गंधांची अजब दुनिया

गंधांची अजब दुनिया

Share this post on:

सुगंधाची अशी एक मोहक अगोचर दुनिया असते. या दुनियेला वेगवेगळ्या खिडक्या किंवा झरोके असतात. कधी सुगंध या झरोक्यातून प्रवेशतात तर कधी आपण सुगंधांकडे ओढले जातो. अगदी पुराण काळापासून सुवास किंवा अत्तराचे वेड माणसाला आहे. हे सुगंध माणसाला वेडं करतात. आपली पत जाऊ नये म्हणून थेंबभर अत्तरासाठी कुणा बादशहाने अत्तराने भरलेला अख्खा हौद खुला केला होता म्हणतात.

उंची अत्तरे, सुगंधी द्रव्ये वापरणे हे त्या बादशहालाच शक्य होतं. आपण उगाच चिमुटभर कापूस कानात घालून फिरणारी माणसं! हल्ली तर स्प्रेचा जमाना! अंगभर फवारुन बाहेर पडायचं पण संध्याकाळी येताना अंगाला वास असतो गर्दीचा!

पण त्यातही काही क्षण मात्र सुगंधी होतात. मनावर प्रसन्नतेची शिंपण करतात. पहिल्या पावसाचं आगमन आणि तप्त मातीचा सुगंध. हा सुगंध मनाला वेडावतो. तुषार्त मन त्या वासाने शांत होतं. समृद्धीची चाहूल घेऊन येणारा गंध! वर्षातून फक्त एकदाच अनुभवायला मिळणारा असा. पाऊस आपला चमत्कार दाखवतो आणि सर्वदूर हिरवी जादू पसरते. हिरव्या रंगाला रंगीबेरंगी सुगंधी फुले लागतात.

सारं वातावरण सुगंधी बनतं. हवेत पावसांच्या थेंबांबरोबर एक ओला सुवास भरुन राहतो. फुलं आणि सुगंध हे समीकरण आहेच पण आता ते जाणवायला लागतं. नव्या नवलाईने फुलणारा अनंत, जाई-जुई ,प्राजक्त, सोनटक्का, केवडा, गुलाब! रंग आणि गंध यांची स्पर्धा जशी वरचढ होण्यासाठीची. मानवी ज्ञानेंद्रीयांवर कब्जा मिळावा म्हणूनची. असं म्हणतात, की सुगंधाचे तीन प्रकार आहेत. उग्र दर्पाचा सुगंध, मध्यम सुगंध अन् दीर्घ काळ रेंगाळणारा सुगंध! बकुळ, प्राजक्त, मोगरा, पिवळा चाफा मंद गंध पण मनाला उल्हासित करतात. सुरंगी, मरवा, सोनटक्का, हिरवा चाफा, निशीगंध मनाला भुरळ पाडतात. पांढरी दाट तगर काही काळ ओंजळीत धरताना तिचा सुगंध जाणवतो.

कृष्णकमळाचं ते जांभळं फुल मोहक पण किंचीत सुगंधीही! कवी, गीतकार या फुलांना त्यांच्या सुगंधासारखंच शब्दगीतातून अमर करतात. लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का…? या गीताची अवीट गोडी कधी किंचीतही कमी झाली नाही. सुगंधी वलयाचं एक रिंगण आपल्या घरातच असतं. देवखोली किंवा देवघर सहाणेवर उगाळलेलं चंदन किंवा अष्टगंध. शुद्धतुपाचा जळता दिवा, धूप, कापूर, अगरबत्तीचा मंद सुवास, देवाचरणी वाहिलेल्या फुलांचा मधुर दरवळ आपल्याला भक्तिरसात बुडवून टाकतो. देव तुमचा आणि तुम्ही देवाचे होऊन जाता. भक्तिचा हा दरवळ हात जोडायला भाग पाडतो.

घरातलं सुगंध निर्मितीच दुसरं ठिकाण स्वयंपाक घर! अनेकानेक चवींची निर्मिती इथं होते आणि मग गंधाची चवदार लहर घरभर पसरते. सकाळच्या मसालेदार चहा-कॉफीपासून ते संध्याकाळच्या चरचरीत फोडणीपर्यंत. सारे सुगंध इथे सुखेनैव नांदतात. खरा खवय्या केवळ सुवासावरुनच पदार्थाच्या चवींची पावती देतो. आज जमाना बदललाय पण पूर्वी खास बाळ आणि बाळाच्या आईसाठी घरात वेगळी खोली असायची आणि घरात शिरताना बाळाच्या धुरीचा तेलाचा एक विशिष्ट गंध घरभर जाणवायचा. घराचाच व्हायला आलेल्या नव्या पाहुण्याची चाहूल द्यायचा.

बाहेरचं असं एक उग्र दर्पाचं जग, गंभीर चेहर्‍याचं, नकोसं वाटणारं औषधांचं! गंभीर वातावरणात कोंदलेला नकोसा वास. न आवडणारं पण तुम्हाला बरं करुन पाठवणारही! इथे वावरताना एक अवघड आणि अवजड ओझं आपण नाकावर पेलतोय हा भाव जाणवत राहतो. नाक तसा आपल्या देहाचा एक साधारण अवयव पण ह्या गंधांच्या जगात त्याचं वेगळं आयुष्य नि अनुभव असतात ना?

-नीता जयवंत
अंबरनाथ
9637749790

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!