तरूणाईच्या काळजात घर केलेली ‘काळीजकाटा’

तरूणाईच्या काळजात घर केलेली ‘काळीजकाटा’

Share this post on:

‘एकवेळ माझं साहित्य बाजूला ठेवा पण या नव्या दमाच्या प्रतिभावंत लेखकाचं आवर्जून वाचा,’ असं सांगणारे दिग्गज साहित्यक्षेत्रात दुर्दैवानं कमी झालेत. जे थोडेफार आहेत त्यांच्यामुळे हा साहित्यगाडा अव्याहतपणे सुरू आहे. अशाच गुणग्राहक लेखकांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे पंढरपूर येथील सुप्रसिद्ध ग्रामीण लेखक, विचारवंत डॉ. द. ता. भोसले.

उमलत्या अंकुरांना बळ देण्यात भोसले सर कायम आघाडीवर असतात. त्यामुळेच त्यांनी लावलेली अनेक रोपटी आज फुला-फळांनी बहरताना दिसत आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचा मला एकदा फोन आला. ते म्हणाले,

‘‘संपादक महोदय, आमचा सोलापूर जिल्हा म्हणजे प्रतिभावंतांची खाणच आहे. काही कारणानं त्यातले काही अस्सल हिरे दुर्लक्षित राहिलेत. अनेक हिर्‍यांना पैलू पाडण्याचं काम तुम्ही यशस्वीपणे करत आहातच पण ग्रामीण भागातील आमच्या मुलांनाही तुम्ही सहकार्याचा थोडासा हात दिला, कौतुकाची थाप दिली तर साहित्यक्षेत्रात हे दीर्घकाळ झळकत राहतील. सुनील जवंजाळ हा आमच्या सांगोला तालुक्यातील चोपडी या गावचा एक हरहुन्नरी लेखक आहे. अत्यंत प्रतिकूलतेवर मात करत त्यानं साहित्याची बाराखडी गिरवलीय. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देणं गरजेचं आहे. काही करता आलं तर नक्की बघा…’’

आमची अशी चर्चा झाली आणि दुसर्‍याच दिवशी सुनील जवंजाळ यांचा फोन आला. गेली दीड-दोन वर्षे आमच्या ‘चपराक’च्या या 365 पुस्तकांच्या प्रकल्पाची जय्यत तयारी सुरू आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 असा कालखंड आम्ही त्यासाठी निवडला असल्यानं 2018 मध्ये जवंजाळांचे हे पुस्तक करता येणार नाही याची जाणीव होती. तरीही संहिता मागवून घेतली. भोसले सरांनी जवंजाळांचं केलेलं कौतुक ऐकून ते वाचण्याची उत्सुकता होतीच. जवंजाळांनी कादंबरीची संहिता मला मेल केली. नेमके त्याचवेळी आमची डोंबिवलीच्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची लगबग सुरू होती. या सगळ्या धावपळीत त्यांची कादंबरी वाचणे राहूनच गेले.

यासंदर्भात जवंजाळांचे तीन-चार फोन येऊन गेले. ते अत्यंत आदबीने आणि नम्रतापूर्वक त्यांच्या कादंबरीविषयी प्रतिक्रिया विचारत होते. या धबडग्यात अजून वाचले नाही, असं सांगितल्यावर ते म्हणाले,

‘‘माझ्या पुस्तकातल्या एकाही पानावर, किमान एखादे वाक्य रंजनातून प्रबोधनाकडे गेलेले नसेल तर ते पान प्रकाशक आणि वाचक या नात्याने तुम्ही बिनधास्त फाडून टाका. फाडलेल्या पानाचा फक्त क्रमांक कळवा, म्हणजे ते मी पुन्हा लिहिन.’’

त्यांच्या या ठाम आत्मविश्‍वासाचं कारण विचारल्यावर ते म्हणाले,

‘‘मी फक्त 17 दिवसात ही कादंबरी पूर्ण केलीय. आजचा भरकटलेला, नैराश्याकडं झुकणारा तरूण वर्ग डोळ्यासमोर होता. त्यांचं भवितव्य वाचवण्याचा माझा ध्यास आहे. त्यांच्यासाठी माझा जीव तुटतो. हे लेखन पूर्ण होत असताना मी माझे मित्र धनाजी चव्हाण यांना दाखवायचो. ते तटस्थपणे काही सुचना करायचे. लिहून पूर्ण झाल्यावर डॉ. द. ता. भोसले आणि डॉ. रणधीर शिंदे सरांना एकेक प्रती दिल्या. त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या अंमलात आणल्या आणि मग तुमच्याकडे पाठवले आहे.’’

दरम्यान मी कोल्हापूर दौर्‍यावर होतो. त्यावेळी प्रवासात जवंजाळांच्या कादंबरीचं वाचन सुरू केलं आणि ते अक्षरशः काळजात जाऊन बसले. त्यांच्या शोकात्मिकेचा काटा काळजात सलू लागला. मात्र ही वेदनाही हवीहवीशी वाटत होती. वसंता आणि सावली या पात्रांनी मनात आणि हृदयात घर केलं. कादंबरी आत्यंतिक आवडल्याचं ती प्रकाशित करत असल्याचं जवंजाळांना लगोलग कळवलं. ते म्हणाले,

माझी मुलगी योग्य घरात जातेय. आता माझी चिंता मिटली.

त्यानंतर अवघ्या आठ दिवसात कादंबरी वाचकांच्या हातात आली सुद्धा!

जवंजाळांची साहित्यनिष्ठा, त्यासाठी ते घेत असलेले परिश्रम, त्यांची कसदार शैली, अत्यंत विनयी आणि नम्र स्वभाव, समाजाविषयी वाटणारा कळवळा, तरूण पिढीला काहीतरी सर्वोत्तम द्यायचे असा सततचा ध्यास यामुळे अल्पावधीतच आमची चांगली गट्टी जमली. मसापच्या अहमदनगरला झालेल्या विभागीय साहित्य संमेलनात त्यांच्यातील कवीनंही आम्हा सर्वांना जिंकून घेतलं. त्यांच्या जीवनातील संघर्ष पाहून कोणीही अचंबित होईल. एका टपरीवजा हॉटेलवर टेबल पुसणारा, चहाचे कप धुणारा मुलगा ते माणदेशची साहित्य परंपरा नेटाने पुढे नेणारा प्रगल्भ लेखक, कवी असा त्यांचा जीवनप्रवास आहे. दहावीत अनुत्तीर्ण झाल्याची खंत न बाळगता पडेल ती कामे करत, सकाळी पावासारखे बेकरी प्रोडक्ट घरोघर विकत त्यांनी पुढचे शिक्षण नेटाने पूर्ण केले. डीएड करून ज्ञानदानाचेच काम हाती घेतले. जगणं जेव्हा लेखणीतून झरू लागतं तेव्हाच त्यातून महाकाव्याची बीजं निर्माण होतात हे त्यांनी हेरलं. त्यांचा ‘वेदनेच्या पाऊलखुणा’ हा कवितासंग्रहही याचीच साक्ष देतो.

‘काळीजकाटा’ या कादंबरीत अत्यंत तरल शैलीतली, काव्यात्म भाषेतली, प्रेम, मैत्री, संघर्षाची मूळे घट्ट रोवणारी कथा त्यांनी मांडलीय. ही एक अत्युत्तम प्रेमकथा आहे. आजच्या वासनेनं बरबटलेल्या युगात अनेकांची आकर्षणालाच प्रेम समजण्याची गफल्लत होत असताना, त्यातून कुटुंबसंस्थेवरच अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित होत असताना जवंजाळ यांनी वसंत आणि सावली या दोन पात्रांच्या माध्यमातून चांगुलपणावरील श्रद्धा जपली आहे. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार वाट्याला येऊनही या कादंबरीची नायिका कचरत नाही. आलेल्या परिस्थितीला निर्भयपणे सामोरे जाताना ती तिच्यातील कवयित्रीला जिवंत ठेवते. बलात्कारासारख्या गुन्ह्यात स्त्रिचा काहीही दोष नसताना तिला अनेक मानहाणींना सामोरे जावे लागते. ही एक निव्वळ दुर्दैवी घटना आहे, एक अपघात आहे असे समजून आपण तिच्याशी तितक्याच जिव्हाळ्याने, आत्मियतेने वागावे, तिला योग्य तो आदर-सन्मान द्यावा असा सकारात्मक संदेश सुनील जवंजाळ यांनी या कादंबरीतून दिला आहे.

वसंत आणि सावलीची ही प्रेमकथा वाचताना आपण त्यात हरवून जातो. जवंजाळ यांचे या कादंबरीतलं समाजचिंतन, त्यांची प्रगल्भता, सुभाषितवजा वाक्यांची केलेली पखरण, यातल्या पात्रांनी दाखवलेला संयम, सामान्य माणसाला सर्व हलाहल सोसण्याचं, प्रतिकूलतेवर मात करण्याचे मिळणारे बळ हे सर्व काही विलक्षण आहे. प्रत्येक आईवडीलांनी आपल्या मुला-मुलींना भेट द्यावी, तरूणाईने आपापले प्रतिबिंब त्यात शोधावे असे अचाट शब्दसामर्थ्य जवंजाळांच्या या कादंबरीत आहे. यातल्या सगळ्याच व्यक्तीरेखा आपल्या आजूबाजूला असल्याचं सातत्यानं जाणवतं. साहित्य व्यवहारातल्या अनिष्ठतेपासून ते ग्राम्य संस्कृतीतील संस्काराच्या, कलेच्या वैभवाचं दर्शन या कादंबरीत घडतं.

या कादंबरीच्या प्रकाशनाचे कार्यक्रमही अनोखे झाले. जवंजाळांनी चोपडी या त्यांच्या गावात कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा सोहळा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती आग्रहाने पूर्णत्वासही नेली. त्यांचे सगळे नातेवाईक, मित्रमंडळी या सगळ्यांच्या उपस्थितीने गावालाच उत्सवी स्वरूप आले होते. पुण्यातून आमची ‘चपराक’ची टीम उपस्थित होती. द. ता. भोसले सरांपासून ते ग्रामीण कथाकार अप्पासाहेब खोत, पुरूषोत्तम सदाफुले, त्यांच्या शाळेचे संस्थाध्यक्ष पी. सी. झपके, जवंजाळांचे सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी असा अनोखा सोहळा रंगला. ‘आत्मिक प्रेमाचं सुंदर मंदीर म्हणजे काळीजकाटा’ अशा शब्दात भोसले सरांनी या कादंबरीचा गौरव केला.

अल्पावधितच या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचा उत्कृष्ट ग्रामीण कादंबरी लेखनासाठीचा ग. ल. ठोकळ पुरस्कार, सोलापूर जिल्ह्यातील साहित्यात प्रतिष्ठेचा समजला जाणारा मनोरमा पुरस्कार, मसाप दामाजीनगर शाखेचा स्व. सिद्धमाला ढगे स्मृती साहित्य पुरस्कार, ध्यास फौंडेशनचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार असे एकाहून एक पुरस्कार प्राप्त झाले. नुकतेच या कादंबरीला टेंभुर्णी येथील काव्यमंथन बहुउद्देशिय मंडळाचा ‘साहित्य मायबाप’ हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

27 फेब्रुवारी रोजी भाषा दिनानिमित्त मुंबईत झालेल्या उद्योजक परिषदेत जगभरातील यशस्वी उद्योजकांच्या साक्षीने या कादंबरीची दुसरी आवृत्ती समारंभपूर्वक वाचकांच्या भेटीस आली आहे. वर्षभरात कादंबरीची दुसरी आवृत्ती येणे, त्याला अशी बेफाम वाचकप्रियता लाभणे हे सुनील जवंजाळ यांनी या कादंबरीलेखनात घेतलेल्या परिश्रमांचे फलित आहे. तरूणाईची वैचारिक जाणीव आणखी प्रगल्भ व्हावी यासाठी ही कादंबरी विद्यापीठीय अभ्यासक्रमात लागायला हवी. एका सामान्य माणसाने जिद्दीने, नेटाने त्याच्यातील असामान्यत्व सिद्ध केले आहे. आता त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहून त्याला बळ देणे हे आपल्या समाजाचे, व्यवस्थेचे कर्तव्यच आहे. तुर्तास, माणदेशी मातीचा वारसा पुढे नेणार्‍या आणि सांगोला तालुका हा निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळी असला तरी इथली वैचारिक संपन्नता अनमोल आहे हे सिद्ध करणार्‍या सुनील जवंजाळ यांना भावी लेखन प्रवासासाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो.
– घनश्याम पाटील, पुणे
7057292092
पूर्वप्रसिद्धी – दै. सुराज्य, सोलापूर
11 मार्च 2019

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

5 Comments

  1. जबरदस्त लेख…
    काळीजकाटा वाचायलाच हवी अशी अप्रतिम कादंबरी

  2. खूप छान शब्दात आपण कधीच काटा या कादंबरीचा यशाचा आलेख मांडला आहे काळीज कथा ही कादंबरी महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली पाहिजे हा तुमचा दृढ विश्वास निश्चितपणाने सफलतेकडे जाताना दिसतोय .
    आभारी आहे सरजी खूप भारी लिहिलंय

  3. पुरस्कारांपेक्षाही लेखन महत्त्वाचे.आपण करून दिलेल्या परिचयातून लेखनवत्ता यथास्थित ध्यानात येते.

    1. धन्यवाद सर. आपला अभिप्राय महत्त्वपूर्ण आहे.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!