तापी दुथडी भरून वाहत नसली तरी दोन्ही किनाऱ्याच्या मधोमध एक मोठी धार वाहत झेपावत पुढे निघाली होती. आज तिच्या काठावर अभंगाचे सूर उमटले. टाळ-मृदुंगाचा नाद घुमला. हरिनामाचा गजर झाला. हिरव्या कंच वनराईत भगव्या पताका डोलू लागल्या. आळंदीहून निघालेला वैष्णवांचा मेळा तापीच्या किनाऱ्यावर विसावला. हे पाहून तापीचा प्रवाह आनंदला! संत जनांची मांदियाळी पाहून त्या प्रवाहाचे डोळे भरून पावले. तो दिवस, हो तोच दिवस, तापी आजपावेतो कधीही विसरली नाही. विसरणारही नाही. तो दिवस होता – ‘वैशाख मासातील वैद्य दशमीचा.’
मुक्ताईचा हात धरून निवृत्तीनाथ चालत होते. मुक्ताई-निवृत्तीनाथांना मध्ये घेऊन सभोवती वैष्णव मंडळी चालली होती. टाळ-मृदुंगाचा, दड्या-पथकांचा नाद घुमत होता. वृक्षवेलींनी, फळाफुलांनी समृद्ध असलेल्या तापी किनारी मुक्ताईची उदास पावले पडली. तापी काठची शीतलताही तिच्या मनाचा दाह कमी करू शकत नव्हती. हृदयातला वनवा शमत नव्हता. निवृत्तीनाथांनी तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. जणू काही आपला हात सोडून मुक्ताई दूर कुठेतरी निघून जाईल याची त्यांना भीती वाटत होती. मुक्ताईला ते जाणवले, तशी तिने आपली जड पावले उचलत निवृत्तीनाथांकडे पाहिले व ती हसली. गूढ गूढ हसली. तिच्या त्या हसण्याने निवृत्तीनाथ चमकले. त्यांची व्याकूळता वाढली. मनाचा गाभारा रिता रिता झाल्यासारखा त्यांना वाटू लागले. क्षणभर त्यांची पावले अडखळली. त्यांना वाटले की आपल्या या लाडक्या बहिणीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला विचारावं, “मुक्ताई, अशी हसलीस का? कशासाठी?” परंतु क्षणभरच! ते पुन्हा गप्प चालू लागले, जणू या गूढ हसण्याचा त्यांना अर्थबोध झाला होता.
दादा आपण ज्ञानी आहात. ज्ञान, वैराग्य, भक्ती याचा त्रिवेणी संगम आपल्या ठायी आहे. आपण सर्व काही जाणता, मग हे अजाणतेपण कशासाठी? कुणासाठी? ही अंतरीची तळमळ का वाढली आहे? मुक्ताईच्या मनामध्ये असे भावतरंग उमटत होते.
मुक्ताईच्या मनातील या भावना निवृत्तीनाथांनाही उमगत होत्या. तरीही त्यांचे व्याकूळ मन मानत नव्हते. चित्त स्थिर होत नव्हते. आपल्या लडिवाळ बहिणीच्या डोक्यावरून हात फिरवून तेही हसले. उदास, मंदपणे हसले. आता त्यांनी मुक्ताईचा हात अधिकच घट्ट पकडला. ते मंद पावले टाकीत पुढे पुढे चालू लागले. तापी-पुर्णेचा संगम भक्तिरसात चब भिजला होता. काही भक्तमंडळींचे स्नान उरकले होते तर काहीजण अजून धारेतच उभे होते. काही वैष्णव मंडळी वृक्षांच्या सावलीत विसावून आलेला शीणवटा घालवू पाहत होते. एवढ्यात मुक्ताईसंगे निवृत्तीनाथ संगमावर आले.
“मुक्ताई, आपणही स्नान उरकून घेऊया का?”
“हो दादा, चला तर! आम्ही निघतो पुढे. तुम्ही या मागावून.”
संतमंडळीसंगे मुक्ताईच्या ‘आम्ही निघतो पुढे’ या बोलाने निवृत्तीनाथ पुन्हा चमकले. त्यांना मुक्ताईचा हात सोडवेना.
त्यांनी हलकेच मुक्ताईकडे पाहिले व तिच्या मुखावरील भाव न्याहाळत ते म्हणाले, “मुक्ता, आज सोबतच उतरू प्रवाहात.”
“दादा, असे कसे चालेल? नामदेवादी संतमंडळी मागे आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर राहा. आम्ही निघतो पुढे.”
“नाही मुक्ताई! आम्ही आमच्या हाताने अंघोळ घालणार आहोत तुम्हाला…” असे बोलता-बोलता निवृत्तीनाथांचे डोळे भरून आले. आपल्याशिवाय आपल्या या लाडक्या बहिणीला आता कोण न्हाऊ-माखू घालणार? ज्ञाना होता तोपर्यंत त्याने मुक्ताईला कशाचीही उणीव भासू दिली नाही. अगदी आईची देखील! तोच तर होता आईच्या मागे. मुक्ताईची आई ‘ज्ञानाई.’ आम्हा तिघा भावंडांची आई मुक्ताई आणि मुक्ताईची आई ज्ञानाई! तिची वेणी-फणी तोच तर करायचा. त्याने मुक्ताला कधी आईची साधीशी आठवण होऊ दिली नाही. खरेच किती मायेने तो आपल्या या लडिवाळ गोजिऱ्या बहिणीचे लाड पुरवायचा. या आठवणीत निवृत्तीनाथ हरवून गेले. निग्रही वृत्तीचे असूनही त्यांना गहिवर दाटून आला. ज्ञानदेवाच्या आठवणीने ते पुन्हा व्याकूळ झाले.
“दादा पुन्हा कुठे हरवलात?” हल्ली निवृत्तीनाथांचे भान असेच हरपून जात होते. मुक्ताईच्या प्रश्नाने ते भानावर आले.
“हं… चला तर मग” असे म्हणत बहीण-भाऊ त्या जीवनदायीनी नदीपात्रात उतरले. त्यांच्या स्पर्शाने तापी-पूर्णेच्या संगमाचे ते पात्र पवित्र झाले. पाण्याच्या शीतल स्पर्शाने दोघेही थोडेसे सावरले. निवृत्तीनाथांनी पाण्याची ओंजळ मुक्ताईच्या डोक्यावर धरली व त्या जलधारांनी तिचा अभिषेक करवीला. हे पाहून जनाबाई धावत आल्या. त्यांनीही मुक्ताईला स्नान करविले. तो मंगल स्नानाचा अनुपम सोहळा वैष्णवादी भक्तगणांनी डोळे भरून पाहिला. ते धन्य धन्य झाले. मुक्ताई कृतार्थ झाली. ती हळूवारपणे पुटपुटली,
“आता देह जावो अथवा राहो
आम्ही तो केवळ वस्तूची आहे।”
स्नान आटोपून दोघे बहीण-भाऊ आम्रवृक्षाच्या सावलीत आले. तापी तीरीचा तो आम्रवृक्ष जणू या बहीण-भावाची प्रतीक्षा करत युगानुयुगे तिथे उभा होता. त्याचा डौल ऐसपैस होता. पानाचे कवच व फळांची कुंडले तो ल्याला होता. फांद्याचा मांडव सांभाळून आपला डेरेदार देह आवरत त्याने या भावंडावर सावली धरली.
“दादा हे ठिकाण किती रम्य आहे ना?”
“होय मुक्ता, हा अवघा परिसर रम्य आणि प्रसन्न आहे.”
“हो दादा, या भूमीला अलौकिक प्रसन्नता लाभली आहे. इथे येऊन मनालाही थोडेसे प्रसन्न वाटते आहे. इथे ध्यान साधनेचा दरवळ आहे दादा!”
मुक्ताई थोडीशी सावरली आहे, तिच्या मनाची उदासी कमी झाली आहे हे पाहून निवृत्तीनाथांना समाधान वाटले.
“एखाद्या तहानलेल्या पांथस्थाची तहान भागल्यानंतर त्याला जशी प्रसन्नता लाभते, आत्मतृप्त होऊन त्याला संतोष वाटतो, अगदी तसेच वाटते आहे इथे दादा! ज्ञानदादा एकदा म्हणाला होता की मार्कंडेयाने खूप मोठी तपश्चर्या केली होती. ती इथेच केली होती ना?”
“हो मुक्ताई, इथेच! मार्कंडेयाच्या तपसाधनेने हे ठिकाण पुनीत झाले आहे” असे बोलून निवृत्तीनाथ क्षणभर शांत उभे राहिले. त्यांच्या मुखावरचे भाव झरझर बदलत गेले. दृष्टी दूरवरचा अनंतकाळ पाहू लागली. ते स्वगतच पुटपुटले. “हे पुनीत ठिकाण आता तीर्थस्थळ होईल तीर्थस्थळ!”
“दादा काय म्हणालात?”
“काही नाही मुक्ताई. मार्कंडेयाच्या तपोबलाने ही भूमी पवित्र, शुद्ध झाली आहे. महाकाल महादेवाचे चरणस्पर्श या भूमीला लाभले आणि ही भूमी समृद्ध झाली. ज्या भूमीत ऋषी मार्कंडेय चिरंजीव झाले तीच ही पुण्यभूमी! पुण्यस्थळ! म्हणूनच इथे प्रसन्न वाटते आहे.”
“दादा इथे ज्ञानाचा अमर प्रकाश आहे, ज्ञानप्रकाश!”
निवृत्तीनाथ कोमल नजरेने आपल्या बहिणीकडे पाहत होते.
“दादा हा आम्रवृक्ष पाहिलास? किती ऐसपैस आहे ना! याची सावली तर बघ, किती गडद, घनगर्द! वाटतेय इथेच विश्रांती घ्यावी.”
या शीतल छायेत, या पवित्र पावनभूमीत हिचे मन रमले आहे, ही थोडीशी सावरली आहे, येथील मुक्काम वाढवावा असा विचार मनात येताच निवृत्तीनाथ म्हणाले, “ठीक आहे मुक्ताई, इथे तुला प्रसन्न वाटत असेल तर काही दिवस थांबू आपण! इथे जवळच्या देवळात रोज हरी कीर्तन होईल, नामसंकीर्तनात दिवस कसे जातील कळणारही नाही. येथील लोकांना ही हरिकीर्तनाची गोडी चाखायला मिळेल. हे अमृतकण त्यांनाही वेचायला मिळतील. कीर्तन-प्रवचनाच्या अवीट गोडीने येथील जनसमुदाय तृप्त होईल, थांबूच आपण!”
मुक्ताई आपल्या या भावाकडे शांतपणे पाहत होती. पाहता पाहता तिचे ओठ विलग झाले. ती हसली. हलकेच, उदासपणे हसली.
“अरे हो मुक्ताई, चला तिकडे देवळात, नामदेव महाराजांनी कीर्तन आरंभलंय. बघा तर तिकडे वैष्णवजनांची कशी लगभग सुरू झाली आहे. टाळ-मृदुंगाचा नाद घुमतो आहे आणि माहिती आहे का आज ते मार्कंडेय पुराणच लावणार आहेत कीर्तनात, चला निघू आपण” असं म्हणत ते उठले.
“दादा तुम्ही चलावे पुढे, मी थांबते अजून काही वेळ इथेच.”
“मग आम्ही पण थांबतो तुमच्यासोबत!” निवृत्तीनाथ असे म्हणताच तिने मान हलवली.
“नको नको दादा, नामदेवादी समस्त संत मंडळी वाट पाहत असतील तिकडे. संतजनांना आपली वाट पाहत ताटकळत ठेवणे योग्य नाही. तुम्ही चला, मी थांबते इथेच! वृक्षाच्या या शीतल छायेत बरे वाटते आहे.”
तिच्या या बोलाने निवृत्तीनाथ निरुत्तर झाले. त्यांनी मुक्ताईच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला. तिने डोळे मिटून घेतले. त्यांच्या या हस्तस्पर्शाने तिचा क्षण शाश्वत झाला.
क्षण शाश्वत झाला!
आत्मा तृप्त तृप्त झाला!!
देह निरांजन झाला!!
आता तिने हळूवारपणे आपल्या कमळाच्या पाकळीसारखे डोळे उघडले. निवृत्तीनाथ निघाले होते. ती आपल्या भावाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ डोळे भरून पाहत राहिली. पाहता पाहता नकळत तिने हात जोडले. दुरूनच त्यांच्या पावलांचे दर्शन घेतले. त्यांना वंदन केले. निवृत्तीनाथ नजरेआड होताच मुक्ताईने त्या आम्रवृक्षावरून आपली स्निग्ध नजर फिरवली. उन्हे तापत होती. त्यामुळे नाना प्रकारची पाखरे त्या वृक्षावर विसावली होती. मधमाशांचा गुंजारव कानी पडत होता. एक धीटुकली खार या वृक्षाच्या अंगाखांद्यावर दुडदुडत होती. ती बसली होती तिथेच पलीकडे खोडाजवळ मुंग्यांचे वारूळ होते. त्या तुडतुडत वारुळातून आत बाहेर करत होत्या. इकडे तिकडे फिरत होत्या. हे पाहून मुक्ताईने पुन्हा डोळे मिटले व ती स्वगतच पुटपुटली,
“बाबा रे, केवढा तुझा हा पसारा? किती जीव तुझ्या सावलीत विसावले आहेत? हे आम्रवृक्षा, तू या सर्वांच्या विसाव्याचे ठिकाण आहेस! मलाही तुझ्याच छायेत विसावा मिळू दे बाबा!”
तिचे मन व्याकूळ व्याकूळ झाले. तिला तिच्या ज्ञानदादाच्या आठवणीने गहिवरून आले.
“आम्रवृक्षा, माझा ज्ञानदादा ही तुझ्यासारखाच विसाव्याचे स्थान होता रे माझ्यासाठी! पण आता-आता केवळ देवच माझा विसावा. तोच जिवा-शिवाचा विसावा आहे.”
मुक्ताई म्हणे देवा! तू विसावा जीव शिवा!!
आता तिच्या मिटल्या डोळ्यासमोर सगुन साजिरा ज्ञानदादा प्रकटला. त्याच्या मुखावर हास्य विलसत होते. मुखाभोवती तेजाचे वलय होते. त्याने शंख, चक्र, गदा, पद्म धारण केल्याचा तिला भास होत होता. तो आनंदघन अनुभवता अनुभवता तिच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली. पाहता-पाहता या आसवांचा ढग झाला. ढगाने ढगाला हाक दिली.
हाकेला ओ मिळाला. ढगांची गच्च दाटी झाली. आभाळ अंधारून आले. वाऱ्या-वादळाने सोबत केली. पाल्या-पाचोळ्याने फेर धरला. झाडांचे मांडव डळमळू लागले. पाखरे चिडीचूप झाली. चिमुकली खार झाडाच्या डोलीत गुडूप झाली. मुंग्यांचे वारूळ एकदमच अबोल झाले. समोरच्या देवळातील कीर्तनाचे सूर लांब कुठेतरी हरवून गेले. धुळीचे लोटच्या लोट उठले. काहीच दिसेनासे झाले. एवढ्यात ढगांच्या कप्प्यात एक वीज लख्खकन चमकून निमिशात गायब झाली. मग एका मागून एक विजांचा कडकडाट सुरू झाला. त्याने सारा परिसर हादरन, भेदरून गेला. हे अचानक काय झाले कुणालाच कळेना.
“मुक्ता, मुक्ताई…”
वादळ वाऱ्याला भेदत निवृत्तीनाथांची आर्त हाक उमटली. त्यांनी मुक्ताईच्या दिशेने धाव घेतली.
“माझी मुक्ता, माझी पोर…” म्हणतच ते मुक्ताईकडे धावत सुटले. एवढ्यात एक वीज ढगाच्या कप्प्यात कडाडली. कडेल कड कडकड करत लख्ख तेजाचा एक गोळा विद्युत गतीने धरतीकडे झेपावला. डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच आम्रपृक्षाच्या फांद्या पानांचा विस्तार ओलांडून तेजाची ती एक ज्योत मुक्ताई नावाच्या दुसऱ्या ज्योतीत विलीन झाली. ज्योतीला ज्योत मिळून ती तेजोमय झाली. ती तेजोमय ज्योत उंच उंच आकाशी उडाली. मुक्ताई मुक्त झाली. तिचा देह निरंजन झाला.
“मुक्ताऽऽ, मुक्ताई माझीऽऽ!”
निवृत्तीनाथांचा आर्त टाहो विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडात विरून गेला.
– माधव गिर,
सुप्रसिद्ध कवी आणि सूत्रसंचालक
https://shop.chaprak.com/product/sahasi-leena/
पूर्वप्रसिद्धी – साहित्य चपराक मार्च २०२४