अत्रेंनी पाडलेला मुंबईचा बादशहा

‘हा सदोबा… लोकसभेत जायचं म्हणतोय. याला मी शोकसभेत पाठवेन,’ अशी बोचरी टीका करणार्‍या आचार्य अत्रे यांनी एका सभेत एक विधान केलं होतं. ते म्हणाले, ‘मी 13 ऑगस्टला जन्माला आलो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. दोन चांगल्या गोष्टींच्या मध्ये एक वाईट गोष्ट घडावी म्हणून 14 ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले.’

किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ असं ज्यांचं वर्णन केलं जायचं त्या स. का. पाटील यांच्या विरूद्ध आचार्य अत्रे यांनी जंग जंग पछाडलं होतं. त्याचं कारण होतं, स. का. पाटील यांचा संयुक्त महाराष्ट्राला असलेला विरोध. त्यामुळंच 1967 च्या लोकसभा निवडणुकीत साऊथ बॉम्बे मतदारसंघातून पाटील यांचा पराभव झाला आणि जॉर्ज फर्नांडिस तिथून निवडून आले. याच निवडणुकीत दस्तुरखुद्द आचार्य अत्रे पराभूत झाले होते पण स. का. पाटील यांच्या पराभवाने त्यांनी गुलाल उधळला. स्वतःच्या विजयापेक्षा स. का. पाटील यांचा पराभव अत्रे साहेबांना महत्त्वाचा वाटला. ‘मुंबई हे बहुसांस्कृतिक शहर असल्याने ते महाराष्ट्रात सामील करू नये,’ अशी पाटील यांची भूमिका होती. ‘या विश्वात जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही,’ अशी दर्पोक्ती त्यांनी केली होती. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे सेनानी आचार्य अत्रे हे त्यांच्यावर तुटून पडणं स्वाभाविकच होतं.
मोरारजी देसाई, स. का. पाटील अशा मंडळींना आचार्य अत्रे यांनी सळो की पळो करून सोडले होते. ‘मुंबई महाराष्ट्राची नाहीच,’ असा त्यांचा दावा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जेव्हा 105 हुतात्मा झाले तेव्हा मोरारजी देसाई यांनी ‘पोलिसांनी किती गोळ्या झाडल्या आणि त्यात कितीजण मेले’ याचा हिशोब मागितला होता असे सांगितले जाते. त्यामुळेच आचार्य अत्रे त्यांना ‘नरराक्षस’ मोरारजी असे म्हणायची. त्यांनी त्यांच्यासाठी ‘मोरारजी नव्हे मर्डरजी’ असेही विशेषण वापरले होते.
मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असलेले स. का. पाटील हे गांधीजींच्या विचाराने भारावलेले होते. विद्यार्थी दशेपासून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. पुढे त्यांनी पत्रकारिताही केली. कायदा आणि शिक्षण क्षेत्रात योगदान दिले. ते तीनवेळा मुंबईचे महापौर होते. त्यांना ‘बॉम्बेचा मुकूट नसलेला राजा’ म्हणून ओळखले जायचे. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. चौथ्या लोकसभेला त्यांचा साऊथ बॉम्बे मतदारसंघातून (दक्षिण मध्य) पराभव झाला. आचार्य अत्रे यांच्या घणाघाती प्रचारामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

15 नोव्हेंबर 1955 रोजी लोकसभेत राज्य पुनर्रचना आयोगावर चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी मुंबईला स्वायत्त शहर-राज्य म्हणून दर्जा देण्याची मागणी केली होती. ‘पाच हजार वर्षांत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही,’ असेही एक गंभीर विधान त्यांनी केले आणि हा संघर्ष टोकाला गेला. 1960 साली बॉम्बे राज्याचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्त्वात आली. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली. मुंबई ही गुजरातला जोडली जावी हा तेव्हाचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले. त्यानंतर सातत्याने अनेक प्रकारे हा प्रयत्न पुन्हा पुन्हा करण्यात आला. अजूनही तसे प्रयत्न होतात पण मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कट मराठी माणसाने झुगारून लावला. म्हणूनच मुंबई ही मराराष्ट्राची राजधानी असली तरी ती देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.

घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 13 मे 2024

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा