चीनची सफर

चीनची सफर

2009 च्या ऑक्टोबरमध्ये मला चायनाला कंपनीच्या एका कामासाठी महिनाभरासाठी जाण्याचा योग आला होता. चिंदाव ह्या उत्तर चायनामधील शहरातील एका शैक्षणिक विद्यापीठाबरोबर करार करून काही विशिष्ट कौशल्य ह्या चायनीज मुलांना शिकवण्याचा हा करार होता.

त्यानुसार 26 ऑक्टोबर 2009ला मी आणि माझे अजून दोन सहकारी मुंबईहून शांघाई आणि शांघाईहून ह्या चिंदावला गेलो होतो.

शांघाई ते हुंदाव हा साधारण 2 तास विमानाचा प्रवास करून आम्ही हुंदाव विमानतळावर उतरलो तेव्हा रात्र होती. हुंदाव विमानतळावर तिकडचा अमेरिकन सहकारी मित्र आम्हाला न्यायला गाडी घेवून आला होता. विमानतळाबाहेर पाऊल ठवले आणि थंडीमुळे जी काही हुडहुडी भरली म्हणून सांगू! माझी तर दातखिळीच बसली होती. त्यात अंगावर इतक्या वेळ चढवलेला ओझं म्हणून नकोसा वाटलेला तो कोट होता म्हणून वाचलो होतो. मी तर अक्षरश: थंडीने कुडकुडत होतो. कसाबसा सामान सांभाळत एकदाचा आम्हाला न्यायला आलेल्या गाडीत जावून बसलो.

हुंदाव ते चिंदाव हे अंतर साधारण 50-60 किलोमीटर असेल. मध्यरात्र झाली होती. आम्ही इनोव्हासारख्या एका मोठ्या गाडीत होतो. त्यांच्या तिकडच्या द्रुतगती मार्गावरून गाडी चालली होती. बाहेर प्रचंड थडी होती म्हणून गाडीत हिटर लावलेला होता. अचानक गाडी थांबली. गाडी एका टोलनाक्यावर होती. तिथल्या कर्मचार्‍याने पुढचा रस्ता धुक्यामुळे बंद आहे सांगितले. खूप धुके दाटले होते आणि वादळी वारे सुटलेले होते. त्यात मध्यरात्र. अनोळखी देश आणि शहर. डोळ्यात बोट घातले तरी समोरचे दिसत नव्हते. आयुष्यतील पहिलीच परदेशवारी आणि सलामीलाच हे असले निसर्गाचे तांडव पाहून माझी तर फाटलीच होती.

भल्या पहाटे आम्ही चिंदाव ह्या शहरात पोचलो. आमची राहण्याची सोय ह्या विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये करण्यात आली होती. ह्या शहरातील वातावरण सुद्धा अतिशय थंड म्हणजे 2 डिग्री होते आणि अधूनमधून बर्फही पडत होता. थंड वातावरणामुळे तिकडचे लोक येता जाता गरम पाणी किंवा ग्रीन टी पीत होते व शरीराचे तापमान नियंत्रित ठेवत होते हे समजले.

दुसर्‍या दिवसापासून लगेचच कामाला सुरवात केली परंतु भाषेची फारच अडचण येत होती. आम्हाला जे काही जुजबी चायनीज शिकवले होते त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्यात त्यांच्याकडे कोणालाच इंग्रजी येत नव्हते. त्यामुळे आमचे तर खूपच वांदे झाले होते. नाही म्हणायला तो अमेरिकन होता म्हणून बरं आणि अजून एक दुभाषा होता ज्यामुळे आमचा इतरांशी संवाद होत होता. त्यामुळे मी तर दुभाषाला इतका जीव लावला होता की काही विचारू नका. मी तर त्याला तळहाताच्या फोडासारखे जपले होते. ह्या महिनाभरात तो माझा तर तो खूपच चांगला मित्र झाला होता व अजूनही माझ्या संपर्कात असतो हे विशेष.

कामानिमित्त आम्ही आजूबाजूच्या काही शहरांमध्ये खूप फिरलो आणि जाणवले की ह्या चायनीज मंडळींनी खूपच चांगली प्रगती केलेली आहे. मात्र खाण्याचे फार हाल होते हो. एखादा शाकाहारी असेल तर संपलाच हो! अर्थात त्यांच्याकडील मांसाहार सुद्धा आम्हाला जरा न झेपणाराच होता. एकतर आमची जेवणाची सोय हॉस्टेलच्या मुलांच्या कॅन्टीनमध्ये असल्यामुळे एका वेळेस 200-300 विद्यार्थी मांसाहारी जेवण करताना त्या वासानेच कसंतरी व्हायचं. त्यात ही पोरं पोर्कच्या लालचुटुक मांसावर चांगला ताव मारायची. आपल्यासारखे चिकन नसायचे! भले मोठे कदाचित बदकच असावे. आपण भारतात खातो तसले चायनीज जेवण तर कुठेच दिसले नाही. माझे खायचेच वांदे झाले होते. मी आपला मालाथांग नावाचे शाकाहारी वाटणारे सूप आणि त्यात आपल्याकडे मिळणार्‍या म्यागीसारखे नुडल्स घालायचो व एक उकडलेल अंडे असा जेवणाचा बेत ठेवायचो. जेव्हा बाहेर जायला मिळेल तेव्हा शहरात जावून जरा बरे काहीतरी खायचो. आपल्यासारखे बिस्कीट, पाव वगैरे मिळणे जरा दूरपास्तच होते. जे काही मिळायचे ते एक तर काय आहे? कसले असेल ह्याची शंका आल्यामुळे खाणे तर लांबच राहिले ते हातात घेणे सुद्धा जड जायचे पण ह्या दुभाष्यामुळे खुपदा आमचे आयुष्य सुखकर झाले होते. सतत आमच्याबरोबर असायचा; म्हणून मी तरी एक महिना काढू शकलो नाही तर अवघडच होते.

कामानिमित्त आम्हाला त्यांच्या वेगवगळ्या शहरातील मेयरना (महापौरांना) भेटायला लागायचे. त्यांच्या पद्धतीने आम्हाला जेवायला घालायचे. त्याचे आदरातिथ्य खरोखर खूपच वाखाणण्याजोगे होते परंतु काय खायचे व कसे खायचे हा एक यक्ष प्रश्न आमच्यासमोर उभा असायचा. त्यांच्या त्या चॉपस्टिकने, भात, दाणे, शिजवलेले हे भले मोठे मासे, चिकन वगैरे खाणे म्हणजे कसरतच वाटायची. एक तर भल्यामोठ्या गोल टेबलावर एकावेळेस 15-20 जण जेवायला बसणार! त्यात ते त्यांच्या भाषेत आम्हाला हे घ्या ते घ्या करणार. त्यात त्यांचे आणि आमचे एकमेकांची भाषा येत नसल्यामुळे झालेले निर्विकार चेहरे पाहून आमचा दुभाषी गोंधळून जायचा व आमच्या मदतीला धावून यायचा. तो जे आम्हाला खाण्यायोग्य वाटेल ते बरोबर सांगून आमची वेळ भागवायचा.

ह्या 30 दिवसात मी तिकडच्या सहकार्‍यांमध्ये, माझ्या मनमोकळ्या स्वभावामुळे खूप प्रसिद्ध झालो होतो. विद्यार्थी सुद्धा माझ्याशी खूप हसून खेळून वागायचे. आम्ही आमच्या काही सहकारी मित्रांच्या घरी एक दोनदा जेवायला गेलो होतो व तिकडे एकदा आपल्या भारतीय पद्धतीचे जेवण म्हणजे फ्लॉवर बटाटा भाजी आणि मैद्याच्या पोळ्या केल्याचे मला चांगले आठवते. पोळ्या लाटायला पोळपाट लाटणे नव्हते तर चक्क ओट्याचा पोळपाट केला होता आणि बिअरच्या बाटलीचे लाटणे केल्याचे अजूनही आठवले की खूप हसायला येते. मला मासे खूप आवडतात हे कळल्यावर तिकडच्या एका सहकारी मैत्रीनेने; मी भारतात परत यायच्या आधी माझ्यासाठी घरून छान तळलेल मासे कार्यालयात आणून मला खाऊ घातले होते हे आजही आठवले तरी छान वाटते.

एकतर मी ह्या सगळ्यांमध्ये 46 वर्षांचा ज्येष्ठ होतो. त्यामुळे ही सगळी मंडळी, तसेच तिकडच्या संस्थेचे संचालक आणि संचालिका माझी अगदी जातीने चौकशी करायचे व तेवढीच काळजीही घ्यायचे. एका सहकारी मित्राने घरी बोलावून केलेल्या पार्टीमध्ये मी गायलेले किशोर कुमारचे फुलों के रंग से… हे गाणे तर सर्वांना इतके आवडले होते की त्यांना शब्द कळो अथवा न कळो त्यांनी चक्क रिकाम्या डब्यावर ताल धरून मला उत्स्फूर्त साथ देवून आमची ही जगावेगळी पार्टी रंगतदार केलेली अजूनही आठवले तरी झकास वाटते. भाषेची सर्व बंधने ह्या संगीतमय मैफिलीत कधीच गळून पडायची आणि आम्हाला भरभरून आनंद देवून जायची.

मला आजही आठवते की एक महिन्यांनी मी माझा व्हिसा संपला म्हणून भारतात परत यायला निघालो होतो तेव्हा तिकडच्या संचालकांनी खूप मोठी पार्टी दिली होती. महिन्याभरातल्या माझ्या सहवासाचे, माझ्या आचरणाचे आणि माझ्यातल्या सकारात्मक दृष्टिकोनाचे तोंड भरून कौतुक केले होते. मला त्यांच्याकडील सर्वांत उंची वाईन आणि ग्रीन टी खास भेट देवून गौरवण्यात आले होते आणि माझ्याबरोबर पार्टीतील प्रत्येक सदस्याने त्यांच्या पद्धतीने नाच करून माझा सन्मान केला होता हे आजही आठवले तरी मन कसे गहिवरून येते!

प्रेम, लळा, जिव्हाळा जो काही असेल तो असेल, जो मला माझ्या ह्या चीनच्या सफरीत अगदी भरभरून मिळाला होता आणि माझी ही एक महिन्याची चीनची सफर आयुष्यभरासाठी यादगार मात्र नक्की करून गेला होता.

अगदी नवरात्रात आपण जसे धान्य पेरतो व दहाव्या दिवशी म्हणजे दसर्‍याला ह्या पेरलेल्या धन्याला आलेले हिरवे हिरवेगार तन पाहून मन कसे प्रफुल्लीत होते ना अगदी तसंच काहीसं मला वाटत होतं!
जसं पेरतो तसं उगवतं.

-रविंद्र कामठे
पुणे
9822404330

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा