कर्तव्यतत्पर प्रभू श्रीरामचंद्र 

महर्षि वाल्मीकींच्या श्रीरामायण या सांस्कृतिक महाकाव्यातील प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे प्रभू श्रीराम! प्रभू श्रीराम हे हजारो वर्षांपासून आपल्या भारतभूमीतील श्रेष्ठ आराध्यदैवत बनले आहे. आपली वैदिक संस्कृती व पूर्णविकसित अध्यात्मशास्त्र कोणाला तरीच आराध्य कसे मानेल? आत्मसाक्षात्कारी ऋषीमुनी आणि संत योग्य आणि सर्वश्रेष्ठच गोष्ट निवडून समाजापुढे आदर्श म्हणून ठेवतात. मग सहजच प्रश्न पडेल की मानवी देहात अवतरलेले, मानवाच्या मर्यादेत जीवन व्यतीत केलेले श्रीराम देवत्वाला कसे पोहोचतात? हजारो वर्षे त्यांच्या चरित्राची मोहिनी जनमानसावर कशी राहते, अनेक संत, सत्पुरुष केवळ रामनामाने आपली आध्यात्मिक साधना पूर्णत्वाला नेऊन जीवनाची कृतार्थता साधतात. काय आहे प्रभू श्रीरामचंद्रांचे जीवन?

‘राम’ हा शब्दच अनेक गुणांचा पर्यायवाचक शब्द बनला आहे. एखाद्या मनुष्याला मृत्यू आला तर आपण म्हणतो, त्याच्या देहात राम नाही, म्हणजे प्राण नाही. एखादा खूप बोलला पण त्याच्या बोलण्यात सत्य अथवा तथ्य नसेल तर आपण म्हणतो, त्याच्या बोलण्यात राम नाही. एखाद्या ठिकाणी सुंदर रचना असेल पण पावित्र्य नसेल तर आपण म्हणतो त्या ठिकाणी राम नाही. एखाद्याच्या अंत्ययात्रेतही आपण सहज ऐकतो राम नाम सत्य है। म्हणजे मृत्युसारखे अनेक शाश्वत सिद्धांत जणू रामच आहेत. प्राण, सत्य, पावित्र्य, शाश्वत सिद्धांत यांना जणू राम हा पर्यायी शब्द व्हावा इतके श्रीरामांचे जीवन पवित्र, शुद्ध, नीतिमान, चारित्र्यवान, कर्तव्याधिष्ठित आणि म्हणूनच सर्वांना आदर्श होते!
मानवी जीवनातील सर्वच नात्यांना कोणत्या गुणांनी सुशोभित करावे, प्रत्येक प्रसंगात कसे वागावे, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श नागरिक, आदर्श राजा, आदर्श शिष्य, आदर्श पिता, आदर्श मित्र, अगदी आदर्श शत्रूसुद्धा याचा उत्कृष्ट वस्तुपाठच श्रीरामचरित्रातून मिळतो.
आज भौतिक संस्कृतीची प्रचंड वाढ झालेली दिसते; पण असे असले तरी त्यामुळे मनुष्य सुधारण्याऐवजी तो अधिकाधिक पशुवत् बनत चालला आहे. बाह्य जगत् कितीही बदलले तरी मानवाच्या अंतःकरणातील भावना, वासना, इच्छा, सुख, दुःख आदी संवेदना त्याच असतात, नाती तीच असतात. 50 वर्षांपूर्वी माणसाच्या मनात सायकल घेण्याची जी इच्छा होती तीच आज स्कूटर, मोटरसायकल, कार, विमान घेताना आहे. काळाबरोबर वस्तू बदलतील; पण इच्छा तीच, द्वेष तोच आणि आनंदही तोच आहे; म्हणून बदलत्या युगात कधीही न बदलणार्‍या – शाश्वत गोष्टींविषयी रामायण आपल्याला मार्गदर्शन करते.
ज्या दिवशी राज्याभिषेक त्याच दिवशी कोणताही गुन्हा नसताना 14 वर्षांचा वनवास, इतका टोकाचा विरोधाभास प्रभू श्रीरामचंद्र शांतपणे पत्करतात. राजा दशरथ सांगू शकत नाहीत पण त्यांची असहायता त्यांच्या डोळ्यांतून समजून घेऊन शांतपणे, प्रसन्नपणे, कोणताही थयथयाट, आरडाओरडा न करता, अपशब्दही न उच्चारता, ‘असं का ? माझा गुन्हा काय ? माझा तुम्ही दिलेल्या वराशी संबंध काय?’ असा कोणताच प्रश्नही न विचारता 14 वर्षांचा भीषण वनवास स्वीकारणे – आज आपण याची कल्पना तरी करू शकतो का? वनवासही साधा नाही. वनातच राहणे, नगरप्रवेश बंदी, पर्णकुटीत, दर्भावर झोपणे, वल्कले नेसणे, कंदमुळे खाणे, इतक्या अटींसह असलेला वनवास! अहो एखादी गोष्ट मनाविरुद्ध झालेली माणसाला खपत नाही, व्यवसायात आलेल्या थोड्याशा तोट्याने अथवा नोकरीत थोडा पगार कमी मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत जाणार्‍यांची संख्या कमी नाही. त्यातून क्रोध, बदला घेण्याची भावना सहज उत्पन्न होताना दिसते; पण इथे मात्र ज्या कैकेयीमुळे वनवास पत्करावा लागला, तिच्याविषयी क्रोध तर सोडाच पण प्रभू श्रीरामचंद्र कौसल्यामातेला तिची काळजी घ्यायला सांगतात, कैकेयी आता राजमाता होईल, म्हणजे वयाने तू मोठी असलीस तरी अधिकाराने कैकेयी माता मोठी आहे. त्यामुळे तू तिच्याच आज्ञेत राहा. भरताचा दुस्वास करू नकोस, त्याच्या प्रेमात अंतर पडू देऊ नकोस, वडिलांविषयी प्रेमभाव ठेवूनच त्यांची सेवा कर. हा सगळा भाग मूळ रामायणातूनच वाचणे खरे आनंदाचे ठरेल. केवढी ही अंतःकरणाची विशालता, केवढी ही कर्तव्यनिष्ठा!
अहो सख्ख्या भावांच्यात एका खोलीवरून, शेताच्या बांधांवरून खून पडताना दिसतात. सख्खा भाऊ पक्का वैरी होतो. त्याउलट स्वतःला मिळालेले पूर्ण साम्राज्य दुसर्‍यास देणारे व स्वतः मात्र वनात राहायला तयार असलेले अद्भुत बंधू रामायणानेच आपल्याला दाखवले. या चारही सावत्र भावातील हे अलोट प्रेम, अतूट नाते सर्वांनाच आश्चर्यकारक वाटणारे आणि त्यामुळेच आदर्श आहे, नाही का?
या बंधूंमधील श्रीरामांचे प्रिय बंधू व अंगभूत गुणांनी अतिभव्य असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सुमित्रानंदन एकनिष्ठ लक्ष्मण! प्रभू श्रीरामचंद्रांपेक्षा दोनच दिवसांनी लहान असलेले जुळे बंधू लक्ष्मण व शत्रुघ्न. भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न हे श्रीरामांचे सावत्रभाऊ. भरताचे जेवढे प्रेम श्रीरामांवर होते तेवढेच प्रेम लक्ष्मण व शत्रुघ्नाचेही श्रीरामांवर होते. जेवढे त्याग-समर्पण भरताचे होते तेवढेच लक्ष्मण व शत्रुघ्नाचेही होते; पण लक्ष्मण श्रीरामांच्या छायेसारखा व शत्रुघ्न भरताच्या छायेसारखा जगले. आपली श्रीरामांपेक्षा वेगळी ओळख असायला हवी असे लक्ष्मणाला कधीच वाटले नाही. अशा लक्ष्मणाच्या भव्य चरित्रामुळे आज हजारो वर्षांनीही दोन बंधूच्या प्रेमाला उपमा द्यायची असेल तर आपण ‘राम-लक्ष्मणासारखे’ अशीच देतो. अत्यंत सुशील, चारित्र्यवान, त्यागी व पराक्रमात श्रीरामांइतकाच पराक्रमी असूनही लक्ष्मणाने आपले व्यक्तिमत्व श्रीरामांच्या व्यक्तिमत्वात विलीन करून टाकले. केवढी ही उदात्त भावना! अगदी बालपणापासूनच राम आहेत तिथे लक्ष्मण असणारच हे अगदी ठरून गेलेले समीकरण होते. विश्वामित्र ताटिका वधासाठी, यज्ञरक्षणासाठी श्रीरामांची मागणी करतात, श्रीराम शस्त्रसज्ज होऊन जाण्यास निघतात, तेव्हा कोणीही न सांगताच मूकपणाने सहजच लक्ष्मणही शस्त्रसज्ज होऊन श्रीरामांच्या पाठोपाठ जातो. मला कोणी बोलावले आहे का? मला स्वतंत्र आमंत्रण आहे का? कोणाची परवानगी घ्यावी का? असे प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाहीत, इतके लक्ष्मणाचे जीवन रामांशी एकरूप होते व सर्वांच्याच अंगवळणीही पडले होते. सर्वच गृहित धरायचे की जिथे राम तिथे लक्ष्मण, वनवास हा श्रीरामांसाठीच होता. त्यांच्या बरोबर सीतादेवींनी अर्धांगी म्हणून जाणेही योग्य व आवश्यक होते. लक्ष्मणाला कोणीही वनवासाला जाण्यास सांगितले नाही, तरी 14 वर्षांच्या खडतर वनवासाला जाण्याचे दुष्कर कर्म श्रीरामांविषयी अतिउच्च भावना असलेल्या लक्ष्मणाकडून सहजच घडले. वनवासात रामांपाठोपाठ त्यांच्या रक्षणासाठी, सेवेसाठी लक्ष्मणानेही जावे अशी माता सुमित्रादेवी आणि पत्नी उर्मिलेचीही इच्छा होती. केवढा हा विलक्षण प्रेमबंध!
वनवासात प्रत्येक काम लक्ष्मणाने केले. पर्णकुटी बांधणे, कंदमुळे आणणे, श्रीराम व सीतादेवींची सर्व प्रकारची सेवा करणे व त्याहून कठीण म्हणजे रात्रभर जागता पहारा ठेवणे. या वनवासाच्या कालावधीत चौदा हजार राक्षसांच्या संहारात देखील त्याने श्रीरामांना साहाय्य केले व अनेक प्रसंगात भावनिक झालेल्या प्रभू श्री रामचंद्रांना भावनाप्रधान न होता कर्तव्यप्रधान होण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले आहे.
लक्ष्मणाने आपल्या पराक्रमाने मायावी असलेल्या, पराक्रमी इंद्राला पराजित केलेल्या व कधीच कोणाकडूनही पराजित न झालेल्या महान शक्तिशाली रावणपुत्र इंद्रजिताला ठार केले. या सर्वच गुणवत्तेमुळे श्रीरामांचेही लक्ष्मणावर फार उत्कट प्रेम होते. लक्ष्मण रावणाशी लढताना शक्तिप्रहाराने बेशुद्ध पडतो तेव्हा श्रीराम म्हणतात,  हा वीर सुमित्राकुमार मला प्राणांहूनही प्रिय आहे, जर युद्धाच्या रणधुमाळीत मारला जाऊन लक्ष्मण कायमचा झोपी गेला असेल तर युद्ध जिंकायचा फायदा तरी काय? प्रत्येक देशात स्त्री उपलब्ध होऊ शकेल, देशोदेशी जातिबांधवही मिळू शकतील; परंतु असा कोणताही देश मला दिसत नाही की जिथे सहोदर बंधू मिळू शकेल…
राज्याभिषेकाच्या वेळी त्याला युवराजपद घेण्यास श्रीरामांनी सांगितले तेव्हा दास्यभावाला आड येईल म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांनी दिलेले यौवराजपद देखील त्याने नाकारले. श्रीरामचंद्रांना शेवटी भरतालाच युवराज करावे लागले.
कर्तव्य करणे, धर्मपालन करणे म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्रांवर प्रेम करणे असा भाव भरताचा आहे तर प्रभू श्रीरामचंद्र हेच प्रत्यक्ष धर्ममूर्ती असल्याने श्रीरामांची सेवा, त्यांचे आज्ञापालन हेच कर्तव्य होय आणि रामांवरचे उत्कट प्रेम म्हणजेच धर्मप्रेम अशी लक्ष्मणाची जीवननिष्ठा होती. अनेक वेळा आज्ञापालन करताना श्रीरामांचा निर्णय न कळल्यामुळे किंवा कदाचित न पटूनही निमूटपणे रामआज्ञेत राहणे हेच लक्ष्मणाचे जीवनसर्वस्व होते.
दुर्वासांच्या क्रोधामुळे अयोध्या दग्ध होण्याचा प्रसंग आल्यानंतर व्यष्टी धर्मापेक्षा समष्टी धर्म श्रेष्ठ मानून कालनेमी व श्रीरामांच्या गुप्त चर्चेत रामाज्ञा भंग करून जेव्हा दुर्वासांची भेट लक्ष्मणाने घालून दिली तेव्हा त्याला त्याचा त्याग करण्याचा दंड श्रीरामांना द्यावा लागला. नम्रपणे श्रीरामांना नमस्कार करून, राजसभेतून घराकडे न जाता, कोणाचाही निरोप न घेता लक्ष्मणाने सरळ शरयू नदीकिनारी जाऊन आपला जीवनक्रम संपविला.
कौसल्या, सुमित्रा, भरत, शत्रुघ्न, सुग्रीव, हनुमंतराय सर्वच श्रेष्ठ व्यक्ती कर्तव्यासाठी का होईना श्रीरामांशिवाय जगू शकल्या; पण कुठल्याही कारणास्तव रामांशिवाय एक क्षणही जगली नाही अशी व्यक्ती म्हणजे केवळ लक्ष्मण! प्रभू श्रीरामचंद्रसुद्धा दशरथ, कौसल्या, भरत, शत्रुघ्न, सुग्रीव, बिभीषण, कुश-लव, अगदी पत्नी सीतादेवींशिवायही कर्तव्य आणि समाजकल्याणासाठी जगले; पण आपल्या शील, चारित्र्य, सेवा, निष्ठा, आज्ञापालन या सर्वच गुणांनी रामांना जिंकून घेत आपल्या प्रेमाचे वेड ज्याने रामांनाच लावले आणि त्यामुळे ज्याच्याशिवाय रामही जगू शकले नाहीत अशी रामायणातील एकच व्यक्ती म्हणजे निर्मळ दास्यभावाचे प्रतीक असलेला लक्ष्मण!
समाजातील, कुटुंबातील भांडणे ही अहंकारामुळे होतात व प्रत्येक जिवाची धडपड स्वतःचे अस्तित्व, स्थान, नाव टिकून राहावे यासाठी असते, याच्या उलट लक्ष्मणाचे चरित्र आहे. रामांइतकीच उच्च कोटीची गुणवत्ता असूनही लक्ष्मणाने आपले संपूर्ण जीवन ध्येयाशी, म्हणजे आपल्या आदर्शाशी एकरूप करून टाकले. रामाज्ञेने आपले प्राणही समर्पित केले, मात्र हे ऐकल्याक्षणी प्रभू श्रीरामचंद्रांनी कुश-लवांना राज्याभिषेक केला आणि लक्ष्मणाशिवाय जीवन जगणे, ही कल्पनाच अशक्य वाटणार्‍या त्यांनी लक्ष्मणाच्या पाठोपाठच जलसमाधी घेऊन आपले जीवनकार्य संपविले. महर्षि वाल्मीकी लक्ष्मणाला कायमच रामांचा बहिश्वर प्राण म्हणतात.
लक्ष्मणाइतकेच भव्य उदात्त असे चरित्र  असलेली श्रीरामांच्या परिवारातील आणखी एक व्यक्ती म्हणजे त्यागी कैकेयीपुत्र भरत. श्रीरामांच्या वनवासाला कैकेयी-दशरथांसमवेत अप्रत्यक्षपणे का होईना भरतही जबाबदार आहे, असा ठपका जरी त्याच्यावर ठेवला गेला तरी भरताने केलेला त्याग, श्रीरामांच्या परत येण्याची वाट पाहत नंदीग्रामात वल्कले धारण करून व श्रीरामांच्या निर्जीव पादुकांशी दाखवलेली अढळ निष्ठा यामुळे त्याच्या चरित्राला कोणताच दोष, कोणतेच पाप स्पर्शही करू शकले नाही. भरत त्यागाच्या ज्या उंच भूमीवर उभा आहे तिच्या रजःकणाइतकी देखील सर जडवाद, भोगवाद, स्वार्थाने बरबटलेल्या या काळात कुणाला तरी येईल का? आपल्या मातृभूमीचे गतवैभव पुन्हा मिळवायचे असेल, जात-पात, संप्रदाय-धर्माच्या संकुचित कल्पनांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष मानवाचे जीवन व चारित्र्य आध्यात्मिक जीवनमूल्यांनी कृतार्थ, परिपूर्ण करावयाचे असेल तर भरताच्या उदात्त जीवनाचाच आदर्श प्रत्येकाने समोर ठेवला पाहिजे.
श्रीरामचंद्र सीतादेवी व लक्ष्मणासह वनवासात जातात तेव्हा भरत शत्रुघ्नासह आपल्या आजोळी गेला होता. श्रीरामचंद्रांनी वनवासात गेल्यावर कैकेयी भरताला माघारी बोलावून घेते. भरत अयोध्येत परतल्यावर प्रथम रामांच्याच भेटीला जातो. आपल्या आईने केलेल्या दुष्कृत्याची पुसटशीही कल्पना नसलेल्या भरताला राम कुठेच दिसत नाहीत म्हणून तो दुःखी होतो. दुःखाचा आवेग थोडासा ओसरल्यावर तो शंकेने माता कैकेयीला विचारतो, ‘‘दशरथांनी रामांना राज्याबाहेर काढले का? रामांच्या हातून काही पाप घडले का? की चारित्र्यभ्रष्टतेचे काही वर्तन घडले? रामांनी एखाद्या ब्राह्मणाच्या धनाचा अपहार तर केला नाही ना! अथवा निष्पाप व्यक्तिला केवळ आपल्या लहरीसाठी तर ठार मारले नाही ना? सांग, सांग, कोणत्या अपराधासाठी रामांना वनवासाची शिक्षा दिली आहे?’’
हे प्रश्न ऐकताच माता कैकेयी आपली फुशारकी मिरवण्यासाठी आपण केलेल्या पराक्रमाचे वर्णन करते व भरताला म्हणते की, ‘‘केवळ तुझ्यावरील प्रेमाने, मीच प्रतिज्ञेच्या बंधनात अडकवून दशरथांकडून तुझ्यासाठी राज्य आणि रामासाठी वनवास मागून घेतला. तुझे वडील सत्यसंध असल्याने मोठ्या कष्टानेच त्यांनी हे मान्य केले; पण रामवियोगाच्या दुःखाने त्यांना मृत्यू आला आहे. तू आता सुखाने अयोध्येचे राज्य कर!’’
हे ऐकताच आनंद होण्याऐवजी भरतावर दुःखाचा वज्राघातच होतो. आपल्या मातेने मागितलेल्या वरामुळे आपल्याला राज्य मिळाले आणि निष्पाप रामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास पत्करावा लागला, हे ऐकून भरताला प्रचंड धक्का बसतो. या सर्व अनर्थाला माताच कारणीभूत झाली म्हणून तो कडक शब्दात तिची निर्भत्सना करतो व रामांना परत आणून त्यांचे जन्मसिद्ध राज्य त्यांना परत करण्यासाठी रामभेटीसाठी निघतो.
श्रीरामचंद्रांनी वनवासासाठी परिधान केलेल्या वल्कलांसारखी वल्कले धारण करून, तापसवेषातच तोही वनात जायला निघतो. वसिष्ठांसह अनेक ऋषीमुनी, मंत्री, अमात्य, कैकेयी, सुमित्रा, कौसल्यादेवींसह सर्व प्रजाजनांना घेऊन व राज्याभिषेकाची सर्व तयारी करूनच तो निघतो. वाटेत निषादराज गुह त्याला अडवतो, भरत रामांशी युद्धच करायला जात असावा, असा संशय त्याला येतो. लक्ष्मणसुद्धा भरताला सेनेसह येताना पाहून क्रोधाने त्याच्याशी युद्ध करण्यास सज्ज होतो. प्रजाजन, राजा गुह, अगदी लक्ष्मणालासुद्धा आपल्या चारित्र्यावर, निष्ठेवर विश्वास नाही हे पाहून भरताला किती दुःख झाले असेल, याची कल्पनाच न केलेली बरी! सामान्य मानवी जीवनात न आढळणार्‍या त्याच्या हृदयाच्या श्रीमंतीची व दिव्य चारित्र्याची कल्पना त्याच्या जवळ वावरणार्‍या लोकांनाही येऊ शकली नाही; पण कोणाविषयी क्रोध नाही की सुडाची भावना देखील नाही. सर्वांच्या संशयाचे निराकारण भरताने महान आत्मयज्ञ करूनच केले.
भरत रामभेटीच्या ओढीने अत्यंत लगबगीने चित्रकूट पर्वतावर येतो व श्रीरामांना पाहून भावनावेगाने मूर्च्छित होतो. राम-भरत भेटीचा प्रसंग फारच विलक्षण आहे. महर्षीनी या प्रसंगाचे केलेले वर्णन वाचताना मन हेलावून जाते. मूर्च्छित पडलेला भरत भानावर आल्यावर रामांना दशरथांना देवाज्ञा झाल्याचे वृत्त कथन करतो आणि रामांच्या पायाला मिठी मारून आपल्या अश्रुंनी त्यांचे चरण धुऊन रामांना अयोध्येला परत येण्याची आणि राज्यपद स्वीकारण्याची विनंती करतो.
भरत म्हणतो, ‘‘हे प्रभू, ज्यांनी राजसिंहासनावर बसावे, अलंकार आणि सुंदर वस्त्रांनी अलंकृत राहावे, त्या तुमच्यासारख्या सर्वगुणसंपन्नाने वनवासात, दुःखात राहणे मला पाहवत नाही.’’
यावर मनाला वश केलेले प्रभू श्रीरामचंद्र त्याला म्हणतात, ‘‘मी अरण्यवास स्वीकारला आहे यात सुखदुःखाचा प्रश्न नसून कर्तव्याचा प्रश्न काय तो महत्त्वाचा आहे. केवळ तुम्हा सर्वांना आनंद व्हावा, म्हणून मला माझे कर्तव्य कसे टाळता येईल? मनुष्याने सुखाच्या मागे न धावता कर्ममार्ग निर्धाराने चालावा.’’
लक्ष्मण भावनाप्रधान होता तर भरत रामचंद्रांइतकाच विचारी होता. प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक निर्णय लावूनच आपले म्हणणे तो योग्य रीतीने मांडत असे. यापुढे प्रभू श्रीरामचंद्रांचे मन वळवण्यासाठी त्याने ज्या पद्धतीने युक्तिवाद केला तो त्याची विचारी बुद्धी व निष्णात प्रवृत्तीचेच प्रतीक आहे. रामचंद्रांना भावनेच्या पाशात आपण पकडू शकत नाही हे कळल्यावर भरताने त्यांना धर्मशास्त्रदृष्टीने रामांनी राज्य स्वीकारणेच कसे योग्य आहे, हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
भरत म्हणतो, ‘‘तुम्ही माझ्या आईला संतोष देण्यासाठी तिच्या आज्ञेने वनात आलात, आता तिला पश्चात्ताप होतो आहे व तिच्याच इच्छेने तिच्याच उपस्थितीत मी तुम्हाला परत न्यायला आलो आहे.’’
त्यावर दीर्घदर्शी रामचंद्र त्याला उत्तर देतात की, ‘‘केवळ तुझ्या मतासाठी वा इच्छेसाठी नाही तर मी पितृ-आज्ञेने वनात आलो आहे. तेव्हा वडिलांच्या आज्ञेशिवाय मला वनवासाचा भंग करता येणार नाही आणि त्यांचे देहावसान झाल्याने आता त्यांची आज्ञा मिळणे शक्य नाही.’’
हा युक्तिवाद फोल ठरल्यावर तो म्हणतो, ‘‘प्रभू, आपले वडील वृद्धपणी स्त्रीच्या मोहात पडून बुद्धिभ्रष्ट झाले होते म्हणूनच त्यांनी अशी आज्ञा दिली. तुमच्यासारख्या विवेकी पुरुषाने ती का मानावी?’’
त्यावर वडिलांना अपशब्द बोलणार्‍या भरताला ते खडसावतात आणि म्हणतात, ‘‘मी वनवासात आलो तेव्हा आपले वडील सिंहासनाधीश होते. याचा अर्थ मंत्रिसंस्था, अमात्य, संस्था, पौरजनपद आणि प्रजाजनाला ते मान्य होते. तेव्हा त्यांना स्त्रीलंपट, बुद्धिभ्रष्ट असे म्हणून या सर्वांचा व वडिलांचा अपमान करू नकोस. वडील, राजा व गुरु म्हणून ते तुला व मला सर्वदा पूज्यच आहेत.’’
त्यावर भरत म्हणतो, ‘‘तुमचे माझ्यावर प्रेम आहे ना?’’
तेव्हा रामचंद्र म्हणतात, ‘‘होय भरता! निःसंशयपणे तू व मी वेगळे नाहीच, एकच आहोत.’’
यावर तो भाबडेपणाने म्हणतो, ‘‘तर मग मी वनात राहतो व तुम्ही माझ्याऐवजी अयोध्येत रहा व राज्य करा.’’
त्यावर कर्तव्यकठोर रामचंद्र त्याला सांगतात, ‘‘भरता, कर्तव्यात खांदेपालट चालत नाही. ज्याचे कर्म त्यानेच करावे. तुला राज्य व मला वनवास हेच पितृ-आज्ञेने आले आहे, तेव्हा विनातक्रार आपण आपापल्या कर्तव्यांचे पालन करून कृतार्थता मिळवावी.’’
शेवटी भावविवश होऊन भरत म्हणतो, ‘‘प्रभू, तुम्ही परत येणार नसाल तर मी इथेच प्रायोपवेशन करून प्राण सोडेन.’’
त्यावर रामचंद्र हसून त्याला म्हणतात, ‘‘प्रायोपवेशनाचा अधिकार शास्त्राने क्षत्रियांना दिलेला नाही, त्यामुळे असे शास्त्रविरोधी कृत्य तुला करता येणार नाही.’’
अत्यंत उदात्त भूमिकेवर चाललेला हा दोन बंधूचा अद्भुत वाद ऐकत असणार्‍या तेथील समुदायाच्या मुखावर हर्षशोकाचे संमिश्र तांडवच उमटत होते व यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी प्रश्नांतून राजनीतीचा खूप सुंदर उपदेश भरताला केला आहे. हा उपदेश प्रत्यक्ष रामायणात वाचला पाहिजे. अखेरीस बुद्धिने नाही तर आपल्या उदात्त प्रेमाने – भक्तिनेच भरत रामांना वश करतो. भरतावर प्रसन्न होऊन रामचंद्र अयोध्येला येऊन राज्य स्वीकारण्याचे मान्य करतात पण 14 वर्षानंतरच!
तेव्हा भरत अत्यंत नम्रपणे त्यांच्या पादुका मागून घेतो व प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पादुका मस्तकी धरून हृदयाचे पाणी करणार्‍या एका करुण दृष्टिक्षेपाने श्रीरामांना पाहत म्हणतो, ‘‘आजपासून चौदा वर्षांपर्यंत वल्कले धारण करून नगराबाहेर पर्णकुटीत राहून, दर्भावरच झोपून, कंदमुळावरच आपली उपजीविका करीत प्राण कंठाशी आणून प्रभू मी तुमची वाट पाहीन. राज्याचा सर्व भार मी या पादुकांवर सोपवीन व पंधराव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आपण मला दर्शन दिले नाहीत व राज्याचा स्वीकार केला नाहीत तर मी अग्निकाष्ठभक्षण करून प्राणत्याग करीन.’’
त्याची ही प्रतिज्ञा ऐकून रामचंद्रही शोकाकुल होतात. भरताला गाढ आलिंगन देतात आणि 15 व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी येण्याचे वचन देतात.
भरत या पादुका घेऊन अयोध्येला परत येतो तेव्हा आपल्या प्रजेला म्हणतो, ‘‘या पादुका म्हणजेच तुमचे श्रीराम आहेत, मी केवळ त्यांचा एक सेवक आहे.’’
धीरोदात्ततेचे केवढे हे आविष्करण! राज्यासाठी, सांपत्तिक लाभासाठी परस्परांशी लढणे, परस्परांचे खून पाडणे, अशा अनेक घटना मानवतेने पाहिल्या आहेत पण चारित्र्यासाठी, त्यागासाठी, बलिदानासाठी, कर्तव्यासाठी, दुसर्‍याला सुख द्यावे यासाठी स्पर्धा करणार्‍या, युक्तिवाद करणार्‍या व अगदी जीवनाचा होम करण्यास सिद्ध असलेल्या या दोन भावांचा दिव्य संघर्ष रामायणानेच दाखवला व उच्च आदर्श सर्वांसमोर ठेवला. रामचंद्रांचा राज्यावरचा जन्मसिद्ध अधिकार मानून, सहज हाती आलेल्या राज्याचा त्याग करून, रामांच्या निर्जीव पादुकांशी निष्ठा राखून रामांना अपेक्षित असे राज्य करणारा निःस्वार्थ भरत रामायणाने दिला.
असे हे लक्ष्मण व भरत या दोघांचेही जीवन जसे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे  सोने होते पण श्रीरामचंद्र नावाच्या परिसाच्या सहवासाने यांचे जीवन परीसच होऊन गेले, असे उच्चकोटीचे जीवन जगलेले श्रीराम, मानवाच्या उन्नतीसाठी, सर्वंकष विकासासाठी गुणावगुणांच्या मर्यादा नियत करून देणारे श्रीराम! मानवी मर्यादेतही सद्गुणांचा अमर्याद विकास करून, मानवी जीवन सर्व प्रकारे विकारहीन करून देवत्वापर्यंत उंचावून दाखवणारे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम! भावनेपेक्षाही कर्तव्याला सर्वाधिक महत्त्व देणारे श्रीराम! शब्दपालनासाठी सर्वस्वाचा त्याग शिकवणारे हरिश्चंद्राच्या वंशातील श्रीराम! मानव धर्माची शिकवण देणार्‍या मनूच्या वंशातील पूर्णमानव श्रीराम! रघुवंशातील अतिपराक्रमी श्रीराम! नीतिमत्तेची, धर्मजीवनाची, ज्ञानाची गंगा सर्व मानवांपर्यंत पोहोचवणारे, भगीरथाच्या वंशातील श्रीराम! आपल्या पूर्वजांच्या सर्वच सद्गुणांचा समुच्चय आपल्या जीवनांतून एकत्रितपणे प्रकाशित करणारे भगवान् श्रीराम! हेच आपले आदर्श! ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हे जगून दाखवणारे दशरथपुत्र श्रीराम! एकपत्नी, एकबाणी, एकवचनी, उच्च आदर्शाचा मानबिंदूच श्रीराम! भगवंतांनी जो निष्काम कर्मयोग सूर्याला दिला तोच निष्काम कर्मयोग समाजहितासाठी स्वतः जगून दाखवणारे सूर्यवंशातील प्रभू श्रीराम!
– श्री. लखन दिलीप जाधव,
प्रधानाचार्य, सव्यसाचि गुरुकुलम्
साधक, श्री संत सेवा संघ.
पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ फेब्रुवारी २०२४

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा