जयघोष निनादला…!!

सावरकर जयंतीच्या निमित्ताने ठाणे येथील जागतिक आणि सामाजिक मंच व ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील मराठी असोसिएशन ऑफ सिडनी इन्कॉर्पोरेटेड (मासी) या दोन संस्थांनी संयुक्तपणे सावरकर विश्वसंमेलनाचे आयोजन केले होते. हे चौथे संमेलन होते. आजवरची तीनही संमेलने उत्तमरित्या आणि निर्वेध पार पडली. यावेळचे संमेलन मात्र अपवाद ठरले. अगदी निघायच्या दिवसापर्यंत विसाचा पत्ताच नव्हता.

दोष कुणाचाच नाही पण मंचावर असणार्‍या लोकांचा विसा हा ऑस्ट्रेलियातून येणार होता. काही अगम्य कारणामुळे त्याला उशीर लागला. अगदी कार्यक्रम होणार की नाही असे वाटत असताना अलगद विसा आल्याची बातमी आली. मग धावपळ सुरु झाली. तशात 27 मेचा कार्यक्रम आणि विमानाची तिकिटे 26 मेची मिळाली. घाईत सगळे निघालो. 27 ला सकाळी सिडनीला उतरलो. येथील जीवघेण्या उकाड्यातून तेथील सुखद थंडीत शिरलो. विमानतळावर ‘मासी’चे नितीन चौधरी घ्यायला आले होते. त्यांच्यासह सरळ सभागृह गाठले. तिथून जवळ राहणार्‍या माळगावकरांनी त्यांच्या घरी नेले. आमच्यासह शरद पोंक्षे आले. तिथे सर्व आवरून धावपळ करीत सभागृह गाठले आणि निश्वास टाकला.

मासीच्या सर्व मूळ भारतीय पण ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेल्या प्रतिनिधींनी अत्यंत नेटके नियोजन केले होते. मुळात असे संमेलन व्हावे ही त्यांची इच्छा होती. विदेशात राहून भारतीय कर्तृत्वाच्या गाथा ऐकण्यात त्यांना विलक्षण रस होता. त्यातून बहुतांशी वेळा त्यांच्या देशात नाटक, गाणी अथवा विनोदी कार्यक्रम होत असतात. त्यापेक्षा या संमेलनातील कार्यक्रम वेगळे असणार होते. त्यामुळे जमलेल्या तीनशेहून अधिक लोकांना त्याची उत्सुकता होती हे जाणवले. ‘सर्वांमुखी मंगल बोलवावे’ हेच आपली संस्कृती शिकवते. ज्याचा आपण ध्यास घेतो, ज्याच्याबद्दल ऐकत वा वाचत असतो तोच आपला आदर्श बनून जातो.

यादॄशै: सन्निविशते यादॄशांश्चोपसेवते ।
यादॄगिच्छेच्च भवितुं तादॄग्भवति पुरूष: ॥
(मनुष्य ज्यांच्या सहवासात राहतो, ज्यांची सेवा करतो, ज्यांच्यासारखा होण्याची इच्छा बाळगतो, तसाच होऊन जातो.)

कार्यक्रमाच्या आरंभी भाईंदर येथील प्रसिद्ध नृत्यांगना ज्योती सावंत यांनी कथ्थकातून गणेश वंदना साकारली. त्यानंतर नागपूर येथील सौ. स्वाती सुरंगळीकर यांनी सावरकरांचे कर्तृत्व हे काव्यातून मांडले व दुपारच्या सत्रात त्यांच्या विनोदी झालर असलेल्या काव्यवाचनाने बहार आणली. सकाळच्या सत्रात आम्ही सावरकर विचार हे चरित्रातून मांडले. त्यानंतर आमच्या ’सत्य सांगा ना!’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ते होताच मंचावरून खाली उतरेपर्यंत आणलेल्या सर्व प्रती हातोहात संपल्या. त्याचवेळी महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव देवेंद्र भुजबळ यांनी सावरकरांच्या पत्रकारितेवर विचार मांडले. त्यांच्या दोन पुस्तिकांचे प्रकाशन झाले. ख्यातनाम अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांवर भाषण केले. नागपूर येथील प्रसिद्ध पुरातत्व अभ्यासक श्रीपाद चितळे यांनी काही प्रसंग सांगितले, तर अमरावती येथील गझलगायक सुरेश दंडे आणि नाशिकच्या गायिका गीता माळी यांनी काही गीते सादर केली.

दुपारच्या सत्रात सिडनी येथील कलाकारांनी समूहाने जयोस्तुते, हे हिंदू नृसिंहा आणि शिवरायांची आरती फारच प्रभावीपणे सादर केली. त्यानंतर तेथील मुलांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य केले. ख्यातनाम अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या नाटकावर काही  विचार मांडले. त्यानंतर आम्ही ’शिवराय’ मांडल्यावर ’जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणा उत्स्फूर्तपणे निनादल्या.

एकूण जवळपास दहा तास चाललेल्या कार्यक्रमाला तेथील रसिकांनी भरभरुन दाद दिली. ठाणे येथील संस्थेचे दीपक दळवी आणि ‘मासी’चे नितीन चौधरी, साईप्रसाद कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व  सहकार्‍यांनी भरपूर श्रम घेऊन हे संमेलन यशस्वी केले. त्यामुळे संमेलनाच्या निमित्ताने यंदा शिवराय आणि सावरकरांच्या जयघोषाने ऑस्ट्रेलिया दुमदुमली.
दुसर्‍या दिवशी 28 मेला सावरकर जयंतीच्या निमित्ताने मेलबर्न येथील मराठी मंडळाने आमचे ’सावरकर-एक झंझावात’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यामुळे आदल्या दिवशीचे संमेलन पार पडून लगेच दुसर्‍या दिवशी सकाळच्या फ्लाईटने निघालो. त्यालाही तेथील रसिक श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. अभिजित भिडे आणि त्यांच्या अन्य मित्रांनी खूप श्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

विदेशात आपलेच लोक राहतात. त्यांना आपल्या मुळाची ओढ नक्कीच असते. तिथे ते अगदी भिन्न संस्कृतीत राहत असतात. तसे राहून देखील आपल्या चांगल्या गोष्टींची ओढ कायम असते. अशा सर्व कार्यक्रमात ते स्वत:लाच शोधत असतात. विदेशात ते अत्यल्पसंख्य असल्यामुळे त्यांच्यात एकोपा जास्त असतो. कदाचित अंतर्गत राजकारण असेलही पण ते बाहेरून तिथे जाणार्‍या माणसाला जाणवत नाही हे विशेष. सगळेजण हाकेला ओ देऊन धावत येत असल्याचे आम्ही पाहिले. आयत्या वेळी एखादे काम सोपवले तर कोणी नाराजी व्यक्त केली नाही. बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळींना सर्वजण आपुलकीने मदत करीत होते. सोळा तासांचा प्रवास करूनही आम्ही सगळे उत्साहाने संमेलनात वावरत होतो, याचे काहींना आश्चर्य वाटले. तसे त्यांनी बोलूनही दाखवले. तथापि या आपल्या विदेशस्थ बांधवांसाठी शिवराय आणि सावरकर मांडायचे आहेत ही भावनाच आमचे टॉनिक होते..!

डॉ. सच्चिदानंद शेवडे 9892321704

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा