काय मंडळी, 2025 सालचं तुमच्या राशीचं भविष्य बघितलं की नाही? काय यंदाच्या वर्षी काही चांगल्या गोष्टी घडणार असतीलच! पण काही अडचणी आहेत एवढंच ना. अहो सर्व राशींचे दर वर्षी हे असंच भविष्य असतं. समस्त मानवजाती तील प्रत्येकाला कित्येक शतके सतावणारा प्रश्न म्हणजे माझे भविष्य काय? उद्या माझं काय होणार? म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा सतावत असते, प्रेमिकांना त्यांच्या प्रेमाला दाद कशी मिळणार ही उत्सुकता, नोकरदारांना त्यांच्या प्रमोशनची चिंता, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणार्यांना आपल्या जगण्याची काळजी असते तर व्यावसायिकांना कुठे कसे पैसे गुंतवू हे कळत नसते. राजकीय नेत्यांना आपल्या देशाची जरी नाही तरी आपल्या पक्षाची आणि त्याहून जास्त आपले पक्षातील स्थान कसे पक्के राहील ही फिकीर असते. थोडक्यात म्हणजे आपल्या भविष्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. या बाबतीत सर्व जातीधर्माचे, सर्व देशातील सर्व लिंगाची मंडळी आपले भविष्य जाणून घ्यायला उत्सुक असतात. म्हणजेच आपले भविष्य जाणून घेण्यास उत्सुक असा खूप मोठा म्हणजे सर्वात मोठा असा ग्राहक वर्ग म्हणजेच बाजारपेठ जगभर आहे. आता अशी एवढी मोठी बाजारपेठ असल्याने अनेक मंडळींनी आपला त्यानुसार व्यवसाय सुरु केलेला आहे. त्यातून अनेक फलज्योतिषी, फेस रीडर, न्युमरॉलॉजीस्ट, हस्तसामुद्रिक, टेरो कार्ड रीडरचा मोठा व्यवसाय सुरु झालेला आहे.
आता माल खपवायचा म्हणजे माल घेणार्याची सायकॉलॉजी समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचं. ग्राहकांना माल गळ्यात मारायचा म्हणजे त्यांच्या सायकॉलॉजीचा विचार करणे आलं. त्यात पहिलं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे ग्राहकाला आपलं चांगलं भविष्य ऐकायला आवडतं आणि पटतं पण वाईट भविष्य आवडतही नाही आणि पटतही नाही. दुसरं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे त्याला सत्त्यापेक्षा स्वप्न जास्त आवडतात. ज्योतिष बघायला आलेला प्रत्येक माणूस हा प्रॉब्लेममध्ये असतो आणि आशावादीही असतो आणि ग्राहकाचं समाधान हे सर्व व्यावसायिकांचे आद्य कर्तव्य आहेच. तिसरं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे प्रत्येक ज्योतिषाला आपण अंदाजपंचे बंडलबाजी करत आहोत हे स्वतःला माहीत असतेच असते. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे 35 लाख रुपयांचे आव्हान आजवर कोणी स्वीकारलेले नाही, स्वीकारणारही नाही आणि त्यांना त्याची गरजही वाटत नाही. सगळ्यांनीच आपल्या भविष्याची गॅरेंटी, वॉरंटी द्यायची नाही असा सामूहिक निर्णय घेतलेला असल्याने एरवी चोखंदळ ग्राहक कोणतीही वस्तू घेताना त्याची गॅरेंटी वॉरंटी बघत असतो पण ज्योतिष्याला तो तसलं विचारत नाही. तसेच मार्केटमधले सगळे ज्योतिषी ‘नो गॅरेंटी वॉरंटी’वाले असल्याने त्या मुद्द्यावर त्यांच्यात अंतर्गत स्पर्धा नाही. ग्राहक ज्योतिषी सांगेल ते भविष्य मुकाट्याने स्वीकारायला तयार असतात. त्यामुळे आता तो बिचारा ग्राहक इतर माल खरेदी करताना जे निकष लावतो तेच इथेही लावू पाहतो. त्यामुळेच ग्राहक ब्रँडेड वस्तूंना जास्त किंमत मोजायला तयार असतो. जास्त पैसे घेणार्या हॉटेलातील पदार्थ अधिक चांगल्या तेलात तळलेले, स्वच्छतेची अधिक चांगली काळजी घेतलेले असू शकतात वगैरे. त्या अनुषंगाने ग्राहक अधिक चांगले एअर कंडीशन असलेले आणि चकाचक दिसणारे दुकान किवा हॉटेल पसंत करतात. ही गोष्ट ज्योतिषी मंडळींनी समजून घेतलेली आहे. जितका बडा ज्योतिषी, तितका बडा त्याचा बडेजाव. त्याचा कॉम्प्युटर, त्याचे वक्तृत्व, त्याचे इंग्लीश भाषा आणि संस्कृत भाषा वापरण्याचे कसब आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अधूनमधून आधुनिक वैज्ञानिक शब्दांची पेरणी. सामान्य ग्राहक अशा भूलथापांना सहज बळी पडतो. सगळ्या ग्राहकांना आमचा ज्योतिषी हा कुणी कुडबुड्या ज्योतिषी नाही तर विज्ञानाचा अभ्यासक आहे ही कल्पना मोहरून टाकणारी असते. तो ज्योतिषी जर चॅनेलवर चमकत असेल किंवा त्याच्या नावाने जर पेपरात भविष्य छापून येत असेल तर तो मान्यवर ज्योतिषी. त्यामुळे पेपरवाले आणि चॅनेलवाले देखील खूश. पेपरवाल्यांची जागा भरते, चॅनेलवाल्यांचा टाईम स्लॉट भरून चार पैसे मिळतात आणि वाचक प्रेक्षकही टिकून रहातो. म्हणून सगळेजण या ज्योतिषांना थारा देतात. अपवाद फक्त आकाशवाणी आणि दूरदर्शनचा, म्हणजे तिथल्या अधिकार्यांना कमर्शियल रेव्हेन्यू नकोय किंवा असल्या भाकड ज्योतिषावर विश्वास नसतो असं नाही हं, तर उलट माझ्या अनुभवाने मी सांगू शकेन की आकाशवाणी, दूरदर्शनमध्ये जास्त अंधश्रद्ध लोक आहेत पण असल्या अशास्त्रीय अंधश्रद्धा पसरवणार्या गोष्टी आकाशवाणीच्या ब्रॉडकास्टिंग कोडमध्ये बसत नाहीत म्हणून त्यांचा नाईलाजको नो इलाज.
मी विज्ञानाचा विद्यार्थी असून पूर्वीच डॉ. अब्राहम कोवूर यांचे ‘बिगॉन गॉडमेन’ (‘इशसेपश सेवाशप’) हे पुस्तक अभ्यासपूर्वक वाचल्यामुळे आणि श्याम मानवसारख्या मित्रांच्या अनिसच्या चळवळीचा अभ्यास केल्यामुळे या असल्या भाकड कल्पनांच्या मागे कधी गेलो नाही. पूर्वी कधी कोणी छोटे मोठे ज्योतिषी आमच्या ऑफिसात आले तर मी त्यांना दोन-चार प्रश्न विचारले की ते ततपप करू लागतात हे अनुभवाने मला माहीत झालेले आहे. हां पण माझा एक अनुभव मात्र इथे नमूद करायलाच हवा. अहो 39 वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलेलं माझं भविष्य आज चक्क 90% जसंच्या तसं खरं ठरलंय आणि तरी त्या दिवशी मात्र मी जे बोललो त्यामुळे त्या ज्योतिषाचा अपमान झाला आणि त्यांना मान खाली घालून जावं लागलं. अरेरे!
वेल, जानेवारी 85 चे ते दिवस. मी आकाशवाणी संभाजीनगरमध्ये निर्माता होतो. नवीन वर्षाचे भविष्य सर्वच वृत्तपत्रांमध्ये छापले जाते तर आकाशवाणीने देखील ते सांगावे अशी विनंती करायला कुणी जोशी नावाचे ज्योतिषी आमच्या केंद्रात आले. मुख्य म्हणजे आमच्या स्टाफमधील त्यांचे भक्त त्यांना माझ्याकडे घेऊन आले. मला सगळ्यांशी गप्पा मारायला आवडते त्याप्रमाणे आमच्या चहा पिता पिता गप्पा झाल्या. त्यांनी किती बड्या बड्या मंडळींना ज्योतिष सांगितले व ते खरं ठरले आदी गोष्टी सांगितल्या. इतकेच नाही तर पूर्वी आमच्या केंद्रातील माझे सहकारी आणि वरिष्ठ देखील त्यांचा सल्ला घेत असतात वगैरे मला समजलं. आमच्या ऑफिसचा हेडक्लार्क तर त्यांची री ओढत होताच. बोलता बोलता त्यांना मी माझ्या पद्धतीने चॅलेंज केले आणि संशोधन कमी असल्याने फलज्योतिष कसे अशास्त्रीय आहे हे सुनावले. मी त्यांना निक्षून सांगितले की ‘मी तर फलज्योतिष सांगण्याचा कार्यक्रम करणार नाहीच पण आमचे त्यांच्यावर विश्वास असलेले बाकी सहकारी देखील हा कार्यक्रम करू शकणार नाहीत कारण आकाशवाणीच्या ब्रॉडकास्टिंग कोडमध्ये असले कार्यक्रम बसत नाहीत.’ असो!
पण जोशी सहजासहजी हार मानणार्यातले नव्हते. त्यांनी मला माझी जन्मतारीख सांगण्याची विनंती केली. माझा पत्रिका आदी गोष्टींवर विश्वास नसल्याने मी त्यांना ‘नाही’ म्हणालो पण त्यावर त्यांनी आपले कागद पेन काढून केवळ संशोधनाचा भाग म्हणून त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकाच्या पत्रिका बनवून त्याचा अभ्यास करायला आवडते आणि माझे विशेष व्यक्तिमत्त्व आणि माझी काही ठाम मते असल्याने त्यांनी मला जन्मतारीख सांगण्याचा आग्रह केला. मग मी त्यांना म्हटलं, ‘लिहून घ्या.’ त्यांनी लगेच टिपण सुरु केलं. मी बोलायला सुरुवात केली. ‘जन्म तारीख : 17 जुलै 1948, वेळ : सकाळी 9 च्या सुमारास, स्थळ : ससून हॉस्पिटल पुणे.’ मला ‘थँक्स’ म्हणत शेजारच्या वेटिंग हॉलमध्ये ते गेले. मी माझ्या इतर कामात मग्न झालो. दरम्यान त्यांनी मात्र माझी पत्रिका तयार केली. दुपारनंतर माझ्याकडे इतर काही मंडळी आलेली असताना त्यांनी मला नम्रपणे ‘आत येऊ का?’ असे विचारले आणि काही भविष्य सांगायची इच्छा व्यक्त केली. कदाचित माझ्याकडे आलेले पाहुणे आणि बाजूचे स्टाफमधील कर्मचारी त्यांना साक्षीदार म्हणून हवे असावेत. त्यांनी आपलं भाषण सुरु केलं.
सुरुवातीलाच त्यांनी मला ‘आकाशवाणीवर तुम्ही ज्योतिष सांगण्याचा कार्यक्रम देऊ शकत नाही याची पूर्ण कल्पना आहे आणि ती अपेक्षाही नाही’ असे प्रास्ताविक केलं. ‘हे मी जे काय बोलतोय ते लक्षपूर्वक ऐका. ज्योतिष शास्त्र खरंय की खोटं हे तुम्हाला काही वर्षांनी कळेल.’ त्यांनी माझी ग्रहस्थिती म्हणजेच माझ्या पत्रिकेत कोणकोणते ग्रह कुठे कुठे आरामखुर्ची टाकून बसलेले आहेत आणि एकेका ग्रहाची मेंटॅलीटी, म्हणजे खूश झाला तर कसे छप्पर फाडके देतो आणि त्याची सणकली तर कशी ठासू शकतो वगैरे सांगून त्या अनुषंगाने माझे भविष्य सांगायला सुरुवात केली.
आज त्यांनी सांगितलेल्या भविष्याला 40 वर्षे झाली आहेत. त्यांनी जे मला सांगितलं होतं त्यातील सुमारे 90 % भाग जसाच्या तसा खरा ठरलेला आहे. त्यांनी जे सांगितलं ते असं होतं.
1) त्याने सुरुवातीलाच माझे दीर्घायुष्यासाठी अभिनंदन केलं. (आता मी सत्तरीत आलो आहेच की!) हां पण प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल हेही सांगितलं. (शुगरच्या बिपीच्या, गोळ्या काय मी उगाच घेतोय का?)
2) माझ्या पत्रिकेतील ग्रहस्थिती शासकीय नोकरीसाठी अतिशय अनुकूल अशी आहे. सरकारी नोकरी निर्विघ्नपणे पार पडेल याची त्यांनी ग्वाही दिली. (आज सरकारी पेन्शन काही मी उगाच घेत नाहीये!) प्रमोशन वगैरे मिळण्यात थोडीशी देरी होऊ शकेल पण ती मिळण्यात कधीही अडचण येणार नाही हेही त्यांनी मला सांगितलं. माझ्या तिथल्या ऐकणार्या सहकार्यांनी माझ्याकडे प्रमोशन मिळालेल्या ऑफिसरला पाहावे असे त्यांच्या डोळ्यातील भाव माझ्या लक्षात आले.
3) मला खेळ, विज्ञान यात विशेष रुची आणि गती असणार असे सांगून महत्त्वाचे म्हणजे मला नोकरीत परदेशी जाण्याची संधी मिळेल असं सांगितलं. (हां, 1988 मध्ये मला आकाशवाणीने जर्मनीला ट्रेनिंगसाठी उगाच नाही पाठवलं) बाकी सहकारी तर माझे त्याचवेळी अभिनंदन करण्याच्या मूडमध्ये दिसले. सरतेशेवटी मी व पत्नी आम्हा दोघांना दीर्घायुष्य असून नातवंडे पाहूच, शिवाय पंतवंडे देखील पाहू शकू असे सांगितलं. अरे व्वा! माणसाला आता आणखी हवेच काय?
मंडळी मी तेव्हा जरी ज्योतिषांवर विश्वास ठेवत नसलो तरी आज त्या ज्योतिषावर विश्वास ठेवायला हरकत नाही ना! हां, पण तेव्हा असं काही घडलं नाही उलट सर्व उपस्थित मंडळींच्या देखत प्रस्तुत ज्योतिषी किती मठ्ठ आहे आणि त्याचं ते शास्त्र किती खोटं आहे असे सुनावून मी त्यांची बोलती बंद केली होती. अरेरे म्हणजे मी आलेल्या पाहुण्यावर त्याने काय सांगितलंय याची शहानिशा न करता सरळ सरळ आरोप करून त्याला अपमानित केलं काय? नाही, तसे नाही. माझा तो स्वभाव नाहीये आणि मी इतरांच्या माझ्या मतापेक्षा वेगळ्या असलेल्या मताचाही सन्मान करतो. मग झालं तरी काय?
ऐका. मी जोशींना जी जन्मतारीख सांगितली होती ती माझ्या नुकतेच निधन झालेल्या मोठ्या भावाची म्हणजे प्रसिद्ध लेखक अनिल बर्वेची होती. त्याला दीर्घायुष्य नव्हतं तर फक्त 36 वर्षाचे आयुष्य होतं. अनिल बर्वेचा नोकरी करण्याचा स्वभाव नव्हता, सरकारी नोकरी तर केवळ अशक्य. त्याला विज्ञान कळत नव्हतं, खेळात फारशी रुची नव्हती पण जोशींनी जरी सांगितलं नाही तरी तो प्रतिभावंत लेखक मात्र होता. परदेशी तो कधी गेला नाहीच उलट त्याच्या स्वभावामुळे रशियाला जायची आलेली संधीही त्याने घालवली. हे सर्व मी सांगताच ज्योतिषीबुवा यावर निरुत्तर होऊन निघून जाण्या व्यतिरिक्त काहीही करू शकत नव्हते.
माझे प्रिय वाचक देखील आपापल्या ज्योतिषाची अशी परीक्षा घेऊ शकतात.
-चंद्रकांत बर्वे
प्रसिद्धी – मासिक ‘साहित्य चपराक’ मार्च २०२५