कुठेही नोकरी न करता समाजसेवेच्या भावनेतून शाळा देतील ते मानधन स्वीकारून साने गुरुजींचे वाङमय प्रसार करणारा एक कलाकार गेल्या बेचाळीस वर्षांपासून महाराष्ट्र भ्रमंती करत आहे. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ समाजाच्या तळागाळातील असंख्य मुलांपर्यंत पोहोचविणारा हा कलाकार इतके दिवस प्रसिद्धीपासून दुर्लक्षित कसा राहिला याचेच आश्चर्य आहे .
अरुण धुमाळ नावाच्या कलाकाराने स्वतःचे अवघे जीवन साने गुरुजींच्या चरित्रासाठी वाहून दिले आहे. साने गुरुजी कथामालेच्या सासवड येथील शिबिरात अरु धुमाळ यांनी श्यामची आई हा एकपात्री प्रयोग करून विद्यार्थ्यांना हेलावून सोडले होते. त्यावेळी ऐन तारुण्यात असलेला हा कलाकार आता पंच्याहत्तरीच्या घरात आहे. आपला संसार सांभाळून श्यामची आई, धडपडणारा श्याम आदी हजारो प्रयोग करून अरु धुमाळ यांनी रंगभूमी नावाची स्वतंत्र नाट्यसंस्थाही सुरु केली. व्यावसायिक रंगभूमीवरही ते अनेकदा दिसतात पण महाराष्ट्रातील मुलांना आजही अरु धुमाळ परिचित आहेत.
पुण्यामध्ये शाळेत शिकत असताना पुरवणीत वाचनाला असलेल्या श्यामची आई या पुस्तकाने बालवयातच धुमाळ यांच्या मनात घर केले. पुढे बी. ए. पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणानंतर दिवसभर नोकरीच्या शोधात भ्रमंती रात्री कुठेतरी फुटपाथवर मुक्काम करून त्यांनी खूप हलाखीचे दिवस काढले. अशा निराश व विमनस्क अवस्थेत दिवस घालवत असतानाच फुटपाथवरील एका दुकानात पुन्हा एकदा श्यामची आई पुस्तक त्यांना दिसले. पुस्तक वाचताना डोळ्यात अश्रू येत असले तरीही त्यातून मनाला प्रेरणा मिळायची. डोळ्यात अश्रू येणारा नेहमीच दुबळा असतो हा चुकीचा समज आहे. आपल्याला तर साने गुरुजींच्या वाङमयातील अश्रू प्रेरक वाटतात, असे अरु धुमाळ सांगतात.
पुण्यात यदुनाथ थत्ते यांनी अरु धुमाळ यांचा श्यामची आई हा एकपात्री प्रयोग पाहिला. पुण्यात मोठ्या प्रमाणावर प्रयोग होऊ लागले. एका कार्यक्रमाला साने गुरुजी यांचे धाकटे बंधू आप्पा साने (पुरुषोत्तम) हजर होते. कार्यक्रम पाहिल्यावर अप्पांना गहिवरून आले. ‘‘आज तू मला अण्णांची आठवण करून दिलीस’’ असे म्हणून पाठीवर शाबासकीची थाप दिली. तेव्हापासून आजपर्यंत अव्याहतपणे प्रयोग सुरु आहेत. अरु धुमाळ मानधनाबद्दल आग्रही नसतात. कित्येकदा तर त्यांना स्वखर्चाने एकपात्री प्रयोग करावा लागे. हाती घेतलेले व्रत शेवटपर्यंत चालू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. अहमदाबाद, बडोदा, जुनागढ आदी ठिकाणी अनेक प्रयोग झाले.
सानेगुरुजींचे संस्कारक्षम वाङमय कालबाह्य होणार नाही, असे ते ठामपणे सांगतात. पुण्यातील भारत फोर्ज रोडजवळील मुंढवा येथील ढवळेनगर येथे अरु धुमाळ यांच्याशी संपर्क साधू शकता. अरु धुमाळ यांचा यांचा संपर्काचा मोबाइल 9623725738 हा आहे . दरवर्षी ते 11 जून – सानेगुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त श्यामची आई हा एकपात्री प्रयोग करून त्यांना विनम्र अभिवादन करतात.