झिपरीचा माळ – समीर गायकवाड

गावातल्या सगळ्या गल्ल्या ओलांडून डाव्या अंगाने गावाबाहेर पडलं की आमराई लागते. आमराईतून जाताना सावल्यांचा काचबंदी खेळ अंगावर झुलत राहतो. कवडशांच्या गर्दीतून अंग झटकत दोन कोस चालत गेलं की आधी केकताडांनी वेढलेला झिपरीचा माळ लागतो. दहा-बारा एकराचं हे सगळं रान सुपीक मातीचं पण इथं नांगराचा फाळ कधी लागला होता हे गावातल्या कुणालाच सांगता येत नव्हतं. काळीभोर मऊशार जमीन असल्यानं घासगवतापासून बोरी-बाभळीपर्यंतची सगळी झाडं एकमेकाच्या अंगाला खेटून पार फांदीत गळे गुतवून ताठ उभी होती. आमराईपासून नजर टाकली की हे एक जंगलच वाटे. भरीस रात्रंदिवस कानावर पडणारे पक्षांचे हरतऱ्हेचे आवाज आणि जोडीला मोकाट कुत्र्यांची ये-जा असल्यानं त्या आवाजात काहीबाही भर पडे. झुडपांच्या बेचक्यातून अलगद बाहेर येणाऱ्या साप-मुंगसाचं आणि वचू-काट्याचं भयही मोठंच होतं. गावाबाहेरील पीरसाहेबाच्या दर्ग्याकडून येणारा नागमोडी ओढा येथून पुढे उताराला लागत असल्याने उतरणीची अंगचण असलेल्या माळाच्या कडंनं बारमाही ओल असायची.

ओढ्यात असलेल्या दगड-धोंड्यांवर चढलेलं शेवाळं क्वचितच सुकलेलं दिसे. या माळाच्या चौदिशेने दगडी चळत रचलेले भराववजा बांध होते. ओढ्यातून येणारी ओल या गोलाकार बांधात पाझरलेली असल्यानं इथल्या दगडांच्या कपारीत उगवलेली केकताडं बाळसं धरलेल्या गुटगुटीत पैलवानागत बारमाही जोमात पसरलेली दिसत. आमराईच्या बाजूने येणाऱ्या वाटेने मधे लागलेला बांध टोकरून त्यात पाऊलवाट बनवलेली. माणसांनी ये-जा करून ही नागमोडी वाट एकदम पक्की केलेली. आषाढात सगळ्या माळावर चिखल असला तरी या वाटेवरनं सहज ये-जा होत राही इतकी या वाटेवरची माती टणक झालेली. गावात दिवेलागण झाली की या पायवाटेवरची ये-जा वाढलेली राही. उदबत्तीचा धूर हवेत विरत जावा तसा उजेडात अंधार मिसळत गेला की झिपरीच्या माळाबाहेर दोन-चार निलट माणसं रेंगाळताना दिसत. गावातल्या कुण्या माणसानं त्यांना हटकलं की ती खोटी खोटी हसत, उसनं अवसान आणून रामराम ठोकीत आणि पुढं निघून गेल्यासारखं करीत. मात्र विचारपूस करणाऱ्याची पाठ वळली की हे पुन्हा माघारी फिरत. डोळ्यात बोट घातल्यावर समोरचं दिसेनासं होईल असा घनगर्द अंधार पडला की मग मात्र तिथल्या वर्दळीची भीड चेपलेली राही. सपासप ढांगा टाकत केकताडं ओलांडून झिपरीच्या माळातल्या झाडाझुडपात ही माणसं दिसेनाशी होत.

झाडांच्या गर्दीतून आठ-दहा फर्लांगभर चालत गेलं की औदु पाटलाचा भग्न वाडा लागतो. चौसोपी बांधणीचा आणि भारी भक्कम दगडी चिऱ्यांचा हा वाडा आता अवशेष स्वरूपात बाकी आहे. वाड्याबाहेरच्या पडवीत दगडफुलं उगवलीत. गाजर गवतानं थैमान घातलेलं. बारा-तेरा गुंठ्याचं क्षेत्र असावं ते. वाड्याच्या भोवतालचं दगडी कुंपण ढासळून त्याचे ढिगारे झालेले. अर्धवट पडलेल्या अवस्थेतल्या मोठ्या ताशीव दगडांच्या अजस्त्र भती वाड्याच्या गतकालीन वैभवाच्या दुखऱ्या खुणा दर्शवत होत्या. वाड्याचं मजबूत आढ्याचं छप्पर कोसळून त्याची धूळधाण उडालेली. जिकडं पाहावं तिकडं नुसते दगडांचे भग्न अवशेष आणि त्यातून डोकावणारी रानटी झुडपं. भतींच्या आतल्या बाजूस असणाऱ्या देवळ्या कोळ्याच्या जाळ्यात गुरफटून गेलेल्या. त्यात कधी काळी शेकडो दिवे, पणत्या लवलवत असतील. त्यांच्या उजेडात औदु पाटलांचा वाडा झगमगून उठत असेल. खंडीभर माणसांचा राबता असेल. दुधदुभत्याने घर न्हाऊन निघत असेल. धान्यानं कणग्या खच्चून भरून गेल्या असतील. कपड्यालत्त्यांनी अलमाऱ्या भरलेल्या असतील. बत्तीस खणांचा वाडा होता तो. वाडा कसला, जणू भक्कम गढीच होती ती! मधल्या चौकाला लागून चार दिशांना लांबसडक ऐसपैस सोपे होते, त्यांच्या मागं प्रशस्त हवेशीर खोल्या होत्या. खोल्यांना शिसवी दरवाजे होते. वाड्याचं प्रवेशद्वार कलाकुसर केलेल्या भक्कम सागवानाने सजलेलं होतं. एका सोप्यावर पाळणा असायचा. कर्रकर्र आवाज करत पाळणा हलायचा आणि त्यावर बसलेले औदु पाटील मिशांना पीळ देत पानाचा विडा चघळत तृप्त नजरेने आभाळाकडं बघत हात जोडायचे. एका ओवरीवर पोत्यांची चळत लावून ठेवलेली असे. माजघरात भल्या मोठ्या चुली होत्या. पडवीतल्या वृंदावनामागं सरपणाची स्वतंत्र खोली होती. मोठाली पातेली, कढया, तांबे, चरव्या, पंचपात्रे, काटवटं, तवे, ओगराळे, पळ्या, ताटं, वाट्या, चमचे, भातवाड्या, चिमटे सगळी भांडी ढिगानं होती. फुकाऱ्यानं झालेला धूर जाण्यासाठी सवनी होती. कधी काळी घरधन्याने बारमाही दुधा-तुपात बोटं बुडवलेल्या त्या वाड्यात आता रात्री-अपरात्री येणाऱ्या लोकांनी मुताऱ्या करून ठेवलेल्या. जिकडं तिकडं कोपऱ्या-कोनाड्यात नुसता उग्र दर्प भरलेला.

वाड्यात शेकड्याने पंगती उठायच्या. काही कार्यक्रम असला की गावजेवण ठरलेलं असे. लक्ष्मी अक्षरशः पाणी भरत होती. पाणक्या दत्तूला इथं खास मान होता. तो थेट माजघरात जाऊन पाणी ओतू शकायचा कारण औदू पाटलांचा मनमिळाऊ स्वभाव. अख्खं गावच जणू त्यांचं अपत्य होतं. गावातल्या कोणत्याही माणसानं इथं येऊन आपली दाद-फिर्याद मांडावी, मग पाटलांनी त्याला न्याय द्यायचाच. कुणी इथून रिकाम्या हातानं परत गेलेलं नव्हतं. पंचक्रोशीतले अनेक निवाडे इथं झालेले. गावाच्या आडाचं पाणी कमी-जास्त झालं की वाड्यामागे असणाऱ्या दोन्ही बारवा गावासाठी खुल्या होत. वाड्यात येण्याजाण्यास कुणासही मज्जाव नव्हता की कसल्या सीमा नव्हत्या. पाटलांची कोणतीही बंधने नसूनही त्यांच्या कुटुंबकबिल्यातील बायका मात्र गोशात राहत. नाकापर्यंत खाली पदर ओढलेला राही. दागदागिन्यांनी मढलेल्या या बायका-पोरी मायाळू होत्या. त्यांच्या रूपानं अन्नपूर्णाच नांदत होती. औदु पाटलांचा हा वाडा पिढीजात होता. विशेष बाब म्हणजे गावाबाहेर होता पण गावाची शान होता. पाटलांचा वाडा गावाबाहेर कसा, यावर बऱ्याच किस्से-कहाण्या होत्या; मात्र त्या साऱ्या ऐकीव गप्पाच होत्या. आपल्या अज्ज्याने त्यांना कधी काळी मांडीवर घेऊन सांगितलेली गोष्ट असं म्हणत औदु पाटील सांगत की, कुण्या वतनदाराची ही गढी होती. त्यानं नंतर पाटलांना ही आंदण दिलेली. त्यांच्या मूळपुरूषाने या वाड्यावर जीवापाड प्रेम केलेलं. त्याला बरकत आणली. चौथाई वसूलीचं ठिकाण म्हणून कुप्रसिद्ध असलेली जागा त्यांनी हक्काच्या न्यायाच्या जागेत परावर्तित केलेली. रक्ताचं पाणी करून, काबाड कष्ट करून, अंगमेहनतीतून दौलत वाढवत नेली. शेतीवाडीचा पसारा वाढवत नेला पण कुणाची बददुवा कधी घेतली नाही. हाताची मूठ सदैव खुली ठेवली. आल्यागेल्याची दुःखे विचारली. अवघ्यांचा जीव जाणला. सगळ्यांच्या काळजाचा नेमका ठाव घेतला. अश्राप बायकापोरींना आधार दिला. ते कुणासाठी भाऊ झाले तर कुणासाठी बाप तर कुणासाठी ल्योक झाले. अनेकीचे माहेरपण त्यांनी साडीचोळी देऊन केलेलं. कोणताही सणवार आला की त्यांचा उदार हात अजूनच मोकळा होई. औदु पाटलांच्या पाचेक पिढ्याआधीची ही कथा असावी. तो वसा त्यांनी तसाच पुढे नेलेला. काळ पुढे जात गेला तशी वाड्यातली वंशावळ वाढत गेली. वाडा बायका-पोरांनी गच्च भरून गेला. त्याचं गोकुळ झालं. भाऊबंदकीचे प्रसंग आले तेव्हा पाटलांनी शेतीवाडी वाटली. जमीन-जुमला विभागून दिला पण वाड्याची वाटणी कदापिही केली नाही. पुढे जाऊन वाड्याची कळा बदलण्यास ही वृत्ती देखील कारणीभूत ठरली पण याला इलाज नव्हता कारण वाड्याची इमारतच तशी होती. गर्भातल्या अंकुरावर त्याच्या जन्माआधीपासूनच आई जीव लावत असते तसंच काहीसं त्या वाड्यात जन्माला येणाऱ्या कर्त्या पुरूषाला वाड्याबद्दल वाटे. त्यामुळे काहीही झालं तरी वाड्याची शानोशौकत कमी होणार नाही यावर भर असे. ज्या त्या पिढीतला कर्ता पुरूष हेच धोरण ठेवी. पिढी दर पिढी जमिनीचे हिस्से पडत गेले पण जे वंशज वाड्यात राहायचे. त्यांची जमीन कशी आणि किती घटत गेली हे त्यांनादेखील उमगले नाही. वाड्याला याची झळ बसणं क्रमप्राप्त होतं पण त्याहून भयानक आक्रीत वाड्याच्या नशिबी होतं. त्याचीच परिणती म्हणून आता वाड्यातल्या त्या सुखसमृद्धीची, डोळे दिपवणाऱ्या ऐश्वर्याची कोणतीच चिन्हे उरली नव्हती.
वाड्याच्या मधोमध आकाशसन्मुख असलेल्या चौकात उन्हाळ्यात महिनाभर वाळवण घालायचा कार्यक्रम चाले. तिथं आता वारूळं झालेली. तुळया आणि खांबांचे काही अवशेष बाकी होते ज्याला पाऊसपाण्याने वाळवी लागलेली. कुठं खिळे बाहेर आलेले, तर कुठं भतीत ठोकलेल्या खुंट्या बाहेर आलेल्या. लोकांनी काहीच शिल्लक ठेवलेलं नव्हतं. अलीकडच्या काळात ही असली थेरं सुरू झाल्यानं चोरा-चिलटाबरोबरच चांगली-चुंगली माणसंही तिथं यायची बंद झालेली. दोन माणसं एकत्र बसून अंघोळ करू शकतील इतकी मोठी घंघाळं वाड्यात होती. सात पोरींच्या पाठीवर झालेल्या औदु पाटलांच्या दिवट्या पोरानं परमुलुखातून नाचगाणं करणारी एक अत्यंत देखणी गोरीपान बाईल पळवून आणली. गुलाब तिचं नाव. त्याला तिच्या हवेलीचा नाद कसा लागला आणि घरात कुणालाही याची भनक लागू न देता त्यानं हे सगळं कसं निभावून नेलं हे सगळं नवलच होतं. त्यांनं घरात खोटंनाटं सांगितलं. त्यानं आणलेल्या बाईनंही त्याच्या भूलथापांना दुजोरा दिला. काही काळ औदु पाटलांच्या डोक्यात संशयाचा खोडकिडा वळवळला पण पुत्रप्रेमात आंधळ्या झालेल्या पत्नीपुढे त्यांचे काही चालले नाही. शेण झाकून ठेवले तरी त्याचा वास जात नाही तसं त्या गोष्टीचं झालं. पडवीला लागून असलेल्या खोलीत ते दोघं रात्रंदिवस एकत्र राहू लागले. कसले म्हणून खोलीबाहेर येतच नव्हते. देहाची नशा चढली होती त्यांना. एके दिवशी कहर झालेला. दोघं एकत्र घंघाळात बसून अंघोळ करताना घरातल्या चिमूरड्यांनी पाहिलं आणि ही गोष्ट कानोकानी झाली. औदु पाटलांच्या पायाखालची माती सरकली. त्यांचा संशय बळावत चालला. पोरगा जरी वाहवत गेला तरी सून अशी कशी हा प्रश्न त्यांना जाळू लागला. त्यांच्या संशय घेण्यावरून खटके उडू लागले तेव्हाच खरे तर वाड्याला मोठे तडे गेलेले. बापलेकात भांडणं होऊ लागली आणि आतल्या माणसांसह वाडा खचू लागला.

कस्तुरीगंध

या बाईची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत, असं पाटलांना वाटू लागलं पण त्याची गरज पडली नाही. एका रात्री तिच्या पहिल्या यारानं आपल्या शस्त्रसज्ज साथीदारांच्या मदतीने वाड्यावर अकस्मात हल्ला चढवला आणि कुणाला काही कळण्याच्या आधी तिला घेऊन ते पसार झाले. त्या दिवसापासून पाटलांचा पोरगा वेडापिसा झाला. आपल्या बापानेच आपल्याविरूद्ध कारस्थान रचलंय असं त्याला वाटू लागलं. बापाला धडा शिकवला पाहिजे, या भावनेनं तो पेटून उठला. त्यानं सूड उगवलादेखील पण विपरित पद्धतीनं. त्यानं गावातल्या बायकापोरींच्या अब्रूशी खेळ सुरू केला. सुरूवातीला काही प्रकरणात लोक गप्प बसले पण त्याचं धाडस वाढत चाललं तसं गाव अस्वस्थ होत गेलं. पाटलांच्या कानावर गोष्ट गेली आणि त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक भावनांचा कडेलोट झाला. दोनच दिवसात पोरगा घरातच मृतावस्थेत आढळला. घर शोककल्लोळात बुडून गेलं पण पाटलांच्या डोळ्यात टिपूस आलं नाही. गावात चर्चेला उधाण आलं. कोण काहीही म्हणू लागलं. अशा वेळेस कुणाचं तोंड धरणार? पाटलांनीच अन्नातून विष दिलं, अशी सगळीकडं वावडी उठली. ही चर्चा पाटलीणबाईच्या कानी गेली. तिने हाय खाल्ली, अंथरून धरलं. घराचे जणू दिवस बदलले. वाड्याचं दार आता बंद राहू लागलं. आतली खबरबात बाहेर येईनाशी झाली. तशातच एका धुकं भरलेल्या पहाटे पाटलीणबाईंनी जगाचा निरोप घेतला. एका पाठोपाठ एक बसत गेलेल्या धक्क्यांनी पाटील अंतर्बाह्य खचले. त्यातच भावकीने सगळी दुष्मनी काढली. पाटलांचं हुक्कापाणी आधीच बंद झालं होतं. आता अन्नावाचून वाडा तडफडू लागला होता. ही कोंडी असह्य झाली. ताठ मानेनं जगापुढे जगलेल्या पाटलांनी पोराच्या कर्तृत्वानं आधीच हाय खाल्ली होती. त्यात बदनामीचा बट्टा लागला आणि आता अन्नाला मौताज व्हायची अवस्था आलेली. ज्या गावासाठी ते देत गेले ते गावही त्यांना आता परकं झालं. स्वाभिमानाला उजवा कौल देत पाटलांनी पडवीतली विहीर जवळ केली.

पाटील गेले आणि वाड्याची उरलीसुरली रया गेली. वाडा भकास झाला. त्यांच्या भावकीनं वाडा ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केले पण निष्फळ ठरले. पाटलांच्या सात पोरी आणि जावई त्यांना पुरून उरले. अशीच बरीच वर्षे निघून गेली, मात्र या नादात वाड्याची देखभाल तटली. वाड्याचे वैभव लोप पावत गेले. वाडा उदास दिसू लागला. दिवाबत्ती बंद झाली तसे अंधाराचे साम्राज्य वाढू लागले. पाटलांच्या मुलींनी वाड्यामागच्या दोन्ही विहिरी बुजवून टाकल्या. वाड्याभोवतालच्या क्षेत्राला दगडमुरूमाचे भराव बांधले. कुणाची घुसखोरी होऊ नये म्हणून रोजंदारीनं माणसं ठेवली. पुढं जाऊन हा खर्च कोण करायचा यावरून त्यांच्यातही वाद होऊ लागले. वाड्याभोवताली झाडंझुडपं वाढू लागली तसे चोऱ्यामाऱ्या वाढू लागल्या. वाड्यातल्या वस्तूंना पाय फुटले. हळूहळू आतल्या जिनसा गायब होऊ लागल्या. शेवटी काही सामानसुमान पाटलांच्या मुलींनी आपसात वाटून घेतलं; पण आपल्या घरी जिन्नस नेणार तरी किती असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला कारण वाड्यात तितका डामडौल होता, तितक्या वस्तू होत्या. गालिच्यापासून ते तक्क्या-लोडपर्यंतच्या वस्तूही होत्या आणि शाही मीनाकाम केलेल्या पिकदाणीपासून ते अस्सल जरीच्या साड्यांचे अनेक वाण तिथं होते. या सगळ्या वस्तू पिढी दर पिढी वारसा म्हणून चालत आलेल्या. वाड्याची खऱ्या अर्थाने शान या जाम्यानिम्यातच होती. त्यामुळं या वस्तूंची नासधूस होताना पाहून, त्या चोरीस जाताना पाहून पाटलांच्या मुली हळव्या झाल्या. आता वाडा विकून तरी टाकावा कवा तो पाडून तरी टाकावा अशा निर्णयापर्यंत मुलींचे मनोबल निग्रही झाले पण हेही नियतीला मान्य नव्हते.

काही महिन्यांनी गुलाबबाई बारा तेरा वर्षाच्या मदनसोबत परत आली. तिनं दावा केला की मदन हा पाटलांचाच नातू आहे. ‘आता माझ्या कपाळाचं कुंकू नसलं म्हणून काय झालं, मला पळवून नेलं म्हणून काय झालं, माझा सगळा जीव इथंच माझ्या धन्यावरच गुंतलेला होता आणि राहील. आता माझं मरण इथंच होणार. मला आता काहीच नको, फक्त या भकास वाड्यातली एक खोली द्या‌’ असा तिने आक्रोश केला. आपल्या भावाच्या रक्ताचा वारस आला, या भाबड्या समजुतीने तिला वाड्याच्या मागील बाजूस असलेल्या पडवीलगतच्या त्यांच्याच जुन्या खोलीचा ताबा देण्यात आला. बराच काळ सगळं सुरळीत होत गेलं. बघता-बघता मदन सज्ञान झाला. त्याचं दिसणं, बोलणं-चालणं सगळं धाकट्या पाटलासारखं होतं. त्याच्या रूपड्यावर भाळून आणि गुलाबच्या वर्तनाला फसून भोवतालच्या जमीनीसह वाडा त्या पोराच्या नावावर केला आणि कर्तव्यपूर्तीच्या आनंदात पाटलांच्या मुली न्हाऊन निघाल्या! पण नंतर सत्य बाहेर आलंच. ती सगळी गुलाबची खेळी होती. तिला वाड्याच्या जागेवर कब्जा हवा होता. वाडा ताब्यात येताच तिनं असली रंग दाखवले. तिची अय्याशी तिथं सुरू झाली. तिचे यार मित्र तिथं गोळा होऊ लागले. एव्हाना वाड्यासभोवती जंगल होऊ लागलं होतं. बघता-बघता तिथं आणखी बायका बोलवल्या गेल्या आणि एकेकाळी जिथं तुळशीला पाणी देऊन मगच तहान भागवली जायची तिथं दारू वाहू लागली. नाचगाणं होऊ लागलं. या सगळ्यात गुलाबचा मुलगा आघाडीवर असायचा. आधी रात्री सुरू असलेल्या या गोष्टी दिवसाही सुरू राहू लागल्या तसं गावाचं पित्त खवळलं. एकेदिवशी पंचायत भरली. तिथं हा विषय निघाला. आपल्या वाट्याला वाडा न आल्याचं शल्य डाचणाऱ्या पाटलांच्या भावकीनं बरोबर डाव साधला. त्यांनी हवेला जोर दिला. त्या दिवशी सगळं गाव वाड्यावर चालून गेलं. जिथं अनेकांच्या पिढ्या तृप्त होत जेवल्या होत्या तिथं त्यांच्याच वारसांनी नांगर फिरवला. एका रात्रीत होत्याचं नव्हतं करून टाकलं. धुधू करून छप्पर कोसळून पडलं. भती उद्ध्वस्त झाल्या. खोल्या भुईसपाट झाल्या. सोपे खणले गेले. चौकात धुळीचे लोट उठले. पडवीत दगडांचा खच पडला. गुलाबच्या झिपरीला धरून खेचत फरफटत आणलं गेलं. जखमी अवस्थेत तिला चावडीसमोर खांबाला बांधलं. पाटलांची पूर्वपुण्याई तिथं कामाला आली. त्यांच्या घराण्याच्या नाममात्र का होईना नात्यातली असल्यानं तिचे प्राण दान केले. पुन्हा कधीही गावात न परतण्याच्या अटीवर तिला सोडून देण्यात आलं. मदनलाही सज्जड दम देऊन सोडलं. भग्न वाड्यात तो परतला. वेड्यागत तिथंच राहू लागला. तिथल्याच चीजवस्तू गोळा करून वाड्याच्या मागं काही अंतरावर त्यानं एक खोपट बांधलं. लोक म्हणायचे की, त्याला वेड लागलंय. त्याला वेड लागलं नव्हतं, त्याचं डोकं पक्कं शाबूत होतं. त्यानं जाणीवपूर्वक सगळा परिसर निर्मनुष्य होऊ दिला. सगळीकडे एक विमनस्क अरण्यछाया येऊ दिली. तो इतका एकांतात राहू लागला की गाव त्याला विसरून गेलं. मग त्यानं आपला हेतू साध्य केला. गुलाब फिकी पडावी अशी एक बाई त्यानं तिथं आणली आणि गावातल्या एकेक रंगेल माणसांना तिची चव देऊ केली. दरम्यान काळही पुढे आला. वर्षामागून वर्षे जात राहिली. वाड्याच्या मागच्या बाजूस असलेल्या खोपटाची कीर्ती सगळीकडं होत राहिली. कालांतरानं तिथं अशा बायकांची अदलाबदली होऊ लागली. हा इलाखा आता बाईलवेडासाठी नामांकित झाला होता. गुलाबच्या झिपऱ्या धरून आणलेल्या त्या माळावर झुडपांच्या बुंध्याशी बाईच्या केसांचे गुंते अजूनही सापडतात. गावानं नाव दिलेलं ‘झिपरीचा माळ‌’ नाव सार्थ झालं!

– समीर गायकवाड
सोलापूर । 9766833283

पूर्वप्रसिद्धी : ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक २०२३

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा