सदोबांचं बेगडी इतिहासप्रेम

महाराष्ट्रात विचारवंतांची कमतरता नाही. त्यातही पुणे शहरात तर नाहीच नाही. इथे एक विचारवंत शोधा; तुम्हाला दहा मिळतील. अशाच ‘विचारवंतांपैकी’ एक आहेत डॉ. सदानंद मोरे. ते घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत. तत्त्वज्ञानात रमतात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते देहूकर मोरे आहेत आणि थेट तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. ‘सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख‘ असे रामदास स्वामींनी म्हटले असले तरी सध्या कोण कुणाचा वारसदार आहे हे सांगावे लागते. कुणी कुणाच्या संपत्तीचा वारसदार असते; तर कुणी विचारांचा! सदानंद मोरे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत, असे म्हणायला हरकत नाही; मात्र हा वारसा चालवताना ते बहुतेकदा ‘सोयीस्कर’ वारसा जपतात. ‘मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर’ होण्याचे धाडस तुकोबांच्या या वंशजात नाही. म्हणूनच ते ‘नाठाळाच्या माथी’ काठी मारण्याचे धाडस करत नाहीत. त्यांच्या भूमिका ‘कुंपणावर’च्या असतात. सध्याच्या अस्थिरतेच्या काळात साहित्यिकांची, विचारवंतांची भूमिका समाजमन घडविण्यात महत्त्वाची ठरणारी असताना प्रा. मोरे यांच्यासारखे लोक मात्र नवनवीन वाद उकरून काढतात आणि चर्चेत राहतात.

एक गोष्ट प्रांजळपणे कबूल करायला हवी की, मोरे यांच्या विचारांची खोली आणि विविध विषयांवरील व्यासंग अफाट आहे. माझ्यासारख्या नवख्याला त्यांच्या जवळपासही फिरकणे शक्य नाही. त्यांची जीवननिष्ठा, साधना आणि अविरत परिश्रम नव्या पिढीसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांना दोष लावणे म्हणजे नातवंडाने आजोबाची फिरकी घेण्यासारखे आहे. या गोष्टीची नम्र जाणीव असूनही हे लिहावे लागतेय, कारण आजोबांच्या खांद्यावर बसलेला नातू काहीवेळा त्यांच्याहून लांबचे पाहू शकतो. त्याची तितकी क्षमता नसतानाही दूरवरचे संकट त्याला आजोबांच्या आधी दिसू लागते.

सध्या आपण जातीधर्मात वाटले गेलोय. ज्यांना सुशिक्षित म्हणावे ते सर्व आपला सुसंस्कृतपणा बाजूला सारून या राजकारणाचा घटक बनतात. जातीशिवाय, धर्माशिवाय, विचारधारांशिवाय जगणे दिवसेंदिवस कठिण होत चाललेय. अशा वातावरणात या सगळ्यातून समाजाला बाहेर काढण्याऐवजी सदानंद मोरे यांच्यासारखे विचारवंत आपला क्षणिक स्वार्थ जपण्यासाठी आपल्याला त्या भोवर्‍यात ढकलत आहेत.

पुण्यात नुकतेच बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. सदाशिव शिवदे यांना पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. सदानंद मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यात त्यांनी संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यावरून काही विधानं केली. त्यांचं म्हणणं असं आहे की, ‘‘संभाजी उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवणे हा औचित्यभंग आहे.’’ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा या उद्यानातून काढून टाकला होता. गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकाद्वारे त्यांनी संभाजीराजांची बदनामी केलीय, असा त्यांचा आक्षेप आहे. हा पुतळा या उद्यानात पुन्हा सन्मानाने बसवणार हा भारतीय जनता पक्षाचा गेल्या निवडणुकीतील दावा होता. त्यात त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले. नंतर या मुद्याचा भाजपला विसर पडलेला असतानाच मोरे यांनी हा वाद पुन्हा उकरून काढला आहे.

ते म्हणतात, ‘‘तेव्हाच्या काळात महाराजांविषयी जे गैरसमज रूढ होते त्यानुसार गडकरींनी अय्याशी आणि रंगेल संभाजीचे चित्रण त्यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकात रंगवले. वा. सी. बेंद्रे यांच्यासारख्या अभ्यासकाने राजांवरील बदनामीचा हा डाग धुवून काढला. त्यामुळे या उद्यानात संभाजीराजांचाच पुतळा असायला हवा. गडकरींचा पुतळा हटवल्याने कायस्थ प्रभूंच्या अस्मितेला तडा जाता कामा नये. गडकरींनी महाराजांची बदनामी करायची म्हणून हे लेखन केले नाही, पण ज्या संभाजीराजांबद्दल अपसमज प्रचलीत होते ते दूर करण्याचं पहिलं काम कुणी केलं? ते काम वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी केलं; की जे स्वतः कायस्थ प्रभू आहेत! ज्यांनी अभ्यासपूर्वक संभाजीराजांविषयीचे अपसमज दूर केले त्या बेंद्रेंचा पुतळा संभाजी उद्यानात बसवायला हवा. मुख्य पुतळा संभाजीराजांचा आणि बाजूला बेंद्रेंचा पुतळा जोपर्यंत बसवला जात नाही तोपर्यंत या उद्यानाला पूर्णत्व नाही.’’

महाराष्ट्रात सध्या शेतकर्‍यांचा संप सुरू आहे. अशावेळी नवनवीन वाद निर्माण करण्याचे मोरे यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. गडकरींचा पुतळा रातोरात काढून नदीत फेकून देण्यात आला. त्यावेळी मोरे हजार किलो मूग गिळून गप्प होते. नेमके आताच त्यांना बेंद्रेंची आठवण का यावी? पंढरपूर मंदिर समितीच्या अध्यक्षपदासाठी डॉ. सदानंद मोरे इच्छुक असून त्यासाठी मराठ्यांची सहानुभूती मिळवणे आणि दबावगट तयार करणे असे यातले राजकारण असल्याचे सांगितले जात आहे. हे जर खरे असेल तर आपला समाज रसातळाला गेलाच म्हणून समजा. आपले इप्सित साध्य करण्यासाठी जेव्हा विचारवंतांना असे घाणेरडे राजकारण करावे लागते तेव्हा आपण अधोगतीच्या दिशेने जात असतो.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे अशीही मागणी गेली अनेक वर्षे सातत्याने होत आहे. त्यावेळी मोरे यांनी अनाहूतपणे सल्ला दिला की, औरंगजेबाचा भाऊ दारा शूकोह हा संस्कृततज्ज्ञ होता. मग शहराचे नावच बदलायचे झाले तर त्याला दारा शूकोहचे नाव द्या! त्याहीवेळी बराच वाद झाला होता. महाराष्ट्र सरकारच्या ‘नाम समिती’ चे अध्यक्ष असल्याप्रमाणे मोरे यांच्यासारखे विद्वान जेव्हा ‘कोणत्याही’ विषयावर मते मांडू लागतात तेव्हा ती अधिक चिंतेची बाब असते.

मोरे यांचे नेहमीच ‘कातडीबचाव’ धोरण असते. अनेकदा ते एखाद्या राजकीय विचारधारेने प्रेरित होऊन मतप्रदर्शन करत आहेत, हे स्पष्टपणे जाणवते. कोणत्याही विषयावर ठाम भूमिका न घेता ते उड्या मारत असल्याने त्यांना ‘कुंपणावरचे विचारवंत’ म्हटले जाते. बरं, त्यांच्याकडे काही स्वाभिमान शिल्लक आहे की नाही असाही प्रश्‍न अनेकदा पडतो. घुमानच्या साहित्य संमेलनात साहित्य महामंडळाच्या तेव्हाच्या अध्यक्षा व्यासपीठावर होत्या. नऊवारी साडी, नथ आणि हातात तलवार घेऊन त्यांनी माध्यमांना फोटो दिला. पंजाबचे मुख्यमंत्री, आपले ‘जाणते राजे’ हे सगळे व्यासपीठावर होते आणि संमेलनाध्यक्ष असणारे मोरे मात्र मागे मागे ढकलले गेले होते. या संमेलनात संमेलनाध्यक्षाला काही किंमत आहे की नाही, असा प्रश्‍न बघणार्‍यांना पडत होता. त्यावेळी तो फोटो छापताना आम्ही ‘नथ दिसली पण नाक दिसत नाही’ असे स्पष्टपणे लिहिले होते. अशी अवहेलना, उपेक्षा वाट्याला येऊनही गप्प बसणारे मोरे मराठी माणसाला स्वाभिमान शिकवतात. घुमानच्या संमेलनात ओळखपत्र नसल्याने त्यांना जेवणासाठी वाट पहात थांबावे लागले होते आणि नंतर रांगेतून जेवण घ्यावे लागले होते या बातम्याही तेव्हा माध्यमांनी दिल्या होत्या.

संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा तेव्हाच्या महापौरांनी बसवला होता. त्यासाठी आचार्य अत्रे यांच्यासारखा बलदंड पत्रकार आवर्जून उपस्थित होता. ‘राजसंन्यास’ या नाटकात जिवाजी कलमदाने या खलपात्राने महाराजांविषयी आणि रामदास स्वामी यांच्याविषयीही अवमानकारक उद्गार काढले आहेत. मात्र तेव्हाच्या प्रचलीत साधनांचा आधार घेत ही मांडणी करण्यात आली होती. मुळात गडकरी हे इतिहासलेखक नाहीत. राजसंन्यास हे एक नाटक आहे. त्यातही ते खलपात्र. महत्त्वाचे म्हणजे हे नाटक अपूर्णच राहिले. 1907 साली लिहिलेल्या या नाटकावरून 2017 ला वाद होणे म्हणूनच दुर्दैवी आहे. राम गणेश गडकरी यांनी हे नाटक लिहिल्याबद्दल त्यांचा पुतळा या उद्यानात बसवला नव्हता. त्यांची एकंदर साहित्यनिष्ठा, भाषाप्रभू म्हणून दिलेले योगदान यामुळे त्यांच्या स्मृती जपण्याचा हा प्रयत्न होता. मग असलेले पुतळे काढायचे आणि नवे बसवा म्हणून मागण्या करायच्या हा दुटप्पीपणा नाही का? सदानंद मोरे यांच्यासारख्या अभ्यासकाला तरी हे शोभणारे नाही.

आज जगद्गुरू तुकोबारायांच्या विचारांची समाजाला खरी गरज आहे. आपल्यातला एकोपा वाढणे, टिकणे महत्त्वाचे असताना समाजात फूटच पडत चालली आहे. संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की हत्या? हाही वाद अधूनमधून चर्चेला येत असतो आणि अनेकांत वादाचे कारणही ठरतो. पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देहूत तुकाराम महाराजांची हत्या झाली असती तर त्यांचे शिष्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय भूमिका घेतली असती? तुकारामांची हत्या झाली असे म्हणणे म्हणजे शिवरायांच्या क्षमतांवर आक्षेप नोंदवण्यासारखे नाही का? हा प्रजाहितदक्ष राजा त्यांच्या गुरूंचेही रक्षण करू शकला नाही? त्यामुळे यात सगळ्यांचीच बदनामी आहे हे लक्षात घेऊन विधाने करावित. खरंतर सदानंद मोरे यांच्यासारख्या विचारवंताने अशा विषयावर ठाम भूमिका घेऊन हे वाद थांबवायला हवेत. समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी करायला हवे. डॉ. सदानंद मोरे हे अकारण आक्रस्ताळेपणा करणारे, वाद ओढवून घेणारे, आपल्या असभ्य आणि उर्मट प्रवृत्तीचे प्रदर्शन घडविणारे साहित्यिक निश्‍चित नाहीत. त्यामुळे ते काय म्हणतात याकडे माझ्यासारख्या अनेक अभ्यासकांचे लक्ष असते. म्हणूनच सदानंद मोरे यांनी आता कसल्याही मोहात न अडकता नव्या पिढीला दिशा देण्याचे काम करावे; अन्यथा त्यांचे वागणे, बोलणे हे बेगडीपणाचेच होते, आहे असे दुर्दैवाने आम्हास म्हणावे लागेल.


घनश्याम पाटील, पुणे
7057292092

टीम चपराक

हे ही अवश्य वाचा