हिंदू धर्मात ज्याप्रमाणे ईश्वराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्याचप्रमाणे ईश्वरीय अवतार समजले जाणारे संत यांचेही स्थान अपरंपार असे आहे. जो सत्याचे आचरण करतो, जो ज्ञानवंत आहे, तो संत असा एक विचार भक्तांच्या मनी वसलेला असतो. संत रुपात अवतार घेऊन समाज सुधारणेचे अतुलनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तिंना गुरू, साधू, तपस्वी, ऋषी, महात्मा, स्वामी, मुनी, योगी, तपस्वीनी, योगिनी इत्यादी नावांनी ओळखल्या जाते. पुरातन काळापासून अशा व्यक्तिंनी केवळ धर्मप्रसाराचे काम केले आहे असे नाही तर वेळोवेळी प्रत्येक बाबतीत समाज शिक्षणाचे, सामाजिक जागृतीचे महत्तम काम केले आहे. हजारो वर्षांपासून जी संत परंपरा चालू आहे, ती आजही समाजप्रिय आहे.
नुकताच श्री घनश्याम पाटील यांनी संपादित केलेला ‘सुभावभजन’ हा गौरवग्रंथ वाचण्याचे भाग्य लाभले. या ग्रंथात पंचवीसपेक्षा अधिक महानुभावांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. एखाद्या थोर व्यक्तिसंदर्भात लिहिलेले लेख ग्रंथाच्या रुपात प्रकाशित करताना ग्रंथांचे बाह्यांग तितकेच आकर्षक, देखणे असले पाहिजे त्यादृष्टीने या ग्रंथाचे मुखपृष्ठ चरित्र नायकाची भावमुद्रा आणि पाठीराखा असलेले महाराष्ट्र दैवत विठूरायाचे चित्र लक्षवेधक तर आहेच पण तितकेच मंगलमय, पवित्र आहे. त्यासाठी चित्रकार संतोष घोंगडे यांचा कुंचला कौतुकास्पद आहे. सुबक तितकीच चित्ताकर्षक मांडणी हे या संग्रहाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, त्यासाठी मांडणीकार मयुरी मालुसरे कौतुकास पात्र आहेत. या ग्रंथातील सर्व ११५ पाने गुळगुळीत, रंगीत छपाई असलेले आणि ठळक अक्षरात असल्यामुळे वाचायला अत्यंत सोपे जाते.
शांताराम महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केलेल्या या ग्रंथात
आपल्या संपादकीय लेखात घनश्याम पाटील या गौरवग्रंथाचे नायक ह. भ. प. शांताराम निम्हण यांच्याबद्दल म्हणतात, “आपण देव पाहिला नाही, तेवढे आपले भाग्य थोर नाही पण देवमाणूस पाहायचा असेल तर एकवेळ शांताराम महाराजांना नक्की भेटा.” या एकाच वाक्यात फार मोठा भावार्थ सामावलेला आहे. अण्णांच्या स्वभावातील अत्यंत सरळ, सालस, सत्वशील या प्रमुख गुणांचे वर्णन करताना ह. भ. प. चैतन्य भानुदास महाराज देगलूरकर श्री तुकाराम महाराजांचे एक वचन उद्धृत करतात
धन्य भावशीळ|
ज्याचे हृदय निर्मळ|
यावरून अण्णांचा स्वभावधर्म, आचरण लक्षात येते.
आळंदी येथील ह. भ. प. डॉ. किसन महाराज साखरे ‘नियमनिष्ठ’ वारकरी म्हणून अण्णामहाराजांचा उल्लेख करताना ते वै. बाळोबा सुतार यांची परंपरा पुढे चालवत असल्याचे आवर्जून सांगतात. किसन महाराज अण्णांच्या आवाजाचा सुमधुर, तार सप्तकात गाताना त्यांचा आवाज कधी फाटत नाही, चिरका निघत नाही असा उल्लेख करतात. सोबत ते खरे भजनानंदी आहेत असा गौरवही करतात कारण वयाची पंचाहत्तरी गाठली तरी अण्णांची भगवद्सेवा अविरत सुरु आहे.
ह. भ. प. भक्तियोगी शांताराम महाराज ‘तुका म्हणे वर्म भजनेचि सापडे’ या लेखात वारकरी संप्रदाय, गुरुकुल, संतपरंपरा,संत अवतार, संत वाङ्मय, इत्यादी गोष्टींचा उल्लेख करताना गौरवग्रंथ नायक यांचे वैशिष्ट्य स्पष्ट करतात…
‘सदाचारसंपन्न, सूचारू जीवनशैली, निरपेक्ष -निष्काम ईशसेवा, भजन-कीर्तनाची प्रामाणिक भूमिका, लोकसंगीत व परंपरागत वारकरी चालीची परंपरा या दोन्हीचा समावेश महाराजांच्या संगीत भजन सादरीकरणात दिसून येतो.
‘जे इतरांच्या कानात अमृताचा वर्षाव करतात त्यांचेच अमृतमहोत्सव साजरे होतात.’ अण्णांचे असे गुणगान ‘मणिकांचनयोग’ या लेखात प्रमोद महाराज जगताप करतात तेव्हा अण्णांच्या कार्याची महती लक्षात येते. प्रमोद महाराज नामाचे महत्त्व स्पष्ट करताना नामामृताचे सेवन अण्णांनी स्वतः केले आणि भजनाच्या माध्यमातून सर्व समाजाला मुक्तहस्ताने वाटले. या वाक्यातून अण्णांच्या स्वभाव धर्माबद्दल एक उक्ती आठवते ती म्हणजे…
‘जे जे आपणासी ठावे
ते ते इतरांसी सांगावे,
शहाणे करून सोडावे
सकल जन।
पुढे प्रमोद महाराज भजनसेवेचा वारसा त्यांना वडिलांकडून लाभला असल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. वारकरी संप्रदायाचे अनुकरणीय वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांना नमस्कार करणे. हे वैशिष्ट्य अण्णांच्या ठायी असल्याचे डॉ. जगताप अधोरेखित करतात. अण्णांचे शांतिदूत म्हणून गौरवयुक्त वर्णन करताना ते संत तुकोबारायांच्या अभंगाचा आधार घेतात…
शांती परते नाही सुख।
येई अवघे ते दुःख।
म्हणवोनि शांती धरा।
उतरायला पैल तीरा ।।
ह. भ. प. अभय टिळक ह्यांचा ‘ही स्वरांकित भक्तिसेवा अक्षय रुजू होत राहो’ असे काव्यात्मक शीर्षक असलेला लेख वाचनीय आहे. कमालीचे शांत, स्निग्ध, आत्मविलोपी, आणि अल्पभाष हे शांताराम महाराजांचे निजरूप होय. नितांत सुंदर, शांत कमालीचा गोड आवाज, आर्जवी असा आवाज आणि त्यातून साकारणारे शांताराम महाराजांच्या अस्तित्वात समरस झालेले समर्पण यांचा सुरेल मिलाफ टिळक वर्णितात.
‘संप्रदायाची प्रेरणा’ या लेखात ह.भ.प. उल्हासदादा पवार यांनी गावोगावी असलेली भजन, काकड आरती, भारुडे या परंपरांबद्दल विस्तृत विवेचन करून वारकरी संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गळ्यातील माळ! या परंपरेमुळे गावोगावी शाकाहार, व्यसनमुक्ती होण्यासाठी मोठे बळ मिळाल्याचे उल्हासदादा पवार स्पष्ट करतात. सोबतच शिस्तप्रिय, मितभाषी, निरुपद्रवी, विठ्ठलभक्त, माणसामध्ये देव ही निष्ठा जपणारा वारकरी संप्रदाय हेही आदराने नमूद करतात. हे कार्य शांताराम महाराज अव्याहतपणे करत असल्याचे गौरवोद्गार उल्हासदादा काढतात तेव्हा वारकरी संप्रदायासोबत अण्णांच्या कार्याबद्दल अभिमान वाटतो.
भजनसेवेची तुलना अमृताशी करणारे जयवंत महाराज बोधले हे ‘भजनसेवा हेच अमृत’ या लेखात भजनसेवेची महती, भक्ती याबाबत सांगोपांग चर्चा करून शांताराम महाराज किती विनम्र आहेत यासाठी एका चरणाचा दाखला देतात…
मुखी अमृताची वाणी।
देह देवाचे कारणी।।
चंद्रकांत वांजळे महाराज ‘आम्ही नामाचे धारक’ या लेखाच्या आरंभी
‘हरिदासाचे घरी।
मज उपजवा जन्मांतरी।।
म्हणसी काही मागा।
हेचि देगा पांडुरंगा।।
ही ओवी उद्धृत करताना त्यांना वाटते, अशी गतजन्मामध्ये कदाचित अण्णांनी भगवंताकडे प्रार्थना केली असावी. या मागणीचा प्रसादच म्हणून की काय त्यांना वै. ह.भ.प. सयाजीबुवा बापू निम्हण आणि कै. श्रीमती भिमाबाई सयाजी निम्हण या सुशील दाम्पत्याच्या पोटी जन्म मिळाला. यासोबत वांजळे महाराज अण्णांच्या पत्नी सौ. पार्वतीबाई यांनी निभावलेल्या पत्नीधर्माचा गौरव करतात…
‘पतिचिया मता। अनुसरूनी पतिव्रता।।’
शांताराम अण्णांच्या बहरलेल्या, फुललेल्या संसारवेलीचा उल्लेख करताना वांजळे महाराज यांना ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तिचे स्मरण होते.
‘वारकरी संगीताचा पंचम’ असे शांताराम महाराज यांच्याबद्दल लिहिणारे ह.भ.प. भावार्थ देखणे भारतीय संस्कृती भावार्थ उलगडून साधू होण्यासाठी अनेकानेक वृत्ती बाळगाव्या लागतात आणि ते सारे गुण ज्यांच्या अंगी आहेत ते म्हणजे शांताराम महाराज असे स्पष्ट करताना त्यांचे चरित्र लिहिले आहे.
भगवत्प्रातीसाठी साधना महत्त्वाची असून साधनेचे वेगवेगळे मार्ग ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा या लेखात मांडले आहेत. आपले मत स्पष्ट करताना ते संत ज्ञानेश्वर महाराज, आद्य शंकराचार्य, तुकाराम महाराज यांच्या रचनांचा आधार घेत असले तरीही संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या
‘रुणुझुणु रुणझुण रे भ्रमर|
सांडी तू अवगुणु रे भ्रमर||
या अभंगाचा भावार्थही सांगतात. ह्या गौरव ग्रंथाचे एक वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ शांताराम महाराज यांच्याविषयी लेखन नाही तर अनेक विषयांवर मार्गदर्शन वाचकांना मिळते.
ह.भ.प. ज्ञानेश्वर विठ्ठल कदम ह्यांना आपल्या लेखाला ‘निळा माने अंगी शांती। क्षमा विश्रांती ज्ञानाची।। दिलेल्या ह्या शीर्षकात शांताराम महाराज यांचे गुणवैशिष्ट्ये आढळतात. त्याचबरोबर पुणे शहरात सध्या जी कीर्तनसेवा आणि त्यात जी शिस्त आहे, स्वरतालाची सांगड आहे ती शांताराम महाराज यांच्यामुळेच आहे हे स्पष्टपणे सांगतात.
योगिराज महाराज हे अण्णांचा ‘स्वरमार्तंड’ म्हणून गौरव करतात, श्री राजाभाऊ चोपदार यांना ते निष्ठावान साधक वाटतात, सचिन पवार अण्णांबद्दल ‘वारकरी विचारपरंपरेचे निष्ठावंत पाईक’ अशा शब्दांची योजना करतात, पांडुरंग महाराज दातार यांना अण्णा म्हणजे ‘झाकलेले माणिक’ भासतात, संतोष महाराज पायगुडे यांना अण्णा म्हणजे अभंगाप्रमाणे जगणारे असा साक्षात्कार होतो, माधवी निगडे यांना ते पितृरुप वाटतात, बाळासाहेब वाईकर यांच्यासाठी अण्णा ‘आधुनिक वारकरी संत’ आहेत, रघुनाथ यांना अण्णा म्हणजे ‘ईश्वरकृपा लाभलेले पारमार्थिक व्यक्तिमत्त्व’ जाणवते, बाळ सुतार यांच्या मते अण्णा म्हणजे वारकरी संप्रदायाचा महामेरु, भजनांदी योगी असे वर्णन अमृत स्वामी यांनी केले आहे तर उद्धव जालिंदर गोळे ह्यांना अण्णा उदार नि कृपाळ वाटतात.
भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे ह्यांना अण्णांना गायनाची अद्भूत शक्ती लाभल्याचे सांगून अण्णांच्या मुखातून गवळणी, माउलींचे अभंग, आणि संतांच्या विरहिणी ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू पाझरायला लागतात असे निदर्शनास आणून दिले आहे.
संतसेवक या लेखात श्री मारुती ज्ञानोबा कोकाटे हे एका अपूर्व योगाचा दाखला देतात. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांनी काढलेले गौरवोद्गार ते उद्धृत करतात…
“श्री क्षेत्र पंढरपूर येथून पांडुरंग पाषाण नगरी आले. येताना ह.भ. प. श्री शांताराम महाराज निम्हण यांच्यासारखा साधू घेऊन आले कारण त्याचदिवशी पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना आणि त्याच दिवशी शांताराम महाराज यांचा जन्म ही त्याची साक्ष आहे.”
निलेश निम्हण यांनी ‘अण्णा’ ह्यांच्याबद्दल खूप छान लिहिले आहे. सावळेराम झरेकर यांनी ‘का न म्हणावे संत’ ही अण्णांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी पद्य रचना सादर केली आहे.
शांताराम महाराज निम्हण यांच्याबद्दल अनेक नामवंतांनी गौरवोद्गार काढले आहेत परंतु स्वतः अण्णांची आवड कोणती आहे हे सुतार महाराज यांनी पुढील रचनेत स्पष्ट केले आहे…
माझ्या जिवींची आवडी।
पंढरपुरा नेईल गुडी।।
पांडुरंगी मन रंगले।
गोविंदाचे गुणी वेधले।।
अशा सद्गुणी, विठ्ठलभक्त ह.भ. प. शांताराम महाराज निम्हण यांना वंदन करून थांबतो.
००००
– नागेश शेवाळकर, पुणे
(९४२३१३९०७१)