सुकाणू समिती नको; एकहाती नेतृत्व हवे!

ज्याप्रमाणे शेतकर्‍यांना पारंपरिक शेतीपद्धती सोडून आधुनिक पदद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला जातो, त्याचप्रमाणे आता शेतकरी लढ्याच्या रणनीतीतही बदल करणे अपरिहार्य झाले आहे. कारण वर्षानुवर्षे त्याच त्याच पद्धतीचे आंदोलन, त्याच त्या मागण्यांचा फार्स, प्रतिवर्षी तोच तो लढा आणि त्यातील तीच ती नाटकी स्वरुपाची भाषणे आता शेतकरी नेत्यांनी बंद करायला हवीत. तसेच शेतकर्‍यांनी ती ऐकणेही बंद करायला हवीत. ज्याप्रमाणे एक मेंढरु दुसर्‍याच्या पाठीमागे जाते आणि पुढे जाऊन ते खड्ड्यात पडते अगदी तशाच पद्धतीने शेतकरी चळवळीतील लढ्याचे आणि नेतृत्वाबाबत झाले आहे. आता कुठेतरी यात बदल व्हायला हवेत. अन्यथा पुन्हा एकदा पदरी निराशाच पडल्याशिवाय राहणार नाही.


सध्या राज्यात ऐतिहासिक शेतकरी लढा सुरु आहे. वास्तविक पाहता भारताच्या इतिहासात शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी इतका मोठा लढा उभारला गेला नसेल. खर्‍याअर्थाने आता शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर उत्तर मिळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही संधी शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांनी गमवायला नको. कारण ज्याप्रमाणे मागण्यांबाबत शेतकरी नेते म्हणतायत त्याप्रमाणे नेतृत्वाबाबतही ’अभी नही तो कभी नही’ अशीच भूमिका शेतकर्‍यांनी घेतली पाहिजे.
1 जूनपासून शेतकरी संपावर गेला आहे. वास्तविक पाहता शरद जोशींनी सांगितलेल्या लढ्यांपैकी हा एक लढा शेतकर्‍यांनी त्यांच्या पश्चात हाती घेतला आहे. त्यांना ही एक नामी संधी चालून आली आहे. आजच्या घडीच्या कोणत्याही शेतकरी नेत्याने संपावर जाण्याबाबतचा विचार किंवा प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्याच्या शेतकर्‍यांनी स्वतःहून या प्रकारचा लढा उभारला. शेवटी गरज ही शोधाची जननी असते हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. या लढ्याला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल. कारण संपूर्ण राज्यभर कोणत्याही नेतृत्वाविना स्वयंस्फूर्तीने शेतकर्‍यांनी या संपात सहभाग घेतला. मात्र दहा दिवसानंतर आता त्याचाही विचका होताना दिसतोय. याला जबाबदार आहे ती शेतकरी नेत्यांची समिती. जयाजीसारख्या अर्धवटरावाला या लढ्यात नेतृत्व दिले गेले. त्यानंतर त्यांनाही बाजूला सारत नव्या समितीची स्थापना करुन डॉ. अजित नवलेंसारख्या आक्रस्ताळी शेतकरी नेत्याला किसान सभेने पद्धतशीरपणे समितीची सूत्रे दिली. त्याच दरम्यान राज्यातील काही अस्वस्थ नेत्यांनीही यात पद्धतशीरपणे घुसखोरी केली. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिकाधिक गुंतागुंतीचे बनण्यावर शिक्कामोर्तब झाले. एकदोन चेहरे सोडले तर वर्षानुवर्षे शेतकरी लढा देणार्‍या आणि शेतकर्‍यांना विशेष काही देवू न शकणार्‍या नेत्यांनाच यात संधी दिली गेली.
कोणतेही आंदोलन हे त्यांच्या नेत्याच्या निर्णयक्षमतेनुसार आणि कार्यक्षमतेनुसार यशस्वी होत असते. याचा प्रत्यय देशाने वारंवार घेतला आहे. मग राष्ट्रपिता महात्मा गांधी असोत की जयप्रकाश नारायण किंवा अण्णा हजारे असोत! या सर्व आंदोलनात एक धागा समान होता तो म्हणजे एकछत्री नेतृत्वाचा. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व महात्मा गांधीनी केले. सत्तरच्या दशकातील भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेतृत्व जयप्रकाश नारायण यांच्याकडे होते, तर अगदी अलीकडच्या काळातील भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेतृत्व अण्णा हजारे यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांचे लढे यशस्वी होऊ शकले असा निष्कर्ष आपण काढू शकतो. मात्र शेतकरी लढ्याबाबत आपण तसे ठामपणे सांगू शकत नाही कारण आजतागायत देशात सोडा राज्यातही शेतकर्‍यांना एकछत्री नेतृत्व असलेला नेता मिळालेला नाही. शरद जोशींनी तसा प्रयत्न केला मात्र त्याला शेतकर्‍यांकडूनच खो घालण्यात आला. त्यांच्यानंतर राजू शेट्टी हे नाव गेल्या दशकभरात पुढे आले. मात्र शेट्टींनीही जुनीच री ओढत केवळ तात्कालिक विषय हाती घेत शेतकरी चळवळ पुढे दामटवली. कालांतराने तोचतोचपणामुळे मोठ्या प्रमाणात शेट्टींच्या स्वाभिमानीने शेतकर्‍यांचा जनाधार गमावला असे खेदाने म्हणावे लागते. त्यामुळे आज जी सुकाणू नामक समिती स्थापन करण्यात आली त्यात अशांचाच भरणा पहायला मिळत आहे. त्यामुळे या समितीकडूनही शेतकर्‍यांना ठोस असे काही मिळेल असे वाटत नाही.
खरेतर आजवरची शेतकरी आंदोलने ही तात्कालिक स्वरुपाचीच असल्याचे पहायला मिळाले. प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी आंदोलने उदयाला आली. मात्र प्रश्नांची उकल करण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते तसे कोणतेच प्रयत्न आजच्या शेतकरी नेतृत्वाकडून झालेले नाहीत किंबहुना भविष्यात तसे होतील असेही दिसत नाही. शेतकरी चळवळ त्याच त्याच ठिकाणी घिरट्या मारताना दिसत आहे. ती पुढे जायला तयार नाही. आजवरच्या चळवळीच्या नेत्यांनी ठरावीक कालावधीपर्यंत न्याय हक्काबाबतचा लढा दिला आणि आजही तो दिला जातोय. मात्र त्याच्यापुढे जाऊन एक सकारात्मक दिशा देणे गरजेचे होते आणि भविष्यातही आहे. शेतकरी युवकांचे गट गावागावत बनवून वर्षातील काही महिने लढा आणि उर्वरीत कालावधीत शेतीतील नवनवीन प्रयोग, नवीन तंत्रज्ञान, शेतमालावरील प्रक्रिया करण्यासाठीच्या कार्यशाळा घेणे क्रमप्राप्त होते. त्यापुढे जाऊन ऑनलाईन मार्केटींग, मालाचे एक्स्पोर्ट करणे, गावात बंधारे बांधणे अशी शेकडो कामे या चळवळीतील युवकांना देता आली असती. मात्र केवळ एफआरपीसाठी रास्तारोको, ट्रकांची जाळपोळ, कारखानदारांच्या विरोधात बंडाळी निर्माण करणे, दूध किंवा पालेभाज्या रस्त्यावर फेकून देवून व्यवस्थेविरोधातला राग व्यक्त करणे याशिवाय काहीही केलेले पहायला मिळत नाही. खरतर खूप मोठी संधी शेतकरी नेत्यांना भविष्यातही आहे.
आजच्या घडीला राज्यात एक नवे नेतृत्व तयार होताना पहायला मिळत आहे. जयप्रकाश उर्फ बच्चू कडू असे त्या नेतृत्वाचे नाव आहे. ’अपना भिडू, बच्चू कडू’ अशी कॅचलाईन देत त्यांनी विदर्भासहीत मराठवाड्यातील युवकांच्या हृदयात कोपरा निर्माण केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातही त्यांची क्रेझ निर्माण होताना दिसत आहे. वास्तविक पाहता अंध-अपंगांसाठी सुरु केलेल्या लढ्यातून ते शेतकरी प्रश्‍नाकडेही वळले आहेत. सामान्यांविषयी असलेली आंतरिक तळमळ, अन्यायावर तुटून पडण्याची धमक, कोणत्याही अमिषाला बळी न पडता मुख्य उद्देशापासून विचलित न होणारे नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहता येवू शकते. आजवर त्यांनी जी आंदोलने केली ती वरवर पाहता तात्कालिक स्वरुपाची भासत असली तरी त्यात प्रश्‍नांची उकल करण्याची तळमळ दिसून येते. आपल्याला नक्की काय करायचे आहे याची स्पष्टता त्यांच्याकडे आहे. नेतृत्वाला पुरेशी असलेली आक्रमकता आणि संवादाची तयारी असलेले शेतकरी चळवळीतले आजच्या घडीचे एकमेव आश्वासक नेतृत्व म्हणून बच्चू कडू यांच्याकडे पाहता येईल. राज्यात वा देशात सुरु असलेल्या राजकीय वादंगात योग्यरीतिने आणि प्रभावीपणे प्रवेश करण्याची कलाही त्यांच्याकडे आहे, हे त्यांचे बलस्थान आहे. हा माणूस जातपात पाहत नाही, प्रांतवादही स्वीकारत नाही. धर्माच्या बाबतीत माणुसकी हाच धर्म मानणारा असल्याने त्यांचे नेतृत्व पूर्वग्रहविरहीत दिसते.
कोणतीही चळवळ पुढे जायची असेल तर त्याला बहुनेतृत्व चालत नाही कारण हाताच्या पाच बोटांपासून वज्रमूठ बनत असली तरी त्यातील एक बोट हे मोठे असतेच. त्यामुळे एकाला कोणालातरी नेतृत्व किंवा मोठेपणा देणे क्रमप्राप्त ठरते. आज शेतकरी चळवळ अधिक संवेदनशील झाली असतानाच तिला एक संवेदनशील, मुत्सद्दी, व्यावहारिक, सर्वसमावेशक, पूर्वग्रहविरहीत दृष्टी लाभलेल्या नेतृत्वाची गरज आहे. सुदैवाने बच्चू कडू यांच्या रुपाने तसे नेतृत्व शेतकरी चळवळीकडे आहे. त्याचे मोल समजून त्यांच्याकडे नेतृत्व दिल्यास ठोस असे कार्य निश्चितपणे उभे राहील असे वाटते. बळीराजाने आता वाहवत न जाता एकछत्री नेतृत्व स्वीकारून त्याच्या हाती सूत्रे देणे गरजेचे आहे. अन्यथा गेली अनेक वर्षे रखडलेले शेतकर्‍यांचे प्रश्न पुढची अनेक वर्षे जैसे थेच राहतील.

सागर सुरवसे

सोलापूर, 9769179823

हे ही अवश्य वाचा