‘‘हे बघ श्रीपती, असा मौका परत येणार नाही. तुझ्या त्या पडीक माळरानात तसंही काहीच पिकत नाही. तुझे वडील होते तोपर्यंत ठीक होतं पण आता ते हयात नाहीत. किती दिवस ते दगडगोटे भावनेच्या आहारी जाऊन सांभाळणार आहेस? बघ, थोडा तरी व्यवहारी हो, कुणाला काय वाटेल याचा फार विचार करू नकोस. लक्ष्मी स्वत:हून तुझ्या दारापर्यंत चालून आली आहे. तिला असं लाथाडू नकोस…’’
श्रीपती फक्त शांतपणे ऐकून घेत होता.
‘‘ती बिनकामी जमीन विकून टाकलीस तर एक रकमी चांगले दहा-बारा लाख रुपये मिळतील. तू जर म्हणत असलास तर अजून रक्कम वाढवून मागू शेठकडून! बघ, लवकर निर्णय घे. उभ्या आयुष्यात कधी बघितला नसशील एवढा पैसा एका झटक्यात मिळून जाईल…’’
मोहनराव श्रीपतीला समजावण्याचा प्रयत्न करत होता…
श्रीपतीची गावाबाहेर लवकरच रुंदीकरण होणार्या टाररोडच्या बाजूला दीड एकर खडकाळ माळरान जमीन होती. लवकरच या भागात वाहनांची वर्दळ वाढणार आहे हे लक्षात घेऊन पुण्याच्या एका पार्टीला ती जमीन विकत हवी होती.
मोहनराव या भागातल्या जमिनीच्या व्यवहारात मध्यस्थी करायचा. अशा व्यवहारात त्याला भरपूर दलाली मिळायची. या भागातल्या अत्यंत मोक्याच्या जमिनी मोहनरावने अशी मध्यस्थी करून शहरी व्यावसायिकांना विकलेल्या होत्या आणि भरपूर कमाई केलेली होती.
पुण्यापासून केवळ एक-दीड तासाच्या अंतरावर असणार्या, सतत दुष्काळाच्या छायेखाली असणार्या पुरंदरच्या खोर्याकडे आत्तापर्यंत शहरातल्या जमीन माफियांची बिलकूल नजर गेलेली नव्हती पण ‘या भागात विमानतळ होणार’ अशी बातमी आली आणि इकडच्या जमिनींना अचानक महत्त्व आले.
अलीकडेच पेपरमध्ये लवकरच पुरंदरच्या विमानतळाचे काम सुरू होणार अशा स्वरूपाच्या आलेल्या बातमीमुळे तर अनेक शहरी व्यावसायिक नियोजित विमानतळाच्या वीस-पंचवीस किलोमीटरच्या टप्प्यातल्या जमिनी खरेदी करण्यासाठी धडपड करत होते.
‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा !
या भागातल्या अनेक मोक्याच्या जमिनी आत्तापर्यंत विकल्या गेल्या होत्या त्यामुळे या रस्त्यावर तशाही विक्रीयोग्य जमिनी आता फारशा शिल्लक राहिलेल्या नव्हत्या. त्यामुळेच गेली कित्येक वर्षे पडीक असलेल्या श्रीपतीच्या नापीक परंतु अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या या जमिनीवर बर्याच दलालांची आणि त्यातल्या त्यात मोहनरावची नजर होती.
खरंतर श्रीपती काही फार मोठा शेतकरी नव्हता. आपल्या वडिलोपार्जित शेतीत हंगामी पावसावर जमेल तशी मेहनत करून तो आपल्या कुटुंबाची गुजराण करत होता. त्याचा एक मुलगा अजून शिकत होता. श्रीपती खाऊन-पिऊन तसा सुखी होता. त्याचे वडील वारकरी होते. अनेक वर्षे ते दर आषाढीला सोपानकाकांच्या पालखीबरोबर सासवड ते पंढरपूरची वारी करायचे. पूर्वी सोपानकाकांची पालखी सासवडवरून निघून सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे जायची पण मधल्या काळात काही कारणाने या पालखी सोहळ्याचा मार्ग बदलण्यात आला आणि आता सोपानकाकांची पालखी पांगारे घाटाने परिंचेमार्गे नीरेकडे जाऊ लागली.
ज्या वर्षी पालखी मार्ग बदलला त्याच्या अगदी पहिल्या वर्षीपासून विठ्ठलराव-श्रीपतीच्या वडिलांनी मोठ्या मनाने आपली ही पडीक जमीन एका दिवसासाठी पालखीसाठी तळ म्हणून वापरायला दिली. त्यासाठी पदरमोड करून पालखीच्या विसाव्यासाठी एक दगडी चबुतरा त्यांनी बांधून घेतला होता. आपल्या मालकीच्या या मातीत पांडुरंगाचा भक्ती सोहळा एका दिवसासाठी का होईना रेंगाळतो, वारकर्यांच्या भजन-कीर्तनाने या मातीवर भक्तिरसाचे मुक्त सिंचन होते आणि या निमित्ताने आपल्याकडून सोपानदेवांची आणि पांडुरंगाची थोडीफार का होईना सेवा घडते याचे विठ्ठलरावांना प्रचंड समाधान होते!
विठ्ठलराव वारल्यानंतरही दर वर्षी श्रीपती सोपानकाकांच्या पालखीची ही सेवा अगदी भक्तिभावाने बजावत होता.
इथे अगदी भरपूर दगडगोटे असले, माळरान असले तरी या जागेभोवती तिन्ही बाजूला छोट्या-मोठ्या टेकड्या होत्या. त्यातच उलट्या पेल्याचा आकार असलेली एक छोटीशी टेकडी या जमिनीच्या अगदी मधोमध होती. या टेकडीवर एक चार बाय चार फुटांचा ओबडधोबड दगडी चबुतरा होता आणि त्यावर शेंदरी रंगातले मांढरदेवी काळूबाईचे ठाणे होते. दर मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला गावातले लोक देवीच्या दर्शनाला येत.
उन्हाळ्यात जरी हे रान उघडेबोडके दिसत असले तरी पावसाळ्यात मात्र इथून हिरव्यागार डोंगररांगाचे मोहक दृश्य दिसायचे.
मागच्या बाजूला नाथाचा डोंगर, समोर पावसाळ्यात वाहणारी रुद्रगंगा नदी, पलीकडे दिसणारा हरणी महादेव आणि पेला टेकडीवरून जरा दूर नजर टाकली तर थेट जेजुरीच्या कडेपठाराचे दर्शन व्हायचे. त्यामुळे श्रीपतीच्या वडिलांचा या तुकड्यावर खूप जीव होता आणि आता श्रीपतीलाही ते रान तेवढेच प्रिय होते…
विमानतळ झाल्यावर या भागाला नक्कीच महत्त्व येणार होते. शिवाय या रस्त्यावर मागे-पुढे वीस किलोमीटर अंतरात पेट्रोलपंप किंवा एकही ढाबा नव्हता. एकदा का या रस्त्यावर वर्दळ वाढली की इथे एखादा व्यवसाय उभारून भरपूर कमाई करता येईल याचा त्या पुण्याच्या शेठला पक्का अंदाज आलेला होता. त्यामुळेच ही जमीन कशीही करून त्याला हवी होती.
मोहनरावला या व्यवहारात मोठी दलाली मिळणार असल्याने तो सतत श्रीपतीचा पिच्छा पुरवत होता. त्याला बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने जास्त रकमेची लालूच दाखवत होता पण आपल्याला आपली ही जमीन विकायचीच नाही यावर श्रीपती ठाम होता.
तो आहे त्या परिस्थितीत सुखी होता.
त्याच्या पांडुरंगभक्त वडिलांची आठवण म्हणून ते माळरान त्याला जपायचे होते. पालखीचा तळ इथे पडला की तेथेच आसपास दादा वावरतात असा त्याचा विश्वास होता.
श्रीपती जमीन द्यायला तयार नाही असे समजल्यानंतर मागच्या आठवड्यात शेठजीने मोहनरावला फोन करून आपली ऑफर आधीपेक्षा दीडपट केली आणि ‘कसंही करून ती जमीन मला मिळवून दे’ असं सांगितलं होतं.
त्या दिवसापासून तर मोहनराव सकाळ-संध्याकाळ श्रीपतीचे डोके अजूनच खायला लागला होता. श्रीपती मात्र नम्रपणे ‘आपण जमीन विकणार नाही’ हे पुन्हा पुन्हा त्याला सांगत होता.
एवढी मनधरणी करूनही श्रीपती जमीन विकायला तयार नव्हता. ‘रेट वाढवून देतो’ म्हटलं तरी तो बधत नव्हता याचा खरंतर मोहनरावला प्रचंड राग आला होता पण इथे रागावून उपयोग नव्हता. गोड बोलूनच हे काम करावं लागणार होतं याची त्याला जाणीव होती.
मोहनराव एक मुरलेला दलाल होता. जादा पैशाची लालूच दाखवली की भल्याभल्यांना त्याचा मोह होतो आणि भावना गुंडाळून ते जमीन विकायला तयार होतात हे त्याला अनुभवाने माहीत होते. इथे श्रीपतीवर मात्र ही मात्रा उपयोगी पडत नव्हती.
जसा जसा उशीर होत होता तशी त्याला अजूनच श्रीपतीची चीड येत होती. श्रीपतीला पटवण्यासाठी, त्याच्यावर दबाव आणण्यासाठी मोहनराव वेगवेगळे डाव टाकत होता. मोहनरावने सुरुवातीला गावच्या पोलीस पाटील आणि सरपंचाला हाताशी धरून श्रीपतीचे मन वळवण्याचा प्रयत्न करून बघितला तरी काहीही उपयोग झाला नाही. आता मात्र मोहनराव अजूनच पेटून उठला. त्याने ‘श्रीपतीला काहीही करून जमीन विकायला भाग पाडायचेच’ असा मनाशी ‘पण’ केला.
आता वेळप्रसंगी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर तो यासाठी करणार होता.
आता हा प्रश्न त्याने चांगलाच प्रतिष्ठेचा केला.
त्याची कुटील बुद्धी आता वेगळ्याच दिशेने काम करायला लागली. कितीही वेळ गेला तरी चालेल पण आज ना उद्या तो श्रीपतीला जमीन विकायला भाग पाडणार होता.
श्रीपतीला सख्खा भाऊ नव्हता. विठ्ठलरावांना श्रीपती आणि सिंधू अशी दोन अपत्ये होती. सिंधूचे पंधरा वर्षापूर्वीच लग्न झालेले होते. सातार्याजवळ मेढा गावात एका कष्टाळू शेतकरी कुटुंबात तिचे सासर होते. खाऊन पिऊन सुखी असलेल्या घरात ती अत्यंत सुखाने नांदत होती. श्रीपतीचा आपल्या या धाकट्या बहिणीवर खूप जीव होता. वर्षातून निदान दोन-तीन वेळा तरी जत्रा वा दिवाळीच्या निमित्ताने या बहीण-भावांची स्नेहभेट व्हायची.
श्रीपती सरळ मार्गाने बधत नाही हे पाहून मोहनरावने आता आपला मोर्चा सिंधूकडे वळवला. काहीतरी निमित्त काढून तो सिंधूच्या गावाला चक्कर मारून आला. ‘सहजच या भागात आलो होतो तर भेटून जावे असा विचार केला’ अशी बतावणी करून तो सिंधूच्या घरीही जाऊन आला. कुणाला सुगावा लागू नये अशा बेताने गावातल्या पारावर पडीक असलेल्या मंडळींबरोबर त्याने गट्टी केली. त्यांच्याशी बोलता बोलता त्याने सिंधूच्या कुटुंबाबद्दल बरीच माहिती जमा केली.
सिंधू खाऊन पिऊन सुखी होती. तिचा नवरा आणि ती शेतीत भरपूर कष्ट करून, राबून तरकारीचे पीक घ्यायचे. त्यांच्याकडे असलेल्या उत्तम बागायती शेतीतून पिकलेली हिरवीगार तरकारी व फळे सातारा मार्केटमध्ये नेहमीच चांगला भाव खायची. भरपूर रोकडा उत्पन्न मिळत असल्याने या कुटुंबाला कधी पैशाची ददात नसायची.
त्या कुटुंबाबद्दल जी माहिती मिळाली होती त्यामुळे मोहनराव थोडा नाराज झाला होता. त्याचा आत्तापर्यंतचा अनुभव सांगत होता की समोरची पार्टी जर आर्थिकदृष्ट्या गांजलेली वा कर्जबाजारी असेल तर टाकलेले फासे सहसा फसत नाहीत पण सिंधूचे कुटुंब बर्यापैकी सधन आणि सरळमार्गी होते. इथे टाकलेला डाव यशस्वी होईलच याची त्याला खातरी नव्हती पण सहजासहजी हार मानणे हा मोहनरावचा स्वभाव नव्हता.
त्याने पुण्याला जाऊन शेठजीला या गोष्टींची कल्पना दिली आणि या व्यवहारासाठी भरपूर वेळ मागून घेतला.
अजून काय काय करता येईल यावर तो विचार करायला लागला. सिंधूच्या कुटुंबाला कळणार नाही अशा बेताने मोहनराव तिच्या गावात वारंवार जायला लागला. त्या गावातल्या पारावर कायम पडीक असलेल्या काही माणसांना पैशाची लालूच दाखवून त्याने हाताशी धरले.
श्रीपतीचा मेहुणा आठवड्यातून तीन-चारदा तरी सातारा शहरात मार्केटमध्ये जायचा. मोहनरावने फितवलेली माणसे सातार्यात गेलेल्या त्या पाहुण्याच्या अवतीभवती वावरू लागली. त्याच्याशी सलगी करू लागली. सुरुवातीला गप्पागोष्टी आणि चहापाणी व्हायचे. दिवसेंदिवस त्यांची सलगी वाढत गेली आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.
या डावाचा पुढचा भाग सुरू झाला.
आता श्रीपतीचा मेहुणा या लोकांबरोबर सुरुवातीला त्यांची संगत करायला म्हणून दारूच्या गुत्त्यावर रमायला लागला. संगतीने थोडी थोडी करत श्रीपतीचा मेहुणाही दारू प्यायला लागला आणि या सरळ-साध्या कुटुंबात दारूचा शिरकाव झाला.
दारूने त्याच्यावर अंमल गाजवायला सुरुवात केली.
मोहनरावने विचारपूर्वक टाकलेला डाव हळू हळू यशस्वी व्हायला लागला होता.
कोणताही व्यसनी माणूस सर्वात जास्त त्याच्यासारख्या व्यसनी माणसांवर विश्वास ठेवत असतो. प्रसंगी त्यांचे तो काहीही ऐकतो किंबहुना त्याच्यासाठी घरच्या माणसांपेक्षा हे तथाकथित मित्रच जास्त चांगले असतात! दारूड्यांच्या या मानसिकतेचा वापर मोहनराव नेहमीच करायचा. इथेही आता मोहनरावचे काम अजून सोपे झाले होते. ‘सिंधूने जर तिच्या माहेरच्या जमिनीत हिस्सा मागितला तर लाखो रुपये तुझ्या खिशात सहज येतील’ ही गोष्ट पद्धतशीरपणे सिंधूच्या नवर्याला पटवण्यात मोहनराव कमालीचा यशस्वी झाला.
हळूहळू सिंधुबाईच्या घरात माहेरी वाटणी मागण्यावरून धुसफूस होऊ लागली. दिवसेंदिवस हे वाद विकोपाला जायला लागले. सुरूवातीला या गोष्टीला सिंधूने ठामपणे विरोध केला. दररोज सिंधूला तिच्या नवर्याकडून कधी नशेत असताना तर कधी शांतपणे तिने माहेरी वाटणी मागितली नाही तर आपले लाखो रुपयांचे नुकसान कसे होते आहे हे परत परत सांगितले जात होते. तिच्या माहेरच्या जमिनीवर असलेल्या कायदेशीर अधिकाराची जाणीव पुन्हा पुन्हा करून दिली जात होती.
‘‘तू आताच जर हालचाल केली नाहीस ना, तर श्रीपती ती जमीन विकून लाखो रुपये घेऊन रिकामा होईल, तोपर्यंत उशीर झालेला असेल!’’ याशिवाय ‘‘आपली परिस्थिती तशी बरी असली ना तरी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र सोडून जास्तीचा एकही सोन्याचा दागिना मी घालू शकलेलो नाही. या व्यवहारात चार पैसे जास्तीचे मिळाले तर तुझी दागिन्यांची भरपूर हौस होईल, आपल्यालाही थोडीफार मजाहजा करता येईल’’ असाही विचार सिंधूच्या मनात बिंबवायला तिच्या नवर्याने सुरुवात केली.
आपला नवरा सांगतो त्यात तथ्य असल्याचा साक्षात्कार आता सिंधूला झाला आणि एक दिवस सिंधूलाही त्या मिळू शकणार्या लाखो रुपयांचा लोभ सुटला. सिंधूने माहेरी जाऊन श्रीपतीकडे सरळ हिश्याची मागणी केली. श्रीपती तिला समजावू लागला पण सिंधू ऐकायला तयार नव्हती.
आता एक पर्याय म्हणून श्रीपतीने त्याच्या भावकीतल्या वडीलधार्या मंडळीबरोबर मिटिंग बोलावली आणि त्यांनी सिंधूला समजावून सांगावे अशी विनंती केली.
श्रीपतीच्या वाईटावर आधीच टपून बसलेल्या लोकांसाठी उलट ही पर्वणी होती. मिटिंगमध्ये चर्चेचा फार्स करून भावकीच्या पंच मंडळीने ‘हा बहीण भावातला आपसातला मामला आहे, तेव्हा त्यांनीच मार्ग काढावा, नाहीतर कायद्याचा सल्ला घ्यावा’ असे सांगितले.
रवींद्र खंदारे यांचे गाजलेले ‘संघर्ष हेच सामर्थ्य’ आत्मचरित्र मागण्यासाठी येथे क्लिक करा
आता मात्र सिंधू वाटणीसाठी काट्यावर येऊन भांडायला लागली. कोर्टात जायची धमकी देऊ लागली. अख्खी भावकीही सिंधूलाच पाठीशी घालून चिथावणी देत आहे हे पाहून श्रीपती मनाने पुरता खचला. त्याने आपल्या बहिणीची खूप विनवणी केली. आईवडिलांची शपथ घालून तिला हात जोडले पण तिला आता फक्त आणि फक्त मिळणारा पैसा दिसत होता.
जमिनीच्या ‘त्या’ तुकड्यापायी बहीण-भावाच्या प्रेमळ नात्यात कटुता आली होती. कोर्टकचेरीची भाषा होऊ लागली होती. या जमिनीपायी आपली बहीण दुरावते आहे, तिचे ऐकले नाही तर आता कोर्टाची पायरी चढावी लागणार, गावात या वादाची भरपूर चर्चा होणार, आपली बदनामी होणार या कल्पनेनेच सरळमार्गी श्रीपती हादरला. आधीच या जमिनीमुळे त्याची मन:शांती संपूर्णपणे ढळली होती. श्रीपती आता मानसिकदृष्ट्या थकला होता. तो मनाशी विचार करू लागला, झाला तेवढा तमाशा खूप झाला. परमेश्वराची जी इच्छा असेल तसेच होणार…
त्याची आपल्या धाकट्या बहिणीवर खूप माया होती…
सिंधूला नाराज करून तो आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नव्हता. बस्सऽऽ ठरलं…! जमीन विकून अर्धा हिस्सा सिंधूला देऊन टाकायचा! त्याने आकाशाकडे पाहून पांडुरंगाला हात जोडले.
‘‘पांडुरंगा मला माफ कर!’’
त्याच्यासमोर विठ्ठलरावांचा चेहरा आला.
‘‘दादा, मी हरलोय. या नालायक श्रीपतीला माफ करा.’’ त्याने दोन्ही हात उंचावून आपल्या वडिलांची माफी मागितली आणि डोळ्यातले अश्रू पुसले. त्याच दिवशी त्याने मोहनरावला जमिनीच्या विक्रीचे पेपर तयार करण्यासाठी निरोप धाडला.
आज या क्षणी एक दलाल जिंकला होता आणि काळ्या आईचा एक सच्चा भक्त नात्यांपुढे आणि प्राप्त परिस्थितीपुढे हतबल होऊन शरण गेला होता, संपूर्णपणे हरला होता…!
– प्रल्हाद दुधाळ, पुणे
‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक २०२३
ही कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी चपराकचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा!