मराठीत, विशेषतः कोकणातल्या श्रद्धाळू ग्रामीण समाजजीवनात, एक म्हण आहे ‘देवाच्या काठीला आवाज नसतो!’ देवाचं सगळीकडे लक्ष असतं, आसपास घडणार्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची तो दखल घेत असतो आणि त्यापैकी प्रत्येक भल्याबुर्या गोष्टीचा तो न्यायदेखील करत असतो, असा या श्रद्धाळू समजुतीचा अर्थ! तो, म्हणजे देव, एखाद्या चांगल्या कृतीबद्दल शाबासकीही देतो आणि वाईट गोष्ट नेमकी लक्षात ठेवून योग्य वेळ येताच त्याची शिक्षाही देतो, असे हा श्रद्धाळू समाज मानतो. देवाची ही शाबासकी किंवा शिक्षा इतकी सहज घडते, की कोणत्या एखाद्या गोष्टीची आपल्याला शाबासकी मिळाली किंवा नेमक्या कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळाली हेही कोणास समजत नाही; कारण अशा शिक्षेसाठी देवाच्या हाती असलेल्या काठीचा आवाज येत नाही. कधीतरी नकळत एखादा जबर फटका बसतो, त्या जागी असह्य वेदना होतात, ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी अवस्था होते तेव्हा देवाने त्या काठीने आवाज न करता आपल्या कुठल्या तरी कृतीबद्दल फटका दिला अशी समजूत करून घेत निमूटपणे ही शिक्षा भोगावी अशीही या श्रद्धाळू समाजाची भावना असते.
ज्यांचा अशा समजुतींवर विश्वास नाही, जे देव वगैरे काही मानत नाहीत, त्यांच्याकडून जरी एखादी अप्रिय, अन्याय्य गोष्ट घडली तरी देवाची काठी आवाज न करता त्यालाही योग्य ती शिक्षा देऊन बरोबर धडा शिकवते, असे ही श्रद्धाळू, भोळी माणसं मानतात. म्हणूनच आसपासच्या समाजजीवनात असे काही घडले, की त्यांचे या समजुतीवर शिक्कामोर्तब होते. देवाच्या काठीने आवाज न करता दिलेली शिक्षा या लोकाना बरोबर समजते आणि देवाच्या त्या बिनआवाजाच्या काठीचा फटका बसलेल्यांची अवस्था, ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी होऊन जाते. इतरांस कळणार नाही अशा छुपेपणाने दुखर्या जागा कुरवाळत बसायचे, चेहर्यावर दुःखाची रेषाही उमटू न देता निमूटपणाने वेदना सोसत, काहीच झाले नाही असा आव आणत समाजात वावरायचे हीदेखील एक शिक्षाच असते. देवाच्या काठीने आवाज न करता मारलेल्या फटक्याची ही दुहेरी शिक्षा भोगणार्यांना पटो वा न पटो पण तो देवाच्या काठीचाच फटका आहे, हे भोळ्या भाविकांस मात्र माहीत असते. अशी शिक्षा भोगणारी माणसे आसपास दिसली आणि त्यांनी चेहर्यावरची वेदना लपविली असली तरी या भोळ्या भाविकांसही ती लगेच ओळखू येतात. त्यांच्या वरवर हसतमुख चेहर्याच्या आत देवाच्या काठीच्या फटक्याने होणार्या वेदना ठुसठुसत आहेत हेही त्यांना सहज कळते पण देवानेच त्यांना शिक्षा दिलेली असल्याने व ‘देव अन्याय करत नाही’ या समजुतीवर त्यांची श्रद्धा असल्याने, ‘झाले ते योग्यच झाले’ असा विचार करून शिक्षा भोगणार्याकडे तशाच नजरेने पाहिले जाते.
गेल्या दोन-अडीच वर्षांत आणि त्याआधीही, म्हणजे नेमके सांगायचे झाले तर अगदी गेल्या दहा वर्षांत, महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू होते ते पाहून या श्रद्धाळू भाविकांच्या मनात एक विचार दिवसागणिक स्पष्ट होत होता. त्यांच्या मनात एक यादीही तयार होत होती आणि या यादीतल्या काहींना कधी ना कधी देवाच्या काठीचा प्रसाद मिळेल याची खातरीही त्यांना वाटत होती पण देव कधी विनाकारण, उतावीळपणे शिक्षा करत नाही. शिक्षेसाठीही तो योग्य वेळ शोधतो. कधीकधी सुधारण्याची संधी देऊन त्यासाठी प्रतीक्षाही करतो. शिशुपाल पापी होता पण त्याचे शंभर अपराध घडेपर्यंत देवाने त्याला धडा शिकविला नव्हता. शंभर अपराधानंतर त्याच्या पापाचा घडा पुरता भरला आणि देवाने शिक्षेचे अस्त्र उगारले हे भोळ्या भाविकांस माहीत असल्याने, आताही योग्य वेळ आल्याखेरीज देवाची काठी उगारली जाणार नाही अशी त्यांचीही भावना होती. गेल्या दहा वर्षांत अनेकदा, या यादीतल्या अनेकांच्या नावावर देव खुणा करत होता. तसे संकेत त्याने कितीतरी वेळा त्या संबंधितांनाही दिले होते. ‘मी कधी कुणाला त्रास देत नाही पण कुणी त्रास दिला तर त्याला सोडणारही नाही’ असे या देवाने अनेकदा जाहीरपणे बजावले होते. ‘पाठीत खंजीर खुपसून केलेल्या विश्वासघाताच्या गुन्ह्याला क्षमा नाही’ असे सांगणार्या या देवाबद्दल या भाविकांच्या मनात भक्तिभावाची भावना रुजत होती आणि अशा तर्हेने, महाराष्ट्राच्या राजकारणात, सामान्यांच्या मनातल्या ‘देवाभाऊ’ विषयीचा आदर रुजत गेला, तो बोलतो तसा वागतो, त्याला जे आवडत नाही त्याला देवाची काठी आवाज न करता शिक्षा देते, हे पटत गेले आणि देवाभाऊच्या काठीचा फटका बसलेल्यांना आता आपल्या चेहर्यावरच्या वेदना लपवून दुखर्या जागेवरची ठुसठुस सोसावी लागेल याबद्दल या भाविकांची खातरीही होत गेली.
जवळपास दहा वर्षांपूर्वी, 31 ऑक्टोबर 2014 या दिवसाने महाराष्ट्रात एक इतिहास घडला. एका आगळ्या, ऐतिहासिक दिवसाच्या अनुभवाने मुंबईचे वानखेडे स्टेडियम समृद्ध झाले. याआधी त्या जागेने असंख्य वेळा गर्दी अनुभवली, उत्साह अनुभवला, जोष अनुभवला… पण त्या दिवशीचा उत्साह, जोष, जल्लोष काही वेगळाच होता. महाराष्ट्राचा तरुण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी ईश्वरास स्मरून शपथ घेतली, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विशुद्धपणे आणि निस्पृहपणे काम करण्याची ग्वाही तमाम जनतेला दिली आणि खचाखच गर्दीतील जल्लोषाच्या अनुभवाने वानखेडे स्टेडियम नखशिखान्त मोहरून गेले. त्याआधी तब्बल 15 वर्षे आणि पाच वर्षांपूर्वीच्या अनैतिक राजकारणामुळे विरोधकाच्या भूमिकेत वावरताना देवाभाऊ प्रत्येक घडामोडीची, प्रत्येक अपमानाची आणि प्रत्येक खिल्लीची नोंद घेत होते. योग्य वेळ येताच देवाची काठी आवाज न करता याची शिक्षा देणार अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची खातरी होती. म्हणूनच विरोधक म्हणून काम करताना राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर आवाज उठविण्याचे, रस्त्यावर आणि विधिमंडळातही सरकारला धारेवर धरण्याचे व्रत देवाभाऊंनी निष्ठेने पूर्ण केले. याची पावती देऊन जनतेने बहाल केलेल्या नव्या सत्तेचा शकट हाकण्याची क्षमता देवाभाऊंकडे आहे, याचे असंख्य दाखले या काळात मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याच्या नेतृत्वाची, सरकार चालविण्याची जबाबदारी पक्षाने सोपविली.
राजकारणाच्या रंगमंचावर भूमिका बदलली की प्रश्न विचारणार्याच्या भूमिकेतून उत्तर देण्याच्या भूमिकेत जावे लागते. ही बदललेली भूमिका सहजपणे निभावणे सोपे नसते. प्रश्न विचारणे कदाचित सोपेही असते. उत्तर शोधणे किंवा उत्तर देणे फारच अवघड असते. विरोधकाच्या भूमिकेतून राज्यकर्त्याच्या भूमिकेत गेल्यावर होणारा हा बदल सहजपणे पेलू शकेल अशा योग्य नायकाच्या गळ्यात या भूमिकेची माळ घालणे ही पक्षाची मोठी कसोटी असते. महाराष्ट्रात तर भाजपला सरकार चालविण्याची संधी याआधी अल्पकाळच मिळाली असल्याने, अशा भूमिकेसाठी योग्य नायक निवडणे हे आव्हान होतेच पण या जबाबदारीसाठी पक्षाने केलेली निवड सार्थ ठरविणे हे नायकासमोरील त्याहूनही खडतर आव्हान होते. आपल्या सक्षम नेतृत्वाची मोहोर उमटवून देवेंद्र फडणवीस यांनी ते आव्हान पेलण्याची क्षमता सिद्ध करून दाखविली आहे आणि महाराष्ट्राच्या आजवरच्या सुसंस्कृत राजकारणाला धक्का देऊ पाहणार्या टोमणेबाजांना वेळोवेळी त्यांची जागा दाखवून देत देवाच्या काठीचा पुरेपूर प्रसाद देऊन नव्या पर्वास सामोरे जाण्याच्या नव्या आत्मविश्वासाचा मार्गही पक्षास दाखविला आहे. कधीकाळी काही मोजक्या नेत्यांच्या प्रतिमेवर महाराष्ट्रात जेमतेम राजकारण करणार्या भारतीय जनता पार्टीने आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आपला झेंडा रोवला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपच्या बाजूने उभा राहिल्याने पक्षाचा आत्मविश्वास बळावला आणि कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांस व ‘महायुती’ या नावाने एकत्र आलेल्या मित्रपक्षांच्या सामूहिक प्रयत्नास देवाच्या काठीचा मोठा आधार वाटू लागला. ही राजकारणातली देवाची काठी आहे, आपल्या पाठीशी असून विरोधकांच्या पाठीवर आवाज न करता उगारली जाणार आहे, हा महायुतीचा विश्वास त्यातूनच बळावला आहे…
काही वर्षांपूर्वी एका दूरचित्रवाणी वाहिनीवर पाहिलेली देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत मला अजूनही आठवते कारण आत्मविश्वासाचे अदम्य दर्शन त्या मुलाखतीतून त्यांनी घडविले होते. मित्रपक्षाचे नेते, विरोधकांमधील दिग्गजांनी सातत्याने शरसंधान सुरू ठेवल्यामुळे, चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी फडणवीस यांची अवस्था झाली आहे, असे मुलाखतकारास वाटत होते. या नेत्याची पहिल्याच चेंडूत दांडी उडवावी अशा आविर्भावात मुलाखतकाराने तसा प्रश्न विचारला. क्षणभर त्यांनी मुलाखतकाराकडे पाहिले आणि ते म्हणाले, ‘‘त्या अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे ज्ञान नव्हते. माझ्याकडे ते ज्ञान आहे. चक्रव्यूहात मला घेरणार्यांना तेथेच गुरफटवून कसे ठेवायचे आणि आपण बाहेर कसे पडायचे ते मला माहीत आहे आणि मी तसे करून दाखवेन…’’
विधानसभा निवडणुकीतील प्रचंड महाविजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा अभिमन्युच्या गोष्टीचा उल्लेख केला तेव्हा या देवाच्या काठीची ताकद विरोधकांनाही नक्कीच कळली असेल.
नव्या पर्वात अधिक जोमाने काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सज्ज झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत फडणवीस यांना मित्र म्हणविणार्या ठाकरे परिवाराच्या पक्षाकडून असंख्य वेळा ‘घरचे आहेर’देखील मिळत गेले. राजकारणात, मित्रपक्षाशी ‘जुळवून घेणे’ म्हणजे, मित्रपक्षांसमोर ‘गुडघे टेकणे’ असाच बर्याचदा अर्थ असतो. महाराष्ट्रात शिवसेनेसोबतच्या सुमारे तीन दशकांच्या युतीच्या काळात भाजपला अनेकदा हेच करावे लागले. मोठ्या भावाच्या ताठ्यात वर्षानुवर्षे वावरणार्या या मित्राचे रुसवेफुगवे घालवून त्यांची मनधरणी करण्यासाठी अनेक केंद्रीय नेत्यांना मुंबईत धाव घ्यावी लागत असे. त्या इतिहासास आता अशी काही अलगद कलाटणी मिळाली आहे, की हे घडले कसे ते त्या इतिहासासही कळलेच नसावे. ‘देवाच्या काठीचा’च हा प्रताप आहे याविषयी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मात्र खातरी आहे. विरोधकांनाही ते कळले असेल पण सहन होत नसले तरी सांगता येणार नाही ही त्यांचीही अडचण आहे.
ज्येष्ठ पत्रकार
‘देवाची काठी’ खूप छान आणि वास्तवदर्शी विचार मांडले आहेत.