हाऊ इज द जोश…?

हाऊ इज द जोश...?

दिवसभर पक्षाच्या कार्यालयात प्रचाराची तयारी पूर्ण करून रात्री तो उशीरा घरी येतो. कपाटातले पांढरे खादीचे कपडे बाहेर काढून, त्याला कडक इस्त्री करून, बुटाला पॉलिश करून न जेवता तो झोपतो. असंही त्याला जेवण जाणार नव्हतं कारण उद्याचा उजाडणारा दिवस हा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तो ज्या पक्षासाठी, नेत्यासाठी दिवसरात्र लढायचा आज तोच नेता त्याच्या भागात, गावात येणार होता. शेजारच्या गावात तसं सभेचं रणशिंग फुंकेलेलं होतं. उद्या साहेबांना पाहता येणार, भेटता येणार, त्यांना केलेलं काम दाखवता येणार म्हणून तो खूप खुश होता. कधी दिवस उजाडेल आणि मी साहेबांना भेटेल असं त्याला झालं. आपल्यासोबत.. साहेबांना भेटायला येणार्‍या प्रत्येकाला त्याने कधी, कुठे भेटायचं, किती वाजता जमायचं ह्याचा एक मेसेज टाकला होता. घड्याळातला अलार्म चेक करून, पंखा थोडा वाढवून, जमिनीवर चादर अंथरुन तो शांत पडला. दिवसभर प्रचाराच्या गडबडीत थकल्याने त्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही.

सकाळ होते. अलार्म वाजतो. अंथरून आटपून, मनातली उत्सुकता शिगेला पोहचते. तो तयार होतो. थोडा नास्ता करून लगबगिने घराबाहेर पडतो. गाडीला पक्षाचा झेंडा, डोक्यावर पक्षाची टोपी, सोबत केलेल्या कामाची फाईल कात्रण. ठरलेल्या वेळेत सगळे जमतात. स्वागताची आणि रोड शोची पूर्ण तयारी होते. साहेब कुठपर्यंत पोहचले ह्यावर फोनाफोनी चालू होते. पहाटेपासून सगळे कार्यकर्ते साहेबांच्या भेटीला रस्त्यावर उभे असतात. पाण्याची बाटली अन् बाजूच्या टपरीवर वडापाव खाऊन सगळे कार्यकर्ते गावाच्या वेशीवर. जागोजागी स्वागतासाठी छोट्या-मोठ्या जाहिराती आणि तयारी.

घड्याळाचा काटा सकाळच्या वाटेवरून दुपारच्या वाटेवर चालू लागतो. कार्यकर्त्यांच्या गर्दीत एकच कुजबुज. अरे साहेब आता इथे आहेत, साहेब तिथे आहेत, साहेब अमुक ठिकाणी नास्ता करत होते म्हणून उशीर झाला, साहेब रस्त्यात अमुक अमुक व्यक्तीच्या बंगल्यावर थांबलेत. असो! ह्या सगळ्या गडबडीत तो मात्र साहेबांच्या गाडीकडे नजर लावून बसलेला असतो. त्या दिवशी त्याच्या घरात काय चालू आहे हे त्यालाही माहीत नसते. (जेवढी आपण आपल्या नेत्याची वाट पाहत भर रस्त्यावर थांबतो तेवढी वाट आपण आपले आईवडील जेव्हा परगावावरून घरी येतात तेव्हा त्यांना स्टॉपवर घेण्यासाठीही पाहत नाही.) त्याला आतुरता असते ती फक्त साहेबांची.

उन्हाचा पारा 30-35 च्या घरात पोहचतो. साहेबांची गाडी आणि त्याचा ताफा येण्यास अजून तरी वेळ असते. खबरी फोनाफोनी चालू असते. सगळे आपापल्या ग्रुपमध्ये उभे. बाजूच्या ग्रुपचा एक मुलगा वाट पाहत गर्मीने बेहोश पडतो. थोडी धावपळ चालू होते आणि लांबून साहेबांचा ताफा दिसतो.

साहेबांचा ताफा ते भले मोठे 7 ते 8 फुल्ली एअर कंडिशन हाईफाई गाडी. त्या पाठोपाठ अजून 5 ते 6 गाड्यांचा ताफा. त्या बेहोश पडलेल्या मुलाला बाजूच्या टपरीवर पंख्याखाली सोडून साहेबांच्या भेटीला सगळे तुटून पडतात. कोणाच्या हातात हार, कोणाच्या हातात फुलांचा गुच्छा असतो. तर बरेच जण तो क्षण टिपण्यासाठी मोबाईलचा कॅमेरा ऑन करून ठेवतात. साहेब तिथून थेट सरकारी विश्रांती गृहात जाईपर्यंत बाईक रॅली आयोजित होते. गावाच्या वेशीवर साहेबांची गाडी येऊन उभी राहते. पाठच्या गाडीतून साहेबांचे बॉडीगार्ड बाहेर पडतात आणि त्या गाडीला कव्हर करतात. ( जसं चित्रपटात दाखवतात सेम टू सेम तसं चालू असतं.)

तो पाहत असतो. गाडीचा दरवाजा उघडतो. गाडीतली एअर कंडिशन हवा घेऊन बाहेर उन्हाच्या झळामध्ये साहेब स्वागत स्वीकारत होते. कोणाची घोषणा, कोणी फोटो तर कोणाची धावपळ चालू असते भेटीला. तोही भेटीसाठी धडपडत असतो. साहेबांच्या भोवती कार्यकर्ते, त्यांना, त्या कार्यकर्त्यांना सावरणारे बॉडीगार्ड आणि घामाच्या धारेत हलकीशी थंड हवेची झुळूक. प्रत्येक कार्यकर्त्यासाठी तो अविस्मरणीय क्षण.

तापलेलं वातावरण पाहत साहेब गाडीत बसतात. काहींची भेट होते, काहींची तशीच राहते. सगळे रोड शोसाठी बाईकला किक मारतात आणि साहेबांच्या गाडीसमोरकर्कश आवाज करत, झेंडे मिरवत, गावात प्रचाराची धूळ उडवत, शक्ती प्रदर्शन करत सरकारी विश्रांती गृही पोहचतात. तो पुन्हा भेटण्याची ान कार्याची संधी शोधू लागतो. पक्षाच्या आणि साहेबाच्या विश्वासातल्या लोकांना भेटतो. भेटीसाठी त्यांना विनंती करतो. साहेब प्रवासात थकलेत ते जेवण करून थोडा आराम करून पुन्हा सगळ्यांना भेटतील. तो त्या वेळेची वाट पाहत पुन्हा थोडं हलकं फुलकं खाऊन घेतो. काही झालं तरी आज साहेबांची भेट घ्यायचीच. घराचं दार ओलांडल्यापासूनचा त्याचा तो जोश तसाच कायम असतो. काही कार्यकर्ते घराकडे तर काही कार्यकर्ते तसेच तिथेच वाट पाहत. बाजूच्या गावात रात्री साहेबांची सभा असते. त्या गावातही तोच जोश, तीच लगबग चालू असते पण तो मात्र तिथेच साहेबांची वाट पाहत. पुन्हा 2-3 गाड्याचा ताफा येतो. काही नेतेमंडळी गाडीतून उतरून साहेबाला भेटयला जातात. तो हे सगळं न्याहाळत संधीची वाट पाहत बसतो. बातमी समजते की ते नेते मंडळी आज पक्षप्रवेश करणार आहेत. मिटिंग चालू असते आणि सभेची वेळही जवळ येत असते आणि त्याची उत्सुकता तशीच कायम आणि आशावादी.

मिटिंग संपते. साहेब बाहेर येतात. सोबत नेते मंडळी अन् बॉडीगार्ड. जमेल तशी तो गर्दीतून वाट काढतो. साहेबांच्या जवळ जातो. स्वतःची ओळख सांगतो. साहेब पाठीवर थाप मारतो, साहेब एअर कंडिशन गाडीत बसतो. ताफा निघतो. त्याच्या डोळ्यासमोर ताफा हळूहळू दूर जातो पण त्याला महत्त्वाची असते ती साहेबांनी त्याच्या पाठीवर मारलेली थाप. 2 ते 3 सेकंदासाठी झालेली भेट. भेटीत साहेबांचे शब्द. तो अविस्मरणीय क्षण. चुकून तो क्षण कोणी टिपलाय का? आजूबाजूला त्यासाठी केविलवाणा प्रयन्त आणि त्या साहेबांवर असलेली निष्ठा तशीच कायम ठेवत पक्षासाठी पुन्हा कामाला लागतो.
हा जोश असतो तो खंदे कार्यकर्त्यात असतो.

सचिन तळे
पुणे
7709099646

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा