केशवराव नारायण गालट तथा बाबासाहेब धाबेकर हे अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा या गावचे सुपुत्र. राजकारणात बाबासाहेब धाबेकर याच नावाने ते सुपरिचित होते. धाबे गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून त्यांचा राजकीय प्रवास सुुरू झाला. पुढे उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जि. प. सदस्य, अकोला जिल्हा परिषदेचे बारा वर्षे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास होता. ते अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाचा काळ हा सुवर्णकाळ समजला जातो. त्यावेळी त्यांनी अकोला जिल्ह्यात राबवलेल्या अनेक योजना पुढे राज्यभर लागू झाल्या. आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्द यशस्वी ठरली. 2009 साली त्यांनी लोकसभेचीही निवडणूक लढवली होती. पूर्वी हा कर्तबगार नेता त्यांच्या डोळ्यावरील चष्म्यामुळे पराभूत झाला होता.
सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रीमंडळात असलेल्या बाबासाहेब धाबेकर यांच्या कार्यकाळात तयार झालेल्या लहान बंधार्यांना धाबेकर बंधारा असे म्हटले जायचे. शिंदे यांनी बाबासाहेबांना योजनामहर्षी ही उपाधी बहाल केली होती.
1990च्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना शरद पवार यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. शिवसेना-भाजप त्यावेळी एकत्र येऊन लढायचे मात्र त्यांच्या फारशा क्षमता नव्हत्या. शिवसेना तर मुंबईच्याही बाहेर पडली नव्हती. अशावेळी बाबासाहेब धाबेकर यांना काँग्रेसतर्फे तिकीट मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. शिवसेनेतर्फे गुलाबराव गावंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. विदर्भ हा मुळातच काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने गावंडे यांचे पानिपत होणार हे जवळपास निश्चित होते. शिवसेनेच्या पोरा-टोरांनी मात्र काहीही करून गावंडे यांना निवडून आणण्याचा चंग बांधला.
बाबासाहेब धाबेकर यांच्या डोळ्याची विदेशात एक शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून ते सतत काळ्या रंगाचा चष्मा वापरत. याच मुद्याचा लाभ घेत तरूण शिवसैनिकांनी एक पुडी सोडली की, बाबासाहेबांच्या या चष्म्यातून समोरचा माणूस विवस्त्र दिसतो. ही अफवा बघता-बघता महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंत पोहोचली. मग बाबासाहेब जिथे जात तिथून बायका धूम घरात पळत आणि आतून कडी लावून घेत. तरण्या-ताठ्या मुली, बायका, इतकेच काय म्हातार्या बायकाही त्यांच्यासमोर येईनात! त्यातून त्यांच्या प्रचारसभा ओस पडू लागल्या. सुरूवातीला इकडे दुर्लक्ष करणार्या बाबासाहेबांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ही चावट बातमी वणव्यासारखी सगळीकडे पोहोचली होती. अकोला-वाशिम भागात अकारण बाबासाहेबांची प्रतिमा रंगेल अशी रंगवण्यात आली. याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि बाबासाहेब या निवडणुकीत पराभूत झाले.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
पुढच्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांची उमेदवारी नाकारली पण त्यांनी कारंजा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरला. ते तिथून निवडून आले आणि सेना-भाजप युतीला पाठिंबा दिला. मग शिवसेनेच्याच कोट्यातून त्यांना राज्य परिवहनमंत्री, जलसंधारण मंत्रीपद मिळाले. त्यांनी सहकाराचं जाळं आणखी मजबूत केलं. 1999 साली ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आणि विजयीही झाले. अकोला-कारंजा भागात मात्र अजूनही त्यांच्या या चष्म्याची खुमासदार चर्चा रंगते.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 3 मे 2024