तीन सारांश कथा – नागनाथ कोत्तापल्ले

कथा हा अतिशय लवचिक असा वाङमयप्रकार आहे. संस्कृतिच्या प्रारंभापासून कविता आणि कथा लिहिल्या जातात. पुढे नाटक आले. म्हणजे साहित्याचे हे मूळ आविष्कार रूपे होत. कथा ही लवचिक असल्यामुळे ती असंख्य रुपात व्यक्त झालेली आहे. होऊ शकते. लघुत्तम कथा, लघुकथा, गोष्ट, कथा, दीर्घकथा, धक्कांतिका अशा विविध रुपात कथा लिहिली गेली. कमीत कमी अवकाशात खूप काही सूचित करण्याचे सामर्थ्य कथा या वाङ्मय प्रकारात असते. शिवाय काही अनुभवच असे असतात की, कथेशिवाय ते अनुभव इतरत्र व्यक्त होऊच शकत नाहीत. एक प्रकारची अपरिहार्यताच तेथे असते. येथे ’सारांश कथा’ हा एक प्रयोग आहे. कमीत कमी अवकाशात अधिकाधिक वास्तव गोळीबंदपणे प्रकट करण्याचा हा प्रयत्न आहे.

बुडबुडा

बाबू कुठून आला माहिती नाही. पण तो मराठी बोलू शकत नव्हता. मोडकं तोडकं हिंदी बोलायचा. अर्थात त्याच्या भाषेशी  कोणालाच काही देणं घेणं नव्हतं. तो काम मात्र उत्तम करायचा. म्हणूनच तो गणेशशेठच्या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पावर कामाला लागला होता. गणेशशेठचा हा मोठाच महत्त्वकांक्षी प्रकल्प होता. मध्यमवर्गियांना परवडणार्‍या किमतीत घरे देण्याच्या ध्येयवादाने ते पेटून उठले होते आणि त्यांनी कुठून कुठून मजूर ट्रकमध्ये भरुन आणले होते. बिहार, मध्यप्रदेश, आंध्र आणि अगदी केरळ पासून त्यांच्या ट्रक येत होत्या. खुराड्यात कोंबड्याभरून आणावीत तसे मजूर, त्यांच्या बायका, पोरं आणली गेली होती. त्यांच्यासाठी पत्र्याची तात्पुरती घरे उभारलेली होती. अर्थात हा प्रकल्प झाला की गणेशशेठ यांच्या दुसर्‍या प्रकल्पावर ती सारीच मंडळी जाणार होती. तर या प्रकल्पाचे काम झपाट्याने सुरु होते. अकराव्या मजल्यापर्यंतचे स्ट्रक्चर उभे राहिले होते. आता आणखी दोन मजले झाले की भिंती, गिलावा, फरशी आणि इतर कामांचा धायटा सुरु राहणार होता. येत्या दिवाळीला घरे ताब्यात द्यायची होती आणि रात्रीही फ्लड लाईटच्या प्रकाशात कामे सुरुच होती.
कामाला असा वेग आलेला होता. मजल्यामजल्यावर माणसं तोल सावरीत कामं करीत होती. इंजिनिअर्स, मुकादम आणि बाबू मंडळी सशाच्या मागे लांडग्याने लागावे तशी फिरत होती. ओरडत होती. कोणी बाई आपल्या लेकराला अडोशाला घेऊन दूध पाजत असली तरी ते रोखून बघत होते. वेळच तशी आणीबाणीची होती ना! दिवाळीला केवळ सहा महिने राहिले होते… आणि काय झाले ते कोणालाच कळले नाही. अकराव्या मजल्यावरुन बाबूचा तोल गेला आणि तो खाली असलेल्या मिक्सिग मशिनवर कोसळला. पाहता पाहता एकच कल्लोळ झाला. दोन तिनशे मजूर कलकलाट करीत बाबू भोवती जमले. बाबूची बायकोही उर पिटत, आक्रोश करीत तिथं आली. तिनं बाबूला कवटाळलं. साराच जमाव हतबुद्ध होऊन पाहात राहिला. कोणालाच काय करावं ते कळेना अन् तेवढयात चित्याच्या वेगानं तिथला मॅनेजर धावत आला. त्यानं सार्‍यांना दूर केलं. चार मजुरांच्या सहाय्यानं बाबूला जीपमध्ये टाकलं आणि जीप दवाखान्याच्या दिशेने वेगाने निघून गेली… मॅनेजरने समजावले, आधी इलाज झाला पाहिजे. सारे आले तसे निघून गेले. जिथे काम करीत होते, तिथं कुचकुचत कामासाठी उभे राहिले… जणू पाण्यावरचा एक बुडबुडा फुटला होता. पाणी पुन्हा प्रवाहित झाले होते.
बाबू कुणी मोठा नव्हता. तो केवळ बाबू होता. म्हणून राष्ट्रीय दुखवट्याचा तर सोडाच, पण प्रकलपाच्या दुखवट्याचाही प्रश्न नव्हता. नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता रोजच्यासारखाच भोंगा झाला. हळूहळू मजूर स्त्रीपुरुष पत्र्याच्या खोल्यांमधून बाहेर पडू लागले. घाईघाईनं नेमून दिलेल्या ठिकाणाकडे जावू लागले. आणखी दहा मिनिटांनी शेवटचा भोंगा वाजू लागला. तो जरा दीर्घ वाजत राहतो… आणि कुठल्यातरी खुराड्यातून बाबूची बायको आपल्या वर्ष दीडवर्षाच्या लेकराला काखेत सावरत मंद पावलांनी निघाली होतो. दुसर्‍या हातात घमेलं होतं.
आज तिच्यावर ’ जल्दी जल्दी पैर उठाव…’ असं कोणी ओरडणार नाही, असं तिला उगीचच वाटत होतं!

https://shop.chaprak.com/product/kasturigandh/

अन्नासाठी आम्हा…

पन्नास साठ प्रशस्त बंगल्यांची मोठी सोसायटी होती. गावातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देसाई या सोसायटीचे बांधकाम करीत होते. त्यासाठी त्यांनी कुठून कुठून मजूर आणले होते. अर्धवट बांधून झालेल्या बंगल्यांमधूनच अडोसे लावून मजूर राहत होते. तेथेच त्यांचे स्वयंपाकपाणी चाले. काही मजूर मोकळ्या जागेत झोपड्या उभारुन राहात होते. बांधकाम वेगाने चालले होते. जसजसे बंगले होतील तसतसे हस्तांतरित करावयाचे असे देसाईंनी ठरवून टाकले होते. त्यामुळे रोज कुठले ना कुठले कुटुंब आपले बंगले पाहावयास येत असत… लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देऊन, समाधान व्यक्त करुन किंवा नाराजी व्यक्त करुन जात असत. असंच त्या सकाळी प्रा. गवळी आणि त्यांच्या पत्नी सोसायटीत आल्या. कंपाऊंडच्या बाहेरच गाडी पार्क करुन चावी फिरवीत, स्वच्छ हवेचा आस्वाद घेत ते आपल्या बंगल्याकडे निघाले. ते थोडेसे पुढे गेले आणि थबकले. त्यांच्या अर्धवट बांधलेल्या बंगल्याभोवती खुपसे मजूर गोळा झालेले दिसले. एक दोन पोलीसही दिसले. नेमकं काय झालं ते त्यांना कळत नव्हतं, पण काही तरी विपरीत झालंय, याची त्यांना जाणीव झाली आणि ते झटपट चालत निघाले. त्यांच्यामागे त्यांची पत्नीही धावत निघाली. अर्धवट बांधलेल्या बंगल्याजवळ ते पोचले. मनातून चरकलेच कारण त्यांच्या बंगल्यात राहणारा मजूर असेल पस्तीस चाळीसचा तो अक्षरशः तडफडत होता. त्याच्या अंगावर लोकांनी पाणी टाकले होते आणि अक्षरशः तो पाण्याबाहेर काढलेल्या मासळीसारखा तडफडत होता. त्याने स्वतःच आपल्यावर रॉकेल टाकून पेटवून घेतले होते. सत्तर ऐंशी टक्के जळाला होता. सारे शरीर भाजलेल्या वांग्यासारखे काळेठिक्कर पडले होते. त्यांची वाचण्याची सारी शक्यताच संपलेली होती… ते दृष्य पाहून सौ. गवळींना तर भोवळच आली. लोकांनी सावरले म्हणून बरे नाही तर कोसळल्याच असत्या.
लोक घाई करीत होते, त्याला दवाखान्यात नेण्याची; पण न्यायचे कसे? अजून इंजिनियर, मुकादम किंवा बाबू मंडळी आली नव्हती. आपल्या गाडीतून हा जळका देह घेऊन जाणे प्रा. गवळींना प्रशस्त वाटेना. आपल्याला कुणी विचारु नये म्हणून जरा दूर जाऊन ते उभे राहिले… मग लोकांनी एक बाज आणली. त्याचा गरम देह कापडाने धरुन बाजेवर टाकला. कापड थोडेसे ओढले तर त्याची भाजलेली त्वचा सोलून केवढा तरी मांसाचा गोळा- लालभडक असा दिसायला लागला. त्याने केवढा तरी चित्कार केला आणि सारेच शांत झाले. आता कुठेही नेऊन काहीच होणार नव्हते.
दिवसभर पंचनामा, तपास, जाबजबाब चालत राहिले. दुपारी पोस्ट मार्टेम झाले आणि संध्याकाळी तर सर्व क्रियाकर्म आटोपले. कुठल्या तरी दूरदेशीच्या मातीतून घडलेला त्याचा देह इथल्या मातीत मिसळून गेला.
संध्याकाळी प्रा. गवळी आणि त्यांच्या पत्नी पुन्हा तिथे गेल्या. गवळींना उत्सुकता होती, नेमके काय झाले ते जाणून घेण्याची. बाई मात्र घाबरलेल्या, भ्यालेल्या. होणार्‍या बंगल्यांचे मालक म्हणून पोलिसांनी प्रा. गवळींनाही चार प्रश्न विचारले. पण बंगला तर देसाई बांधत होते. ते निश्चिंत होते.
त्यांना फारसे काही कळले नाही. त्या मजुराच्या बायकोचे काही लफडे आहे, असे हलक्या आवाजात लोक बोलत होते. संध्याकाळी तिही दिसली नाही. साईट इंजिनियर म्हणाला, ‘‘चलता साब, ये लोगोंका ऐसाही होता है…’’
परतताना थंड हवेत सौ. गवळींचे केस भुरभुरत होते. ती गंभीरच होती. तिच्याकडे पाहात प्रा. गवळी म्हणाले, ‘‘तू फारसा विचार करु नको. झाले ते चांगले झाले.’’ बाईंना काही कळेना. मग ते म्हणाले, ‘‘अगं काही काही जागा बळी मागतात… आत्ताच घडून गेलं ते बरं झालं. नसता आपल्याला वास्तू लाभली नसती. आता तिचा भग तिला मिळाला. आपल्याला वास्तू लाभदायक ठरणार… परमेरेच्छा’’ आणि गाडी चालवता स्टिइरिंग सोडून त्यांनी परमेश्वराला दोनही हात जोडून नमस्कार केला.
सौ. गवळी मात्र सुन्न होऊन आपल्या नवर्‍याकडे पाहत राहिल्या. प्रा. गवळी शांतपणे गाडी चालवीत होते.

वाळकं अन शन्न्या

पिराजीमामा कोरडवाहू शेतकरी. पाऊस चांगला झाला तर त्याच्या शेतात काही पिकायचं. नाही तर मोलमजुरीवर पोट भरायचं. पण पिराजीमामा मोठा मेहनती होता. कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही असा सारा कारभार. आपण भले की आपलं काम भलं. त्यामुळे त्याला सगळे मामा म्हणायचे. तर पिराजीमामाचं शेत म्हणजे काय, तीन एकराचा तुकडा. त्यात रात्रंदिवस राबायचं. तसा त्याचा एकलपायी मामला. म्हणजे मदतीला कुणी नाही. नांगरणं, पखरणं, पेरणं सारं तोच करायचा. त्याची बायको जमनामामी मात्र त्याच्याबरोबर सतत असायची. स्वयंपाकपाणी झालं की तिही शेतात जायची. एकुलतं एक पोरगं यंदा मॅट्रीकला होतं. त्यामुळे पिराजीमामाचं त्याला शक्यतो काम सांगायचा नाही. त्याच्यावर तर त्यानं किती स्वप्नं रचलेली.
या वर्षी पाऊस उत्तम झाला. म्हणजे जेव्हा पडावयास पाहिजे तेव्हा पडला. जेव्हा थांबावयास पाहिजे तेव्हा थांबला. एखाद्या गुणी बाळासारखं पावसाचं या वर्षीचं वागणं होतं. सगळा शेतकरी वर्ग आनंदला होता. पिराजीमामा तर कायमच शेतात असायचा.
तो मोठ्या हिशेबानं शेती करायचा. एका एकरात भुईमूग. दीड एकरात ज्वारी. म्हणजे हायब्रिड. अर्ध्या एकरात कापूस नाही तर उडीद मूग, तूर असंच काही… हा पण एक करायचा मधूनमधून एक दोन काकरा कुचकुची नाही तर गूळभेंडी. म्हणजे मऊसर हुरड्याची सोय. भुईमुगात मध्ये मध्ये भेंडी, दोडकी, दुदगी, कारली, गवार असा भाजीपाला. म्हणजे भाजीपाल्याची सोय व्हायची. गवारीच्या कुसर्‍या तर वर्षभर पुरायच्या. मोठ्या टुकीनं तो शेती अन् संसार करायचा चाळकं तर सार्‍यांनाच आवडायची. पिवकी धाश्रक झाली की खायला मजा यायची. हिरव्यागार ऐन्न्या तर जिभेवर ठेवली की विरघळायच्या. मग जमनामामी वाळकाचं रायतं घालायची तेही मग वर्षभर पुरायचं. या वर्षी त्यानं ज्वारीत अन् भुईमूगातही खूप वाळकं अन शन्न्या लावल्या होत्या. रानभर वेली पसरत गेल्या होत्या. पिवळ्याजर्द वाळकांनी वेली लगडल्या होत्या. पिराजीमामा शेताकडं बघता बघता स्वप्नांचे इमल्यावर इमले चढवायचा. जमनामामीही काळकाकडं अन् शन्न्यांकडे बघत राहायची. मग नवर्‍याकडं कौतुकानं बघायची.
ऑक्टोबर सुरु झाला. आता थोड्याच दिवसात कामाची घाई सुरु होणार होती. भुईमूग काढावयास आला होता. ज्वारीची कापणीही करावयाची होती, अन् कापूस एकदा काढून झाला होता. पिराजीमामाची घाई सुरु होती… कुठल्या ना कुठल्या कामासाठी गावात जावं लागे. सकाळी शेतात यायला उशीर होई. मग तो धावतपळत यायचा. सगळं जिथल्या तिथं बघून हुशारुन जायचा.
पण गेल्या चारपाच दिवसांपासून काहीतरी बिघडलं आहे. हे त्याच्या लक्षात येत होतं. भुईमूगाचा एक कोपरा काळा दिसू लागला होता. म्हणजे येणारे जाणारे भुईमूग डपटून नेत होते. तसं तर पोरं सोरं असं भुईमूग उपटणं आपला हक्कच समजतात. शेतकरीही त्याकडे समंजसपणे कानाडोळा करतात. पण इथं तेवढंच नव्हतं. आऊड दोन आवडाचं ढिगलं सपाट झालं होतं अन् मुख्य म्हणजे ज्वारीत घुसून वाळकं अन् शेन्याही गायब होत होत्या. वाळकांनी लगडलेला वेली बुच्याबुच्या दिसत होत्या. काय करावं ते कळत नव्हतं.
आणखी चार दिवस गेले अन् त्याच्या लक्षात आलं की, कुचकुचीची कणसं खुडली होती. भुईमूगाच्या रानातला सपाट ढिगला थोडा मोठा झाला होता. वेलीही अधिकच बुच्या दिसत होत्या. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं? दिवसभर त्याचं डोकं भणाणून गेलं अन् संध्याकाळी घरी परतताना त्यानं उरलेल्या वाळकांवर आणि शेन्न्याका एंड्रीनचा हलकासा फवारा मारला अन् आनंदात घरी आला. रात्री ते निचिंतीने झोपला.
सकाळ झाली तसं ज्वारी कापण्यासाठी अन् कणसं खुडण्यासाठी बायकांना सांगायचं होतं. त्यानं पोराला बोलावलं अन् म्हणाला, पिल्या, घंटा-दोन घंटे रानात जातूर काय? मी येतोच तुज्या म्हागं-म्हागं… पोरगं उड्या मारीत शेताकडं गेलं.
पिराजीमामा पर्‍यागबाईच्या अंगणात उभा राहिला. त्यानं हाक मारली, वयनी… अन् त्याला आठवलं; आपण एंड्रीन फवारल्याचं पोराला सांगितलंच नाही… पर्‍यागबाई अंगणात आली. काय हे मामा… म्हणाली. तर पिराजीमामा पळत सुटला होता. वेड्यासारखा. पर्‍यागबाई मनाशीच पुटपुटत आत वळली.
पिराजीमामा शेताता पोचला. त्याला धाप लागली होती. तो भराभरा ज्वारीची धाटं बाजूला करीत ज्वारीत घुसला. तर त्याचा पोरगा जमिनीवर पडून तळमळत होता. त्याच्या तोंडातून काळसर फेस ओघळत होता. एका हाताच्या मुठीत हिरवीगार शेन्नी गच्च पकडलेली होती.

– नागनाथ कोत्तापल्ले, पुणे
सुप्रसिद्ध साहित्यिक

पूर्वप्रसिद्धी : ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक २०२३

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा