होय, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांचा पराभव व्हावा यासाठी काँग्रेसने जंग जंग पछाडले होते. त्यांच्या या प्रयत्नांना हिंदू महासभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी आंबेडकरांच्या विरुद्ध उमेदवार उभे करत सहकार्य केले होते. त्यामुळे डॉ. आंबेडकर चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांच्या विरोधात त्यांचेच पी.ए. नारायण एस. काजरोळकर हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून निवडून आले. काजरोळकर यांचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे एका दूध विक्रेत्याने त्यांचा पराभव केला अशी चर्चा त्या काळात होती.
या पराभवानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून राज्यसभेवर गेले. लोकसभेत जाण्याचं त्यांचं स्वप्न असल्यानं त्यानंतर दोन वर्षांनी लागलेल्या भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी ते उभे राहिले पण तिथेही काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. दुर्देवाने ही त्यांची शेवटची निवडणूक ठरली कारण त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1956 साली त्यांचे निधन झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल्ड कास्ट पार्टीकडून 35 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ते स्वतः एक होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे उभे असलेले काजरोळकर हेही मागासवर्गीय होते. 15 हजार मतांनी त्यांनी आंबेडकरांचा पराभव केला.
त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जननायक अशी प्रतिमा होती. त्यांचा असा काही करिष्मा होता की काँग्रेसच्या विरुद्ध कोणताही उमेदवार तग धरू शकायचा नाही. 1952 साली झालेल्या या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने 489 पैकी 364 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईत आंबेडकरांच्या विरुद्ध विराट सभा घेतली होती. स. का. पाटील हे त्यावेळी काँग्रेसचे मुंबई प्रांताचे अध्यक्ष होते. देशाच्या या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने 45 टक्के मते मिळवली होती तर 74.4 टक्के जागांवर त्यांना यश आलं होतं. 25 ऑक्टोबर 1951 रोजी देशात पहिल्या निवडणुकीसाठी मतदान झालं. ही प्रक्रिया चार महिने म्हणजे 1952 च्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाच्या पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी त्यांचं कार्य निर्विवाद होतं. या पराभवावर बरीच चर्चा झाली मात्र डॉ. आंबेडकरांनी कुणालाही दोष दिला नाही. याविषयी बोलताना एका सभेत ते म्हणाले, ‘निवडणूक ही शेवटी क्रिकेटची मॅच असते. पराभूत टीम गाशा गुंडाळून गप्प बसत नाही. ती पुढच्या सामन्यासाठी आणखी जोरदार तयारी करते!’
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
याबाबत बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माई आंबेडकर त्यांच्या ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या आत्मचरित्रात लिहितात की, ‘लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यावेळी आम्ही दिल्लीला होतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही मुंबईला आलो होतो. त्या दरम्यान आमचा मुक्काम सिद्धार्थ महाविद्यालयात किंवा कुलाब्याच्या जयराज हाऊस इथे असायचा.
“एके दिवशी नारायणराव काजरोळकर सांहेबांना सिद्धार्थ कॉलेजमध्ये भेटायला आले. कदाचित त्यांना समोर येण्यात अपराधीपणा म्हणा किंवा संकोच वाटत असावा, असे मला वाटते. कारण ते संकोचाने सामोरे आले. त्यांना पाहताच साहेबांनी त्यांना अत्यंत आपुलकीने जवळ बोलावले. काजरोळकर आले व त्यांनी क्षणार्धात साहेबांच्या पायावर डोकं ठेवले. साहेबांनी दोन्ही हातांनी त्यांना उठवलं आणि शेजारी बसवून घेतलं व निवडून आल्याबद्दल उदार मनाने त्यांचे अभिनंदन केले.’
–घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 28 एप्रिल 2024