ना देवी, ना दासी – – हिरालाल पगडाल, संगमनेर

लाखो वर्षाच्या मानवी इतिहासाच्या वाटचालीत एक बाब स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे जगातील बहुसंख्य संस्कृतींनी स्त्रीच्या महात्म्याला दगडाच्या, मातीच्या, धातूच्या मूर्तीत बंद करून देवळात कोंडून ठेवले आहे. वास्तव जीवनात मात्र स्त्रीच्या वाट्याला पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिले आहे. तिचे जिणे पुरुषांच्या तुलनेत कष्टदायी आणि विनासन्मानाचे  आहे.

प्राचीन काळापासून भारतात स्त्री देवतेची पूजा केली जाते. तिला मातृत्वाची देवता, शक्तिची देवता म्हणून मान्यता आहे. भारतातील सर्वच राज्यात कोणत्या ना कोणत्या स्त्री देवतेची पूजा केली जाते.
भारताप्रमाणेच जगातील अनेक संस्कृतींमध्ये स्त्री देवता आढळतात. आयसिस (प्राचीन इजिप्त), सेखमेत (इजिप्त), अथेना (ग्रीस), मिनर्व्हा (रोम), आफ्रोडेइटी (ग्रीस), व्हीनस (रोम), अमातेरासु (जपान), कुआनयिन (चिन), इश्चेल (मेक्सिको) इत्यादी नावाच्या प्राचीन  देवता आढळतात. त्यांची पूजा-अर्चा केली जाते. देवघरात, मंदिरात स्त्री देवता म्हणून पुजली जात असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र जितीजागती स्त्री अन्याय, अत्याचार, विटंबना, असमानता यांची शिकार झाली आहे.
मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे, त्याचा पूर्वार्ध असा आहे
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। 
याचा अर्थ जेथे स्त्रियांची पूजा केली जाते तेथे देवता रमतात. वस्तुस्थिती मात्र त्याच्या उलट आहे. जेथे देवता पूजल्या जातात तेथेच नारी जास्त रमतात. 
मानवी विकासाच्या वाटचालीत  स्त्रीचे स्थान कायमच दुय्यम राहिले आहे. स्त्रीचे कष्टप्रद जिणे तिला कधीही चुकलेले नाही. स्त्रीला पुरेसा मानसन्मान मिळालेला नाही. ज्या वेळी माणूस टोळी अवस्थेत होता त्यावेळी टोळीतील सर्वजण मिळून शिकार  करीत असत. त्यात पुरुषांबरोबर स्त्रियांचा देखील सहभाग असे. टोळीचा सरदार हा सर्वात बलवान आणि शक्तिशाली असे. तो टोळीचे नेतृत्व करीत असे. टोळीतील सर्वांचे उदरभरण ही त्याची जबाबदारी असे. त्या अवस्थेच्या प्रारंभिक काळात टोळीतील स्त्री-पुरुषांचे लैंगिक व्यवहार मुक्त होते. त्याला नात्याची बंधने नव्हती. टोळीतील स्रियांना होणारी अपत्ये ही संपूर्ण टोळीची सामूहिक जबाबदारी होती. मातेची जबाबदारी स्तनपानाची होती. टोळीतील सर्व आबालवृद्ध, स्त्री-पुरुष मिळून बालकांचे संगोपन करीत असत.
माणसाचे पिल्लू आणि इतर प्राण्यांचे पिल्लू यात स्वावलंबी होण्याच्या बाबतीत खूप मोठा फरक आहे. चतुष्पाद प्राण्यांचे पिल्लू जन्मानंतर काही वेळातच स्वतःच्या पायांवर उभे राहते व थोड्याच दिवसात स्वतःचे स्वतः चारा-पाणी खाऊ-पिऊ लागते. माणसाचे पिल्लू मात्र जास्त दिवस आईच्या अंगावर पिते तर स्वतःच्या पायावर उभे राहायला त्याला अनेक टप्पे पार पाडावे लागतात. पालथे पडणे, रांगणे, चालणे यासाठी एका वर्षापेक्षा अधिक काळ लागतो. बाळाला अंगावर दूध पाजणे आणि बाळाचे संगोपन यासाठी स्त्रीला अधिक काळ घरात अडकून पडावे लागते.
जेव्हा टोळ्या टोळ्यात संघर्ष होत असे तेव्हा जकलेली टोळी पराभूत टोळीतील स्रियांचे अपहरण करीत असे.  जकलेल्या टोळीतील पुरुष या स्रियांना आपली मालमत्ता समजून त्यांचा भोगदासी, गुलाम यासारखा वापर करीत. या दूष्प्रवृत्तीमुळे  स्रियांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. आपल्या टोळीतील स्रिया परटोळीतील पुरुषांच्या ताब्यात सापडणार नाहीत याची जबाबदारी टोळीतील पुरुष घेऊ लागले. त्यातून स्रियांच्या  हडण्या-फिरण्यावर निर्बंध आले. स्त्री उंबऱ्याच्या आत अडकून पडली. तिची केशभूषा, वेशभूषा, आहार यावरही नियंत्रण आले. बुरखा, पडदा, पदर, घुंगट इत्यादी नावाखाली स्त्रियांना आपला देह आणि चेहरा झाकण्याचे बंधन आले.
अग्नी, चक्र आणि शेती यांचा शोध टप्प्याटप्प्याने लागला. त्यामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाला. अग्निच्या शोधामुळे मनुष्य शिजवलेले अन्न खाऊ लागला. चक्राच्या शोधामुळे त्याच्या जीवनात तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला. शेतीच्या शोधामुळे  माणसाची भटकंती कमी झाली. माणूस स्थिर झाला. कुटुंबसंस्थेचा उदय झाला. विवाहाची प्रथा सुरू झाली. विवाहित स्त्री-पुरुषांचे जोडपे हे एकमेकांना आयुष्यभर साथ देऊ लागले. अपत्यांचे पालनपोषण ही विवाहित जोडप्याची संयुक्त जबाबदारी होती. शेतीत काहींना गरजेपेक्षा जास्त तर काहींना गरजेपेक्षा कमी उत्पादन होत होते. ज्यांच्याकडे जास्त (अतिरिक्त) उत्पादन असे ते आपले अतिरिक्त उत्पादन, वस्तू कवा धान्य यांच्या मोबदल्यात दुसऱ्याला देऊ लागले. यातून वस्तू विनिमय पद्धतीचा व्यापार सुरु झाला. संपत्ती या संकल्पनेचा उदय झाला. त्यातून मालकी हक्क अधोरेखित होऊ लागला. या मालकी हक्काच्या भावनेनेच स्रियांचा खूप मोठा घात केला. काही आदीम जमाती वगळता संपूर्ण जगात पुरुषप्रधान संस्कृती विकसित झाली होती. त्यामुळे शेतीतील अतिरिक्त उत्पन्नाचा मालक देखील पुरुषच झाला. सर्व निर्णय पुरुष घेऊ लागला. स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेले. त्यातून तिच्यावर अनेक बंधने लादली गेली. जिती जागती स्त्री ‘इंसान‌’ ऐवजी ‘इस्टेट‌’ बनली.
शिकार, मासेमारी, पशूपालन, शेती  आदी व्यवसाय करताना श्रम विभागणीचे तत्त्व पुढे आले. या श्रम विभागणीतून स्त्रीच्या वाट्याला ‘चूल आणि मूल‌’ यांची अधिकची जबाबदारी आली. आजतागायत ती तशीच आहे. मालकी हक्काची भावना ही जेव्हापासून दृढ झाली, तेव्हापासून स्त्रीकडे बघण्याचा पुरुषांचा  दृष्टीकोन आपल्या मालकीची व्यक्ती, दासी अशीच झाली. स्रिया आपल्या नवऱ्याला सहजपणे मालक संबोधतात. स्त्री-पुरुष संबंधात योनीशुचिता ही अत्यंत महत्त्वाची बाब बनली. विवाहित स्त्रीने आपल्या नवऱ्याव्यतिरिक्त इतर पुरुषांशी शरीरसंबंध ठेवायचे नाहीत ही लग्नसंबंधातील सर्वात महत्त्वाची अट असते. पुरुषांवर मात्र असे कोणतेही बंधन नाही. स्त्री-पुरुषांच्या सहजीवनात स्त्रीच्या चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तिचे चारित्र्य हाच केंद्रबदू बनून जगाची वाटचाल चालू आहे. राज्य साम्राज्य, युद्ध  महायुद्ध, काव्य-महाकाव्य  यांचा केंद्रबदू स्त्रीचे चारित्र्य हाच राहिला आहे.
मानवाची वाटचाल अनेक अवस्थांमधून पुढे पुढे जात आहे. या सगळ्या वाटचालीत माणसाने जगण्याचे काही नीतिनियम बनवले. काळानुसार त्यात आवश्यक ते बदल तो करीत आला आहे. प्राचीन काळापासून जगाच्या विविध भागात विविध संस्कृती उदयाला आल्या आणि विकसित झाल्या. त्यातील काही संक्रमित झाल्या. काही  अस्ताला गेल्या. काही  नव्याने जन्माला आल्या. या सर्व संस्कृतीत स्त्रीचे स्थान सर्वसाधारणपणे दुय्यमच राहिले आहे. या सर्व संस्कृतीमध्ये स्त्रीने आपल्या पतीबरोबर एकनिष्ठ राहण्याचे बंधन कायम आहे परंतु पुरुषांनी आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावे या बंधनात सर्वत्र ढिलाई आढळते.
काही आदिम, आदिवासी जनजातीमध्ये स्त्रीसत्ताक कुटुंबपद्धती होती हे खरे आहे पण एकूण जगाच्या व्यापकतेचा विचार करता अशी स्थिती फारच नगण्य ठिकाणी होती.
भारत असो की, जगातील इतर देश… प्राचीन काळापासून आत्तापर्यंत किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र राज्यकर्ते पुरुषच राहिले आहेत. ऐतिहासिक कालखंडात काही पराक्रमी, कर्तबगार स्त्री राज्यकर्त्या होऊन गेल्या आहेत. त्यांनी जगाच्या इतिहासावर स्वतःचा ठसा देखील उमटवलेला आहे पण हजारो वर्षांच्या इतिहासात पुरुषांच्या तुलनेत स्त्री राज्यकर्त्यांची संख्या अत्यल्प आहे.
सर्वांचाच असा गैरसमज आहे की, निसर्गत: स्त्रीची शरीररचना पुरुषांच्या तुलनेत नाजूक, थोडी दुर्बल असते. प्रत्यक्षात तसे काहीही नाही. स्त्रीला मातृत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी निसर्गाने थोडी अधिकची क्षमता दिलेली आहे. तिची कंबर अधिक शक्तिशाली असते. त्यात तिच्या पोटात वाढणारा गर्भ पेलण्याची विशेष शक्ती असते. बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या शरीराची जी झीज होते ती भरून काढण्याची नैसर्गिक व्यवस्था स्त्रीच्या शरीरात असते. स्तनदा आईच्या अंगावर बाळ दूध पिते पण त्यामुळे स्त्रीच्या शरीरात कोणताही कमकुवतपणा येत नाही. स्तनदा मातेच्या शरीरात बाळाची भूक भागेल इतके दूध तयार होण्यासाठी अधिक सकस आणि पोषक आहार यांची गरज नक्कीच असते. वास्तवात असा सकस आणि पोषक आहार अनेक स्तनदा मातांना मिळत नाही. त्यातून त्या माता कृश आणि कुपोषित होतात.
निसर्गत: स्त्रीच्या शरीररचनेत पुरुषांच्या तुलनेत कोणतीही कमतरता नाही. दुर्बलता तर अजिबात नाही. तरीही स्त्रीला अबला संबोधले जाते. पुरुष तिच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे असे मानले जाते. त्यात तथ्य नाही. स्त्री-पुरूष विषमता ही मानवनिर्मित असून ती पुरुषप्रधान व्यवस्थेने केलेली पद्धतशीर लबाडी आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेने हजारो वर्षांपासून स्त्रीला समाजात, कुटुंबात दुय्यम स्थान देऊन तिचे मानसिक खच्चीकरण केलेले आहे. परिणामतः ती अबला नसतानाही स्वतःला अबला समजू लागली. या मानसिक दुर्बलतेमुळे तिला दुय्यम स्थानी ठेवण्यात पुरुषप्रधान व्यवस्था यशस्वी ठरली आहे.
भूख, भय, निद्रा, मैथुन ही सस्तन प्राण्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यापासून त्याची सुटका नाही. वंशसातत्य हे देखील जिवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक जीव आपल्या वंशाला जन्माला घालतो. माणूस हा सस्तन प्राणी आहे. तो देखील आपल्या वंशाला जन्म देतोच. आस्ट्रीयन शास्त्रज्ञ डॉ. सिग्मंड फ्राईड याने मानवी जीवनातील कामप्रेरणेचे महत्त्व मनोविश्लेषण प्रणालीद्वारे अधोरेखित केले आहे. ‘कामप्रेरणा ही नैसर्गिक गोष्ट आहे. तिचे दमन केल्यास मनोविकृती निर्माण होते‌’ हे  डॉ. सिग्मंड फ्राईडने साधार समाजापुढे आणले. ‘माणसातील कामप्रेरणेला नैसर्गिक वाट मोकळी करून दिली पाहिजे‌’ याचे त्याने ठाम प्रतिपादन केले. कबहुना मानवी वर्तन व्यवहारात ज्या अनेक समस्या निर्माण होतात त्याचे मूळ बहुदा कामजीवनात दडलेले असते असेही डॉ. सिग्मन्ट फ्राईडने सांगून ठेवले आहे.
https://shop.chaprak.com/product/watale-mala-je/
मानवी जीवनातील लैंगिक व्यवहारांचे सुयोग्य नियंत्रण ठेवण्यासाठी विवाह संस्थेने खूप मोलाची कामगिरी बजावली आहे. विवाह हाच कुटुंबपद्धती आणि समाजव्यवस्थेचा पाया आहे. कुटुंब व्यवस्थेचा सर्व डोलारा महिलेच्या त्यागावर उभा आहे. निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांना मन, बुद्धी, शक्ती जरी सारखी दिली तरी मातृत्वाची जबाबदारी फक्त स्त्रीवर सोपवली आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत गर्भसंभव टाळण्याचे तंत्रज्ञान सार्वत्रिक झालेले नव्हते. मनाविरुद्ध होत असलेली गर्भधारणा हा महिलांच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा होता. आपल्याला किती अपत्ये असावीत हे ती ठरवू शकत नसे. गर्भधारणा-बाळंतपण – स्तनपान – बाळाचे संगोपन – पुन्हा गर्भधारणा या चक्रात ती अडकून पडत असे. सर्वसाधारणपणे प्रत्येक महिला वय वर्ष १३ ते ४५  पर्यंत या चक्रात अडकलेली असे. महिला या काळात दुसरे काही कामकाज मोकळेपणाने करू शकत नसे. त्यामुळे प्रगती व संधी कुंठित होत असे. स्रियांमध्ये अनेक क्षमता असूनही बाळाचा जन्म आणि बाळाचे संगोपन यातच अडकून पडल्यामुळे या क्षमतांचा मनाजोगा वापर करण्याची संधी तिला मिळत नसे. आज मात्र परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. बाळाला जन्म द्यायचा की नाही हे  बाळाचे आईवडील सहजपणे ठरवू शकतात. गर्भनिरोधन तंत्रज्ञान ही  मानवी जीवनातील क्रांतिकारी गोष्ट आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब विवाहित जोडपे त्यांच्या इच्छेनुसार करीत आहेत. त्यामुळे  विविध क्षेत्रात महिला आपली कर्तबगारी विनाअडथळा सिद्ध करीत आहेत. अशी अनेक क्षेत्र आहेत की, जी क्षेत्रं पुरुषांची मक्तेदारी समजली जात होती. अशा अनेक क्षेत्रात आता महिलांनी शिरकाव करून आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे.
गर्भनिरोधन तंत्र जसे विकसित झाले तसे गर्भजल चिकित्सा तंत्रज्ञान देखील विकसित झाले. सोनोग्राफी तंत्र विकसित झाले. त्यामुळे स्त्रीच्या गर्भातील अर्भकाचे लगनिदान करणे सोपे झाले. हे तंत्रज्ञान मात्र स्त्रीच्या मुळावर उठले आहे. गर्भात मुलगी असेल तर गर्भपाताचे प्रमाण अधिक आहे. आईच्या पोटातच मुलीची विज्ञानाचा आधार घेऊन हत्त्या होऊ लागली. त्यामुळे समाजाचे लग गुणोत्तर बिघडले आहे. लोकसंख्येत स्रियांचे प्रमाण घटल्यामुळे समाजापुढे नवे प्रश्न उभे राहिले आहेत. पुरूष जास्त आणि स्रिया कमी यामुळे अनेक पुरुषांना विवाहासाठी स्त्री जोडीदार मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे बालिका विवाह, स्त्री अत्याचार, विनयभंग, बलात्कार यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.
‘रांधा वाढा उष्टी काढा‌’ यातच स्त्री अडकून पडली आहे. तिच्या या कामाला आर्थिक मोल नाही, प्रतिष्ठा नाही. राब राब राबूनही तिच्या कष्टाचे कोणाला कौतुक नाही. सासरी छळ, मारझोड याची ती शिकार झाल्याची उदाहरणे पावलोपावली आढळतात.
पिता रक्षति कौमारे
भर्ता रक्षति यौवने।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा 
न स्त्री स्वातन्त्र्यं अर्हति॥
हा मनुस्मृतीतील श्लोक आहे. याचा अर्थ ‘कुमारी असताना पित्याने रक्षण करावे, तरुणपणी नवऱ्याने रक्षण करावे आणि म्हातारपणी मुलांनी रक्षण करावे कारण स्रियांना स्वातंत्र्य नाही‌’.
अशा स्त्री जन्माचे कोण स्वागत करील? स्त्रीलाच स्त्री जन्म नकोसा वाटावा इतकी दारुण स्थिती आहे.
 स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
 हृदयी अमृत नयनी पाणी।
या काव्य पंक्तिमध्ये कवीने स्त्री जन्माचे अचूक वर्णन केले आहे. स्त्री जन्माचे स्वागत करायचे असेल तर स्त्रीचे जिणे सन्मानजनक होणे आवश्यक आहे.
स्त्रीच्या कर्तबगारीला पुरेसा वाव न देणाऱ्या व्यवस्थेने स्त्रीच्या रंगाला, रुपाला, दागिन्यांना, नटायला अवास्तव महत्त्व देऊन तिला शोभेची वस्तू बनवण्याचा प्रयत्न केला. स्त्री देखील या दुष्टचक्रात अडकून पडली. त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वातील खऱ्या पैलूंना वाव मिळाला नाही. तिचे दागिने हे आभूषणे नसून गुलामीची प्रतीके आहेत असा दावा स्त्रीवादी चळवळ सातत्याने करीत आली आहे.
स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांना समानतेने वागवणे ही काळाची गरज आहे. स्त्रीचे मानसिक खच्चीकरण करून तिला दुय्यमस्थानी ठेवल्यामुळे मानवी समाजाचा सर्वांगीण विकास झाला नाही. स्त्रीयांमधील क्षमतांचा कृत्रिम पद्धतीने संकोच केल्यामुळे मानवी समाजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्त्री-पुरुषांमध्ये मैत्रीपूर्ण सहसंबंध नसल्याने अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत की, ज्या स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून उचलण्याऐवजी एकटा पुरुषच उचलत आहे. त्याचा अतिरिक्त ताण, दबाव पुरुषांवर येत आहे. अशी जबाबदारी पार पाडताना अपेक्षित यश न आल्यामुळे कधी कधी पुरुष नैराश्यग्रस्त, वैफल्यग्रस्त होतात. त्यातून ते व्यसनाधीन होतात कवा आत्महत्त्येसारखा टोकाचा विचार करतात. स्त्री-पुरुष नात्यात समानता असेल, मोकळेपणा असेल तर ते दोघे मिळून सर्व आव्हाने पेलवू शकतात आणि संकटांचा एकत्रित मुकाबला करून संकटांना पळवून लावू शकतात.
आजही सार्वजनिक क्षेत्रात स्रियांचे प्रतिनिधित्व अत्यल्प आहे. त्यामुळेच सार्वजनिक निर्णय प्रक्रियेत स्रियांना तितकीशी संधी मिळताना दिसत नाही. पंचायत राज व्यवस्थेत स्रियांना निम्मे प्रतिनिधित्व दिल्यामुळे पंचायतराज व्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहेत. अनेक ठिकाणी स्रियांच्या वतीने त्यांचे पतीदेवच कारभार हाकताहेत अशा तक्रारी येत आहेत. या तक्रारीत काही प्रमाणात तथ्य असले तरी सरसकटपणे सर्वत्र अशी स्थिती नाही. अनेक महिला लोकप्रतिनिधींनी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने गावगाडा उत्तम पद्धतीने  हाकलेला आहे. आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. पुरुषांच्या तुलनेत आपण कोठेच कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे.
मानवी समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक पातळीवर स्त्री-पुरुषांमध्ये सामंजस्य आणि समन्वय हवा आहे. त्यासाठी स्त्री पुरुषांमध्ये दर्जा आणि संधीची समानता आवश्यक आहे, तरच दोघांनाही न्याय मिळेल. कोणावरही अन्याय होणार नाही. समाज पुरुषसत्ताक अथवा स्त्रीसत्ताक न राहता तो  मानवसत्ताक असला पाहिजे. त्यासाठी आपण स्त्रीपेक्षा सबळ, बुद्धिमान आणि अधिक सक्षम आहोत या चुकीच्या अहंगंडातून पुरुषांनी बाहेर यायला हवे तर आपण अबला आहोत, नाजूक आहोत, पुरुषाची दासी आहोत या न्यूनगंडातुन स्त्रीयांनी बाहेर पडायला हवे. पुरुषांचा अहंगंड आणि स्रियांचा न्यूनगंड दूर झाल्यास मानवी समाजाचे कल्याण होईल. ज्या समाजात स्त्री पुरुषांमध्ये दर्जा आणि संधीची समानता असेल तो समाज प्रचंड वेगाने प्रगती करेल यात शंका नाही. त्यासाठी स्त्रीला देवत्व अथवा दास्यत्व न देता माणूसपण बहाल केले पाहिजे. आदर्श आणि न्याय समाजनिर्मितीसाठी त्याची नितांत गरज आहे. आपण सर्व स्त्री-पुरुष मिळून अशा समाजनिर्मितीसाठी कटिबद्ध राहू या.
(हिरालाल पगडाल यांचे ‘चिन्नण्णा‌’ हे वाचनीय आत्मचरित्र ‘चपराक‌’ने प्रकाशित केले आहे.)
https://shop.chaprak.com/product/chinnanna/

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा