ज्ञानेश्वरीतील वसंतऋतू…

ज्ञानेश्वरी हा मराठी माणसांच्या जीवनातील कोहिनूर आहे. जीवनाच्या आणि निसर्गाच्या सर्व बाजूला स्पर्श करणारा परीस आहे. या परिसाच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचे सोने झाले आहे. ज्ञानेश्वरीत निसर्गाचा मुक्त वावर आहे. निसर्गातील चराचर सृष्टीचे दर्शन वेळोवेळी यामध्ये दिसून येते.

ज्ञानेश्वरीतील वसंत ऋतुचा शोध घेताना जाणवले की, समग्र ज्ञानेश्वरीच एक वसंत ऋतू आहे. वसंत ऋतुतील चैतन्य,  ताजेपणा,   नवनिर्मिती, सुगंधाचा बहर, आंब्याचा मोहोर, कोकिळेचे कूजन, सृष्टीचे पूजन, सगळे ज्ञानेश्वरीत ठाई ठाई दिसून येते. वसंत ऋतुच काय, सगळेच ऋतुसृष्टीचे चक्र, निसर्गाचे विविध विभ्रम ज्ञानेश्वरीत आढळतात. ज्ञानेश्वरांनी उपमा व दृष्टांत या अलंकारात निसर्गाची उधळण केली आहे. उपमा व दृष्टांतामध्ये सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, उल्का, धुमकेतू, वृक्ष, नद्या, नाले, समुद्र, पर्वत, लता, फुले, पाने, गवत, दवबिंदू, पाऊस, धबधबे, सरोवर, जंगल या सर्वांचे उल्लेख अनेक वेळा आले आहेत. आपले म्हणणे पटवून सांगण्यासाठी निसर्गातील अनेक गोष्टींचा उपयोग त्यांनी केला आहे.

 

पशु-पक्षी, मनुष्य यांच्या वृत्ती-प्रवृत्ती, वर्तन, स्वभाव यांचा अभ्यास अनेक उदाहरणातून दिसतो आणि लक्षात येते की ज्ञानेश्वर हे अष्टांग योगी तर होतेच पण अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनीही होते. ज्ञानेश्वरीतल्या सुंदर विवेचनात गुंगून जाताना मन थक्क होऊन भरून येते. एखादी उपमा व दृष्टांत किती समर्पक आहे म्हणून विचार करावा तर त्यापुढील उदाहरण त्याहून अधिक समर्पक व सुंदर असते.  ज्ञानेश्वर माउलींच्या या गुणांपुढे नतमस्तक होताना मान वर होऊ शकत नाही कारण एकापेक्षा एक सरस उदाहरण देत ज्ञानेश्वर भगवद्गीतेतील प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक श्लोकाचा अर्थ स्पष्ट करून सांगतात. त्यामुळे मान लवलेलीच राहते आणि नकळत आपले डोळे, आपले अंत:करण शोधू लागतात. त्यांच्या अनुभवी विचारापुढे आपले मन, स्वभाव, जगणे किती तोकडे आहे? आपण किती शूद्र आहोत? याची जाणीव होते. ज्ञानेश्वरांच्या विशाल व्यक्तिमत्त्वाचा, उत्तुंग कल्पनाशक्तिचा, सखोल विचाराचा प्रत्यय येतो. सूर्यासम प्रतिभाशक्ती असलेला हा तत्त्वज्ञ, योगी, कवी आहे. जसे सूर्यापासून काहीही लपवता येत नाही किंवा त्याच्या प्रकाशात सगळे जग स्वच्छ, स्पष्ट दिसते तसे ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेत सगळे स्वच्छ दिसते. ही अशी गोमाता आहे तिच्यापासून अर्थरूपी दुधाचे कितीही सेवन करावे तरी पोट भरत नाही आणि अर्थाची कास भरलेलीच राहते.

वसंत ऋतू हा ऋतुंचा रा

जा आहे. नवी पालवी, नवी फुले यामुळे सृष्टीचे सौंदर्य विलोभनीय दिसते. कोवळ्या पानांचा हिरवा रंग, त्यावर आलेली निळी, पिवळी, जांभळी, गुलाबी विविध रंगी फुले मन प्रसन्न करतात. कोकिळचे कूजन ऐकू येते. हवा आल्हाददायक असते. सूर्याचे ऊन उब देणारे असते. नवे धान्य आलेले असते. सृष्टी बहरलेली असते. वसंत ऋतुच्या या गुणांचा उल्लेख ज्ञानेश्वरीत अनेक वेळा आलेला आहे. वसंत ऋतू सर्व ऋतुत कसा श्रेष्ठ आहे याविषयी बोलताना ज्ञानेश्वर म्हणतात, कृष्णाने अर्जुनाला मीच सर्व सृष्टीत सामावलेला आहे व श्रेष्ठ आहे हे समजावून सांगताना म्हटले आहे की,

मासांआत मार्गशीरू| तो मी म्हणे शारंगधरू|ऋतूमाजी कुसुमाकरू| वसंतु तो मी॥

(10वा अध्याय, 283)

ज्याप्रमाणे सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष मास श्रेष्ठ असतो, तो मी आहे व सहा ऋतुमध्ये पुष्पांची खाण असणारा जो वसंत ऋतू तो मीच आहे म्हणून माझी भक्ती करा. याविषयी ज्ञानेश्वर माउलींनी म्हटले आहे.

आता पै माझेनि एके अंशे| हे जग व्यापिले असे| यालागी भेटू सांडूनि सरिसे| साम्य भज॥

(10वा अध्याय, 317)

ऐसे बिंबुधवन वसंते| तेणे विरक्तांचेनि  एकांते|बोलिले जेथं श्रीमंते| श्रीकृष्ण देवे॥

(10वा अध्याय, 318)

आता हे पहा, माझ्या एका अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे म्हणून भेदभावना टाकून अभेद बुद्धिने

सर्वत्र मीच समव्याप्त आहे असे समजून या दृष्टिने माझे भजन कर, असे सांगणारा श्रीकृष्ण कसा होता? तर ज्ञानी पुरुषरुपी वनास वसंतऋतुप्रमाणे आनंद देणारा व विरक्तांना एकांत ठिकाण असणारा असा सकल ऐश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण परमात्मा होता.

वसंत ऋतुची उपमा अनेक वेळा अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरांनी वापरली आहे. सत्वगुणांचे वर्णन करताना ज्ञानी भक्तांचे गुण वर्णन करताना वसंत ऋतुची उदाहरणे आली आहेत. चेतनेचे लक्षण सांगताना तेराव्या अध्यायात ज्ञानेश्वर सांगतात. चेतना म्हणजे काय तर…

आता असंगा साक्षिभूता| देही चैतन्याचि जे सत्ता| 

तिचे नाव पंडुसुता| चेतना येथे॥

(13वा अध्याय, 134)

जे नरवौनि केशवरी| उभी जागे शरीरी|

जे तिही अवस्थांतरी| पालटेना॥

(13वा अध्याय, 135)

मनबुद्धादि आघवी| जियेचेनि  टवटवी|

प्रकृति वन माधवी| सदांचि जे॥

(13वा अध्याय, 136)

म्हणजेच या शरीरात जी पायाच्या नखापासून ते थेट मस्तकांच्या केसापर्यंत नित्य जागृत असते व जागृति, स्वप्न, सुषुप्ती अवस्थांमध्ये जिच्यात अजिबात फरक पडत नाही, जिच्या योगाने मन व बुद्धी इत्यादींना टवटवी, प्रसन्नता असते व जी प्रकृतिरूप मनाला नेहमी वसंत ऋतूप्रमाणे प्रफुल्लित ठेवते ती चेतना होय. चैतन्याचे मुख्य लक्षण या उदाहरणातून अधिक चांगल्याप्रकारे स्पष्ट होते. चेतनेप्रमाणे ज्ञानाचे वर्णन करतानाही ज्ञानेश्वरांनी वसंत ऋतुचा उल्लेख केला आहे. खरे ज्ञान म्हणजे काय? ते झाल्यावर कसा फरक पडतो. ते ज्ञान झाले आहे हे इतरांना कसे समजते याविषयी ज्ञानेश्वर म्हणतात, खरे ज्ञान म्हणजे अविद्या नाहीशी होऊन जीवाचे व परमात्म्याचे ऐक्य होणे होय. या ज्ञानाची प्राप्ती झाली असता द्वैतरुपी दुष्काळ संपून सर्वत्र समबुद्धीरूप अद्वैत बोधाचा सुकाळ होतो. गर्व समूळ नष्ट होतो व आपपर भाव शिल्लक राहत नाही. हे ज्ञान नेमके कसे आहे ते निरूपण करता येणार नाही. डोळ्यांना दिसणार नाही पण ते प्राप्त झाल्याचे त्याच्या वर्तनावरून लक्षात येते.

मग तेचि इये शरीरी| जै आपला प्रभावो करी| 

तै इंद्रियांचिया व्यापारी| डोळाही दिसे॥

(13वा अध्याय, 177)

पै वसंताचे रिगवणे| झाडाचेंनि साजेपणे| 

जाणिजे तेवी करणे| सांगती ज्ञान॥

(13वा अध्याय, 178)

अगा वृक्षासि पाताळी| जळ सांपडे  मुळी|

जे शाखांच्या बहाळी| बाहेर दिसे॥

(13वा अध्याय, 179)

 

पण तेच ज्ञान ज्या वेळेस या शरीरात अभिव्यक्त होऊन आपले सामर्थ्य प्रकट करते त्यावेळी ते या इंद्रियाच्या आचरणावरून दृष्टोत्पत्तीस  येते. जसे झाडाच्या टवटवीतपणावरून वसंत ऋतुचा प्रवेश झाला हे समजते तसे इंद्रियांच्या व्यापारावरून ज्ञानप्राप्तीची लोकास ओळख होते. झाडाला जमिनीत मुळाशी पाणी सापडले आहे, हे फांद्याच्या विस्तारावरून व त्याच्या हिरव्या रंगावरून, टवटवीवरून दिसते. त्याप्रमाणे ज्ञानोदय झाल्यावर शरीरावर त्याची लक्षणे दिसू लागतात. आत्मा व शरीर यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते व गुणांच्या तादात्म्याने,  आध्यात्मिक संबंधाने आत्मा संसारी झाला आहे. त्याला सुखदुःखादि माया उपाधी लागल्यामुळे भोग भोगावे लागतात. आत्म्याला गुणांदिकांची बाधा कशाप्रकारे होते. रजोगुण, तमोगुण, सत्त्वगुण यांची लक्षणे कोणती. हे पटवून सांगताना ज्ञानेश्वरांनी अनेक उपमा, दृष्टांताचा वापर केला आहे. सत्त्व, रज, तम असे तीन गुण असून प्रकृति त्यांची जन्मभूमी आहे. त्यात सत्त्वगुण उत्तम असून रजोगुण हा मध्यम आहे. तमोगुण कनिष्ठ आहे. ज्याप्रमाणे एकाच देहास बाल्य, तारुण्य व वार्धक्य या तिन्ही अवस्था येतात त्याप्रमाणे हे तिन्ही गुण एकाच अंत:करण वृत्तीच्या ठिकाणी उत्पन्न होतात. यातील सत्त्वगुणांचे लक्षण सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात…

पै रजतमविजये| सत्व गा देही इये|

वाढतां चिन्हे तिये| ऐसी होती॥

(10वा अध्याय, 204)

जे प्रज्ञा आतुलीकडे| न समाती बाहेरी वोसंडे| 

वसंती पद्मखंडे| हृती जैसी॥

(14वा अध्याय, 205)

रज व तम या गुणांवर विजय मिळवून जेव्हा सत्त्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात. वसंत ऋतुमध्ये कमळे फुलल्यावर त्याचा सुवास आत न मावता बाहेरही चहूकडे पसरतो. त्याला वेगळे सांगावे लागत नाही. त्याप्रमाणे प्रज्ञावृत्ती व  ज्ञान हे अंतर्यामी फुलून येतात आणि बाहेर त्याच्या वर्तनावरून प्रकट होतात. आत न मावता बाहेर पडतात.

परमेश्वर हा प्रत्येक चैतन्य गुणात असून तो इतर सर्व गुणांप्रमाणे असूनही गुणांच्या अधीन न होता त्यापासून अलिप्त असतो. चैतन्य म्हणजे परमेश्वराचे अस्तित्व होय. परमेश्वर अकर्ता असून फक्त तो साक्षीभूत असतो, कारण नसतो. सर्व क्रियांना हे सत्त्व, रज, तम गुणच कारण असतात. यासाठी उदाहरण देताना ज्ञानेश्वर म्हणतात…

सत्व रजतमांचा| भेदी पसरू कर्माचा|

होत असे तो गुणांचा| विकारु या॥

(14वा अध्याय, 294)

ययामाजी मी ऐसा| वनी कां वसंतू जैसा| 

वनलक्ष्मी विलासा| हेतूभूत॥

(14 वा अध्याय, 295)

म्हणजे सत्त्व, रज, तम या गुणांपासून निरनिराळी जी कर्मे होतात ती आपण न करता त्याला गुणच कारण आहेत. वनातील वनशोभेच्या विलासाला जसा वसंत ऋतुच कारण असतो परंतु तो अलिप्त असतो.

साद निसर्गाची

16व्या अध्यायात दैवी व असुरी संपत्तीचे वर्णन आहे. दैवी संपत्ती मोक्षमार्गाला नेणारी, वाट दाखवणारी मशाल आहे. ज्या ठिकाणी एक दुसऱ्याला सहाय्य करणारे परस्पर पोषक असे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी मिळवले जातात त्याला लोकात संपत्ती असे म्हणतात. अशी जी दैवयोगाने एके ठिकाणी जमलेली दैवीगुण समुदायरूप संपत्ती व सर्वास सुख लाभ करून देणारी तिलाच दैवी संपत्ती असे म्हणतात. या दैवी गुणांमध्ये अभय,  सत्त्वशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दान, यज्ञ, दंभ, स्वाध्याय,  आर्जव, अहिंसा, सत्य, शांती, आक्रोश, भूतदया अशा अनेक गुणांचा समावेश होतो. या गुणांचे वर्णन व महत्त्व स्पष्ट करताना ज्ञानदेवांनी अनेक उदाहरणे दिली आहेत.

यापैकी अलोलुप्त या गुणांविषयी ते म्हणतात, आपल्याला अनुकूल वाटणारे इहलोकीचे किंवा परलोकीचे भोग हे जरी आपल्या इच्छेचे चाकर झाले तरीही त्यांचा उपभोग घ्यावा असे ज्याच्या मनात येत नाही त्याच्याजवळ अलोलुप्त हा गुण असतो. हे पटवून सांगताना ते म्हणतात…

आता सूर्यासि जीवे| अनुसरलिया राजीवे|

परि ते तो न शिवे| सौरभ्य जैसे॥

(16वा अध्याय, 163)

का वसंताचिया वाराणी| आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी|  

ते न करीतुचि घेणी| निगाला तो॥

(16वा अध्याय, 164)

सूर्योदय होण्याबरोबर सूर्य कमळाचे फूल उमलून सूर्यास जिवाभावाने अनुसरीत, अनन्य असते परंतु सूर्य जसा त्यांच्या सुगंधाचे उपभोगार्थ त्यास स्पर्शही करीत नाही किंवा वसंत ऋतुच्या आगमनाने वनातील पुष्कळ झाडे टवटवीत होतात. वनलक्ष्मी ऐश्वर्य धारण करते तथापि त्यातील एकाही झाडाचा किंवा फळाचा उपभोग न घेता तो वसंत ऋतू जसा निघून जातो तसा अलोलुप्त माणूस असतो. त्याचप्रमाणे ज्याच्याजवळ मार्दव हा गुण असतो तो केवळ जे जगाच्या जीवनासाठी जगत असतात. त्यांची दृष्टी, वागणूक भूतमात्राच्या ठिकाणी मवाळ व प्रेमयुक्त असते.

उदा.

नातरी बाळकाद्देशे| मातेचे स्नेह जैसे|

कां वसंतीच्या स्पर्शे| मऊ मलयानिक॥

(16वा अध्याय,169)

बालकासाठी आईचे प्रेम अत्यंत हळुवार असते. तिच्या स्पर्शानेच त्याला सुख होते किंवा वसंत ऋतू सुरू झाल्यावर मलय पर्वतावरून वाहत येणारा वारा मंद, सुगंधित व स्पर्शात मऊ, मुलायम, कोमल असतो. तसे मार्दव असते.

वसंतऋतु हा ऋतुंचा राजा… त्यामुळे काव्यात त्याचे विशेष महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी त्याच्या वर्णनांनी अनेक गोष्टी पटवून सांगितल्या आहेत. अठराव्या अध्यायात ते म्हणतात…

वर्षिया शोभे गगन| वसंते दुणावे वन|

देहा शृंगारी यौवन| दशा जैसी॥

(18वा अध्याय,12)

वसंत ऋतू आला असता जसे आकाश आपोआप भरून येऊन मेघ दाटी करतात.  वसंत ऋतू आला म्हणजे आपोआप वृक्षास नवी पालवी फुटून वनाची शोभा दुप्पट वाढते. तसेच शरीराला तारुण्यदशा प्राप्त झाली की शरीराचे सौंदर्य वाढते.  त्यासाठी बाहेरून काही करावे लागत नाही. हे निसर्गतःच घडत असते. तसेच माणसाने नित्यकर्म करावीत पण ती सहज असावीत. त्यांच्या फळांची अपेक्षा करू नये. फळाचा त्यागच करावा. जसे..

लता पिके आघवी| तव च्यूत बांधे पालवी|

मग हात न लावित माधवी| सोडुनी घाली॥

(18वा अध्याय,124)

वसंत ऋतुच्या योगाने जरी सर्व वेलीला फळे येतात व आम्रवृक्षास नवी पालवी फुटते. फुले आली तरीही जसा तो वसंत ऋतू त्यास हात न लावता ते टाकून जातो तसा नैमित्तिक कर्माच्या फळांचा त्याग करावा. या ओवीत ज्ञानदेवांनी वसंत ऋतुला माधवी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात…

तरी अवसांत आली माधवी| ते हेतु होय नवपालवी|

पल्लव पुष्पपुंज दावी| पुष्प फळाते!!

(18वा अध्याय, 354)

तर अकस्मात वसंत ऋतू प्राप्त झाला असता तो वृक्षवेलींना नवी पालवी फुटण्यास कारणीभूत होतो. त्या नव्या पालवीपासून फुलांचे घोस येतात आणि फुलापासून फळे निर्माण होतात. त्याचप्रमाणे कर्म शास्त्राने मानलेल्या मार्गानुसार जर केली तर ते पुण्यकर्म ठरते.

वसंत ऋतुचे वर्णन असे अनेक ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे आपल्या मनाला आनंदाची नवी पालवी फुटते. आधी ज्ञानेश्वरांचे भाषा वैभव, काव्यसौंदर्य, तत्त्वचिंतनता मनाला भुरळ घालते. त्यात अशी एकापेक्षा एक समर्पक उदाहरणे पाहिली म्हणजे असे वाटते…

का वसंती बरवा आरामु| आरामीही प्रियसंगमु|

संगमी आगनु| उपचाराचा॥

त्याप्रमाणे वसंत ऋतू असून त्यात उत्तम रमणीय बाग असावी. त्या बागेत प्रिय मनुष्याचा सहवास घडला तर चांगलेच आणि तशा अवस्थेत इतर सर्व उपचारांचीही अनुकूलता लाभलेली असावी. मग त्या सुखाला पारावर राहणार नाही. ज्ञानेश्वरीची ‌‘एक तरी ओवी अनुभवावी’ असे श्री संत नामदेवांनी म्हटले पण इथे अख्खी ज्ञानेश्वरी सतत अनुभवत राहावी असे वाटते. शेवटी श्री निवृत्तीनाथांना उद्देशून श्री ज्ञानेश्वर म्हणतात तेच म्हणावेसे वाटते…

 हे वाक्सृष्टी एके वेळे| देखतु माझे बुद्धीचे डोळे|

 तैसा उदैजो जी निर्मळे| कारुण्यबिंबे॥

(14वा अध्याय, 20)

 माझी प्रज्ञावेली वेल्हाळ| काव्ये होय सफळ|

 तो वसंतु होय स्नेहाळ| शिरोमणी॥

(14वा अध्याय, 21)

ज्यामुळे माझ्या बुद्धिरूप डोळ्यांना एकाचवेळी ही शब्दमय सृष्टी पाहता येईल, आकलन होईल अशा तऱ्हेच्या आपल्या करुणारूप निर्मल सूर्यबिंबाने प्रकाशार्थ उदयास यावे. माझी बुद्धिरुपी वेली पुष्कळ वाढून तिला काव्यरूपी चांगली फळे येण्याकरिता, वेलींना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंतऋतू आहे… तो वसंतऋतू हे श्री गुरु आपण व्हा, ज्यामुळे माझी भावार्थदीपिका बहरुन येईल.

– प्रा. डॉ. श्रुती श्री वडगबाळकर

(‘साहित्य चपराक’ मासिक एप्रिल २०२४)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा