भव्य हिमालयाच्या पायथ्याशी घनदाट अरण्यात आपल्या ब्रह्मवीणेच्या सुरात ‘नारायण नारायण’ असं नामस्मरण करीत देवर्षी नारद मुक्त संचार करत होते. एकाएकी एका निर्दय दरडावणीने त्यांच्या अखंड नामस्मरणात खंड पडला. समोर एक क्रूर चेहर्याचा धिप्पाड दरोडेखोर हातात तळपता परशु घेऊन देवर्षींना मारण्याच्या आविर्भावात उभा होता. ‘‘थांब तिथंच. एक पाऊल जरी पुढं टाकलंस तरी तुझी खांडोळी करीन,’’ दरोडेखोरानं धमकी दिली. देवर्षींची मुद्रा शांतच. त्यांना भयाचा यत्किंचित स्पर्शही झालेला नसल्याचं जाणवत होतं. त्यांनी शांतपणे विचारलं, ‘‘कोण आहेस तू? आणि माझ्याडून काय हवंय तुला?’’
त्यांची शांतता पाहून अस्वस्थ झालेला दरोडेखोर म्हणाला, ‘‘माझं नाव वाल्या कोळी. मी लुटारू आहे. मी वाटसरूंना लुटतो आणि त्यांना ठार मारतो. एका माणसाला मारलं की, एक खडा त्या रांजणात टाकतो,’’ त्यानं बोट दाखवलं. तिथं सात रांजण ठेवलेले होते. ‘‘बघ, अशा खड्यांनी हे सात रांजण भरलेत. इतकी माणसं मारलीत मी!’’
देवर्षींनी त्याला विचारलं, ‘‘कशासाठी अशा हत्या करतोस तू? केवढं घोर पाप आहे हे, तुला ठाऊक आहे का?’’
वाल्या म्हणाला, ‘‘माझ्या पत्नीचा आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी मी हे करतो. बरं, आता तुझं थोबाड बंद कर आणि तुझ्याजवळ जे काही धन असेल ते पटकन काढून दे!’’
देवर्षींनी शांतपणे विचारलं, ‘‘माझ्याजवळ कुठलं धन? केवळ नारायण हे नाम आहे! पण काय रे… ज्यांच्यासाठी हे महाभयंकर पाप तू दररोज करतोस, ते तुझ्या पापात सहभागी आहेत का? जा बरं त्यांना विचारून ये. मी कुठंही जात नाही, इथंच थांबतो.’’ ते ऐकून वाल्यानं घराकडे धाव घेतली.
‘‘मी तुमचा सांभाळ करण्यासाठी वाटमारी करतो. वाटसरूंना लुटतो, त्यांच्या हत्या करतो. हे महाभयंकर पाप आहे. याचे तुम्हीदेखील वाटेकरी आहात ना? माझं पाप हे तुमचंही पाप आहे ना?’’ वाल्यानं घरच्यांना विचारलं.
त्याच्या पत्नीसह मुलांनी एका सुरात सांगितलं, ‘‘आमचं पालन करण्यासाठी तुम्ही धन आणता हे तुमचं कर्तच्यच आहे. पण हे धन तुम्ही कुठून आणता याच्याशी आम्हाला काहीही कर्तव्य नाही. आम्ही तुमच्या पापाचे वाटेकरी मुळीच नाही.’’
खजिल आणि निराश होऊन वाल्या कोळी देवर्षींच्या समोर उभा राहिला. पश्चात्तापानं पोळणार्या वाल्याला पाहताच देवर्षींनी सारं ओळखलं.
ते म्हणाले, ‘‘वाल्या, आजपासून हे सगळं पाप तू बंद कर! एका महान कार्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. मी सांगतो त्यानुसार नामस्मरण करत समोरच्या झाडाखाली बस.’’
वाल्याच्या मुखातून नाम उमटू लागलं, राम.. राम… राम… वैखरीचं नामस्मरण त्याचा श्वासोच्छ्वासच बनून गेला.
वाल्यानं नामस्मरण सुरू केलं. त्याला जगाचा विसर पडला. देहभान हरपून गेलं. त्याच्या देहावर वाळवीनं वारूळ केलं. बारा वर्षे लोटली. देवर्षी नारदांचं आगमन झालं. वारूळातून नाम ऐकू येत होतं… राम राम राम… नारदांनी वाल्याच्या अंगावरचं वारूळ मोडून काढलं आणि त्यांना हाक मारली, ‘‘उठा महर्षी वाल्मिकी, उठा… आता तुमचं महत्त्कार्य सुरू होण्याची वेळ आलेली आहे.’’
महर्षी वाल्मिकी भ्रमंती करत अयोध्या नगरीच्या पश्चिमेला असलेल्या वृक्षवल्लरींनी सजलेल्या तमसा नदीच्या तीरावर पोहोचले. तिथं त्यांनी आश्रम स्थापन केला. शिष्यगण जमले. एके सकाळी, सोनेरी किरणांची उधळण करीत सूर्यनारायण उगवले… महर्षींनी लेखणी उचलली… आणि भूर्जपत्रावर अक्षरे उमटली… श्रीरामायण…
**
त्रेतायुग होते ते! कोसल देशाची राजधानी अयोध्येमध्ये इक्ष्वाकू वंशाचा राजा दशरथ राज्य करीत होता. राजा दशरथ हा वेदशास्त्रसंपन्न होता. कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी ह्या आपल्या विविधगुणसंपन्न तीन भार्यांसह तो सुखानं राज्य करीत होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी-संपन्न होती. सर्व काही होतं पण एकच दुःख सर्वांच्या मनात सलत होतं. दशरथ राजाच्या एकाही राणीला अपत्य नव्हतं. राजानं आपल्या राण्या आणि मंत्रीगणांसह चर्चा करून अपत्य प्राप्तीसाठी पुत्रकामेष्ट यज्ञ करण्याचा संकल्प केला. सर्वानुमते ऋष्यशृंग ऋषींना यज्ञासाठी पाचारण करण्यात आलं. शरयू नदीच्या तीरावर यज्ञाची जय्यत तयारी करण्यात आली. वेदमंत्रांचे घोष निनादू लागले. अन्नदानापासून ते सुवर्ण दानापर्यंत अनेक प्रकारचा दानधर्म करण्यात आला. प्रजा तृप्त झाली. ऋष्यशृंग ऋषींनी यज्ञाचे पौरोहित्य स्वीकारून यज्ञाचा संकल्प सिद्धीस नेला. अश्वमेधाचा अश्व विविध राज्यांमध्ये जाऊन परत आला. यज्ञाची सांगता होण्याच्या दिवशी अग्निच्या ज्वालांमधून साक्षात अग्निदेव हाता पायसाचा कुंभ घेऊन प्रकट झाला…
‘तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहलो,
हा माझा सन्मान… दशरथा घे हे पायसदान…’ असं म्हणत पायसाचा कुंभ अग्निदेवांनी दशरथाच्या हाती दिला.
‘हे पायस भक्षण करून तुझ्या राण्या भगवान श्रीविष्णुच्या मानवी अंशांना जन्म देतील. तुला चार तेजस्वी पुत्र होतील,’ असा आशीर्वाद दिला.
कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी तिघींनीही अतीव श्रद्धेने पायसाचे भक्षण केले. काही दिवसांतच तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या… आणि एक दिवस उगवला! चैत्र मास, वसंत ऋतू, माध्यान्ह काळ, पुनर्वसू नक्षत्र, चंद्र आणि गुरू ही शुभग्रह नभांगणी लग्नस्थानी आले. महाराणी कौसल्येच्या उदरातून राम जन्माला आला. पाठोपाठ सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे पुत्र झाले. कैकयीला जो पुत्र झाला, तो भरत! अयोध्येत आनंदोत्सव साजरा झाला. राम-लक्ष्मण-शत्रुघ्न आणि भरत हे चारही राजपुत्र हळूहळू मोठे होऊ लागले. लाडाकोडात त्यांचे बालपण सरले. सर्वांना जाणवणारी एक गोष्ट – राम आणि लक्ष्मण यांचं सख्य काही विशेष होतं. तसेच भरत आणि शत्रुघ्न यांचंही!
**
वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात राजपुत्रांचं शिक्षण सुरू झालं. अनेक शास्त्रे, अस्त्रे, धनुर्विद्या ते शिकू लागले. त्याच वेळी आदिवासी निषाद देशाचा राजपुत्र गुह याच्याशी रामाची मैत्री जमली. लक्ष्मण सावलीसारखा रामासोबत असे तर भरताला शत्रुघ्नाशिवाय करमत नसे. असं असलं तरी तिन्ही भावंडांचा रामावर मात्र विलक्षण लोभ होता. राम हा तिघांचाही प्रेरक होता. चारी राजपुत्र कुमार वयाचे झाले. एव्हाना ते शस्त्रास्त्रात परंगत झाले होते.
एके दिवशी राजा दशरथ राजगुरू वसिष्ठ ऋषी आणि इतर मंत्रीगणांसह मंत्रणा करीत असताना विश्वामित्र ऋषींचं आगमन झालं. सर्वांनी आदरानं उठून विश्वामित्रांचं स्वागत केलं. क्षेमकुशल झाल्यानंतर विश्वामित्रांनी आपल्या येण्याचं प्रयोजन सांगितलं.
‘‘राजा, माझ्या यज्ञकार्यात राक्षस विघ्नं आणत आहेत. सुबाहू, मारीच, त्राटिका हे रावणाचे राक्षसगण आहेत. ते माझा कोणताही यज्ञ पूर्ण होऊ देत नाहीत. यज्ञकुंडात रक्त-मांस-अस्थि आणून टाकतात. सगळा विध्वंस करून टाकतात. मी यज्ञाचा दीक्षित असल्यामुळं त्यांना शाप देऊन भस्म करू शकत नाही. म्हणून तुझा ज्येष्ठ पुत्र राम याला राक्षसांच्या संहारासाठी माझ्यासोबत पाठव.’’
राजा दशरथ भयभीत झाला. तो म्हणाला, ‘‘महर्षी, माझा राम अजून कोवळा आहे. केवळ सोळा वर्षांचा आहे. एवढ्या महाभयंकर राक्षसांचा वध तो कसा काय करणार? त्याऐवजी मी स्वतः येतो आणि माझं सगळं सैन्य मी आपल्याला देतो.’’
यावर विश्वामित्र संतापले. ‘‘राजा, मला एकटा रामच हवा. देणार असलास तर रामच दे! आणखी कुणीही मला नको. मी निघालो.’’
वशिष्ठ ऋषींनी विश्वमित्रांना शांत केलं आणि दशरथालाही समजावून सांगितलं. ‘‘राजा, राम कोण आहे हे तुला ठाऊक नाही. त्याचा पराक्रम तुला ठाऊक नाही. निश्चिंत रहा. त्याला आणि लक्ष्मणालाही खुशाल महर्षींसमवेत पाठव.’’
आपल्या पित्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी राम आणि त्याच्या पाठोपाठ लक्ष्मण आपापलं धनुष्य आणि बाणांचा भाता घेऊन विश्वामित्रांसह निघाले. घनदाट अरण्य लागलं. जाता जाता काही ठिकाणी थांबून विश्वामित्रांनी राम-लक्ष्मणाला अनेक अस्त्रांची दीक्षा दिली. दोन्ही बंधूंनी आपल्या कुशाग्र बुद्धिनं सगळी महाविद्या ग्रहण केली.
घनदाट अरण्यात आपल्या विक्राळ रूपाची भीती दाखवत भयंकर क्रोध प्रकट करीत त्राटिका समोर आली. एका स्त्रीला कसं मारायचं? अशी शंका रामाला भेडसावू लागली पण महर्षी म्हणाले, ‘‘राम, ही स्त्री नाही, ही महाभयंकर राक्षसी आहे. खुशाल तिचा वध कर.’’
त्राटिकेनं अनेक मायावी रूपे धारण करीत भीती दाखवायला सुरुवात केली. तिनं दगडांचा आणि अनेक शस्त्रांचा मारा केला. पण अजिबात न विचलित होता रामानं धनुष्याला बाण लावला… बाणांच्या वर्षावानं तिला ठार मारून टाकलं. सारे आदिवासी आनंदून गेले. विश्वामित्रांनी त्या रात्री राम-लक्ष्मणाला आणखी अनेक अस्त्रे सोडण्याची आणि ती मागे घेण्याचीही विद्या शिकवली.
ते तिघेजण आश्रमात पोहोचले. महर्षींनी यज्ञाची तयारी केली. यज्ञ सुरू होत असताना राम-लक्ष्मणानं धनुष्ये सिद्ध केली. ते यज्ञकुंडाभोवती सतत फेर्या मारत राहिले. काही काळानं आकाशातून प्रचंड गडगडाट होऊ लागला. सुबाहू आणि मारिच ह्या राक्षसांनी यज्ञाचा विध्वंस करायला इतर राक्षसांना घेऊन जोरदार हल्ला केला. तेवढ्यात राम-लक्ष्मण यांनी बाणांचा वर्षाव सुरू केला. एका क्षणात रामाच्या बाणानं सुबाहू खाली कोसळला. अनेक अस्त्रांचे प्रयोग करून रामानं सगळी राक्षस सेना नष्ट केली. मायावी मारिचाला बाणांच्या शक्तिनं दूरवर फेकून दिलं. तो सागराच्या पार जाऊन पडला. मारिच वगळता एकही राक्षस जिवंत राहिला नाही.
विश्वामित्रांचा यज्ञ निर्विघ्नपणे संपन्न झाला. ते प्रसन्न झाले. त्यांनी राम-लक्ष्मणाला जवळ बोलावून कथन केलं, हे महापराक्रमी राजपुत्रांनो, मिथिला राज्याचे महाराज जनक यांनी एक महायज्ञ करून शिवशंकराला प्रसन्न करून घेतलं. शंकरानं त्यांना प्रसाद म्हणून एक प्रचंड धनुष्य बहाल केलं. त्याचं नाव सुनाभ आहे पण ते शिवधनुष्य म्हणूनच ओळखलं जातं. हे अवजड धनुष्य देव-दानव-मानवांपैकी कुणीही उचलू शकलेले नाहीत. आता जनक महाराजांनी एक यज्ञ आरंभलेला आहे. त्या यज्ञाला आपण जाऊ या आणि त्या महाप्रचंड शिवधनुष्याचंही दर्शन घेऊ या. महर्षी विश्वामित्रांनी राम-लक्ष्मण आणि इतर ऋषीगणांसह मिथिलेला प्रस्थान केलं.
चालता चालता एक उजाड झालेला आश्रम दिसला. विश्वामित्रांनी त्या आश्रमाकडे बोट दाखवून सांगितलं, ‘‘हे राम, ह्या आश्रमात महान तपोनिधी गौतम ऋषी आपली अतीव सुंदर भार्या अहल्या हिच्यासोबत राहत होते. अहल्येच्या रूपाची कमालीची भुरळ पडलेल्या इंद्रदेवाने गौतम ऋषी आश्रमाच्या बाहेर गेल्याची संधी साधून त्यांचेच रूप धारण करून अहल्येचा उपभोग घेतला. हा इंद्र आहे हे जाणूनसुद्धा अहल्या त्याच्याशी रममाण झाली. गौतमांना हे सारं अंतर्ज्ञानानं समजलं. त्यांनी देवेंद्राला आणि अहल्येलाही शाप दिला. त्या शापाने इंद्र पौरुषहीन झाला आणि अहल्या या ठिकाणी शिळा होऊन पडली. अहल्येनं गौतम ऋषींची क्षमा मागितली.’’
‘‘मग गौतम ऋषींनी अहल्येला क्षमा केली?’’
‘‘सांगतो, ऐक रामा, गौतमांनी अहल्येला अशा उःशाप दिला की, एके दिवशी कौसल्यानंदन राम आश्रमात येईल. त्याच्या पदस्पर्शानं तू पुन्हा मूळ रूपात येशील. त्याच वेळी आपणही परत येऊ, असा उःशाप देऊन ऋषी हिमालयात निघून गेले. चल, आता पुढे हो आणि शिळेला पाय लाव.’’
रामानं विश्वामित्रांना वंदन केलं आणि शिळेला स्पर्श पदस्पर्श केला. प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शानं अहल्या मूळ रूपात प्रकट झाली. तिनं राम-लक्ष्मण आणि विश्वामित्रांना प्रणाम केला. तेवढ्यात गौतम ऋषीही तिथं आले. ते अहल्येसह हिमालयात निघून गेले.
मजल दरमजल करीत, सार्या वनराईचं सौंदर्य न्याहाळत राम-लक्ष्मण विश्वामित्रांसह मिथिलेला पोहोचले. मिथिला नगरीत महाराज जनकांनी विश्वामित्र आणि राम-लक्ष्मणासह सर्वांचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं. मिथिला नरेशांनी एका महायज्ञाचं आयोजन केलं होतं. त्यांनी महर्षी आणि राजपुत्रांना यज्ञाच्या पूर्णाहुतीपर्यंत वास्तव्य करण्याची विनंती केली.
महाराजा जनक हे जमीन नांगरत असता जमिनीमध्ये त्यांना कन्या सापडली. हीच भूमीकन्या सीता होय. ह्या अतिशय सुलक्षणी, सुंदर, विद्यावान कन्या सीतेसाठी पराक्रमी आणि सुयोग्य वराचा शोध जनक महाराज घेत होते. शंकराचे महान धनुष्य जो कोणी उचलून त्याला प्रत्यंचा जोडेल, त्यालाच सीता वरमाला अर्पण करणार होती. सीतेचं हे स्वयंवर जनकांनी आयोजित केलं होतं पण एकाही राजकुमाराला हे शिवधनुष्य धड उचलताही आलं नाही. मग महर्षी विश्वामित्रांनी रामाला आज्ञा केली. रामानं महर्षींना वंदन केलं, शिवधनुष्याला वंदन केलं. नम्रपणे ते उचललं आणि त्याला प्रत्यंचा लावली. त्याचक्षणी कडाकड असा प्रचंड ध्वनी करत ते विराट धनुष्य मोडून पडलं. सलज्ज सस्मित वदनानं सीतेनं रामाला वरमाला घातली. जनक महाराजांना अत्यानंद झाला. सीतेची बहीण उर्मिला हिनं लक्ष्मणाला वरमाला घातली. महान रघुकुलाशी नातेसंबंध प्रस्थापित झाल्याचा आनंद जनकाच्या हृदयात सामावत नव्हता. त्यानं वेगवान रथातून अमात्य आणि सचिवांना अयोध्येला पाठवलं. अयोध्येत आनंदीआनंद पसरला. दशरथांसह कौसल्या, सुमित्रा आणि कैकयीलाही अपार आनंद झाला. राजा दशरथ सारा राजपरिवार आणि विपुल धन घेऊन सेनेसह मिथिलेला निघाला.
जनकाचा भ्राता कुशध्वज हा कांकाश्या नगरीत राहत होता. जनकानं त्याला त्याच्या दोन कन्या आणि राज परिवारासह पाचारण केलं. मिथिला नगरीत राम-सीता, लक्ष्मण-उर्मिला यांच्यासह कुशध्वजाची कन्या मांडवी हिचा भरताशी आणि श्रुतकीर्ती हिचा विवाह शत्रुघ्न याच्याशी मोठ्या थाटात लावून देण्यात आला. मोठा समारंभ करण्यात आला. पंचपक्वान्नाच्या भोजनासह नृत्य-गायनाचा आनंदही सार्या नगरवासीयांनी लुटला. आपले चारही पुत्र, चार सुना, राण्या आणि सारा राजपरिवार घेऊन दशरथ मोठ्या आनंदाने अयोध्येला परतत असता साक्षात जमदग्नी-रेणुकेचा पुत्र परशुराम सार्या लवाजम्यासमोर प्रकट झाला. संतापलेल्या परशुरामानं विचारलं, ‘‘शिवधनुष्य मोडणारा दशरथपुत्र राम कोण आहे?’’
रामानं पुढे होऊन परशुरामाला अभिवादन केलं. परशुराम म्हणाला, ‘‘रामा, शिवधनुष्याचा भंग करून मोठा पराक्रम केला, असं तुला वाटत असेल तर ते विसरून जा. तुझ्यात सामर्थ्य असेल तर हे विष्णुधनुष्य हातात घेऊन त्याला बाण जोडून दाखव.’’
रामाने त्यांना वंदन करून विष्णुधनुष्य लीलया पेललं. प्रत्यंचा जोडून बाणही लावला. तेव्हा परशुरामाचा अहंकार उतरला पण राम काहीशा कठोर स्वरात म्हणाला, ‘‘हे जमदग्नीपुत्र, माझा बाण कधीही वाया जात नाही! पण हा माझा बाण तुमच्यावर सोडून तुम्हाला मारण्याची माझी इच्छा नाही. हा बाण कुठं सोडू हे मला सांगा.’’
त्यावर परशुरामांनी आपण निर्माण केलेल्या पुण्यलोकावर बाण सोडून ते नष्ट करायला सांगितलं. रामानं ते लोक नष्ट करून परशुरामाचं गर्वहरण केलं.
**
लवाजमा अयोध्येला परतला. कैकयीचा भाऊ श्रीराम आता राज्यकारभार जाणून घ्यायला लागला. दशरथ आणि मंत्रिगणांसह मंत्रणा करायला लागला. गुन्हेगारांना शिक्षा आणि राजनिष्ठांचा सन्मान करण्यात सहभाग घ्यायला लागला.
आता अयोध्येत सर्वत्र चर्चा सुरू झाली, ती श्रीरामाच्या यौवराज्याभिषेकाची. सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली. कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी यांच्या आनंदाला उधाण आलं. पण तेवढ्यात… कैकयीची दुष्ट दासी तिच्या कानाशी लागली… ‘‘अगं, किती भोळी आहेस तू? रामाचा राज्याभिषेक मग तुझ्या भरताचं काय?’’
हे ऐकून कैकयी विस्मयचकितच झाली. राम हा सर्वांनाच प्रिय होता. त्या राज्याभिषेकावर कुणीही प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं नव्हतं. ते दुस्साहस मंथरा दासीनं केलं. राम आणि भरत यांच्यात कैकयी याआधी तुलना करत नव्हती. तिची रामावर निरतिशय माया होती.
पण आता मात्र मंथरेच्या बोलण्याचा कैकयीवर लागलीच परिणाम झाला. तिची दुष्ट बुद्धी जागी झाली. मंथरा म्हणाली, ‘‘भरत इतक्या दूर गेल्याची संधी पाहूनच रामाला राज्याचा लोभ सुटलेला आहे. रामाला राज्याभिषेक हे भरताविरुद्ध केलेलं कारस्थान आहे. म्हणूनच कैकयी, तुला महाराजांनी पूर्वी दोन वर दिलेले आहेत. त्यांचा आत्ताच उपयोग कर. एका वरानं भरताला राज्याभिषेक आणि दुसर्या वराने रामाला चौदा वर्षांचा वनवास मागून घे.’’
पूर्वी देव आणि दानवांच्या एका घनघोर संग्रामात दशरथ राजा देवांच्या साहाय्यार्थ गेला होता. दानवांच्या मायावी सामर्थ्यानं दशरथ राजा बेशुद्ध पडला. तेव्हा कैकयीनं त्याचा रथ दूर घेऊन जाऊन त्याचे प्राण वाचवले. कैकयीच्या ह्या पराक्रमानं दशरथ राजाला परम संतोष झाला. त्यानं त्या आनंदात कैकयीला दोन वर मागून घ्यायला सांगितलं. तेव्हा ते वर न मागता ‘‘नाथ, माझ्या इच्छेनुसार योग्य वेळी हे दोन वर मी मागून घेईन,’’ असं कैकयी म्हणाली.
त्या वरदानाचं आता कैकयीला स्मरण झालं. रामाच्या यौवराज्याभिषेकाची तयारी पूर्ण होत आली होती. तेवढ्यात कैकयी कोपगृहात गेली. कोणालाही क्रोध आल्यानंतर त्या कोपगृहात गेल्यावर इतर सर्वांना काहीतरी अघटित घडत असल्याची माहिती मिळे. कैकयी कोपगृहात गेल्यावर मोठ्या चिंतेनं ग्रासलेले दशरथ महाराज त्वरेने कोपगृहात गेले.
‘‘कैकयी राणी, सांग तुला क्रोध का आलाय? कुणी काही बोललं का तुला?’’
कैकयी म्हणाली, ‘‘नाथ, आपण मला देव-दानव युद्धाच्या वेळी देऊ केलेले दोन वर आता मागत आहे. द्याल ना?’’
दशरथ म्हणाला, ‘‘प्रिये, माझे प्राण मागितलेस तरी मी तुला देईन. मी वचनबद्ध आहे, माग जे मागायचं आहे, ते माग.’’
‘‘नाथ, माझा पहिला वर मागते, हा यौवराज्याभिषेक रामाऐवजी माझ्या भरताला केला जावा आणि दुसरा वर असा की, रामाला चौदा वर्षे वनवासाला पाठवलं जावं.’’
**
दशरथावर जणू वीजच कोसळून पडली. तो निश्चेष्ट पडला. भानावर आला, तेव्हा पूर्ण हताश आणि हतबल झाला होता! पण दिलेल्या वचनाला तो बांधील होता. म्हणून श्रीरामाला चौदा वर्षं वनवासाला पाठवण्याचा निर्णय त्यानं जाहीर केला. श्रीरामानं पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानली. आपला राजवेष उतरवून ठेवून त्यानं तापसाचा साधा वेष परिधान केला पण कैकयी आणि दशरथांचा हा निर्णय ऐकून बंधू लक्ष्मणाच्या डोळ्यांतून ठिणग्या पडायला लागल्या. तो क्रोधानं खड्ग उपसून रामाची आज्ञा घ्यायला गेला. दशरथासह कैकयीला कारावासात टाकायला तो धावून गेला पण श्रीरामानं त्याला आवर घातला. ‘‘बाळ लक्ष्मणा, क्रोध आवर. मातापित्यांना कारावासात डांबून आपण कोणता आदर्श प्रजाजनांसमोर ठेवणार आहोत? राजसत्तेच्या हव्यासानं हे कृत्य आपण करायचं नाही.’’
क्षणाचाही विलंब न करता राज्याचा त्याग करून, पिता दशरथ आणि तिन्ही मातांचा निरोप घेऊन श्रीराम बाहेर पडला आणि त्याच्या पाठोपाठ सीता आणि त्याची जणू सावलीच, असा तो लक्ष्मणही बाहेर पडला. तिघेही राजप्रासादाच्या बाहेर पडले. तापसवेष धारण केलेले राम-लक्ष्मण-सीता रथात बसले. सारी प्रजा शोकाकुल झाली. ते घोषणा करायला लागले. ‘रामच आमचा राजा आहे. आणखी कोणीही आमचा राजा असणार नाही…’ पण श्रीरामाचा निश्चय ढळला नाही. त्यानं सुमंताला रथ सीमेपार न्यायला लावला. अखेर ते गंगेतीरी पोहोचले. निषाद देशाचा राजा श्रीरामांचा मित्र गुह तिथं आला. त्यानं ती रात्र व्यतीत करण्याची तयारी केली.
गुहाने सकाळी उठून राम, सीता, लक्ष्मण यांच्यासाठी एक नौका सिद्ध केली. त्या नौकेतून त्यांना गंगेच्या पैलतीरी नेऊन सोडलं. तिघांनी गुहाचा निरोप घेतला आणि अरण्याची वाट ते तुडवू लागले. अरण्यात त्यांनी भरद्वाज ऋषींची भेट घेतली. पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेऊन ते चित्रकूट पर्वताकडे निघाले. रम्य वनराईचा आनंद घेत त्यांनी वनवासाला आरंभ केला.
इकडे राम राम, असा विलाप करीत दशरथाला पुन्हा ग्लानी आली. त्यानं शोकावेगानं आपला प्राणत्याग केला. कौसल्येनं भरत आणि शत्रुघ्नाला मामाच्या राज्यातून बोलावून आणण्यासाठी रथ पाठवला. भरत-शत्रुघ्न आले. शोककळा पसरलेल्या अयोध्येत प्रवेश करतानाच भरताला अशुभाची चाहूल लागली. राजप्रासादात पोहोचताच त्याला सगळा वृत्तांत समजला. आपल्या मातेने केलेले कारस्थान ऐकताच त्याला शोक अनावर झाला, तसेच त्याचा संतापही आला. पिता दशरथावर अंत्यसंस्कार करून भरतानं रथ सज्ज केला आणि रामाला परत आणण्यासाठी तो सैन्य घेऊन वायुवेगानं निघाला. आपल्या तिन्ही मातांनाही त्यानं सोबत घेतलं.
भरतानं रामाच्या शोधार्थ अरण्यात प्रवेश केला. त्यानं भरद्वाज ऋषींचं दर्शन घेतलं. त्यांनी भरताला श्रीराम, सीता आणि लक्ष्मण चित्रकूट पर्वतावर वास्तव्य करीत असल्याचं सांगितलं. त्यांचा निरोप घेऊन भरत लवाजम्यासह चित्रकूट पर्वताकडे निघाला.
इकडे लक्ष्मणाला लांबून उडणारे धुळीचे लोट दिसल्यावर त्याच्या मनात शंकेचे काहूर उठले. भरत सैन्य घेऊन येत आहे, याचा अर्थ आपल्याशी युद्ध करून रामाला मारण्यासाठीच येत आहे, असं त्याला वाटायला लागलं. तो श्रीरामाला म्हणाला, ‘‘दादा, भरत आपल्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे. आपण वहिनींना घेऊन आश्रमात जा. मी एकटा सगळ्या सैन्यासह भरताचा समाचार घेतो. आपला मार्ग निष्कंटक करतो.’’
श्रीरामानं लक्ष्मणाला शांत केलं. ‘‘लक्ष्मणा, बांधवांना मारून मला राज्य नको. तू क्रोध आवर, शांत हो. भरत आपल्याला परत घेऊन जाण्यासाठी येत असावा.’’
काही वेळातच भरत आश्रमात पोहोचला. त्यानं श्रीरामाच्या चरणी लोळण घातली. श्रीरामाला सार्या गोष्टी समजल्या. त्यानं आपल्या पित्याला आदरांजली अर्पण केली. मातांचे पाय धरले. त्यांचं सांत्वन केलं. कैकयीनं क्षमायाचना केली पण श्रीरामाने तिला दोष दिला नाही. ‘‘माते, हे असं घडणार हे विधिलिखित होतं. तू त्यासाठी स्वतःला दोषी समजू नकोस!’’
अयोध्येला परत चलण्याची भरताची विनंती श्रीरामानं मानली नाही. राज्य त्याच्याच ओटीत घातलं. अखेर भरत म्हणाला, ‘‘दादा, अयोध्येचे राज्य आपलेच आहे. त्याचे अधिपती आपणच आहात. मला आपल्या पादुका द्या
. त्या
पादुका सिंहासनावर ठेवून मी राज्यकारभार चालवतो. रामराज्य चालवतो. आपले आशीर्वाद असू द्या!’’
श्रीरामानं आपल्या पादुका भरताला दिल्या. त्यानं त्या मस्तकावर ठेवल्या आणि सद्गदित मनानं तो परिवारासह अरण्यातून माघारी गेला. अयोध्येला आल्यावर सिंहासनावर श्रीरामांच्या पादुका ठेवून त्यानं एक विश्वस्त म्हणून, रामाचा सेवक म्हणून राज्यकारभार सुरू केला. न्यायाचं राज्य सुरू केलं. शत्रुघ्नाची चांगली साथ त्याला लाभली होती.
**
त्यानंतर श्रीरामांनी ते अरण्य सोडण्याचा निर्णय घेतला. चित्रकूट पर्वतापासून दक्षिण दिशेला तिघेही निघाले. छोटी छोटी गावे, विविध प्राणी, वनचर पाहत पाहत ते अत्रि ऋषींच्या आश्रमात पोहोचले. तिथे परम पतिव्रता सात्विक, सुंदर, तेजस्वी अनसूयेनं त्यांचं स्वागत केलं. सीतेला जवळ घेऊन तिचं अवघ्राण केलं. वनवासात त्रास होऊ नये म्हणून दिव्य नंदनाची उटी आणि पुष्पमाला सीतेला दिली. काही अलंकार सीतेच्या सर्वांगावर घातले. सीते, ह्या अलंकारांचा तुला भविष्यात उपयोग होणार आहे, असं अनसूया म्हणाली. अत्रि ऋषी आणि माता अनसूयेचा आशीर्वाद घेऊन तिघेजण दंडकारण्याकडे निघाले.
दंडकारण्यात प्रवेश करताच अकराळविकराळ अशा विराध राक्षसानं त्यांच्यावर हल्ला केला. श्रीरामानं त्याचा वध करताच त्याच्यातनू तुंबरू नावाचा शापित गंधर्व प्रकट झाला. त्याला वैश्रवण कुबेराच्या शापामुळं राक्षसाचा देह मिळाला होता. राक्षसाच्या देहातून सुटका होताच त्यानं श्रीरामाला वंदन करून तो आपल्या लोकी रवाना झाला.
**
दंडकारण्यात श्रीराम, सीता, लक्ष्मण यांची मार्गक्रमणा सुरू होती. ऋषी-मुनींच्या भेटीचा आनंद त्यांना मिळत होता. अनेक कठोर तापसांचा सहवास त्यांना लाभत होता. सुतीक्ष्ण ऋषींची भेट झाल्यावर त्यांनी अगस्त्य ऋषींच्या आश्रमाचा मार्ग दाखवला. अगस्त्य ऋषींची भेट होताच सर्वांनाच मोठा आनंद झाला. ऋषिवर्यांनी सर्वांचं प्रेमभरानं स्वागत केलं. काही दिवस अगस्त्यांच्या आश्रमात वास्तव्य करून श्रीराम बाहेर पडले. अगस्त्य ऋषींनी श्रीरामाला वैष्णव धनुष्य आणि अक्षय बाणांचे दोन भाते भेट दिले. त्या भात्यांमधील बाण कधीच संपत नसत. त्यांचा स्वीकार करून ते पंचवटीच्या दिशेने निघाले.
अनेकविध औषधी वृक्षांनी, हिरवळीनं आणि सुंदर जलाशयांनी पंचवटी सजली होती. राम-लक्ष्मणांनी स्फटिकासारख्या स्वच्छ जलाशयाच्या काठी कुटी उभी केली. तिथं अतिशय आनंदात ते दिवस व्यतीत करीत होते. फळं, कंदमुळं यांचा आहार सेवन करून त्यांची क्षुधा भागत असे.
एके दिवशी एक अतिशय सुंदर रमणी त्या परिसरात आली. ती होती लंकेचा राजा रावण याची बहीण. एक मायावी राक्षसीण.
श्रीराम आणि लक्ष्मण यांचं रूप पाहून ती काममोहीत झाली. तिनं जवळ येऊन त्यांच्याशी ओळख करून घेतली. ‘‘मी लंकापती रावणाची बहीण शूर्पणखा. कुंभकर्ण, विभीषण, खर, दूषण हे सारे माझे भाऊ आहेत.’’
शूर्पणखा विधवा होती. तिनं श्रीरामांशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीराम म्हणाले, ‘‘हे शूर्पणखे, मी अयोध्येचा राजकुमार आहे. मी एकपत्नीव्रत धारण केले आहे. ही बघ माझी भार्या सीता. त्यामुळं मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. हा माझा भ्राता आहे, लक्ष्मण! तू त्याला विचार.’’
शूर्पणखानं लक्ष्मणाला विचारलं. तर तो म्हणाला, ‘‘हे सुंदरी, मी श्रीरामांचा बंधू आहे आणि दासही आहे. त्यामुळं माझ्याशी लग्न करून तू राणी न होता दासी होशील.’’
मग रामाशी विवाह करायचा असेल, तर सीतेला ठार मारलं पाहिजे, असं तिला वाटलं. म्हणून ती सीतेला ठार मारायला धावली. मग मात्र लक्ष्मणानं शूर्पणखेचे नाक कापलं. ती किंचाळत पळून गेली. थोड्याच वेळात ती आपले बंधू खर आणि दूषण यांना घेऊन आली. त्यांनी संतापून श्रीरामावर हल्ला केला. श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, ‘‘लक्ष्मणा, सीतेला घेऊन आश्रमात जा. सगळ्या असुरांचा मी समाचार घेतो.’’
खर आणि दूषण यांनी सार्या राक्षस सेनेसह श्रीरामावर हल्ला केला. त्यांचा प्रचंड कोलाहल झाला. सेना समोर येताच, श्रीरामानं प्रचंड शरवर्षाव सुरू केला. आपल्या प्रखर बाणांनी त्यानं सार्या राक्षसांना मारून टाकलं. अनेक तेजस्वी बाणांनी त्यानं खर आणि दूषण ह्या रावणबंधुंना यमसदनाला पाठवलं. चौदा हजार राक्षसांचा संहार केला. सारे जनस्थान राक्षसमुक्त झाले. त्या घनघोर युद्धातूनही अकम्पन नावाचा एक राक्षस निसटून गेला. तो थेट लंकेला पोहोचला. लगोलग किंकाळ्या फोडत शूर्पणखाही रावणासमोर आली. ‘सूड घे त्याचा लंकापती’ असं म्हणून तिनं आपला गुन्हा दडवून रामाविरुद्ध आग ओकली. रावण खवळून उठला पण हे करत असताना अकम्पन आणि शूर्पणखेनं सीतेच्या अवर्णनीय सौंदर्याचं वर्णनही केलं. त्याच वेळी त्या दुरात्मा रावणाला सीतेला पळवून आणून तिचा उपभोग घेण्याची दुष्ट वासना निर्माण झाली.
मारीच हा रावणाचा भाऊ मायावी राक्षस होता. सीतेचं अपहरण करण्यात मारीच आपल्याला साहाय्य करील असं रावणाला वाटलं. मारीच हा कोणत्याही प्राण्याचं रूप घेऊ शकत होता. रावणानं रामाचा महापराक्रम ऐकला होता. म्हणून सीतेला कपटानं पळवून आणण्याचं त्याच्या मनात होतं. त्यानं मारीचाला आज्ञा केली, ‘‘हे मारीचा, तू एका सुंदर सुवर्णमृगाचं रूप धारण करून पंचवटीत जा. सीतेला तुझा मोह पडेल. मग ती राम-लक्ष्मणाला तुझ्या शिकारीसाठी पाठवील. त्याच वेळी मी सीतेला माझ्या पुष्पक विमानातून पळवून आणीन.’’
आधी मारीचानं कामांध रावणाच्या कपटी योजनेबद्दल त्याची निंदा केली. मारीचाला राम-लक्ष्मणांचा महापराक्रम अनुभवानं माहीत होता. म्हणून त्यानं रावणाला त्याच्या कपटापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु दुराचारी आणि कामातुर रावणाला त्याचा बोध रुचला नाही. राजा ह्या नात्यानं त्यानं मारीचाला आपण सांगतो तसं करण्याची आज्ञाच केली. त्याची आज्ञा मारीचाला निमूटपणे मान्य करावी लागली. सीताहरणाचं कारस्थान रचण्यात आलं.
**
रावण आणि मारीच पुष्पक विमानात बसले. नद्या, सागर, अरण्ये ओलांडत ते पंचवटीत पोहोचले. मारीचानं अतिशय सुंदर अशा सुवर्णमृगाचं रूप धारण करून तो श्रीरामाच्या कुटीसमोर इकडे तिकडे बागडायला लागला. एवढा सुंदर हरिण सीतेनं याआधी कधीही पाहिला नव्हता. त्या अद्भुत हरिणाचा तिला विलक्षण मोह पडला. तिनं श्रीरामाला सांगितलं, ‘‘नाथ, हा अतिशय सुंदर मृग पकडून आणा! तो आपण अयोध्येला घेऊन जाऊ या. तो आपल्या सगळ्या परिवाराला खूप आवडेल आणि समजा तो जिवंत हाती लागला नाही, तर त्याची शिकार करा. त्याच्या कातड्याची कंचुकी मी परिधान करीन.’’
लक्ष्मणानं मारीचाला ओळखलं होतं. त्यानं श्रीरामाला सावध केलं. ‘‘दादा, हा हरिण नाही, हा मारीच राक्षस आहे. मायावी रूप घेऊन त्यानं कित्येकांना ठार मारलंय.’’
श्रीराम म्हणाले, ‘‘हा मृग असेल, तर सीतेची इच्छा पूर्ण होईल आणि मारीच राक्षस असेल तर माझ्या हातून मारला जाईल. तू सीतेजवळ थांब. मी जातो.’’
श्रीराम सुवर्णमृगाच्या मागे धावले. मारीचाला तीच संधी हवी होती. तो वेगानं धावत सुटला. श्रीराम त्याच्या मागे धावत सुटला. खूप दूर आल्याची खातरी पटताच मारीच थांबला. त्याला पकडता येत नाही, हे लक्षात येताच श्रीरामाने बाण सोडला. तो काळजात घुसताच, मारीच मानवी रूपात आला. त्यानं श्रीरामाच्या आवाजात, जोरजोरात हाक मारली, ‘‘सीते, लक्ष्मणा धाव धाव…’’ पुन्हा पुन्हा धावा करून मारीच मरून पडला.
मारीचाचा हा आक्रोश कानी पडताच, सीता भयकंपित झाली. तिनं लक्ष्मणाला, ‘‘लक्ष्मणा, लवकर धाव. तुझे बंधू संकटात आहेत. त्यांनी साहाय्यासाठी धावा केलेला आहे.’’
यावर तो वीरबाहू पराक्रमी लक्ष्मण म्हणाला, ‘‘मला इथं तुमच्या रक्षणासाठी दादांनी थांबायला सांगितलेलं आहे. लक्षात घ्या वहिनी, दादांचा पराभव करणं, त्यांना मारणं ही कोणालाही अशक्य गोष्ट आहे. हा आवाज मारीच राक्षसाचा आहे.’’
लक्ष्मणाचं हे बोलणं ऐकून सीता संतप्त झाली. तिनं लक्ष्मणाची निर्भर्त्सना केली. ‘‘त्या मायावी राक्षसाच्या हातून श्रीरामांची हत्या व्हावी, अशी तुझी इच्छा असलेली दिसते. म्हणूनच तू रामाच्या रक्षणाला जात नाहीस.’’
लक्ष्मणानं अतिशय दुःखी अंतःकरणानं सीतेला वंदन केलं. ‘‘माते, मी जातो दादांच्या रक्षणाला पण माझ्या बाणाच्या टोकानं ह्या कुटीभोवती मी एक रेषा आखतो, ती ओलांडून तू बाहेर जाऊ नकोस.’’
लक्ष्मणानं धनुष्य घेतलं. बाणांचा भाता घेतला आणि तो आश्रमाच्या बाहेर पडला. कुटीत सीता एकटीच असलेली पाहून साधूच्या वेषात दबा धरून बसलेला रावण कुटीच्या दारात जाऊन म्हणाला, ‘‘माई भिक्षा वाढा,’’ सीता बाहेर आली. तेवढ्यात रावणानं लक्ष्मणरेषा पाहिली. त्यानं आत पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला पण त्या रेषेतून ज्वाला उफाळून आल्या. आपण ती ओलांडून आत जाऊ शकत नाही, हे त्यानं ओळखलं. त्यानं सीतेलाच बाहेर येण्याची विनंती केली. सीतेनं एक पाऊल बाहेर टाकताच रावणानं साधूचा वेष टाकून आपलं मूळ रूप धारण केलं. सीतेचा हात पकडून तिला खेचलं. विमानात बसवलं आणि वायुवेगानं ते आकाशमार्गानं नेलं. जाता जाता सीता आक्रोश करत होती. अनसूयेनं तिला दिलेल्या अलंकारांपैकी एकेक दागिना ती खाली टाकत राहिली. जेणकरून आपल्या शोधार्थ बाहेर पडलेल्या राम-लक्ष्मणाला आपला मार्ग कळावा. वाटेत एका झाडावर बसलेल्या गृध्रराज जटायूचं लक्ष सीतेनं वेधून घेतलं. सीतेचा धावा ऐकून जटायू धावून गेला. आपल्या पंख, तीक्ष्ण नख्या आणि चोचीनं त्यानं रावणावर हल्ला चढवला पण दुष्ट रावणानं वृद्ध जटायूचे पंख खड्गानं छाटून टाकले. जटायू घायाळ होऊन खाली कोसळला. त्यानं रावणाला ओळखलं होतं. तो श्रीराम आणि लक्ष्मण यांची वाट पाहत कसाबसा जिवंत राहिला.
**
इकडे लक्ष्मण आणि श्रीराम यांची वाटेतच भेट घडली. लक्ष्मणानं रामाच्या आवाजातील मारीचाचा धावा कसा ऐकला आणि सीतेनं आपल्याला जाण्याची आज्ञा कशी केली हे सांगितलं. त्याच क्षणी दोघांनाही संकटाची कल्पना आली. दोघंही कुटीकडे परतले, तर सीता नव्हती. दोघंही तिच्या शोधासाठी बाहेर पडले. वाटेतच सीतेनं टाकलेला एकेक दागिना रामानं ओळखला. त्या अनुषंगानं ते चालत राहिले. पुढे घायाळ जटायूची भेट झाली. त्यानं राम-लक्ष्मणाला, लंकानरेश रावणानं सीतेला विमानमार्गे लंकेला पळवून नेलेलं आहे, असं सांगितलं आणि प्राण सोडले. त्याला वंदन करून दोघे बंधू पुढे वाटचाल करू लागले.
**
रावणानं सीतेला लंकेला आणलं. तिच्याभोवती क्रूर राक्षसिणींचा पहारा बसवला. त्यानं सीतेला, ‘‘हे रूपसंदरी, तू स्वर्गातील अप्सरांपेक्षाही अधिक सुंदर आहेस. तू माझ्या आधीन हो. मी तुला माझी पट्टराणी करतो. जगातलं सारं वैभव तुझ्या पायाशी आणून टाकतो. तू माझी कामेच्छा पूर्ण कर.’’
सीता म्हणाली, ‘‘अरे पाप्या , तू श्रीरामांच्या सीतेला पळवून आणलंयस. तू पेटत्या अंगारात हात घातलेला आहेस. तू कामांध आणि भ्रष्ट आहेस. श्रीरामांच्या शिवाय मी कोणाचाही विचार करत नाही. ते एकच माझे प्राणनाथ आहेत, परमेश्वर आहेत. ते तुझा निश्चितच वध करतील आणि मला सोडवून घेऊन जातील, विसरू नकोस.’’
हे ऐकून रावण रागारागानं पाय आपटत निघून गेला.
अशा रीतीने, रावण वारंवार सीतेकडे उपभोगाची मागणी करीत राहिला. समजावून, धमकावून कशानेही सीता त्याला दाद देत नव्हती. प्रत्येक वेळी त्याचा धिक्कार करीत होती.
श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत चालत राहिले. वाटेत एका प्रचंड धूड असलेल्या कबंध ह्या महाभयंकर राक्षसानं त्यांना उचललं. ‘‘माझ्या भुकेच्या वेळीच तुम्ही इथं आलेले आहात. आता तुम्हाला मी खाऊन टाकणार,’’ तेवढ्यात दोघांनीही चपळाई करून खड्गाने त्याचे दोन्ही बाहू छाटून टाकले. तो प्राणांतिक वेदनेनं कळवळला. तेव्हाच त्याला ह्या दोन्ही तेजस्वी पुरुषांची ओळख पटली. तो दनू नावाचा एक सुंदर पुरुष होता पण इंद्राच्या शापानं तो भयंकर आणि विद्रूप झाला. त्याच्या इच्छेप्रमाणे राम-लक्ष्मणाने एका खड्ड्यात त्याला पुरलं. तेव्हा तो मुक्त झाला. जाता जाता त्यानं सांगितलं, ‘‘हे प्रभो, दक्षिणेकडे पंपा सरोवरापर्यंत ऋष्यमूक पर्वत पसरलेला आहे. तिथं सुग्रीव नावाचा वानर आपला बंधू वाली याच्या भीतीमुळं लपून राहिलेला आहे. त्याची भेट घ्या. तो आणि त्याचे साथीदार तुम्हाला सीतेच्या शोधासाठी साहाय्य करतील.’’
वाटेवर श्रीरामांची भक्त शबरी हिचा आश्रम लागला. तिनं श्रीरामांची पाद्यपूजा केली. त्यांचा आदरसत्कार केला. तेव्हापासून ‘शबरीची उष्टी बोरे’ अजरामर ठरली. तिनंच सुग्रीवाकडे जाण्याचा मार्ग दाखवला.
**
श्रीराम आणि लक्ष्मण चालत असता एक माणूस त्यांना सामोरा गेला. त्यानं दोघांना वंदन केलं. त्यांची विचारपूस केली. सगळी माहिती समजल्यानंतर त्यानं आपलं मूळ रूप धारण केलंं. तो होता महाबली हनुमान… श्रीरामांचा दूत मारुती. वायुपुत्र अंजनीसुत हनुमान! त्यानं आपलं विराट रूप धारण केलं आणि तो दोघांना खांद्यावर घेऊन मलय पर्वतावर सुग्रीवाकडे घेऊन गेला. सुग्रीव हा वानरांचा राजा. किष्किंधा हे त्याचं राज्य. त्याचा महाबलाढ्य बंधू वाली यानं त्याच्या पत्नीचं – तारा हिचं बळानं अपहरण करून, किष्किंधेचं राज्य बळकावून त्याला हाकलून लावलं होतं. श्रीराम आणि लक्ष्मण यांना आपल्याला मारण्यासाठी वालीनंच पाठवलं असावं असा त्याला संशय आला होता, म्हणून त्यानंच हनुमानाला त्यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं. तथापि ते आपले मित्रच आहेत, हे सुग्रीवाच्या लक्षात आलं. म्हणून त्यानं त्यांचं स्वागत केलं. आदरसत्कार केला. मग दोघांनी एकमेकांना साहाय्य करण्याचं वचन दिलं आणि घेतलं. श्रीरामांनी कपटी वालीचा वध करायचा, सुग्रीवाचं राज्य त्याला परत मिळवून द्यायचं आणि सुग्रीवानं सीतेचा शोध घेण्यासाठी आणि तिची सुटका करण्यासाठी श्रीरामाला साहाय्य करायचं, असं ठरलं. तेव्हापासून हनुमान हा श्रीरामांचा परमभक्त झाला. सीतेने पुष्पक विमानातून जाताना टाकलेले काही दागिने ऋष्यमूक पर्वतावरही टाकले होते. ते सुग्रीवानं दाखवले. श्रीरामांनी ते ओळखले. त्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले.
श्रीरामांच्या सांगण्यावरून एके दिवशी सुग्रीवान किष्किंधेला जाऊन वालीला लढण्याचं आव्हान दिलं. सुग्रीव आणि वालीची भयंकर कुस्ती चालू असताना श्रीरामानं वालीला एका भयंकर बाणानं मारून टाकलं. सुग्रीवाला त्याचं राज्य आणि पत्नी परत मिळाली पण हे झाल्यावर त्याला श्रीरामांना दिलेल्या वचनाचं विस्मरण झालं. एक पावसाळा संपून गेला. अखेर लक्ष्मणानं आपल्या धनुष्याचा मोठा टणत्कार करून कठोर शब्दांत सुग्रीवाला त्याच्या कामाची आठवण करून दिली. सुग्रीवानं श्रीरामांची क्षमा मागितली आणि सारी वानरसेना घेऊन तो श्रीराम-लक्ष्मण यांच्यासह वाट तुडवू लागला. सारे वानरवीर आपापले सैन्य घेऊन येऊन मिळाले.
**
https://shop.chaprak.com/product/he-rama/
वाटेत येणार्या सार्या अडथळ्यांवर आणि संकटांवर मात करीत वानरसेना वाटचाल करीत होती. सीता ही दक्षिणेकडेच असावी, यावर सुग्रीव ठाम होता. यात एके ठिकाणी जटायूचा भाऊ संपाती याची भेट झाली. सूर्याच्या प्रखर किरणांनी त्याचे पंख जळून गेले होते. त्यानं हनुमान आणि अंगद यांना रावणानं सीतेला लंकेला पळवून नेलेलं आहे, हे सांगितलं. श्रीरामाला सहकार्य केल्यावर त्याला नव्यानं पंख फुटले. त्यानं कनिष्ठ बंधू जटायूचे तर्पण केले.
त्यानंतर अथांग सागराच्या किनार्यावर श्रीरामासह-वानरसेना जमली. महापराक्रमी आणि महाबली हनुमानच हा सागर ओलांडून जाऊ शकतो, हे जांबवंतानं सांगितलं. श्रीरामाच्या कार्यासाठी तू उड्डाण कर, असं जांबवंतासह सार्या वानरांनी हनुमानाला सांगितलं. श्रीरामाचं कार्य असं म्हटल्यावर हनुमानाला स्फुरण चढलं. त्यानं झेप घेतली. तो उड्डाण करत लंकेच्या दिशेनं निघाला. वाटेत येणार्या सार्या परीक्षा पार पाडत, संकटांवर मात करत हनुमान लंकेला पोहोचला. तिथल्या राक्षसांशी युद्ध करून त्यानं लंकेत प्रवेश केला. अशोकवनात बसलेल्या सीतेसमोर जाऊन तो उभा राहिला. त्यानं श्रीरामांची ओळख सांगितली. आपली ओळख पटवून दिली. राक्षसांच्या हल्ल्याला तोंड देत, त्यांचा पराभव हनुमानानं केला. अखेर स्वतःच तो राक्षसांच्या पाशात बंदिस्त झाला कारण त्याला रावणाच्या दरबारात पोहोचायचं होतं. श्रीरामांचा संदेश घेऊन हनुमान रावणाच्या दरबारात जातो. तिथं श्रीरामाच्या पराक्रमाचं वर्णन तो करतो.
वानरसेनेसह राम-लक्ष्मण समुद्रतीरी येतात परंतु समुद्र उल्लंघून लंकेत जायचे कसे, हा प्रश्न असतो. इकडे हनुमानाच्या पराक्रमामुळे रावण अस्वस्थ झालेला असतो. एकट्या हनुमानाने लंकेत येऊन सीतेची भेट घ्यावी, लंकाही उद्ध्वस्त करावी हा प्रकार त्याच्या दृष्टीने चिंताजनक असल्यामुळे तो आपल्या मंत्र्यांशी चर्चा करू लागतो. त्या वेळी सीतेला परत करण्याचा शहाणपणाचा सल्ला विभीषण रावणाला देतो. रावण हा सल्ला झिडकारून विभीषणाला अपमानित करतो. आपल्या चार सहकार्यांसह विभीषण लंका सोडून रामाला येऊन मिळतो. ‘‘सेनेने सागर कसा तरून जावा?’’ असा प्रश्न हनुमान आणि सुग्रीव विभीषणास विचारतात.
‘‘रामाने समुद्राला शरण जावे,’’ असे विभीषण सुचवतो. राम तीन रात्री सागराची उपासना करतो आणि समुद्राची उदासीनता पाहून अखेरीस धनुष्याला तेजस्वी बाण लावून समुद्र सुकवून टाकावयास निघतो. तेव्हा समुद्र रामास सांगतो की, ‘‘निसर्गनियमानुसार माझे रूप आहे असेच राहिले पाहिजे पण मी तुझा मार्ग सुकर करून देईन. विश्वकर्म्याचा पुत्र नल ह्याच्याकरवी सेतू बांधून लंकेकडे जावे’’ असे सागर रामास सांगतो. नलाचा रामाशी परिचय करून देतो.
वानरांच्या साहाय्याने नल सागरावर सेतू बांधतो. युद्ध सुरू करण्यापूर्वी राम वालीपुत्र अंगद ह्याला रावणाकडे शिष्टाईसाठी पाठवतो. राम रावणाला कळवतो की, ‘‘तुझे ऐश्वर्य संपले आहे. सीतेला प्रणाम करून सन्मानपूर्वक तू जर माझ्याकडे परत पाठविले नाहीस तर तुला मी ठार मारीन आणि तुझे राज्य विभीषणाला देईन.’’
ही अंगदाची शिष्टाई अर्थातच विफल होते. लढाईला तोंड लागते. शूरांच्या झटापटी होतात. इंद्रजित राम-लक्ष्मणांना नागपाशांनी बांधून टाकतो परंतु तेथे गरुड येतो आणि त्याला पाहून नाग पळून जातात. रावणाचा सेनापती प्रहस्त हा अग्निपुत्र नीलकडून ठार करतो. त्यानंतर रावण स्वतः युद्धात प्रवेश करतो. राम रावणाचा रथ तोडून टाकतो आणि त्याच्या छातीवर जोरदार प्रहार करून त्याला मूर्छित करतो! पण राम त्याला ठार मारीत नाही. त्यानंतर रावण लंकेत येऊन कुंभकर्णाला जागा करतो. कुंभकर्ण प्रथम रावणाची, त्याने केलेल्या पापकर्माबद्दल, निर्भत्सना करतो परंतु नंतर लढायला निघतो. युद्धात कुंभकर्णाला राम ठार मारतो. इंद्रजित स्वतः अदृश्य राहून वानरसेनेवर हल्ला करू लागतो. ब्रह्मास्त्राच्या साहाय्याने इंद्रजित राम-लक्ष्मणांना आणि वानरसेनेला निश्चेष्ट करतो. तथापि हनुमान दिव्य औषधी धारण करणारा एक पर्वत घेऊन येतो व त्या पर्वतावरील महौषधींचा वास देऊन हनुमान राम-लक्ष्मणांना आणि वानरवीरांना जागे करतो.
पुढे इंद्रजित मायावी सीता निर्माण करून तिला वानरांच्या देखत ठार मारतो. सीतावधाच्या वार्तेने राम मूर्च्छित पडतो. इंद्रजिताने केलेला सीतावध खरा नाही, असे म्हणून विभीषण रामाला शोक आवरण्यास सांगतो. इंद्रजित ज्याप्रमाणे वानरांना फसविण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे रावणानेही सीतेला फसविण्याचा प्रयत्न केलेला असतो. राम युद्धात मारला गेला असे सीतेला सांगून रामाचे मायामय शिर रावणाने सीतेला दाखविलेले असते परंतु सीतेवर प्रेम करणार्या सरमा नावाच्या राक्षसीने राम जिवंत असल्याची तिची खातरी पटवलेली असते. इंद्रजिताने हा मायावी सीतेच्या वधाचा डाव खेळल्यानंतर लक्ष्मण त्याचा वध करण्यासाठी निघतो. दोघांचे युद्ध होते आणि त्यात इंद्रजित मारला जातो. नंतर राम-रावणाचे युद्ध होते. ह्या युद्धात रावण मारला जाणार, असे वाटल्यावरून त्याचा स्वामिभक्त सारथी रथ युद्धभूमीपासून बाजूला नेतो. रावण त्याच्यावर संतापतो. रथ युद्धभूमीत पुन्हा आणला जातो. तुंबळ युद्ध होते आणि अखेरीस एक बाण सोडून राम रावणाचे हृदय विदीर्ण करून टाकतो. रावण ठार झाल्यावर राम विभीषणाला रावणाची उत्तरक्रिया करावयास सांगतो. रावणाचे राज्य विभीषणाला दिले जाते. सीतेला रामाजवळ आणले जाते. तथापि राम सीतेच्या चारित्र्याविषयी शंका प्रदर्शित करतो. सीता अग्निदिव्य करते. सीता शुद्ध असल्याची ग्वाही प्रत्यक्ष अग्निकडून मिळाल्यानंतर राम तिचा स्वीकार करतो. पुष्पक विमानातून राम अयोध्येला परततो. त्यानंतर श्रीरामाला राज्याभिषेक होतो. निषादराज गुह, बिभीषण, सुग्रीव हे सारे राज्याभिषेकास उपस्थित राहतात. त्यानंतर सारे आपापल्या राज्यात परत जातात पण श्रीरामभक्त हनुमान मात्र श्रीरामांच्या सेवेत अयोध्येतच राहतो.
– श्रीराम ग. पचिंद्रे
पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ फेब्रुवारी २०२४