मार्गस्थ (कथा) – अनिल राव

Share this post on:

सभागृह संपूर्णपणे भरायला आलं होतं. आज विठ्ठल पांडुरंग कापडनेकर यांची ‘मार्गस्थ’ ही दहावी कादंबरी प्रकाशित होत होती. त्यांची आजपावेतो चोवीस पुस्तके प्रकाशित झाली होती. आजचे पंचविसावे पुस्तक प्रकाशित होत होते. साहित्य क्षेत्रातील ते एक मोठं प्रस्त होतं. सदोदित हसत-खेळत राहणारं व्यक्तिमत्त्व होतं. सगळ्यांना आपलेसे करणारे साहित्यिक असा त्यांचा नावलौकिक होता. आजपर्यंत त्यांचे साहित्य ज्या ज्या प्रकाशकांनी प्रकाशित केले होते त्यांनी सर्वांनी मिळून आजचा हा मोठा समारंभ आयोजित केला होता.

नामांकित मंडळी देखील आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होती. त्यांचा बालपणीचा मित्र जो आज राजकीय क्षेत्रातील मोठ्या हुद्द्यावर होता तो देखील जातीने उपस्थित राहून त्याच्या मित्राची कादंबरी प्रकाशित करणार होता. हा देखील आज योग जुळून आला होता. जवळ-जवळ चारशे ते साडेचारशे पानांची कादंबरी आज वाचकांच्या हातात येणार होती. वाचन कमी कमी होत असलं तरी चांगलं, सकस साहित्य वाचलं जातं हे विठ्ठल पांडुरंग कापडनेकरांनी सिद्ध करून दाखवलं होतं.

सर्व जय्यत तयारी झाली होती. साहित्य क्षेत्रातील त्यांचा प्रकाशक मित्र संकेत नाडकर्णी, ज्याने त्यांचे पहिले पुस्तक आजपासून जवळजवळ पंधरा वर्षांपूर्वी प्रकाशित केले होते, तो त्यांची प्रेक्षकांसमोर आज प्रकट मुलाखत घेणार होता. मुलाखत झाल्यावर ते वाचकांशी देखील चर्चा करणार होते. भरगच्च दोन तासांचा कार्यक्रम आयोजित केला होता पण तेव्हाच विठ्ठल पाडुरंग कापडनेकर यांच्या घरी मात्र काही वेगळंच घडत होतं. त्यांचा कोणाशी तरी खूप मोठा वाद चालू होता.
सकाळपासून विठ्ठल आनंदात होते. अर्थातच आज आनंदाचा दिवस होता पण त्यांच्या मनावर थोडंसं दडपण देखील आलं होतं. स्वाभाविक होतं म्हणा. पंचविसावं पुस्तक म्हणजे लहान-सहान सिद्धी नव्हतीच. त्यांच्या काही कथासंग्रह आणि कादंबऱ्यांचे विविध भाषेत अनुवाद देखील झाले होते. त्यांच्या दोन कादंबऱ्या इंग्रजी, जर्मनी, फ्रेंच, स्पॅनीश अशा भाषेत अनुवादित झाल्या होत्या. एका मराठी साहित्यिकाचं साहित्य जगातील विविध भाषेत अनुवादित होणं हे गौरवास्पदच होतं. सगळ्यांशी मिळून मिसळून राहणं त्यांना आवडायचं. ते तीन महिने लिहित असत. मग दोन महिने भ्रमंती करायचे. थोडे विक्षिप्तपणाने कधी कधी वागायचे. त्यांच्या लिहिण्याच्या वेळेस त्यांना कोणीही अडथळा आणला की त्यांना खूप राग येत असे. त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या नवीन कादंबरीचे कात्रण घेतले होते. ते कात्रण ते चाळत होते. अचानक त्यांना चक्कर आल्यासारखं वाटलं. सगळं गरगरतंय आपल्या अवतीभोवती असं त्यांना वाटू लागलं. छातीतून अचानक एक सौम्य कळ येऊन गेल्यासारखं वाटलं. कपाळावर थोडासा घाम देखील आला होता. त्यांनी तो रूमालानं टिपला. त्यांना श्वास घेण्यास थोडं अवघड वाटत होते. ते खूर्चीत बसले. त्यांना कुठेतरी हे अनुभवल्यासारखे वाटत होते. आत्ता झाले ते पूर्वी कधीतरी होऊन गेल्यासारखे वाटत होते. केव्हा? एकदम त्यांना आठवले. दोन वर्षांपूर्वी असेच झाले होते. तेव्हा दवाखान्यात ॲडमिट केले होते. त्यावेळी माईल्ड ॲटक होता म्हणून वाचले होते. म्हणजे आत्ता देखील माईल्ड ॲटक?…म्हणजे मृत्यू आला काय माझा? आत्ता?…ते एकदम घाबरले. त्यांनी मुलाला हाक मारली पण त्यांच्या तोंडातून एकही शब्द उमटलाच नाही. डोळे उघडून ते सर्वत्र पाहू लागले. सगळं अंधुकसं दिसत होते जणू काही… पण त्यांच्या समोरच्या खुर्चीवर कोणीतरी बसलेले त्यांना स्पष्ट दिसत होते. तो हसत होता. त्यांना आश्चर्य वाटत होते. याला मी तर ओळखत नाही. मग हा कसा काय माझ्या घरात आलाय आणि चक्क हसतोय. म्हणजे? मृत्यू आहे माझा? मला घेऊन जाण्यासाठी आला आहे? असे विचार त्यांच्या मनात येत असताना तो म्हणाला,
“विठ्ठला, तुम्ही किती विचार करता? तुम्ही समजता, जो विचार करता आहात; तोच मी आहे. माझ्याबरोबरची वेळ सगळ्यांची सुनिश्चितच असते. जन्माला येतात तेव्हाच.”

विठ्ठलांना कळून चुकले होते की हा समोर जो कोणी आहे तो खराच आहे. त्याचा आवाज त्यांना स्पष्टपणे ऐकू येत होता पण बाकीचे कोणतेही आवाज त्यांना ऐकू येत नव्हते. हा भास नव्हताच, ही एक वैचारिक पातळीवरची सवंदेना देखील असू शकते! हा समोर आहे तो आपला मृत्यू जाणतो? तो मृत्यू आहे? पण कसं शक्य आहे? मला तर कोणताही आजार नाही. मधुमेह देखील नाही. दोन वर्षांपूर्वी सौम्य हृदविकाराचा झटका आल्यानंतर मी स्वत:ला खूप बदलून घेतलं होतं. तरीही…! मरणं…!
“ते तुमचे विचार झाले विठ्ठल, माझे नाही. माझा विचार नक्कीच असतो. त्यात कोणीही ढवळाढवळ करु शकत नाही. ब्रह्मदेव देखील नाही.”
“पण म्हणजे माझ्याकडे किती वेळ आहे?”
“ते मी तुम्हाला सांगू शकत नाही.”
“सांगितलं तर बरं होईल की! हा पसारा आवरून कोणाला तरी सोपवता येईल. पुढील पिढीसाठी…!”
तो हसतो. “असा पसारा आवरून कधीच होणार नाही हो… कधी कोणाला जमला आहे का? तुमच्या मानवाच्या इच्छा नेहमी अबाधीत असतात.”

कस्तुरीगंध

“पण हे कसं शक्य आहे? मृत्यू कोणाला कधी सांगायला थोडीच येतो?”
“खरंय तुमचं! पण सगळ्यांना आम्ही सांगायला कधीच जातच नाही. संकेत मात्र देतो पण सामान्य माणूस कुठे अशा संकेतांवर विश्वास ठेवतात. त्यांना तर नेहमीच वाटतं की ते अमृत प्राशन करून आले आहेत. मग एक दिवस ते संपतात पण बुद्धिवान लोकांना सहसा असे संकेत देण्यास मी स्वत: जातो. मला आवडतं देखील!”
“आवडतं?”
“हो! कारण बुद्धिमान लोकं अशी माझ्याशी चर्चा करताना ते खरोखरच माझ्याबरोबर येण्यास तयार आहेत की नाही? ते कळतं किंवा अजून संसाराच्या मोहात अडकलेले आहेत का? ते ही कळतं! तेव्हा त्यांच्या उर्वरित राहिल्याला कामाची आठवण करून द्यायला मी जातो. त्यांनी त्यांचे ते कार्य या जन्मात पूर्ण करावे हा नियतीचाच एक भाग असतो. त्या कामापासून ते कुठे भरकटले गेलेले आढळले की आवर्जुन जातो…”
“मी तर भाषेचं, साहित्याचं कार्य करतोय. त्यावरील मोठा प्रकल्प हातात घेत आहे. त्याचीच आज घोषणा करणार आहे नं मी…! माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनाच्या समारंभात मी माझ्या पुढील पुस्तकाची घोषणा करत असतोच नं! मी… मी आज देखील करणार आहे… म्हणजे? पुढील कादंबरी पूर्ण नाही होणार? एवढाही वेळ नाही माझ्याजवळ आता?”
“असेलही… नसेलही…”
“असं कसं म्हणतो? एकीकडे तू मला घेऊ जायला आला आहेस म्हणतोस नं?”
“नाही. मी असं म्हणालोच नाही. मी तुम्हाला संकेत देण्यासाठी आलो आहे असे आधीच सांगितले.”
“म्हणजे अजून माझ्याकडे वेळ असू शकतो?”
“हो! पण तुमचा निर्णय, तुमची बुद्धिमत्ता, तुम्ही आजपर्यंत जे वागलात ते, तुमचं घर, संसार, तुमची नाती देखील सगळं-सगळं अजून संपलेलं नाही. जे आधीपासून ठरवूनच तुम्हाला पाठवण्यात येतं तसंच आहे पण कधी संपणार आहे ते मात्र तुम्हाला कळणार नाही. कोणालाच कळत नाही.”
“पण मग… मृत्युसारखी भयानक गोष्ट सांगण्यासाठी तू माझ्याकडे का आला आहेस? आणि दिवस पण असा निवडला आहेस की माझ्या कुटुंबांचा तसेच अनेक चाहत्यांचा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे तो…!”
“विठ्ठला, अरे आनंदाच्या दिवशीच तुला भेटायला आलो कारण आता मार्गस्थ होण्याची तयारी तुम्ही करावी म्हणूनच… जगताना तुम्ही कशी सगळ्या गोष्टींची तयारी करत होतात तशीच… तुम्ही तर लेखक आहात. विशिष्ट कार्यासाठी नियतीने तुम्हाला पाठवलं होतं. ते पूर्ण होण्याची वेळ झाली असावी… की अमृत घेऊन थोडीच आला आहात? तुम्हीच माझंही अस्तित्व अनेक कथांमधे दाखवत आला आहातच की, तोच मी…! मृत्यू…! तुमच्यासमोर आल्यावर एवढं विचलित का होत आहात?”
“विठ्ठल त्यांना काकुळतीला येऊन सांगत होते.”
“मी खूप मोठी कादंबरी लिहीण्यास घेतली आहे. ते कार्य तरी पूर्ण होईल का? ते कार्य अपुरे तर राहणार नाही नं!”
“हे तर सर्वांनाच वाटतं विठ्ठला, तुम्ही या शरीराचे काही वर्षांसाठीचे पाहुणे होतात हे तुम्ही विसरलात? ती वर्ष संपत आली आता… स्वत:च्या घरी जाण्याची वेळ आली आता आणि तुम्ही जे नाव कमावलं आहे ते सगळं कायम येथे अनंत काळापर्यंत राहणारच आहे. शरीर नावाचं टरफल फक्त टाकून दिलं जाणार आहे. त्याचं एवढं दु:ख विठ्ठल पांडुरंग कापडनेकर तुम्ही करताय? आश्चर्य आहे. तत्त्वज्ञान, देशप्रेम, धर्म, निष्ठा, प्रेम, नाती या विषयांवर कथा, कादंबरी लिहीणारे तुम्ही… मृत्युला घाबरलात? पाप-पुण्याचं म्हणाल तर त्याचा हिशोब लागल्यावर, जर पुन्हा मानव जातीत आलात तर नव्यानं सुरूवात करालच की…”
विठ्ठल आता अस्वस्थ झाले होते पण अस्वस्थ होऊन त्यांना चालणार नव्हते. ते हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात त्यांचा मुलगा ओमकार समांरभासाठी बोलवण्यासाठी आला. ते चपापले पण मृत्यू त्यांच्याशिवाय कोणालाच दिसणार नव्हता, हे त्यांना उमगले.
“बाबा, चला गाडी तयार आहे. सगळं व्यवस्थित होतंय… काही टेन्शन घेऊ नका. कार्यालयातून आत्ताच शिवणेकरांचा फोन येऊन गेला. जय्यत तयारी झाली आहे. जवळ-जवळ सभागृह भरले देखील आहे. बाबा, नेहमीप्रमाणे नवीन कादंबरीची घोषणा करून आजच्या भाषणाची सांगता करणार आहात नं! बाबा ऑल द बेस्ट!” ओमकार बोलत होता पण त्यांचे लक्ष त्याच्या मागे उभ्या असलेल्या त्याच्याकडे होते.
“मी येतो. तू हो पुढे” ओमकाराला त्यांनी सांगितले. ओमकार गेल्यावर तो म्हणाला,
“विठ्ठल, तुम्हाला दोन वर्षांपूर्वीच हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. तुमच्याकडे वेळ कमी आहे. जे लिहायचं आहे ते लवकर आटपून घ्या पण तुम्ही त्याच्याकडे तुमच्या सोयीप्रमाणे दुर्लक्ष केलं म्हणून आज मला जातीने तुम्हाला सांगायला यावं लागलं.”
विठ्ठल खूप सावरत होते. त्यांनी त्याला विचारलं, “ठीक आहे पण मृत्युचा नेमका महिना, वर्ष, तारीख काही सांगू शकतो? म्हणजे त्याप्रमाणे मी भाषणामधे बदल करून कादंबरीची घोषणा करू शकेन. तसेच मृत्युचं कारण कळालं तर बरं होईल.”
तो हसत हसत म्हणतो, “ब्रह्मांडातली अनेक सत्य माणसांना कशी कळणार नं! कळू शकतच नाही. तसं मृत्यू देखील आहे. त्याचं कारण देखील कसं सांगू? तुम्हीच पहा तुमच्या अनेक कथा, कादंबऱ्यात तुम्ही मृत्युला किती सहज लिहून मोकळे झाले होतात नं! तुम्हीच लिहिलंय नं! मृत्युला तर छोटं काय, मोठं काय… कारण हे महत्वाचं असतं. तसेच कोणते तरी कारण तुमचेही असू शकते. तुमचं बोटं पकडून ते मृत्युपर्यंत कसं घेऊन जायचं ते मला चांगलंच अवगत आहे.”
“पण मी चुकीचं कधी वागलोच नाही. सगळ्यांना घेऊन आजपर्यंत प्रवास केला आहे. सर्वांवर मी अतोनात प्रेम केलंय! जपलंय! माझ्या साहित्यात देखील सकारात्मकता दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.”
“पण हे तुम्हाला वाटतं. तुमच्या हातून देखील कोणीतरी दुखावलं गेलं असू शकतचं की… तुमच्या हातून देखील चुका घडल्या असू शकतात की… पण तुम्हाला नाही माहीत ते. तुम्ही जसा कोणामधे कोणाताही भेदभाव केला नाही. एका निष्ठेनी तुम्ही साहित्याची सेवा केली. साहित्य लिहिलंय. नवीन साहित्यिक निर्माण देखील केलेत त्याबद्दल तुमचे कौतुक तर सगळेच करत आहेत पण मी देखील तुमच्यामधे आणि दुसऱ्यांमधे भेदभाव करावा? ते कसं शक्य आहे? माझ्यासाठी सगळे मानवजात एकच आहे. ज्याची वेळ येते त्याचं इथलं काम संपवायचं. चला, तुमच्या समारंभाची वेळ झालीय. मी येणार आहे कार्यक्रमाला…”
ते आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात.
“कोणाला मी दिसत नसतो विठ्ठल, ज्याला संकेत द्यायचा त्यालाच फक्त दिसतो.”
“एक शेवटचं विचारू?” विठ्ठलांनी त्याला विचारलं.
“आता नको. समांरभ संपल्यावर मी बाहेर थांबेन तेव्हा बोलुयात. कार्यालयात तुमची वाट पाहत आहेत. चला. योग्य तो विचार करून कादंबरीची घोषणा करा. एकच सूचना करतो. पहा समजतयं का? पावसाळ सुरू होतोय आता, पुढील ऋतू येण्यासाठीचा अवधी अजून बराच आहे पण त्या ऋतुच्या मध्यापर्यंत आटोपतं घ्या.”
***

सभागृहात नेहमीप्रमाणे ‘मार्गस्थ’ या नवीन कादंबरीचे प्रकाशन झाले. त्यांची मुलाखत देखील झाली. नंतर पुढील कादंबरीची घोषणा करण्यासाठी विठ्ठल पांडुरंग कापडनेकर स्टेजवर उभे राहिले. सभागृह संपूर्णपणे भरलेले होते. विठ्ठलांनी डोळे भरून ते पाहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. ज्यांची शब्दांवर पकड होती त्या विठ्ठलाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तसे सभागृहात टाळ्यांचा गजर सुरू झाला. टाळ्यांच्या गजरात त्यांना उभे राहून लोकांनी दाद दिली. तसे ते सावरले आणि त्यांनी बोलण्यास सुरूवात केली. सभागृहाच्या पहिल्या रांगेत एका रिकाम्या खुर्चीत तो देखील बसला होता पण आता त्याची त्यांना भीती वाटत नव्हती.
“आज माझ्या पंचविसाव्या पुस्तकाचं प्रकाशन झाले, तो माझ्यासाठी आनंद खरोखरच अविस्मरणीय आहे. या मार्गस्थ कादंबरीची प्रकाशन पूर्व नोंदणी असंख्य प्रमाणात झाली आहे, हे आत्ताच शिवणेकरसरांनी सांगितले. ज्यांनी ज्यांनी ही नोंदणी केली आहे त्यांचा मी ऋणी तर आहेच तसेच माझ्या कादंबरीवर व साहित्यावर आपण अतोनात प्रेम करता हा आनंद जास्त आहे. अशीच माझ्या पुढील कादंबरीची घोषणा मी करणार आहे पण तत्पूर्वी एक निर्णय मी आज सांगत आहे. जो निर्णय कोणालाही माहीत नाही. माझ्या घराच्यांना देखील माहीत नाही. हा निर्णय मी सकाळपासून ते येथे येण्याच्या मार्गातच ठरवला आहे. कदाचित हा निर्णय ऐकून आपणा सर्वांना आश्चर्य वाटणार आहे तरीही कधीतरी असा निर्णय घेणे गरजेचे असते. तो निर्णय म्हणजे… पुढे येणारी माझी कादंबरी शेवटची असणार आहे. त्यानंतर मी लिहिणं थाबंवणार आहे.”
हे बोलल्यावर त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याने हसून त्यांना दाद दिली. कार्यालयात एकदम खळबळ माजली. त्यांनी बोलायचला पुन्हा सुरूवात केली तसे श्रोते बोलायचं थांबले. “या कादंबरीत मी माझं सर्वस्व पणाला लावणार आहे. खूप काही राहून गेलेल्या गोष्टी देखील यात सामावणार आहे. कदाचित या कादंबरीचा नायक तुम्हाला तुम्ही स्वत:च आहात असेही वाटेल कारण या कादंबरीचा विषय जन्म आणि मृत्युमधील प्रवासाचा आहे. जे सर्वांना अबाधित असतं, अटळ असतं. कोणालाही चुकत नाही. ज्या कादंबरीत प्रेम, नाती, संबंध याची चक्र काळाप्रमाणे कशी बदलतात, त्याला कोण कारणीभूत असतं? आपण का नियती? यावर काही वैचारिक पातळीवर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. ही कादंबरी वाचल्यावर प्रत्येकालाच आपल्या आयुष्याचा अर्थ काय हे कदाचित कळू शकेल. आपण कशासाठी आलो आहोत, हे देखील त्याला समजू शकते. ज्यामुळे आयुष्यातील संघर्ष, भेदभाव, मत्सर, द्वेष, माझं-तुझं हे सगळे विषय कमी कमी होऊ शकतात. जे आपल्याला मिळाले आहे त्यात कसे आपण आनंदाने जगू शकतो याचं मर्म देखील मी उदाहरणासकट नायकाच्या आयुष्यात आलेल्या अनेक संघर्षातून तसेच तो कसा मृत्युला आनंदाने सामोरा जातोय याचं वर्णन करणार आहे. या कादंबरीचा विशेष गाभा अर्थातच प्रेम संबंधावरच असणार आहे. ही कादंबरी माझ्या आयुष्यातील अशा व्यक्तिला समर्पित करणार आहे जी मला माझ्या आयुष्याच्या अशा वळणावर भेटली जेव्हा मी काहीच नव्हतो. आयुष्याच्या संध्याकाळाच्या उंबरठ्यावर ती मला भेटली. मी पूर्णपणे हारलो असताना. व्यवसाय, प्रेम, संसार, सर्व ठिकाणी अपयशाचं लेबल लागलेल्या माझ्या सारख्या सर्वसाधारण लेखकाला परत तिने प्रेमाने आधार दिला. माझ्या अंधारलेल्या जीवनात तिनं उजेड दाखवला… ती व्यक्ती भेटली अन्‌ आयुष्य पार बदलून गेलं. माझ्या आयुष्यात तिनं नवीन रंग भरले. मी चांगलं लिहू शकतो हा विश्वास माझ्यात निर्माण केला. माझे शब्द बहरले… आणि आज तुमच्यासमोर हा यशस्वी लेखक म्हणून उभा राहू शकलोय. ती व्यक्ती म्हणजे माझी पत्नी कावेरी होय… जिच्यामुळे माझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. आज मी जो काही आहे लेखक, व्यक्ती म्हणून तो फक्त आणि फक्त कावेरीमुळेच! ती जर भेटली नसती तर मी केव्हाच काळाच्या पडद्याआड निघून गेलो असतो.”
सभामंडपात पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला. स्टेजवर उपस्थित असलेल्या कावेरी कापडणेकर यांनी देखील सर्वांना नमस्कार करत त्यांचे अभिवादन स्वीकारले. ते पुन्हा म्हणाले, “दरवेळी मी कादंबरी कधी प्रकाशित करणार हे सांगत नसतो प्रकाशक ठरवतात परंतू या कादंबरीचं प्रकाशनही मी घोषीत करतोय. येत्या तीन महिन्यानंतरच्या शेवटच्या आठवड्यात विठ्ठल पांडुरंग कापडेनकर यांची शेवटची कादंबरी ‘रथयात्रा’ प्रकाशित होईल… जन्म-मरणाच्या या रथयात्रेत फक्त प्रेम शोधत रहा. सगळं मिळेल पण निस्वार्थ प्रेम मिळणं हे अवघड असतं. गाडी, बंगला, चैनीच्या सगळ्या गोष्टी पैशानं विकत मिळू शकतात पण प्रेम विकत नाही मिळू शकत. ते आपोआप होतं. कधीही होतं. कोणत्याही वयात होतं. प्रेमात कुठेही अटी नसतात. ज्या प्रेमात अटी आल्या तिथे प्रेम संपतं कारण अटींवर प्रेम टिकत नसतं. तेे फक्त आणि फक्त मनाने मनावर करायचं असते. याच पार्श्वभूमिवर असलेली ही कादंबरी असेल. आजच्या कार्यक्रमात माझा राजकीय मित्र देखील उपस्थित होता, ज्याच्याशी अनेक चर्चा केल्यावरच मंडप कादंबरी आपल्या हातात देण्यात मला यश आलं होतं. त्याचे मी आज आपल्या सर्वांसमोर आभार मानतो. आपण माझ्या साहित्यावर अतोनात प्रेम केलं तसेच आपल्या मातृभाषेतून तसेच विविध भाषेत प्रकाशित होणाऱ्या सर्व सकस साहित्यिकांच्या साहित्यावर देखील तेवढंच करावं, ही आज मी आपणास विनंती करतो. साहित्य वाचलं गेलं तरच ते प्रकाशित होत राहणार आहे. मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. पुन्हा भेटुयात नवीन कांदबरीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त. तोपर्यंत माझा नमस्कार स्वीकार करावा.”
हे सांगून ते निवांत बसले तसे सगळ्या सभामंडपात टाळ्यांचा पुन्हा एकदा गजर झाला. सगळ्यांना मात्र त्यांच्या अशा घोषणेची अपेक्षा मुळीच नव्हती. मीडियाशी जपूनच बोलणं करत ते घरी जाण्यासाठी निघाले. त्यांची नजर त्याला शोधत होती. तो मात्र कुठे दिसत नव्हता. सभामंडपाच्या बाहेर आल्यावर त्यांनी तो कुठे दिसतो का ते पाहिले तर तो दूर उभा असलेला दिसला. ते त्याच्याकडे जाण्यासाठी निघाले तसे त्यांना आवाज आला.
“नका येऊ…”
ते त्याच्याकडे पाहत पाहत गाडीत बसले. त्यांची पत्नी कावेरी त्यांच्या बाजुला बसली होती. तसा तो मागच्या बाजुला बसलेला त्यांना दिसला. गाडी विठ्ठल स्वत: चालवत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. त्यातच मागून त्याचा आवाज फक्त त्यांनाच ऐकू येऊ लागला.
“मी शाश्वत आहे. तुमच्याकडे योग्य वेळ येईल तेव्हा येणारच आहे. तुम्हाला दिलेला संकेत तुम्ही जाणलात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा निर्णय सांगितलात हेच खूप मोठ कार्य केलंत तुम्ही… कारण माणसाला कुठे, कधी थांबायचे हे माहीतच नसतं नं. तुम्हाला ते उमगले. तुमच्याकडे आज येण्याचं हेच मोठं कारण होते. तुमच्या मनात एक मोठे द्वंद अजून आहे. समाजातील अनेक गोष्टी तुम्हाला अस्वस्थ करत आहेत. हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. तुम्ही सर्वांवर प्रेम करता त्याचे महत्वाचं कारण तुम्ही स्वत:वर अतोनात प्रेम करता. जो स्वत:वर प्रेम करू शकतो तोच सगळ्यांना भरभरून प्रेम देऊ शकतो, हे तुम्ही जाणलंत. ते शब्दांच्या माध्यामातून तुम्ही अनेकवेळा सांगितलंय पण आता हा पसारा आवरताना सांगण्याचं धाडस तुम्हीच करू शकता. म्हणूनच मी आलो होतो. मी फक्त काही तासच तुमच्या बरोबर होतो. कादंबरीच नाव देखील तुम्ही आपली चर्चा झाल्यावर बदललंत. हे सगळं निश्चितच होतं. तुमचा आत्मविश्वास डगमगू नये म्हणूनच मी आलो. तुम्ही आजपर्यत अनेकांच्या आयुष्यात आत्मविश्वासाचे बीज रूजवले आहे. त्याप्रमाणे मी तुमच्यामधे रूजवले. तुमच्या जन्म-मृत्युची ही रथयात्रा संपवण्याआधीचे माझे हे कार्य आता संपले आहे. मी योग्य वेळ येईल तेव्हा तुम्हाला घ्यायला येईनच.”
त्यांनी त्याच्याकडे मागे वळून पाहिलं. आता त्यांना त्याची जराही भीती वाटत नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर हासू होतं. त्यांच्याही चेहऱ्यावर हसू तरळलं होतं. त्याच्या तोंडातून “तथास्तु” असा आवाज आला आणि अचानक तो दिसेनासा झाला.
त्यांच्या पत्नीला काहीच कळत नव्हते. आजच्या कार्यक्रमाबद्दल एकही चकार शब्द हे बोलत का नाही? तसेच एकदम हे हसतात काय? न राहवून तिने विचारले
“काय झाले? का हसलात? काही बोलत का नाही? बरं वाटतं आहे ना!”
“हो तर! मी एकदम ऑल राईट आहे.”
“मग एकदम अशी घोषणा का केलीत? शेवटची कादंबरी म्हणून? अशी घोषणा करण्यापूर्वी मलाही सांगावंस नाही वाटलं तुम्हाला?”
“कावेरी, कुठे तरी थांबायचं म्हणतो आता. खूप झालं. थकत चाललोय. पूर्वीसारखं लिहिणं देखील होत नाही. समाजाने आपल्याला नाकारण्यापेक्षा वेळेतच आपण थांबलेलं बरं म्हणून घोषणा केली. तुला न सांगण्यामागचे कारण म्हणजे तुला हे पटलं नसतंच कधी… हे मला माहीत होतं म्हणूनच तुला सांगितलं नाही.”
“तरीही एकदा कानावर तर घालायचं होतं.”
विठ्ठलांनी कावेरीकडे फक्त पाहिलं. ते काही बोलू शकले नाही. काय बोलणार होते ते? त्यांच्याकडे आता काहीच महिने आहेत हे तिला ते सांगू शकत नव्हतेच. तरीही तिचा मुड आणण्यासाठी त्यांनी एका दुकानासमोर गाडी थांबवली. पटक्न उतरून दुकानातून तिच्या आवडीची कॅडबरी चॉकेलट घेतली. गाडीत पुन्हा बसता बसता तिला देत म्हणाले, “हं… चुकलंच माझं… तुला तरी सांगायाला हवं होतं.”
“अहो, काय हे लहान मुलासारखं.”
“त्यात काय? कॅडबरी खायला काय वय असावं लागतं का? आणि एक विसरलीस का? आपल्या दोघांना एकत्र आणण्याचं काम या कॅडबरीनेच केलं होतं… आठवतं नं!”
“हो तर…!” कावेरीने देखील मान्य केलं. त्यांना भरून आलं होतं कारण काही महिन्यात त्यांची ताटातूट होणार होती. हे शल्य ते कावेरीला सांगू शकत नव्हते. तोंडावर हसू ठेवत ते गाडी घराकडे भरधाव पळवत म्हणाले, “काय कावेरी… कसं वाटतं एका साहित्यिकाची पत्नी म्हणून आजपर्यंत जगणं…”
ङ्ग‌‘एकदम सुंदर… मला माझं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं. देवाजवळ एकच मागणं आता… हा आपल्या दोघांचा प्रवास असाच निरंतर पुढील जन्मीदेखील राहू दे” असं म्हणून कावेरीने विठ्ठलांच्या खांद्यावर डोकं टेकवलं. ते तिच्या डोक्यावर थोपटत थोपटत म्हणाले, “तुझं मागणं तेच माझंही आहे कावेरी… देव नक्कीच तुझं ऐकणारच यात काही वाद नाही.”

– अनिल राव
बडोदा, 97144 07436

पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक २०२३

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!