‘पर्यटन स्थळ’ असलेली एकमेव स्मशानभूमी

  काही दिवसापूर्वी वाराणसी अर्थात श्री क्षेत्र काशी येथे जाण्याचा योग आला. काशी हे हिंदुंचे पवित्र धर्मस्थळ आहे. असे म्हणतात की आयुष्यात एकदा का होईना काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन घ्यावे आणि गंगेत डुबकी मारावी. जगभरातून अनेक हिंदू लोक येथे काशी विश्‍वेश्‍वराच्या दर्शनाला येतात. अभ्यास आणि पर्यटनाचा भाग म्हणून देखील अनेक विदेशी पर्यटक काशीला आवर्जून भेट देतात. काशीला जर भेट दिली तर काही गोष्टी आवर्जून बघाव्यात आणि त्या म्हणजे काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन, बनारसी साडी, गंगेची आरती, गंगेच्या काठी बांधलेले प्रसिद्ध घाट.

असे म्हणतात की गंगेच्या काठी 85 घाट आहेत. एखाद्या नावेत बसून जर तुम्ही गंगा नदीतून सैर केली तर तुम्हाला या सर्व घाटांचे दर्शन होते. या 85 घाटांपैकी काही प्रसिद्ध घाट म्हणजे दशाश्‍वमेध घाट, असी घाट, दरभंगा घाट, मनमंदिर घाट, अहिल्याबाई होळकर घाट, मणिकर्णिका घाट! या घाटांमध्ये सर्वात जुना घाट म्हणजे मणिकर्णिका घाट. हा घाट 3000 वर्षांपेक्षाही जुना आहे आणि या घाटाबद्दल अनेक दैवी कथा सांगितल्या जातात. गंगेवर नावेत बसून जर तुम्ही घाटांचे दर्शन घेत असाल तर या यात्रेला पंचक्रोशीची यात्रा म्हणतात आणि या यात्रेत जर तुम्हाला मणिकर्णिका घाटाचे दर्शन होत नसेल तर यात्रा पूर्ण होत नाही असे म्हणतात. मुळात मणिकर्णिका घाट ही एक स्मशानभूमी आहे; पण स्मशानभूमी असूनदेखील या घाटाचे खूप मोठे महत्त्व आहे. विदेशी पर्यटकांसाठी हा घाट एक स्मशानभूमी असूनदेखील पर्यटनाचे केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटन केंद्रबिंदू बनायचे कारण म्हणजे ही भारतातील एकमेव अशी स्मशानभूमी आहे जिथे अखंडपणे अंतिम संस्कार सुरु असतात. एका आकडेवारीनुसार या स्मशानभूमीत एका दिवसाला साधारणपणे 250 ते 300  देहांचे अंतिमसंस्कार होतात. या कारणामुळे या घाटाला महास्मशानभूमी असे देखील म्हणतात.

या घाटाबद्दलच्या कथा आणि प्रथा जर ऐकल्या तर स्मशानभूमी असूनदेखील मनात कुतूहल निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. असे म्हणतात की काशी नगरीचे निर्माण भगवान शंकराने केले आहे आणि या पृथ्वीतलावर भगवान शंकराची जेवढी आवडती स्थळं आहेत त्यापैकी सर्वात आवडते स्थळ म्हणजे काशी आणि काशीमधील मणिकर्णिका घाट. या घाटाचे नाव मणिकर्णिका का पडले आणि हा घाट महास्मशानभूमीत कसा परावर्तीत झाला याबद्दल बर्‍याच पौराणिक कथा आहेत. एका कथेनुसार भगवान शंकर आपल्या भक्तांसोबत सतत व्यग्र असल्याने माता पार्वतीने त्यांचे मन घराकडे वळवण्यासाठी या घाटावर स्वतःचे कर्णफूल लपवून ठेवले आणि कर्णफूल हरवले आहे असे सांगून ते भगवान शंकरास शोधायला सांगितले. यावरून या घाटाचे नाव मणिकर्णिका पडल्याचे सांगितले जाते. एका दुसर्‍या कथेनुसार भगवान विष्णुने या घाटावर शंकराची तपस्या केली होती आणि स्वतःच्या चक्राने एक कुंड निर्माण केले होते. या कुंडात स्नान करताना त्यांचे कर्णफूल हरवल्याने या घाटाला मणिकर्णिका घाट असे नाव पडले. हा घाट महास्मशानभूमीत कसा परावर्तित झाला याबद्दल पण एक कथा आहे. असे म्हणतात की माता पार्वतीच्या वडिलांनी एका सोहळ्यात भगवान शंकराचा अपमान केल्याने पार्वतीने रुष्ट होऊन या घाटावर स्वतःला चितेमध्ये झोकून दिले आणि येथूनच या जागेवर अंतिम संस्काराची सुरुवात झाली. मृत्यू ही आपण अशुभ घटना मानतो पण माता पार्वतीने स्वतःला चितेमध्ये झोकून दिल्यामुळेच या घाटावरील अंतिम संस्काराला अशुभ न मानता मंगल मानतात. असे म्हणतात की कुठल्याही जिवाच्या मृत्युनंतर त्या जिवाला मोक्ष प्रदान होतो, पण मोक्ष मिळतो तो त्याच्या रुपाला, त्याच्या शरीराला. या घाटाबद्दल असा विश्वास व्यक्त केला जातो की या घाटावर ज्या व्यक्तीचा अंतिम संस्कार होतो त्या व्यक्तीला आणि त्याच्या आत्म्याला मोक्ष मिळतो. तो आत्मा जीवन मरणाच्या चक्रातून कायमचा मुक्त होऊन नंतर कुठल्याही गर्भात प्रवेश करत नाही. या कारणामुळेच येथे अखंड चिता जळत असतात. फक्त काशीच नव्हे तर देशाच्या इतर भागातील अनेक हिंदू व्यक्तीदेखील ही इच्छा व्यक्त करतात की मृत्युनंतर त्यांचा अंतिम संस्कार हा मणिकर्णिका घाटावर व्हावा; जेणेकरून आत्म्याला संपूर्ण मोक्ष मिळेल. असे म्हणतात की या घाटावर भगवान शंकर हे मृत व्यक्तीच्या कानात तारक मंत्र म्हणून त्याला मोक्ष प्रदान करतात तसेच पार्वतीच्या कानातील हरवलेल्या कर्णफुलाचा आजही शोध घेऊन प्रत्येक मृत व्यक्तीकडे सापडले का याबद्दल विचारणा करतात. यामुळे या घाटावर भगवान शंकराचे सदैव अस्तित्व असते असा एक समज आहे. हा एकमेव असा घाट आहे जो स्मशानभूमी असून देखील त्याला तीर्थक्षेत्र मानले जाते.

या घाटाबद्दलच्या कथा आणि प्रथा येथेच संपत नाहीत. या घाटावर आजही काही अशा प्रथा साजर्‍या होतात ज्या ऐकून आपल्याला आश्‍चर्याचा धक्का बसतो. प्रत्येक वर्षी चैत्र नवरात्रातील सप्तमीला या स्मशानभूमीत नगर वधु (वेश्या) स्वखुशीने नृत्य सादर करतात. एका बाजूला जळणार्‍या चिता आणि दुसर्‍या बाजूला नगर वधुंचा (वेश्यांचा) नृत्य कार्यक्रम हा अतिशय विचित्र संयोग भारतात फक्त इथेच बघायला मिळतो. या विचित्र प्रथेच्या मागील एक कथा अशी सांगितली जाते की राजा मानसिंगांनी या घाटावरील शंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. जीर्णोद्धाराच्या निमित्ताने त्यांनी नृत्य आणि गाण्याच्या कार्यक्रमाची घोषणा केली. यासाठी त्यांनी काशीमधील कलाकारांना कला सादर करण्यासाठी निमंत्रण दिले पण कार्यक्रमाची जागा ही स्मशानभूमीत असल्याने सर्व कलाकारांनी कला सादर करण्याचे आमंत्रण नाकारले. मानसिंग राजांनी कार्यक्रमाची घोषणा काशी नगरात केल्यामुळे कार्यक्रम रद्द करणे शक्य नव्हते. शेवटी नगरवधुंना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आणि त्यांनी देखील खुशीने हे आमंत्रण स्वीकारले. तेव्हापासून या स्मशानभूमीत दर चैत्र सप्तमीला नगरवधुंचा हा नृत्याचा कार्यक्रम होतो. या दिवशी नगरवधू नृत्य करताना भगवान शंकराला प्रार्थना करतात की पुढील जन्मी त्यांना या नरकासमान जगण्यातून मुक्त कर आणि एक स्वाभिमानी जीवन प्रदान कर. हा एक असा विचित्र संयोग आहे जिथे चितेवर मृत व्यक्ती मोक्षाला जात असते तर नाचणार्‍या नगरवधू ह्या जिवंतपणी नरकासमान जीवनातून मोक्ष मिळण्यासाठी भगवान शंकराची मनोभावे प्रार्थना करतात.

या घाटावर अजून एक प्रथा आहे. ही प्रथा म्हणजे मृत व्यक्तीकडून कर वसूल करण्याची प्रथा. या स्मशानभूमीत येणार्‍या प्रत्येक अंत्ययात्रेतील मृत व्यक्तीकडून कर घेतला जातो. याबद्दल देखील एक कथा अशी सांगितली जाते की राजा हरिश्‍चंद्र हा कल्लू डोंबाकडे एका अटीनुसार नोकरी करत होता. डोंब जात ही मणिकर्णिका घाटावर अंतिम संस्काराचे कार्य करते. राजा हरिश्‍चंद्राचा मुलगा अचानक मरण पावल्याने राजाने कल्लू डोंबाला मुलाचे अंतिम संस्कार करण्याची विनंती केली. त्याकाळी अंतिम संस्काराच्या बदल्यात काही तरी दक्षिणा दिली जायची. तेव्हा राजा हरिश्‍चंद्राने दक्षिणा म्हणून आपल्या पत्नीच्या साडीचा एक तुकडा कल्लू डोंबाला कर म्हणून दिला. तेव्हापासून घाटावर डोंब जातीचे लोक हे अंतिम संस्काराच्या बदल्यात कर घेतात. अजून एका प्रथेनुसार या घाटावरील नागा जातीचे साधू वैकुंठ एकादशीच्या दिवशी या जागी चितेच्या भस्माची होळी खेळतात. अशी होळी भारतात फक्त या एकाच जागी खेळली जाते.

काशीमध्ये येणारे अनेक देशी विदेशी लोक हे स्मशानभूमी असून देखील कुतुहलापायी या घाटाला भेट देतात. आधी सांगितल्याप्रमाणे या घाटावर एक कुंड देखील आहे जिथे स्नान करणे खूप पवित्र मानले जाते. 3000 वर्षांपासून चालत आलेल्या या महास्मशानभूमीत आजपर्यंत 25 कोटीहून अधिक व्यक्तींचे अंतिम संस्कार झाले आहेत. स्मशानभूमी असून देखील पर्यटनाचे केंद्रबिंदू झालेले हे फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील एकमेव ठिकाण आहे.

राहुल बोर्डे

9822966525

हे ही अवश्य वाचा