कामत गुरूजी.
नारायण विष्णुपंत कामत.
वय वर्षे – 104.
1915 सालचा जन्म.
शिक्षक म्हणून नोकरी.
सुरूवातीचा पगार फक्त 4 रूपये
तीस वर्षे नोकरी.
त्यानंतर 60 वर्षे सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत.
स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार.
महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राधाकृष्णन, साने गुरूजी यांना पाहिले, ऐकले.
आज कोल्हापुरातील आपल्या मुलांकडे वास्तव्य.
ही एका शिक्षकाची आणि वयाची शंभरी पार केेलेल्या माणसाची गोष्ट.
शिक्षक म्हणून नोकरी तीस वर्षे आणि त्यानंतर त्याच्या दुप्पट म्हणजे सुमारे 60 वर्षाचा कालावधी निवृत्तीवेतन घेणारे ते एकमेव असावेत. आज त्यांना सेवानिवृत्तीचे वेतन 25 हजाराच्या घरात मिळते. यावरून दीर्घायुषी असलेल्या नारायण कामत गुरूजी यांच्या जीवनाचा प्रवास त्यांच्याशी झालेल्या संवादातून उलगडला आणि तोच सर्वांना प्रेरणादायी ठरू शकतो.
नारायण विष्णुपंत कामत. भुदरगड तालुक्यातील नादवडे या छोट्या गावातील जन्म. 1915 साली जन्मलेल्या नारायण गुरूजी यांचे पहिल्या वर्गाचे शिक्षण नादवडे या खेड्यात झाले. त्यानंतर सातवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरात. शिक्षण पूर्ण होताच विविध खात्यात नोकरीची संधी. इंग्रजी राजवटीचा काळ. वडिलांच्या इच्छेनुसार शिक्षक म्हणून नोकरीत रूजू. प्रशिक्षणासाठी रूकडी आणि पुणे या केंद्रात प्रत्येकी एक वर्षाचा कालावधी घालविला. याकाळात स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा देवून सर्वांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. भारावलेला काळ होता. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी नोकरी सोडण्याचा विचारही मनात होता परंतु नवी पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम म्हणजे देशाची एकप्रकारे सेवाच हा विचार पक्का करून नोकरीत राहण्याचा निर्णय केला. आज नारायण कामत कोल्हापूरात आपल्या मुलाकडे वास्तव्यास आहेत. वय वर्षे 104. अशा एका ज्येष्ठ व्यक्तीची भेट घेवून स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि आजच्या स्थितीबाबत त्यांच्याशी संवाद साधण्याचा विचार करून धोंडीराम कामत या त्यांच्या मुलाच्या घरी भेट घेतली.
उंचीपुरी साडेसहा फुटाची, धष्टपुष्ट शरीरयष्टी. आजही वृद्धापकाळामुळे काही किरकोळ आजार वगळता प्रकृत्ती ठाकठीक. चष्म्याशिवाय वृत्तपत्रे व अन्य वाचन करतात. त्यांच्या भेटीत त्यांना भूतकाळात नेऊन नोकरीच्या काळापासून काही प्रश्न विचारले. त्या अनुषंगाने त्यांनी दिलेली उत्तरे आणि साधलेला संवाद यातून त्यांची स्मरणशक्तीसुद्धा तितकीच उत्तम असल्याचे स्पष्ट झाले.
तारखेनिशी काही घटनांची माहिती त्यांनी दिली. नादवडे या खेड्यात जन्म. त्याकाळात प्रचंड पाऊस कोसळायचा. सलग चार महिने पावसाचे, वाहतुकीची साधने नव्हती. पायी चालत अथवा बैलगाडीसारख्या साधनाचा उपयोग. आठ-दहा किलोमीटर चालत जाणे ही गोष्ट प्रत्येकाच्या सवयीची होती. शेतीकाम आणि त्याला जोडून अन्य काही व्यवसाय केला जायचा. पहिलीपर्यंतचे शिक्षण गावात घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी वडिलांनी कोल्हापूरात व्यवस्था केली. सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तो काळ असा होता की, सातवीपर्यंतचे शिक्षण म्हणजे नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत्या. शिक्षण खात्यात शिक्षक म्हणूनच जावे असा वडिलांचा आग्रह होता. त्यानुसार शिक्षकाची नोकरी पत्करली.
पहिली नेमणूक तालुक्यातील पाटगाव या खेड्यात झाली. मौनी महाराजांचा मठ त्याठिकाणी आहे. त्याचठिकाणी सध्या गारगोटीत असलेल्या मौनी विद्यापीठासाठी डॉ. जे. पी. नाईक यांनी जागा पाहिली होती. मी नोकरीसाठी रूजू झालो. प्रचंड पाऊस. त्यामुळे दररोज गावी जाणे अशक्य असल्याने मठातच मुक्काम होता. शाळेत केवळ दोन-चार विद्यार्थी यायचे. त्यांच्या घरी जावून पालकांशी सतत संपर्क साधावा लागत असे. काही वेळेला एकच विद्यार्थी घेवून शाळा सुरू ठेवावी लागे परंतु शिक्षणाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांची बैठक आणि पालकांशी संवाद अशा नियोजनातून विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले. पगार फक्त चार रूपये होता परंतु तो काळ स्वस्ताईचा. एक पैसा म्हटले तरीसुद्धा त्यामध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध व्हायच्या. खाण्यापिण्याची ददाद नव्हती. दूध दुभते आणि सर्व प्रकारच्या भाज्या असा सकस आहार होता. प्रथमपासून व्यायामाकडे लक्ष दिले होते. उंची सहा फुटाची. त्यामुळे सर्वांवर एकप्रकारे प्रभाव पडायचा. त्यात पुन्हा शिक्षकाला समाजात वेगळे स्थान होते. आदर होता. विद्यार्थी पालकांसाठी आदरयुक्त भीती होती. प्रशिक्षणासाठी रूकडी आणि पुणे अशा दोन ठिकाणी दोन वर्षे जावे लागले. यातच दिल्ली आणि मुंबई अशा ठिकाणीही जाण्याची संधी मिळाली. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थानसुद्धा मी पाहिले आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. राधाकृष्णन यांच्यासह त्याकाळातील दिग्गज नेते आणि देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जी चळवळ सुरू होती त्या चळवळीतील प्रमुख मंडळींना पाहण्याची आणि त्यांची भाषणे ऐकण्याची मला संधी मिळालेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चाललेला लढा म्हणजे एक भारावलेला काळ होता. युवक वर्ग, महिला आणि नागरिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
कामत गुरूजी एकेक आठवण सांगताना भूतकाळात डोकावत असत. त्यांच्या चेहर्यावरील हावभाव सतत बदलायचे. त्याचे बारकाईने निरीक्षण करता करता त्यांच्याशी माझा संवाद सुरू होता. आपल्या जीवनशैलीबद्दल बोलताना ते म्हणाले, कोणत्याही प्रकारचे व्यसन कधी केले नाही. सकस आहार म्हणजे घरची भाजी-भाकरी एवढेच जेवण भरपूर घेत होतो. दूध दुभते मुबलक होते. त्या जोडीला व्यायाम करीत होतो. दररोज चालणे, जोर बैठका अशाप्रकारे शरीर सुदृढ रहावे यासाठी केलेले प्रयत्न हा सवयीचाच भाग होता. आज 104 वर्षे झाली त्याबाबत आश्चर्य वाटत नाही. एवढी वर्षे आपल्याला निसर्गाने दिली. एवढा काळ आपण उत्तमप्रकारे आयुष्य कसे जगलो याचेच कधी कधी आश्चर्य वाटते परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आजच्या पिढीसाठीसुद्धा माझे हेच सांगणे आहे. घरचे जेवण आणि व्यसनापासून दूर राहणे याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. शरीराला व्यायामाची गरज असते. मी तर कोणतीही साधने नसताना चालणे, धावणे यासह लोखंडी पहार घेऊन दांडपट्टा खेळावा अशा पद्धतीने व्यायाम केला आहे. त्यामुळेच आजही शरीर धडधाकट राहिले आहे. निसर्गाने दिलेल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाबाबत आपण प्रथमपासून काळजी घेतली तर खूप चांगले, उत्तम आरोग्य मिळू शकते हा माझा अनुभव आहे. आणखी एक गोष्ट सांगायलाच पाहिजे. दररोज मूठभर शेंगदाणे खात आलो आहे. हा पदार्थ शरीरासाठी सर्वार्थाने उपयुक्त ठरणारा आहे. ही गोष्ट माझ्या अनुभवातून मी सिद्ध केली आहे. उत्तम प्रकृत्तीची अनेक कारणे शोधताना त्यामध्ये मूठभर शेंगदाणे ही गोष्ट प्राधान्याची ठरते.
आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल आपण समाधानी असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. कपड्याबाबतही फारशी वेगळी भूमिका कधीच नव्हती. एक तर भरपूर पाऊस पडायचा. गरजेएवढाच कपड्यांचा वापर. हाफ चड्डी, शर्ट, कधी धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हाच सर्वांचा ड्रेस कोड असायचा. मी सुद्धा शिक्षक असताना हाच गणवेश वापरत आलो आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या सर्वच निवडणुका अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत मतदान केले आहे. मतदान केलेच पाहिजे. तो आपला हक्क आहे. घटनेने दिलेला अधिकार आहे. त्यातून आपल्याला हवे असलेले योग्य प्रतिनिधी निवडून आणू शकतो. आपल्या आवडीचे सरकार येऊ शकते. आज निवडणुका हा विषय वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो परंतु आपण आपले कर्तव्य म्हणजे निवडणुकीत मतदान करणे आणि इतरांना मतदानासाठी प्रवृत्त करणे ही लोकशाहीतील प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे. याचे भान सर्वांनी जपण्याची गरज मला वाटते.
आजच्या युवा पिढीला कोणता संदेश द्याल, यावर ते म्हणाले संदेश देण्याची खरेतर गरज नाही. प्रत्येकानेच भवताली घडणार्या घटनांकडे डोळसपणे पाहून आपली जीवनशैली निश्चित केली तर आपल्या प्रश्नाचे उत्तर सहजतेने मिळून जाते. त्यासाठी कोणाच्याही सल्ल्याची अथवा संदेशाची गरज मला वाटत नाही.
तुमच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय? यावर ते म्हणाले, याबाबत नेमकेपणाने मला उत्तर देता येणार नाही. एकशे चार वर्षे आयुष्य जगलो हे खरे आहे. त्यासाठी व्यसनापासून दूर राहणे, नियमित व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण या तीन गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आजच्या पिढीकडे पाहिल्यानंतर चिंता वाटते. वयाची 40- 50 वर्षे आल्यानंतर विविध आजारांनी त्यांना गाठलेले मी पाहतो. खूप वाईट वाटते. याला कारण आपणच आहोत याचा विचार करून जीवनशैलीत बदल करण्याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही. हाच बोध सर्वांनी घ्यायला हवा.
दीर्घायुष्याचे रहस्य सांगणारे जीवनच नारायण कामत जगले आहेत. त्यातून अनेकांना नवी प्रेरणा आणि आयुष्य जगण्याचा मंत्र मिळू शकेल.
सुभाष धुमे
सुप्रसिद्ध पत्रकार, कोल्हापूर
9273376660
सुप्रसिद्ध पत्रकार, कोल्हापूर
9273376660