देवपूजा – सुनील भातंब्रेकर, पुणे

‘जय जय रघुवीर समर्थ’!!
‘र्थ’ वर जोर देऊन त्याने पूजेची सांगता केली. पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून नमस्कार केला. आसनाची घडी करून शेल्फमध्ये ठेवली आणि कपडे बदलायला आतल्या खोलीत ‘झाली बाबा एकदाची देवपूजा’ असे पुटपुटत गेला. दोन्ही मुलं अजून सोफ्यावर लोळत पडलेली. दोघांना यथेच्छ शिवीगाळ करून झाल्यावर त्याचा मोर्चा पत्नीकडे वळला. तिथे अजून अर्धवट तयारी झालेली दिसल्यावर उरलेली शिवीगाळ तिथे झाली. मुलांनी त्रासिक चेहर्‍याने ऐकून घेतले होते पण पत्नीने प्रतिवार केले आणि मघाशी चकाचक केलेल्या देवमूर्तीपुढे छानशी शाब्दिक चकमक उडाली.
हे सारे नित्य असते. घरातल्या सदस्यांनाच काय देवालाही ह्याची सवय झाली असणार. देवासमोर गंभीर स्वरात ‘ओम शांती: शांती: शांती:’ म्हणायचे आणि क्षणात घरात ‘अशांती अशांती अशांती’ होईल असे काहीतरी बोलायचे. हेही प्रत्येक घरात नित्याचे असले तरी ‘शांती: शांती:’ म्हणत देवपूजा करायचे कोणी थांबवत नाही.
पूर्वीच्या काळी देवपूजेसाठी देवघरांसाठी चक्क एक संपूर्ण खोली असायची. कॉम्पॅक्टनेसच्या नावाखाली आणि आर्थिक कारणामुळे देवघराचा देव-कोपरा झाला. काही ठिकाणी कोपराही अशक्य असतो. म्हणून तिथे देव स्टँड आले. अगदीच तेही अशक्य असले तर देवाचे एक-दोन फोटो तरी अत्यावश्यक असतात.
आमच्या लहानपणी जेव्हा इंटेरिअर डिझाईन ह्या शब्दाचा व त्याच्या वापराचा उगम व्हायचा होता, तेव्हा घराच्या सजावटीची रचना साधी, सरळ होती. पहिल्यांदा जी काही सजावट करायची ती फक्त बैठकीच्या खोलीत म्हणजे – दिवाणखान्यात. ह्या बैठकीच्या खोलीला ‘दिवाणखाना’का नाव पडले असावे, हे कोडे मात्र उलगडत नाही. कुठल्यातरी राजमहालातला खरोखरचा लॉन टेनिस वगैरे खेळता येईल एवढा प्रचंड दिवाणखाना बघितल्यावर ह्या आपल्या दहा बाय बाराच्या खोलीला दिवाणखाना म्हणणे म्हणजे डोक्यावरच्या पांढर्‍या चेपलेल्या टोपीला हिरेजडित मुगूट म्हटल्यासारखे होते किंवा शिकरणाला पंचपक्वान्न म्हणण्यासारखे.
ह्या दिवाणखान्यात प्रामुख्याने असायचे ते देवांचे फोटो. त्यात पंचायतनातले प्रभू रामचंद्र, गुरुदेव दत्त, महादेव, तुळजाभवानी किंवा कोणतीही इतर देवी, देवदेवतांच्या सोबतीला महात्मा गांधी, नेहरू, गुंड्याचा ससा, एखादे भरतकाम, कोणीतरी काढलेले भारताच्या झेंड्याचे किंवा फुलांचे फ्रेम केलेले चित्र अशी सारी मांदियाळी दाटीवाटीने असे. एवढे देवांचे फोटो बघून एखाद्याला आपण बैठकीच्या खोलीत बसलो आहोत का देवघरात अशी शंका येणे रास्त होते.

खुद्द देवघरही साधे असे. त्यातल्या प्रत्येक फोटोला, मूर्तींना, देवघरातल्या वस्तूंना एक संस्मरणीय व श्रवणीय असा इतिहास वा कहाणी असे. ‘अरे, ही घंटा माझ्या आजोबांनी म्हणजे तुझ्या पणजोबांनी काशीयात्रेला पायी गेले होते तेव्हा आणलीय. थेट काशीहून! वाटलं काय तुला? ही देवाची छोटी डबी आमच्या एका लांबच्या मावसभावाच्या ओळखीचा कारागीर होता, त्याच्याकडून बनवून घेतलीय. नक्षीसहित. केवढ्याला असेल? दीड आण्याला! सांग आता!! ही गणेशाची पितळ्याची मूर्ती किनई माझ्या आईची आई माझ्या लग्नानंतर सासरी आली ना तेव्हा स्वतः घेऊन आली होती. किती पिढ्या जुनी आहे कोणास ठाऊक? माझ्या हस्ते पूजा व्हायची होती तिची!’ – अशा डोळ्याच्या कडा ओलावणार्‍या कथा असत.
घरात देवपूजा कोणी करावी, ह्याला मात्र कुठलेही ठोस असे तार्किक वा धार्मिक उत्तर नसते. ज्याला वेळ आहे, आवड आहे, श्रद्धा आहे असं कोणीही करतं. प्रत्येकाची रीत वेगळी. कोणी साग्रसंगीत, प्रत्येक फोटोची व मूर्तीची जिवाभावाने पाहणी करत पूजा करी. त्यात बाळकृष्णाच्या छोट्या मूर्तीच्या गळ्यातली त्याहून छोटी माळसुद्धा स्वच्छ केली जाई. स्नानानंतर पुसायचे वस्त्र स्वतंत्र लागत असे. पळीपात्र, ताम्हण, घंटी ह्या सगळ्या वस्तूंना चकचकीत ठेवले जाई. पूजा चालू असताना ठरावीक मंत्रोच्चारण होई. त्यात कित्येक ठिकाणी चुकीचे शब्द असत पण कोणीही ते दुरुस्त करायच्या भानगडीत पडत नसत.
एखाद्या घरात सात्त्विक स्वभावाचे व परस्परांमध्ये संपूर्णपणे एकरूप झालेले वयोवृद्ध जोडपे जोडीने पूजा करते. ते मात्र विलोभनीय असते. म्हणजे पूजा करत असतात तात्या किंवा आबा पण त्यांच्या पूजेच्या प्रवाहाच्या प्रत्येक पावलावर त्यांना लागणार्‍या जिनसा तत्परतेने देणार्‍या त्यांच्या अर्धांगिनी असत. तिकडे पूजेत स्नानाची घंटा वाजली की, इकडे अष्टगंध उगाळायला सुरुवात होई. मूर्ती आपापल्या जागेत स्थानापन्न होत असतानाच नैवेद्याची वाटी शेजारी आली असे. ‘नैवेद्यम समर्पयामि’ संपेपर्यंत निरांजनात वात, तूप टाकून ज्योत पेटवायची वाट पाहत असे. कोणीही कुणाला सूचना देणं नाही, चिडचिड नाही, ‘अजून तयार नाही? काय हे? झोपा काढता का तुम्ही?’ असले डाफरणे नाही. सुरेख समन्वय साधलेली ही पूजा खरी देवपूजा वाटे.
पूजेमधले निरांजन वा समई प्रज्वलित करणे हे तसे नाही म्हटले तरी कौशल्याचे काम असते. त्यात त्याची वात बरोबर मोगर्‍याच्या कळीएवढी नाजूकशी ठेवली की, अधिक काळ प्रज्वलित राहते पण ती तेवढीच ठेवणे भल्याभल्यांना जमत नाही. ती ज्योत थोडी कमी जास्त झाली की, घरातली आजी लगेच पुढे सरसावून ती वात सारखी करे. तसंच उदबत्ती लावणे. भडाभडा पेटवून बोटभर उदबत्ती लावण्याआधीच संपवणे हे ‘पूजा करण्यात तुम्ही अजून अननुभवी आहात’ हे सांगून जाते. फोटोच्या हाराची लांबी ठरवणे ही देखील तुमची सौंदर्यदृष्टी दाखवते. तोकडा हार किंवा फोटोखाली पाटावर लोळणारा हार हे दोन्ही दिसायला थोडे तरी खटकतात.
स्वच्छ मूर्ती, फोटो, सुरेख हार फुलांची आरास, शांतपणे थरथरणार्‍या समई-निरांजनातल्या ज्योती, उदबत्तीचा मंद सुगंध आणि समोर मनोभावे ठेवलेला नैवेद्य हे दिसल्यावर कोणाही सश्रद्ध  माणसांचे हात नकळत जोडले जातात.
उरकलेल्यासारखी केलेली पूजा त्या देव्हार्‍यात नजर टाकल्या टाकल्या कळते. तिथे फुलं कशीही पडलेली असतात. काही काही फुलं तर खाली डोकं वर पाय म्हणजे खाली फुलं वर देठाचा भाग अशी असतात. निरांजनातल्या दोन वाती एकत्र आल्यासारख्या वाटतात पण त्या तशा नसतात. मूर्तीच्या कपाळावरचे गंध नको तेवढे पाणी लावल्यामुळे कपाळभरच काय नाकावरही ओघळलेले असते. समयांच्या वरची बाजू जर आच्छादीत असली तर काळवंडलेली असते. तिच काय देव्हाराही वाकून बघितल्यावर खालून काळवंडलेला असतो. देव्हार्‍यातल्या छोट्या ड्रॉवरची गुंडी उडालेली असते – असे अजून बरेच. अशा घरात देवाला राहायला किती कठीण जात असेल?
काही श्रीमंत घरात देवपूजा ही सब-कॉन्ट्रॅक्टेड असते. म्हणजे रोज देवपूजेला एखादी अधिकारी व्यक्ती येऊन पूजा करत असते. ही पूजा करणे व करवून घेणे हे किती हृद्य, सश्रद्ध व सुंदर मानलं तरी त्या पूजेत एखाद्या महागड्या डायनिंग हॉलमधल्या पदार्थांचा तोच तोचपणा जाणवतो. अशी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने होते. पूजा छान मांडलेली असते. सर्व साहित्य लखलखत्या चांदीचे असल्याने मनालाही प्रसन्नता वाटते. घरातल्या एखाद्या दुसर्‍या व्यक्तीसाठी ही पूजा आत्मिक समाधान देणारी असली तरी इतरांसाठी तो कुठेतरी व्यवहार असतो. एक-दोन दिवस पूजेत खाडा झाला तरी त्याला खडे बोल सुनावले जातात आणि मग ते धर्मकांड न राहता कर्मकांड होऊन बसते.
काहीजण पूजा करताना पूजा कमी पण त्याचा दणदणाट जास्त अशा थाटात करतात. मग खड्या आवाजात, उच्चरवात श्लोक म्हणणे, साध्या छोट्या घंटीऐवजी थाळ्या वाजवत आरती म्हणणे, एका निरांजनाऐवजी पाच निरांजनवाल्या पात्राने पंचारती करणे, मोठ्याने ‘… की जय’ म्हणून गुलाल उधळणे, शांतीपाठही आसपासच्या चार घरांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्यांदा म्हणून अशांती पसरवणे – ह्या गोष्टी केल्याशिवाय त्यांना पूजा केल्याचे समाधान मिळत नसते. त्यांची पूजा संपल्यावर घरातली माणसंच काय देवदेखील ‘झाली बाबा एकदाची ह्यांची पूजा’ असं म्हणत असतील.
पूजेतली रांगोळी हा एक स्वतंत्र विषय आहे. ही रांगोळी प्रत्येकाची अशी सहीसारखी वेगळी वा वैशिष्ट्यपूर्ण असते. मग ती रांगोळी म्हणजे साधं स्वस्तिक असो वा एखाद्या देवाचं नाव असो. कुणी फुलांची वेलबुट्टी काढतं, कुणी ठिपक्यांची रांगोळी काढतं, काहीजण फुलांच्या पाकळ्या तोडून त्याची रांगोळीसारखी सजावट करतात तर कुणी रेडिमेड स्टेन्सिल वापरून रांगोळीचं क्लिष्ट डिझाईन सहजगत्या उमटवतं.
पूजेतल्या आरत्या पाठ असणं हे एकेकाळी सामान्य होतं. आजकाल आरत्या पाठ असणार्‍यांच्या संख्येत पिढीगणिक घसरण होत चालली आहे. एक-दोन आरत्या कशाबशा पाठ असतात. मग बाकीच्या आरत्या डाव्या हातात पुस्तक व उजव्या हातात निरांजन पकडून ‘वाचल्या’ जातात. तेवढ्या ‘जयदेव जयदेव…’ ला नजर देवाकडे व इतर वेळी पुस्तकात.
प्रांताप्रांतागणिक, देशादेशागणिक, धर्माधर्मागणिक पूजेच्या पद्धती, त्यात मानवी स्वभावाची उमटणारी प्रतिबिंबं, त्यामागची कळकळ ह्या सार्‍या गोष्टी जरी बदलत असल्या तरी त्यामध्ये एक साधारण धागा एकच असतो, तो म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वराची आपापल्या देवाची काही क्षण का होईना जाण ठेवणे. देवपूजा न करणारे, कर्मकांडावर विश्वास न ठेवणारे नास्तिक लोकही प्रचलित देवाला मानत नसतील पण निसर्गाच्या ह्या प्रचंडतेपुढे, माणसामाणसामधील दिसणार्‍या श्रद्धेपुढे तेही नतमस्तकच होतात.
देवपूजा ही त्यामुळे केवळ देवपूजा न राहता देवाशी त्या शक्तिशी असलेला एक अनोखा संवाद ठतो. अंतर्मनातील वेदना, आपल्याला अगदी अंतःकरणातून हवे असलेले कुठल्याही समस्येचे निराकरण, कुटुंबाविषयी वाटणारे प्रेम व त्यांच्या क्षेमकुशलाविषयी वाटणारी तळमळ ह्याचा निःशब्द पुनरुच्चार व मूकसंवाद फक्त देवपूजेतच घडतो.
देवाचे अधिष्ठान घरोघरी असते ते ह्याकरता. तिथं क्षण दोन क्षण जरी थांबलं तरी आत्मिक शांती मिळते. ती कुठेच मिळू शकत नाही.
खुद्द देवही देवपूजा करतानाचे उदाहरण रामायणात प्रभू श्रीराम महादेवाची पूजा करतानाच्या प्रसंगात सापडते. ज्या साधू संतांची आपण पूजा करतो तेही कुणा देवाची पूजाच करत होते. म्हणून देवपूजेकडे केवळ एक नेहमीचा धार्मिक विधी म्हणून न पाहता आपल्याच अनाकलनीय अंतर्मनाशी संवाद म्हणून पहावे; कारण देव हा शेवटी आपल्याच हृदयात असतो आणि आपण आपल्याशीच कधीतरी बोलावं ना! कोणास ठाऊक स्वतःची नव्याने ओळख होईल!!
सुनील भातंब्रेकर, पुणे
(साहित्य ‘चपराक’ दिवाळी अंक २०२३)
अंकासाठी संपर्क 7057292092
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा