जवाहरलाल नेहरू यांचा त्या काळी विलक्षण करिष्मा होता. त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते जगभर तळपत होते. 1964 च्या जानेवारी महिन्यात भुवनेश्वर येथे एकाएकी ते खूप आजारी पडले. डॉक्टरांनी त्यांच्या हालचालीवर पूर्ण बंदी आणली होती. स्वाभाविकच त्यावेळी सगळ्यांना प्रश्न पडला की, आता नेहरूनंतर कोण?
त्यांची विश्रांती सुरू असताना लालबहाद्दूर शास्त्री यांनी त्यांना विचारले, ‘‘आता मी कोणते काम पाहू?’’ त्यावर क्षणाचाही विलंब न करता नेहरू म्हणाले, ‘‘तुम्ही माझेच काम पाहा!’’
तिथेच शास्त्रीजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले होते. जवाहरलालजींचा आदेश मानून 24 जानेवारी 1964 पासून लालबहाद्दूर बिगरखात्याचे मंत्री म्हणून काम पाहू लागले.
खरंतर लालबहाद्दूर यांचं आडनाव श्रीवास्तव. काशी विद्यापीठाचे तत्त्ववेत्ते प्राचार्य डॉ. भगवानदास यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी 1921 साली या विद्यापीठात प्रवेश घेतला. इथे अभ्यासक्रम पूर्ण करून 1925 साली त्यांनी ‘शास्त्री’ ही पदवी प्रथम श्रेणीत संपादित केली आणि ते शास्त्री याच नावाने ओळखले जाऊ लागले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांना सात वेळा तुरूंगात डांबण्यात आले. देशभक्ती आणि स्वातंत्र्यप्रियतेचे संस्कार झालेले असल्याने त्यांनी ऐन उमेदीतली नऊ वर्षे तुरूंगात घालविली. अलाहाबाद नगरपालिकेचे सभासद म्हणून सात वर्षे काम केल्यानंतर त्यांचा राजकीय आलेख कायम चढता राहिला. 13 मे 1952 रोजी ते केंद्रीय वाहतूक व रेल्वेमंत्री झाले. 1956 मध्ये मेहबूबनगर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 112 प्रवासी मृत्यू पावले. केंद्रीय मंत्री या नात्याने त्याची जबाबदारी घेत त्यांनी स्वतःच आपल्या पदाचा राजीनामा दिला. नेहरूंनी तो नाकारला. पुढे लगेचच 1956 मध्ये अलियारपूर येथे पुन्हा भयंकर रेल्वे अपघात होऊन 144 प्रवासी ठार झाले. त्यावेळी ते प्रचंड अस्वस्थ झाले आणि राजीनामा देऊन बाहेर पडले. पुढे पं. गोविंदवल्लभ पंत यांच्या निधनानंतर त्यांच्याकडील केंद्रीय गृहमंत्रीपद शास्त्रीजींकडे आले.
27 मे 1964 ला जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले आणि सारा देश शोकसागरात बुडालेला असताना शास्त्रीजींचे नाव पुढे आले. 9 जून 1964 रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे स्वीकारली. अतिशय गरिबीतून कर्तृत्वाने सर्वोच्च पद मिळविणार्या शास्त्रीजींना अनीतिने मिळविलेल्या पैशांची आणि सत्तेची चीड होती. त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला. देशात अन्नधान्याचा तुटवडा असताना त्यांनी संध्याकाळचे जेवण सोडले होते. दर सोमवारी ते देशबांधवासाठी उपवास करत असल्याने सोमवारला ‘शास्त्रीजींचा वार’ म्हणत.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
पंतप्रधान झाल्यावर त्यांनी दक्षिण भारतातील भाषिक दंगली अत्यंत सामोपचाराने थांबवल्या. भारताच्या सर्व शेजारी राष्ट्राशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंह कैरा यांच्याविरूद्ध केलेल्या आरोपांची चौकशी करून दासमंडळाचा अहवाल प्रसिद्ध केला. ओरिसाचे मुख्यमंत्री बिरेन मित्रा व माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांना औचित्य भंगावरून राजीनामे द्यायला लावले. केरळात राष्ट्रपती राजवट सुरू केली. भारतविरोधी कारवाया करणार्या शेख अब्दुल्लांचा पासपोर्ट जप्त केला. चीन-पाकिस्तान युद्धात कणखर भूमिका घेतली.
आजच्या साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करणार्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्यांनी संपूर्ण समाजमन कलुषित करणार्या काळात लालबहाद्दूर शास्त्री यांच्यासारख्या निस्पृह आणि चारित्र्यसंपन्न नेत्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ‘किस्सा ए इलेक्शन’ सांगताना म्हणूनच अशा नेत्यांचे स्मरणही महत्त्वपूर्ण ठरते.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 15 मे 2024