राजकारणातील ज्योतिषी की विदुषक ?

राजकारणातील ज्योतिषी की विदुषक ?


खूप मोठ्या अपेक्षा असणार्‍या व्यक्ती किंवा संघटनेकडून केवळ पोकळ घोषणाच होत राहिल्या की मग कालांतराने त्यांचे हसू होऊ लागते. त्याचेच आजच्या काळातले जितेजागते उदाहरण म्हणजे राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना! कारण नुकताच 9 मार्च रोजी त्यांच्या पक्षाने तेरावा वर्धापनदिन साजरा केला. या तेरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी काय कमावले? काय गमावले? पक्ष संघटना म्हणून आपण किती सक्षम वा कमकुवत झालोय याचे सिंहावलोकन करणे गरजेचे असताना केवळ मोदी, भाजप, शाह, डोवाल आदींवर तोंडसुख घेण्यातच आपल्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा केला. एक अपयशी संघटक म्हणून यापेक्षा मोठा पुरावा तो काय?

आपण कोणीतरी वेगळे आहोत, आपण कसे सडेतोड बोलतो या भ्रामक प्रतिमेतच त्यांची ऊर्जा वाया जात असल्याचे पहायला मिळतेय. खरं तर राज ठाकरेंना बाळासाहेबांच्या वक्तृत्त्वाचा वारसा लाभलाय. त्यांनी तो वृध्दिंगत करत पक्षाच्या संघटनकौशल्याकडे लक्ष देणे गरजेचे असताना केवळ टिवल्या बावल्या करण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळेच नाशिक महापालिका असेल किंवा सुरवातीच्या काळात 13 आमदार निवडून देत लोकांनी त्यांना संधी दिली होती. मात्र राज ठाकरेंनी त्याकडे लक्ष न देता केवळ स्वतःच्या धुंदीत राहण्यात धन्यता मानली. त्यामुळे आगामी काळात त्याचा फटका त्यांना बसल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले.

साधारणपणे पक्षाच्या वर्धापनदिनी आपल्या कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश देत त्यांच्यात स्फुरण चेतवणे गरजेचे असते. पक्ष संघटनेला आलेली मरगळ झटकून कामाला लावण्याचा तो दिवस असतो. मात्र राज यांनी यापैकी काहीही केलेले दिसले नाही. केवळ मारझोड, तोडफोड, चिकलफेक एवढ्याच काय त्या गोष्टी त्यांच्या वर्धापनदिनाच्या भाषणात ऐकायला मिळाल्या. राज यांचे भाषण सर्वच वृत्तवाहिन्यांवरुन थेट प्रेक्षेपित होत होते. एवढी प्रसिद्धी अभावानेच एखाद्या नेत्याला मिळते. तेही केवळ एक आमदार असणार्‍या पक्षाच्या नेत्याला. अर्थात थेट प्रक्षेपण करणार्‍या वृत्तवाहिन्यांना टीआरपी चांगला मिळतो म्हणून ते भाषण लाईव्ह दाखवतात पण त्याचाच फायदा घेत राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरित करणे गरजेचे असताना, ‘पक्षाची बदनामी करणार्‍यांना घरातून बाहेर काढून मारा’ असा सल्ला देतात यातच त्यांच्या नैराश्येचे दर्शन घडते. असो नोटाबंदीनंतर ते नैराश्य वाढलेय असे एकंदरीतच पहायला मिळतेय.

2014 साली लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली होती. लोकसभा निवडणुका न लढवता त्यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. आज मात्र त्याच मोदींवर आरोपाच्या फैरी झाडतायत. अर्थात तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असावा. मोदींना विरोध करताना त्यांनी सैन्याच्या कर्तृत्त्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलंय. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये केवळ झाडे पडली आहेत, कोणीही दहशतवादी मारला गेला नाही. वर याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी वैमानिक अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचा आधार घेतलाय. जर पाकिस्तानचे दहशतवादी किंवा नागरिक ठार झाले असते तर त्यांनी वर्धमानला जिवंत जाळला असता असे बालिश विधान केलेय. राज यांच्या भाषणाकडे तटस्थतेने पाहिले असता त्यात द्वेषाचा दर्प अधिक येतो.

राज यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानी आणि अरबमधील लोक भागीदार आहेत असा दावा केला. त्यात आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. व्यवसाय हा व्यवसाय असतो. जर का त्याचे भागीदार देशविरोधी कृत्य करत असतील तर त्याला आक्षेप घेतलाच पाहिजे. हाच न्याय जर राज ठाकरे यांच्या बाबतीत लावायचा झाल्यास, शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्या मुलासोबत कोहिनूर कंपनीत कोणाची भागीदारी होती? मराठीचा आग्रह धरणार्‍या राज यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली मग याला काय म्हणायचे? त्यामुळे कोणतीही गोष्ट कोठेही जोडून लोकांची दिशाभूल करणे गैरच आहे. यापुढे जाऊन त्यांनी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीबाबतही भाष्य केले. त्यातून त्यांना सुचवायचे होते की, भाजप सरकारने सत्तेसाठी पुलवामा हल्ला घडवून आणला आहे. केवळ वैयक्तिक आकसापोटी राज ठाकरे यांनी असे आरोप करणे बालिशपणाचेच ठरत आहेत. जी संघटना दिवसरात्र केवळ राष्ट्राचाच विचार करते त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असे नीच काम करतील यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही.

पुढे त्यांनी नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेण्याला आक्षेप घेतला. मात्र ’डिप्लोमसी’ हा प्रकार राज यांना कळत नसावा का? मुळात वैयक्तिक हितसंबध दुखावल्यावर माणूस जसा सुडाने पेटून उठतो आणि आरोपांच्या फैरी झडत राहतो तसेच काहीसे राज यांचे झालेय. सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांना सर्कशीतल्या तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र यामध्ये राज ठाकरे लोकसभा निवडणुका लढवणार नसल्याचे पहायला मिळतेय. त्यामुळे सर्कस पहायला आलेल्या लोकांना हसवण्याची जबाबदारी घेणार्‍या विदुषकाप्रमाणे राज ठाकरेदेखील आपली भूमिका योग्यप्रकारे वठवणार असल्याचे वर्धापनदिनाच्या भाषणावरुन दिसून आले. त्यामुळे राज ठाकरेंची प्रतिमा राजकारणातील ज्योतिषी किंवा विदुषकासारखी होत आहे.

– सागर सुरवसे,
9769179823

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “राजकारणातील ज्योतिषी की विदुषक ?”

  1. Shantanu khilare

    अतिशय चांगले विश्लेषण आणि सडेतोड

  2. Abhishek Samudra

    Vinash kale viprit buddhi…aatmabal sample ki nairashya jaga ghete yache murtimant udaharan ahet he.

  3. sanjay kshirsagar

    टीका बरीचशी एकांगी वाटत आहे.
    वर्धापनदिनी पक्षनेतृत्वाने काय बोलावं व काय बोलू नये, हा त्यांचा प्रश्न आहे. दुसरे असे कि, पुलवामाच्या राजकारणास खुद्द पंतप्रधान व त्यांच्या स्वपक्षीयांनी आरंभ केल्यानंतर इतर राजकीय पक्ष जर स्वस्थ बसले असते तर तो त्यांचा आत्मघात ठरला असता. त्यामुळे हाही मुद्दा निकाली निघतोय. बाकी निवडणुकांच्या संदर्भात आपण काय निर्णय घेणार, घेणार नाही वगैरे योग्य वेळी जाहीर करू असे स्वतः राज ठाकरेंनी सांगितलेलं आहेच. तेव्हा ती योग्य वेळ येईपर्यंत त्यावरही टीका टिपण्णी करणे योग्य दिसत नाही.

    1. Yuvraj malge

      भाऊ सडेतोड लिहिलं आहेस।
      सहमत

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा