गरज पर्यावरणीय अणीबाणीची…

Share this post on:

जागतिक तापमान वाढ (Global Warming) आणि वातावरण बदल (Climate Change) हे आता सर्वच माध्यमांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी रोजच्या परिचयाचे शब्द होऊन बसले आहेत परंतु त्यांच्या परिणामांच्या खर्‍या स्वरूपाची ओळख किंवा त्यांच्या परिणामांच्या दाहकतेचा अंदाज काही तुरळक अपवाद म्हणजे अपूर्णांकातली लोकसंख्या वगळता अजून बहुतांश लोकसंख्येला आलेला नाही.

आजमितीला जीवसृष्टीच्या आणि जीवनासमोर उभ्या ठाकलेल्या या निर्णायक आव्हानाच्या उंबरठ्यावर संपूर्ण मानवजात येऊन ठेपली आहे. केवळ मानव नव्हे तर पृथ्वीवरील समग्र जीवसृष्टीच धोक्यात आलेली आहे. आज गेल्या 58 वर्षामध्ये पृथ्वीवरील 50 टक्क्यांहून अधिक जंगले आणि नैसर्गिक साधन संपत्ती आपण नष्ट केलेली आहे. त्यासाठी आपण केवळ झाडेझुडपे, वेलीच नव्हे तर इतर अनेक पशु, पक्षी, कीटक, जीवाणू आणि अगणित ज्ञात-अज्ञात निष्पाप जीवांच्या जिवाचीही पर्वा केलेली नाही.

पृथ्वीवरील प्राणवायू व पाणी आणि एकंदरीत जगण्यासाठी सर्वच आवश्यक घटक आणि जगण्याच्या एकूण परिस्थितीच्या आपण मुळावर उठलेलो आहोत. आता आपण आपला हव्यास कमी केला नाही तर पृथ्वीवरील उर्वरित 50 टक्के जंगले, नैसर्गिक जीवनावश्यक साधन सामग्री, प्राणवायू, पाण्यासहित जगण्यास योग्य वातावरण जेमतेम दोन-तीन दशकात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर मानवी जीवन शिल्लक राहील किंवा न राहील याची कोणतीही शाश्वती नाही.
आपल्या येणार्‍या पिढ्यांच्या म्हणजेच दुसर्‍या-तिसर्‍या कुणाच्या नव्हे तर आपल्याच मुलाबाळांच्या आणि त्यांच्या मुलाबाळांना भविष्यात जगण्यासाठी पूर्णतः अयोग्य म्हणजे नरकप्राय वातावरण या पृथ्वीवर आपण सोडून जाणार आहोत.
1870 मध्ये आलेल्या यांत्रिक युगानंतर सुरुवातीच्या काळात नैसर्गिक साधन संपत्तीच्या होत असलेल्या हानीबद्दल इतकी कल्पना राज्यकर्ते, तंत्रज्ञांना वा समाजाला आली नाही परंतु 1960 नंतर तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व प्रगतीने औद्योगीकरणाला, दळणवळण यंत्रणा, मुलभूत सुविधांच्या विकासाला आणि वाहन उद्योगाला प्रचंड वेग आला. त्यासाठी प्रचंड प्रमाणात जंगलतोड, खनिज उत्खनन, तेल विहिरीतील इंधन व त्याचे शुद्धीकरण प्रकल्प, सिमेंटनिर्मिती प्रकल्प व वीजनिर्मितीसाठी दगडी कोळश्याचा प्रचंड प्रमाणात वापर सुरू झाला. या सर्वांच्या वापरामुळे वातावरणातील हरित वायू म्हणजे कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, मिथेन इत्यादी वायूंचे प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढू लागले असल्याचे दिसून आले.
1980 च्या सुमारास जगभरातील वैज्ञानिक समूहाला प्रदुषणामुळे होऊ घातलेल्या उत्पाताची प्रथम कल्पना आली. वैज्ञानिक समूहाकडून सर्व देशांच्या राज्यकर्त्यांना त्या संबंधीची सूचना लेखी स्वरुपात देण्यात आली होती. तसेच समाजालाही या संभाव्य धोक्याची कल्पना प्रसार माध्यमांद्वारे देण्यात आली होती परंतु तंत्रज्ञानाच्या नवनवीन उत्तुंग आविष्कारांच्या कोलाहलामधून कोणालाही त्या वास्तवाकडे लक्ष देण्याची फारशी इच्छा झाली नाही. कालांतराने विज्ञानवादी समूह आणि शास्त्रज्ञ समूहाने केलेली भाकिते काही अंशी खरी होऊ लागलेली दिसू लागली.
या विषयावरील पहिली जागतिक परिषद फेब्रुवारी 1979 मध्ये जीनीव्हा येथे वर्ल्ड मेटीऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघाने प्रायोजित केली होती आणि त्या नंतरही 2019 अखेर डझनभर परिषदा भरविल्या गेल्या, करार केले गेले, तरीसुद्धा या समस्येच्या मुळाशी जाण्याची मानवाचे प्रतिनिधित्व करणार्‍या समुदायाची इच्छा अजिबात दिसून येत नाही.
आपल्यापैकीच कोण्या एका समूहाने ठरवलेली जीवनपद्धती स्वीकारताना आणि त्याला लागणारी सामग्री निसर्गाकडून घेत असताना निसर्गाच्या नैसर्गिक निर्मितीक्षमतेचे स्रोेतही आपण नष्ट करत आणले आहेत. निसर्गाच्या त्या नैसर्गिक निर्मितीक्षमता शिल्लक राहाव्यात व येणार्‍या आपल्याच पिढ्यांसाठी त्या तशाच कार्यरत राहाव्यात याची कोणतीही तजबीज आपण केलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या भवितव्याची कल्पना असूनही किंवा आजवर विविध माध्यमातून ती सुस्पष्टपणे मिळूनही आपण त्या भविष्याकडे गांभीर्याने पाहणे तर सोडाच चक्क कानाडोळा करत आलो आहोत.
आजचीच जगण्याची आव्हाने इतकी मोठी आहेत की या भविष्यातील नव्या आव्हानांकडे कोण आणि केव्हा बघणार? असा प्रश्न विचारला जातो. ही सबब रास्त आहे पण पुढे वाढून ठेवलेलं भविष्यही अजिबात टाळता येण्यासारखं नाही. आजची जगण्याची आव्हाने म्हणजे शेवटी त्याच सर्वनाशाकडे घेऊन जाणार्‍या जीवनशैलीमध्ये आपले अस्तित्व टिकले पाहिजे या विचारचक्रात अडकून पडून तिच्यात तग धरण्यासाठी चालू असलेली धडपड आहे. याचे भान आता यायलाच हवे. ऑगस्ट 2018 नंतर अचानक काही बातम्या कानी येऊ लागल्या.
एक 16 वर्षाची मुलगी जिला वातावरण बदल आणि पर्यावरणीय अणीबाणी आणि तिच्या परिणामांची दाहकता अभ्यासाअंती प्रथम जाणवली. ती स्वीडनच्या संसदेबाहेर एकटीच निदर्शन करते आहे. तिच्या हातामध्ये एक फलक आहे त्यावर लिहिले आहे ‘वातावरण अणीबाणीसाठी शाळा बंद’. त्या मुलीचं नाव आहे ग्रेटा थनबर्ग! लोकांना या विषयी सजग करण्यासाठी तिच्याकडे माहितीपत्रके आहेत, जी ती येणार्‍या जाणार्‍या सर्व लोकांना वाटते आहे. लोकप्रतिनिधींना भेटते आहे. त्यांना परिस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न करते आहे.
सुरुवातीला ग्रेटाच्या त्या कृतीकडे सर्वांनीच नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. हळूहळू तिच्या थेट संवाद साधण्याच्या शैलीने तिच्या वयाच्या काही मुलांना विशेषत: तिच्या पालकांना तिचे म्हणणे ऐकू येऊ लागले.
जगभरातल्या राजकारण्यांना तिच्या भाषणातून थेट प्रश्न विचारण्याच्या तिच्या शैलीने तिची कीर्ती अल्पावधीत जगभर वार्‍यासारखी पसरली. जगातील सर्वच प्रौढ लोकांना ती सांगते की, ‘‘मी अशा प्रकारचे निदर्शन शाळा बुडवून करते आहे कारण तुम्ही माझ्या भविष्याचे वाट्टोळे करण्याचे काम करत आहात.’’ वातावरण अणीबाणीबाबत ताबडतोब कृती करावी अशी मागणी ग्रेटा जगभरातल्या राज्यकर्त्यांना आक्रमकतेने करते. जसजशी तिच्या आंदोलनाची माहिती सर्वदूर पसरत गेली, तसा वातावरण बदलाविषयी असलेल्या आंदोलनाला वेग येऊ लागला. ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या नावाने हे आंदोलन ओळखले जाऊ लागले. जगभरातील लाखो युवा वर्गातील मुले व मुली फ्रायडेज फॉर फ्युचर या आंदोलनात सहभागी होऊन ताबडतोबीने यावर उपाययोजना करण्याबाबत आग्रही बनले आहेत.
24 मे 2019 रोजी जगातील पहिले मोठे निदर्शन आयोजित केले गेले. या मध्ये 130 देशातल्या लाखो युवक युवतींनी सहभाग घेतला. 27 सप्टेंबर 2019 मध्ये जगभरातून सुमारे 50 लाख युवकांनी व नागरिकांनी या आंदोलनात भाग घेतला आणि दिवसेंदिवस या आंदोलनात भाग घेणार्‍या लोकांची संख्या वाढतच आहे. विशेषत: या आंदोलनाचे नेतृत्व युवा पिढी करते आहे, हेच अतिशय लक्षवेधक आणि उत्साहवर्धक आहे कारण त्यांच्या त्यामागील शुद्ध हेतूबद्दल कोणतीच शंका घ्यायला जागा नाही. त्याचा परिणाम असा झाला की, सध्याच्या जीवनशैलीच्या विचारप्रवाहाच्या रेट्यामधून स्वत:ला बाहेर काढून या विषयाला कशी आणि कुठून सुरूवात करावी या संभ्रमावस्थेत अडकून पडलेल्या सुशिक्षित लोकांना एक रस्ता दिसू लागला आहे. असे चित्र आजच्या या जगभर चाललेल्या आंदोलनाला मिळणार्‍या प्रतिसादामधून दिसू लागले आहे.
कोणत्याही जनआंदोलनाचे स्थूल उद्दिष्ट, आंदोलनाचे कारण अथवा ती सामाजिक समस्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे व त्याला सामाजिक भान मिळवून देणे हे असते. त्या प्रमाणेच फ्रायडेज फॉर फ्युचर हे जनआंदोलन वातावरण बदलाच्या परिणामांविषयी सजगता आणणे व उपाय योजनांना सामाजिक स्वीकृती निर्माण करणे, त्या परिणामांतून सर्व जीवसृष्टीला बाहेर काढण्यासाठी कराव्या लागणार्‍या उपाय योजनांसाठी पक्की मानसिक बैठक तयार करणे हेच आहे. परिवर्तनाविषयी मानसिक बैठक तयार झालेल्या समाजाला पर्यावरणाशी संबधित एक किंवा अनेक प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन त्या नेमक्या क्षेत्रातील पर्यावरण पूरकता पुनर्स्थापित करण्यातील वेग वाढवण्यास सहाय्यभूत ठरावी असे आश्वासक चित्र या आंदोलनाला मिळणार्‍या प्रतिसादातून दिसते आहे.

‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा !

आजवरच्या पर्यावरण चळवळीमध्ये कृती व जनजागृती यांची सरमिसळ झालेली दिसून येत असे. प्रकल्प राबवण्यात वेगवेगळे लहान-मोठे गट कार्यरत आहेत आणि ते अधिकाधिक प्रकल्प यशस्वी करत आहे. ते सारे प्रकल्प व्यक्तीसापेक्ष किंवा मर्यादित समूहसापेक्ष आहेत. त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ज्यांना या समस्येचं गांभीर्य सर्वप्रथम समजले अशा समाजातील काही द्रष्ट्या लोकांकडून हे प्रकल्प निर्माण केले गेले. वैयक्तिक पातळीवर सुरू असलेले वनीकरणाचे प्रकल्प, नैसर्गिक शेती, जमिनीखालील जलस्त्रोताचा स्तर वाढविण्यासाठी सुरू असलेले लोक प्रकल्प, पर्यायी ऊर्जा निर्मिती, वैयक्तिक स्तरावरील संशोधने असे हजारो प्रकल्प जगभर सुरू आहेत. प्रत्येक प्रकल्प आपापल्या परीने ज्ञानामध्ये आणि प्रयोगशील कृतीमध्ये भर घालीत आहे. हे सर्व प्रकल्प वेगवेगळ्या संदर्भांच्या परिघात, वेगवेगळ्या भौगोलिक, सांस्कृतिक, नैसर्गिक वातावरणीय परिस्थितीत वेगवेगळ्या उद्देशाने राबविले जात आहेत. आजपर्यंत केल्या गेलेल्या संशोधनातून एकात्मिक निसर्गपोषक जीवनप्रणालीसाठी विपुल शोध लावले गेले आहेत. या सर्व शोधांमधून मानवजातीसाठी सर्वसमावेशक व एकात्मिक जीवनशैली निवडता येऊ शकते. आज या मितीला आपण सामाजिक, भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीचे भान बाळगून पर्यावरणावर अतिरिक्त बोजा पडणार नाही, अशीच निसर्गाशी समतोल साधून केलेली जीवनशैली अंगिकारता येईल इतके विपुल संशोधन झाले आहे आणि उपलब्धही आहे.
कोणत्याही समस्येवर वरवरचे उपाय काढून पुन्हा दुसर्‍या समस्यांना जन्म देणे आणि पुन्हा त्या समस्येवर नवीन उपाय शोधून त्या उपायामुळे पुन्हा नव्या समस्येला जन्म देत पुन्हा उपाय शोधून काढणे अशा दुष्टचक्रातून मानवजात बाहेर पडायला हवी. त्यासाठी निसर्गपोषक एकात्मिक जीवनशैली निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच, सगळ्या जगाला पर्यावरणीय अणीबाणी जाहीर करायला लावेल, अशा मानवी समूहाची आज आवश्यकता आहे.

– श्रीराम ग. पचिंद्रे
ज्येष्ठ संपादक, कोल्हापूर

‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक २०२३

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी चपराकचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा!

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!