तुरूंगातून लढत मिळवला त्रिवेणी विजय

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा आपल्यापैकी अनेकांना ज्ञात आहे. हैदराबाद राज्यातील निजामांच्या सरकारी धोरणांना विरोध करणारे कम्युनिस्ट नेते म्हणजे पेंड्याला राघव. त्यांनी अस्पृशता, महिलांवर होणारे अत्याचार याविरूद्ध आवाज उठवला. तेलंगणातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी संघर्ष उभारला. सरकारविरोधी भूमिका घेतली म्हणून हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना तुरूंगात डांबले. ते वर्ष होते 1952 चे. त्यावर्षी तिथे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र आल्या होत्या. राघव यांनी विधानसभा आणि लोकसभेसाठी तीन मतदारसंघातून अर्ज भरले. तुरूंगातूनच त्यांनी निवडणूक लढवली आणि या तीनही मतदारसंघातून विजय मिळवला.

किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

‘माय पब्लिक लाइफ’ हे त्यांचे आत्मचरित्र वाचताना त्यांच्या कार्याची आणि तेव्हाच्या सामाजिक, प्रशासकीय व्यवस्थेची जाणीव होते. स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेते असलेल्या पेंड्याला यांना त्यांच्या नेत्यांनी या विजयानंतर विधिमंडळातील जिंकलेल्या दोन जागा सोडण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आणि दिल्लीत खासदार म्हणून जबाबदारी स्वीकारली. पेंड्याला यांनी लोकसभेसाठी वारंगल मतदारसंघातून तर विधानसभेसाठी कणमकोंडा आणि वर्धन्नापेट मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या तीनही जागा त्यांनी प्रोगेसिव्ह डेमॉक्रॅटिक फ्रंटचे उमेदवार म्हणून लढवल्या होत्या. त्यावेळी त्यांचं वय होतं 35 वर्षांचं.

तुरूंगात असूनही एकाचवेळी तीन मतदारसंघातून निवडणूक लढवणे आणि तिन्ही ठिकाणी विजयीश्रीची माळ गळ्यात पडणे हा पेंड्याला यांचा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. भाजपानेते अटलबिहारी वाजपेयी यांनी 1957 साली उत्तरप्रदेशमधील बलरामपूर, मथुरा आणि लखनौ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण ते लखनौ आणि मथुरेतून ते पराभूत झाले होते. 1985 साली आंध्र प्रदेशात एन.टी. रामाराव यांनी तीन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि तिन्ही ठिकाणी विजय मिळवला होता; मात्र पंड्याला यांनी तीन ठिकाणी निवडणूक लढवली त्यावेळी ते तुरूंगात होते, हा महत्त्वाचा फरक आहे.

 

 

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

 

निजामाच्या जुलूमशाहीविरूद्ध आवाज उठवणार्‍या पेंड्याला राघव यांचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झाले होते. तरीही हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेवर त्यांचे कमलीचे वर्चस्व होते. ते कोणत्याही गुन्हेगारी कृत्याच्या आरोपाखाली तुरूंगात गेले नसून निजामाच्या जुलूमशाहीविरूद्ध त्यांनी आवाज उठवला म्हणून त्यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. या सगळ्याचा विचार करून मतदारांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली. सरकारविरोधी काम केेले म्हणून शिक्षा भोगणार्‍या पेंड्याला राघव यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले, ही घटना म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरते. आजच्या काळात सरकारविरोधी भूमिका घेतल्यास विविध चौकशांचा ससेमिरा मागे लागून नेते संपतात किंवा मांडलिक होतात. अशावेळी पंड्याला राघव यांच्यासारख्या नेत्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 2 मे 2024

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा