शोध शिक्षणाचा : प्रस्तावना – डॉ. ह. ना. जगताप, सोलापूर

भारतात जे काही शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले त्यामध्ये जे. कृष्णमूर्ती यांचे नाव एक विचारवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून घ्यावे लागते. त्यांचे शिक्षणविषयक विचार समजून घेताना त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान देखील समजून घ्यावे लागते. शिक्षणक्षेत्रात गेली 40-50 वर्षे काम करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की, आमच्यापैकी फार थोड्या लोकांना जे. कृष्णमूर्ती समजले आहेत.

त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानासंबंधीचे ग्रंथ मराठीतून फारसे उपलब्ध नाहीत. तसेच त्यांचे तत्त्वज्ञान हे केवळ सहज वाचून समजण्यासारखे नाही तर त्यावर अत्यंत गंभीरपणे विचार केला तरच ते आपल्याला हळूहळू समजू लागते. अलीकडे सुलभीकरणाकडे सर्वांचा ओढा असल्याने गहन, गंभीर परंतु अत्यंत शाश्वत व महत्त्वपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत संदीपजींनी कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानाची व शिक्षणविषयक विचारांची ओळख त्यांच्या नेहमीच्या साध्या-सोप्या भाषेत या पुस्तकाद्वारे करून दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो व आभार मानतो.

पुस्तकाच्या अगदी सुरुवातीच्या भागातच ज्ञान म्हणजे काय याचा सविस्तर उहापोह केलेला आहे. कृष्णमूर्ती ज्ञानाचे विविध मार्ग दाखवितात. आपण मात्र केवळ भूतकालीन घटनांच्या ज्ञानालाच ज्ञान म्हणतो आहोत कवा पुस्तकात साठविलेल्या माहितीलाच ज्ञान समजून शाळा-महाविद्यालयातून अशी पुस्तके शिकवण्याचा उद्योग सुरू ठेवलेला आहे. वास्तविक ज्ञानाचा प्रस्फोट होत आहे हे म्हणतानाच हे ज्ञान मिळण्याचे देखील विविध मार्ग उपलब्ध होत आहेत याकडे आपण फार गंभीरपणे पाहत नाही हेच खरे! आपल्या आजूबाजूचा परिसर व त्यामध्ये घडणाऱ्या घटना, त्यांचे परस्पर संबंध, त्यांचे कार्यकारण भाव समजून घेणे हे देखील महत्त्वपूर्ण ज्ञान होय. याबाबत आपण फार सजग नाही. कुतुहूल व जिज्ञासा या जन्मजात प्रवृत्ती या आपसूकच ज्ञानग्रहण करण्यासाठी आपणास उद्युक्त करीत असतात परंतु असा प्रश्न पडतो की ज्ञानग्रहण तरी कशासाठी? आपण आपल्या अस्तित्वासाठी ज्ञानग्रहण करतो असे मान्य केले तर पुढचा प्रश्न असा पडतो की, आपण जगतो कशासाठी कवा आपले अस्तित्व कशासाठी आहे? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे हेच खरे ज्ञान! परंतु यांचा अर्थ मी जसा अर्थ शोधतो कवा शिक्षण घेतो तोच मार्ग योग्य असे समजणे हा अहंकार होय. या अहंकारापासून मुक्ती मिळवणे आवश्यक असते.

या संदर्भात शिक्षकाची भूमिका कोणती असावी याबाबत कृष्णमूर्ती म्हणतात, शिक्षण हा देखील समस्याग्रस्त असा विद्यार्थी असतो परंतु शिक्षक जर मी कोणी विद्यार्थ्यापेक्षा वेगळा आहे असे समजू लागले तर सारेच बिघडते. कृष्णमूर्ती म्हणतात, स्वार्थ ही आपल्या जीवनातील मूलभूत समस्या आहे. आपल्याला काहीतरी साध्य करायचे आहे ही आपली महत्त्वाकांक्षा बनते व त्यासाठी वाट्टेल त्या मार्गाने वाट्टेल तशी स्पर्धा करून ते साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी मनुष्याच्या वाटेला दुःख येण्याची शक्यता बळावते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अत्यंत ममतेने विद्यार्थ्यांच्या मनातील अहंकार दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांचा ‌‘मी‌’पणाचा प्रवास ‌‘आपण‌’कडे वळविण्याचे काम शिक्षकाला करायचे आहे. विद्यार्थ्यांच्या भावना ज्यावेळी त्यांच्या विवेकावर मात करतात कवा करू लागतात त्यावेळी अत्यंत मृदृतेने शिक्षकांनी त्यांच्या हे लक्षात आणून दिले पाहिजे.

संदीपजींनी  कृष्णमूर्तींच्या विचारांचे विवेचन करतानाच त्यावरील आपले स्वतःचे देखील भाष्य व्यक्त केले आहे. विशेषतः शिस्तीसंबंधीची कल्पना सांगताना ते म्हणतात, शिस्त म्हणजे विचार करण्याची प्रेरणा मारून टाकणे नव्हे. केवळ रूढी-परंपरांचे काटेकोरपणे पालन करणे म्हणजे शिस्त समजणे धोकादायक ठरते. शिक्षणाने आपणास काय घडवायचे आहे? आपण सध्या विशिष्ट पद्धतीने वागणारी, विशिष्ट चाकोरीतून विचार करणारी यंत्रे तर निर्माण करीत नाहीत ना? याचा गंभीरपणे विचार करायला हवा. वास्तविक शिक्षण ही एक आनंददायी प्रक्रिया आहे. विशिष्ट नियमात बांधून चाकोरीतून विशिष्ट प्रकारच्या क्रिया निर्जीवपणे करून विद्यार्थ्यांचे शिक्षण होणार नाही. कृष्णमूर्ती म्हणतात, सरकारला देखील खरी माणसे नको आहेत. त्यांना विशिष्ट कौशल्य प्राप्त केलेली यंत्रे हवी आहेत. संघटित धर्म व सरकार यांना खऱ्या माणसांचा अडथळा वाटत असतो. कृष्णमूर्तींचा हा विचार केवळ एखाद्या विशिष्ट धर्मापुरता कवा शासनापुरता मर्यादित नाही तर तो शाश्वत असणाऱ्या व्यवस्थेबाबतचा विचार आहे. याचे तपशील व विवेचन संदीपजींनी केलेले आहे.

अहिसा, शांतता व स्वातंत्र्य हीच खऱ्या अर्थाने मानव म्हणून जगण्यासाठीची आवश्यक मूल्ये आहेत. शिक्षणसंस्थांचे व्यावसायिकीकरण झाले की शिक्षणाचा मूळ उद्देशच रसातळाला जातो हे कृष्णमूर्तींचे त्यावेळचे विचार आजच्या परिस्थितीला किती चपखलपणे लागू पडतात हे नव्याने सांगायला नको. शिक्षणाच्या दर्जाच्या मापनाविषयी देखील कृष्णमूर्ती आपला आक्षेप नोंदवतात. ते म्हणतात, आपल्याकडे विविध प्रकारची विषमता आणि असमानता असताना केवळ विद्यापीठांच्या परीक्षेतील यशावरून गुणवत्ता मोजली जाते हे अयोग्य आहे. शिक्षणव्यवस्थेची  गुणवत्ता ही केवळ भौतिक सुविधा व परीक्षेतील गुण या भोवतीच घोटाळत राहते हे योग्य नव्हे. कृष्णमूर्तींच्या स्वातंत्र्य कल्पनेचा विस्तार करताना संदीपजी अगदी अलीकडील यंत्रयुगातील व संगणकयुगातील उदाहरणे देतात व खरे स्वातंत्र्य म्हणजे काय हे स्पष्ट करतात. ज्या स्वातंत्र्यात प्रेम आणि प्रज्ञांचा विचार आहे ते खरे स्वातंत्र्य. आपणास प्रज्ञेची वाट हवी असेल तर त्यासाठी सत्याची वाट धरावी लागेल. सध्याच्या स्पर्धेच्या काळात सातत्याने असे म्हटले जाते की, स्पर्धेशिवाय प्रगती होत नाही परंतु या उलट कवा या स्पर्धेबाबत कृष्णमूर्ती वेगळा विचार मांडतात. ते म्हणतात, विविध प्रकारच्या विषमतेने भरलेल्या या जगात स्पर्धा कोणी, कोणाशी व कशासाठी करायची हे निश्चित व्हायला हवे. मुळात ही स्पर्धा का करायची याचे भानही ठेवायला हवे. अन्यथा स्पर्धा हे दुःखाचे फार मोठे कारण बनण्याची शक्यता असते. शिक्षणातून आपल्याला माणूस घडवायचा आहे. शिकलेला माणूस आनंदी असायला हवा. शिक्षण हे आनंद निर्माण करण्यासाठीच असायला हवे. एकमेकांशी तुलना ही कधीच सुख, समाधान आणि आनंद देऊ शकणार नाही.

कृष्णमूर्तींच्या शिक्षणविषयक तत्त्वज्ञानाचा आढावा अत्यंत सुबोध व सुलभ भाषेत आणि मोजक्या पृष्ठांमध्ये सामावण्याचा अत्यंत अभिनंदनीय व यशस्वी प्रयत्न संदीपजींनी केला आहे. हा ग्रंथ शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने व शिक्षणप्रेमींनी अत्यंत गंभीरतेने वाचावा असा आहे. या ग्रंथनिर्मितीबद्दल त्यांचे पुनश्च: अभिनंदन!

– डॉ. ह. ना. जगताप, सोलापूर

शोध शिक्षणाचा

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा