16 ऑगस्ट 1982 रोजी धाराशिव (तेव्हाच्या उस्मानाबाद) जिल्ह्याचे विभाजन झाले आणि लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं योगदान दिलं. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख यांनीही मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ राज्याचं नेतृत्व केलं. शिवराज पाटील चाकूरकर हे तर सात वेळा खासदार होते. त्यांनी देशाचं गृहमंत्रीपद भूषविलं. राज्यपाल म्हणून काम केलं. धाराशिव जिल्ह्यातील डॉ. पद्मसिंह पाटील हेही अनेक वर्ष मंत्रीपदी होते. निलंगेकर, विलासराव, शिवराज पाटील या सर्वांच्या प्रयत्नातून लातूर जिल्हा अस्तित्वात आला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर ए. आर. अंतुले.
लातूर जिल्ह्याच्या निर्मितीला पंचवीस वर्ष पूर्ण झाले होते. या रौप्यमहोत्सवी समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कुणाला बोलवायचं यावर बरीच चर्चा झाली. विलासराव देशमुखांनी ठरवलं असतं तर ते कुणालाही बोलवू शकले असते; मात्र त्यांनी बोलावलं ते अंतुलेंना! त्यामागे त्यांच्याविषयीची कृतज्ञता होती. यावेळी बोलताना अंतुले म्हणाले की, ‘‘आजकाल गरज सरल्यावर लोक त्या माणसाला 25 दिवसही लक्षात ठेवत नाहीत. विलासराव देशमुख यांनी तब्बल 25 वर्षे आठवण ठेवून मला या समारंभाला बोलावलं…’’
सात वेळा लोकसभेवर गेलेल्या चाकूरकरांना पराभवाला सामोरं जावं लागलं. ‘आम्हाला आमचा अतिआत्मविश्वास नडला,’ असं एका वाक्यात त्यांनी त्याचं विश्लेषण केलं होतं! मात्र यामागे अनेक कारणे होती. मतदारसंघातील कुणीही त्यांच्याकडे काम घेऊन गेला की ते सांगायचे, ‘‘अरे हे काम स्थानिक लेवलचं आहे. तू पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सभापती किंवा आमदाराकडं जा. मी खासदार आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्नावर मला भूमिका घ्याव्या लागतात. परराष्ट्र संबंध, सीमा प्रश्न, संरक्षणविषयक असं काही असेल तर माझ्याकडं येत जा…’’ शिवाय निर्भया प्रकरणाच्या वेळी माहिती देताना दिवसभरात चार-पाच वेळा कोट बदलल्यानेही ते चर्चेत आले होते.
असं म्हणतात की, सोनिया गांधी राजीवजींसोबत लग्न करून भारतात आल्यानंतर त्यावेळी त्यांच्यासोबत जे मोजके घनिष्ट लोक होते त्यापैकी चाकूरकर एक होते. इथला देश, भाषा, संस्कृती, चाली-रीति, परंपरा अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांनी त्यांना दिली. त्यामुळे ते गांधी घराण्याच्या कायम जवळ होते. म्हणूनच पराभव झाल्यानंतरही त्यांना महत्त्वाचं सत्ताकेंद्र देण्यात आलं. जर त्यावेळी ते निवडून आले असते तर सरदार मनमोहनसिंग यांच्याऐवजी पंतप्रधान म्हणून त्यांची वर्णी लागली असती. इतिहासात जर-तरला काहीही अर्थ नसला तरी मराठी माणसांनी ही एक मोठी चूक केली असे वाटते.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला लातूर जिल्हा आता मात्र भाजपयम झालाय. मतदारांचे सोडा पण इथल्या निलंगेकर-चाकूरकर अशा बड्या नेत्यांच्या घरातही फूट पडली. विलासराव देशमुख यांचा करिष्मा अजून जिवंत असल्याने देशमुख कुटुंबीय अजून तरी काँग्रेससोबत आहेत. भविष्यात काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे आहेे. विलासराव देशमुख यांच्यासारख्या कृतज्ञता जपणार्या नेत्यांची आज खरी महाराष्ट्राला गरज आहे.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 14 मे 2024