैसे मिळणार हे त्याला ठाऊक असते. म्हणूनच त्याला त्याच्या कामाप्रती एकप्रकारचा समर्पण भाव असतो. त्यामुळे तो अगदी जीव ओतून काम करतो! मग संध्याकाळी आपल्या श्रमाचा मोबदला घेऊन तो समाधानाने घरी जातो.

आधीच्या काळात शाळेतील शिक्षक आजच्यासारख्या शिकवण्या न घेता विद्यार्थ्यांना मनापासून शिकवायचे. त्यांना घडवायचे. त्यावेळी ते शिकवताना तल्लीन व्हायचे, स्वतःला झोकून द्यायचे. अशाप्रकारची समर्पित वृत्ती आजच्या शिक्षकांमध्ये अभावानेच आढळून येते. पूर्ण समर्पित भावनेनं शिकवणारे शिक्षक म्हणून याठिकाणी साने गुरुजींचं उदाहरण देता येईल. त्यांना मुलांचं मानसशास्त्र उत्तमप्रकारे अवगत होतं. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. तसेच आचार्य अत्रे ज्यावेळी शिक्षकी पेशात होते तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांच्यासाठी त्यावेळी ‘नवयुग वाचनमाला’ सुरू केली होती… ती विद्यार्थी घडवण्याच्या त्यांच्या तळमळीमुळेच! त्याचा परिणाम असा झाला… विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टिने तर फायदा झालाच शिवाय त्यांना वाचनाची सुद्धा गोडी लागली. अशाप्रकारचे विद्यार्थ्यांची नस ओळखणारे शिक्षक आज मात्र खरंच शोधावे लागतात ही वस्तुस्थिती आहे!

आज आपण सर्वत्र बघतो, कुठलंही क्षेत्र घ्या… आपलं काम करताना ‘शॉर्टकट मेथड’ वापरण्याची वृत्ती फोफावताना दिसून येते. त्यामुळे त्या केलेल्या कार्यात ‘क्वालिटी’ आढळण्याची शक्यता फारच कमी असते. (उदाहरणार्थ… नवीन इमारतींचे बांधकाम) मात्र काही प्रमाणात याला अपवादही असतात, नाही असं नाही. सरसकट सर्वच लोक ‘टाईमपास’ प्रकारचे काम न करता अगदी मनापासून आपलं काम करणारे पण आपल्या बघण्यात येतातच! तरीसुद्धा आपल्या कामाप्रती आधीसारखी असलेली समर्पित वृत्ती आजकाल कुठंतरी लुप्त झाली की काय अशी आज एकंदर परिस्थिती आहे. कारण कसंतरी चालढकल करून आपलं काम करायचं अन् महिनाअखेर जास्त मोबदल्याची अपेक्षा ठेवण्याची वृत्ती आज सर्वच क्षेत्रात वाढली आहे… आणि यामुळेच कामाप्रती असलेला समर्पण भाव लुप्त होताना दिसतो आहे.
येणार्‍या पिढीसमोर एक नवा आदर्श ठेवण्यासाठी, आपला समाज समृद्ध व सुदृढ करण्यासाठी आपणच ध्यास घ्यायला हवा. त्यासाठी आपण समर्पित भावनेनं कार्य करण्याची आपल्यापासूनच सुरूवात करण्याचा संकल्प करुया. आपल्या आदरणीय पूर्वजांपासून प्रेरणा घेऊन आपलं सामाजिक दायित्व पार पाडण्याचा आपण आजच निर्धार करूया!

विनोद श्री. पंचभाई
वारजे, पुणे
9923797725

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “समर्पण”

  1. Vinod s.Panchbhai

    खूपच छान ?
    साप्ताहिक लेआउट आणि मांडणी अप्रतिम..

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा