मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनेची नोंद

Share this post on:

कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण नजिकच्या धामणवणे येथील श्रीविठ्ठलाई आणि श्रीविंध्यवासिनी मंदिरांचे सान्निध्य लाभलेल्या डोंगरात 2021 च्या वर्षारंभी सापडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची आणि त्यांची आई बिबट्याची भेट घडवून आणण्यासाठीच्या शासकीय वनविभाग रत्नागिरी आणि वन्यजीव अभ्यासकांच्या प्रयत्नांना आठवड्याभराच्या संयमित प्रयत्नांनंतर यश प्राप्त झालं. मातृत्वापासून कायमचे पारखे होण्याच्या वाटेवर असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना (एक नर, एक मादी) मादी बिबट्याने सोबत घेऊन सुरक्षित नैसर्गिक अधिवास गाठला. या संपूर्ण ‘आँखो देख्या’ घटनाक्रमात वनविभाग आणि वन्यजीव अभ्यासकांना मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनायुक्त वर्तणुकीची दुर्मीळ नोंद करता आली. या संवेदनशील विषयाबाबत कमालीची गुप्तता पाळली गेल्याने बघ्यांची अपेक्षित गर्दी टळली होती. प्रयत्नरत हातांचा मूळ हेतू सफल होऊन शेवट गोड झाल्याने मादी बिबट्याच्या वत्सलभावनायुक्त वर्तणुकीचा उहापोह करणं महत्त्वाचं वाटलं.

मौजे धामणवणे येथील पर्यटनप्रसिद्ध श्रीविंध्यवासिनी मंदिराच्या पाठीमागे 11 जानेवारीला प्रा. चेतन खांडेकर यांच्या घराच्या आवाराला लागून असलेल्या ओढ्यात कोणीतरी मार्जार कुळातील प्राणी ओरडत असल्याचा आवाज येऊ लागला. म्हणून खांडेकर यांनी त्यांचे मित्र अ‍ॅड. चिन्मय दीक्षित यांना कळवले. दीक्षित यांनी वन्यजीव अभ्यासक ओंकार बापट यांना ही माहिती दिली. ओंकार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहिले असता त्यांना दीड-दोन महिन्याचे बिबट्याचे एक पिल्लू निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. वनरक्षक रा. र. शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद खेडकर यांनी तातडीने येऊन पाहणी केली तेव्हा कोरड्या ओढ्यात दगडाच्या कपारीत बिबट्याचे मादी जातीचे पिल्लू सर्वांना दिसले. वन विभागातील कर्मचार्‍यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. चिपळूणचे वनविभाग अधिकारी सचिन निलख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सर्वानुमते, ‘बिबट्याच्या पिल्लाला त्याची आई घेऊन जाते का?’ यासाठी प्रयत्न करायचे निश्चित झाले. श्रीविंध्यवासिनी मंदिरानजिक कोरड्या ओढ्याच्या वरच्या बाजूला जिथे पिल्लू सापडलं त्याच वातावरणात एका लाकडी फळ्यांच्या बॉक्समध्ये पिल्लाला ठेवण्यात आलं. घटनेची नोंद व्हावी म्हणून ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला. टीमचे सदस्य सुरक्षित अंतरावर बसून राहिले. रात्री पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज येत राहिला पण मादी बिबट्या आली नाही. उलट एका क्षणी आपल्या नखांचा उपयोग करून ते पिल्लूच बॉक्समधून बाहेर आलं. आजूबाजूला वावरू लागलं आणि कुणाला काही कळायच्या आत अचानक ट्रॅप कॅमेर्‍याच्या कक्षेच्या बाहेर गेलं. आता काळोख्या अंधारात पिल्लू दिसेनासं झालेलं. मध्यरात्र असल्याने पिल्लाला शोधणंही शक्य नव्हतं.

दुसर्‍या दिवशी सकाळी, 12 जानेवारीला बिबट्याच्या पिल्लाचा शोध घेणे सुरु झाले पण ते पिल्लू सापडेना. शोधण्यात दोनेक तास गेले असतील. ट्रॅप कॅमेर्‍यापासून दोनशे मीटर अंतरावर एका बागेतून पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने शोध सुरु झाला. तेव्हा त्या बागेतल्या सागवानाच्या सुकलेल्या मोठाल्या पानांच्या आडोशाला पिल्लू लपून बसलेलं दिसलं. हे पिल्लू मादी जातीचं होतं. आईचे दूध न मिळाल्याने पिल्लू अशक्त झालेलं होतं. पिल्लाला कृत्रिमरित्या दूध (लॅक्टोजन) पाजण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची वजन आणि आरोग्य तपासणी केली. वनविभागाच्या एस.ओ.पी. (स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर)नियमानुसार ‘पिल्लाला त्याची आई घेऊन जाते का?’ यासाठीचे प्रयत्न करायचे निश्चित झाल्याने पिल्लाच्या आईचा शोध सुरु झाला. त्या सायंकाळी लाकडाच्या खोक्यात पिल्लाला ठेवून बाजूस ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला. सुरक्षित अंतरावरून नजर ठेवणे सुरूच राहिले.

तिकडे श्रीविंध्यवासिनी मंदिर परिसरात हे प्रयत्न सुरु असताना रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांना धामणवणे येथील श्रीविठ्ठलाई मंदिर परिसरातील मालकीच्या शेतात बिबट्याचे पिल्लू असल्याबाबत निसर्गप्रेमी रोहन शेंबेकर यांनी कळविले. त्या दिवशी शेंबेकर यांच्या बागेत काम करणारे कामगार कांबळी यांच्या पत्नीला दुपारी 12 वाजल्यापासून कोणा प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला होता. ती महिला दिवसभर कांबळींना म्हणत राहिली, ‘मांजर ओरडतंय!’ म्हणून. कांबळींनी शेवटी सायंकाळी शेंबेकर यांना बोलावून घेतले. तोवर कांबळींच्या मुलाने ओरडणार्‍या पिल्लाचा अगदी जवळून मोबाईलवर फोटो काढलेला होता. सायंकाळी बागेत आलेल्या शेंबेकर यांनी मोबाईलमधला तो फोटो पाहिला तेव्हा त्यांना संशय आला. एका क्षणी त्यांनीही पिल्लाचा आवाज ऐकला. शेंबेकर आवाजाच्या दिशेने मार्गस्थ झाले पण बिबट्याचं पिल्लू जवळपासच्या झुडुपात लपल्याने त्यांना दिसलं नाही. शेंबेकर यांनी मोबाईलमधला फोटो निलेश यांना पाठविला. दोघांचं बोलणं झालं. फोटो पाहताच तातडीने निलेश यांनी धामणवणे गाठले पण तोवर सायंकाळ झाली होती. निलेश यांनी वन विभागाच्या कर्मचार्‍यांना मोबाईलवरून बिबट्याच्या पिल्लाचा विषय सांगितला आणि ‘धामणवण्याच्या मंदिराजवळ या!’ असं सुचविलं. तेव्हा वन विभागाचे कर्मचारी ‘आम्ही पिल्लाजवळच आहोत’ असं सांगू लागले. संवादात थोडावेळ कन्फ्युजन झालं. ‘कुठल्या पिल्लाजवळ?’ असं निलेश यांनी विचारल्यावर ‘देवळाजवळ!’ असं उत्तर मिळालं. शेवटी या संवादात निलेश यांच्या ‘कुठल्या देवळाजवळ?’ या प्रश्नाच्या उत्तरामधून श्रीविंध्यवासिनी आणि श्रीविठ्ठलाई या दोन स्वतंत्र देवळांच्या ठिकाणांचा उलगडा झाला.

आता तिसर्‍या दिवशी, 13 जानेवारीला सकाळ-सकाळी श्रीविंध्यवासिनी जवळच्या पहिल्या पिल्लाची सर्वांनी पाहाणी केली. तेव्हा पिल्लू बॉक्समध्येच आढळून आलं. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी पिल्लाची तपासणी केली. पिल्लू सुस्थितीत होते. ट्रॅप कॅमेरा तपासण्यात आला. त्यात कोणत्याही विशेष हालचालीची नोंद नव्हती. प्रयत्न करणार्‍या सर्वांच्या मनात निराशा निर्माण झाली. श्रीविंध्यवासिनी जवळच्या पिल्लाला बॉक्सच्या तुलनेत एका लहान बास्केटमध्ये घालून डोंगराच्या दमवणार्‍या चढाने शोधाशोध करत सारेजण शेंबेकर यांनी दाखवलेल्या बागेच्या आवारातील जागेच्या दिशेने मार्गस्थ झाले. हा मार्ग निवडण्यामागे मादी बिबट्या याच मार्गाने खाली उतरल्याचा प्राथमिक अंदाज होता, जो खरा होता. याच मार्गावर मध्यभागी डोंगरातून ग्रॅव्हिटीने आणलेल्या पाण्याचा एक पाणवठा आहे. पाणवठा ते विठ्ठलाईच्या दरम्यान मादीला विणीसाठी उपयुक्त ठरू शकतील अशा 2/3 आडोशाच्या जागा टीमच्या निदर्शनास आल्या. तिथे थांबून दुसर्‍या पिल्लाचा शोध घेण्यात आला. मात्र दुसरे पिल्लू सापडले नाही. शोधाशोध करत सारेजण, कामगार कांबळी यांच्या मुलाने बिबट्याच्या पिल्लाचा फोटो काढलेल्या जागेवर पोहोचले. तेव्हा विणीची जागा हीच असावी असा तर्क बांधण्यात आला. दोन वर्षापूर्वी या भागात मादी बिबट्याचा वावर दिसून आलेला होता. याची माहिती वन्यजीव अभ्यासकांकडे होती. सध्याच्या दुसर्‍या पिल्लाचा फोटो काढलेल्या या जागेपासून जवळच पाण्याची उपलब्धी होती. मोठमोठ्या दगडांच्या कपारीचा आडोसा होता. तणरूपी रानमोडीचं जंगल वाढलेलं होतं. त्यातून चालणं कठीण होतं. याच ठिकाणी काल बिबट्याचं दुसरं पिल्लू दिसलं होतं. त्यामुळे आता, ‘या ठिकाणी बास्केटमधून सोबत आणलेलं बिबट्याचं पहिलं पिल्लू ओरडलं तर त्याचा आवाज ऐकून दुसरंही ओरडेल आणि शोधणे सोपे होईल’ अशी स्वाभाविक अपेक्षा टीमच्या मनात होती. टीमने सकाळी सात वाजता पहिल्या पिल्लाला घेऊन चालायला सुरुवात केली होती. त्याला आता पाचेक तास उलटले होते. दुपारी बारा वाजून गेल्यानंतरही दुसरे पिल्लू मिळालेले नव्हते. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते पण इकडे घटनेत काहीच नवीन घडत नव्हतं. मादी बिबट्याच्या वर्तणुकीचा आणि तिच्या अस्तित्वाचा अंदाज बांधणे कठीण झाले होते.

दुपारची 12 वाजून 37 मिनिटे झाली असतील. बास्केटमधील पहिलं पिल्लू अचानकपणे सलग 4/5 वेळा ओरडलं अन् त्याक्षणी दुरून कुठूनतरी दुसर्‍या पिल्लाच्या आवाजाचा हलकासा कॉल सर्वांच्या कानावर आला. खरंतर तो क्षण, ‘आत्ता मादी बिबट्या इथे आली तर?’ या विचारातून मनात कमालीची अनामिक भीती निर्माण करणाराही होता पण का कोण जाणे? टीमला अशी भीती वाटत नव्हती. त्याचं निश्चित कारण ती निसर्गशक्तीच सांगू शकेल. भर जंगलात मादीच्या विणीच्या जागेजवळ बिबट्याचं एक पिल्लू ओरडतंय, काही क्षणांनी दुसर्‍या पिल्लाचा हलकासा का होईना पण आवाज ऐकू आलाय आणि मादी बिबट्या मात्र अजूनही समोर आलेली नाही. जवळपास तिच्या असण्याचा कोणताही पुरावा दिसून येत नाही. अशी साधारण स्थिती होती. वेळ दिवसाची दुपारची असल्याने टीमचे काही सदस्य आवरायला तर काही जण पिल्लाला दूध आणायला निघून गेले. एक-दोघेजण जागेवर थांबून राहिले. वन्यजीव शास्त्रानुसार साधारणत सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत पिल्लं असताना किंवा नसताना बिबट्या सक्रीय नसतो. त्यामुळे भीती तशी कमी झालेली होती पण तरीसुद्धा बिबट्या मादी, ‘आत्ता आली तर?’ किंवा ‘इथेच असेल तर?’ हे स्वाभाविक प्रश्न मनात येतच होते. तरीही अशा मानसिक अवस्थेत उपस्थित दोघा सदस्यांनी जमिनीवर सुरक्षितपणे काठी आपटत रानमोडीच्या जंगलाचा डोळ्यादेखतचा सारा परिसर पिंजून काढायला सुरुवात केली. बघता-बघता दुपारचा दीड वाजला, तरीही दुसरं पिल्लू सापडण्याची चिन्हे दिसेनात. शेवटी बास्केटमधील पहिल्या पिल्लाजवळ येऊन दोघे सदस्य बसले आणि अचानक आतलं पहिलं पिल्लू पुन्हा ओरडू लागलं. त्याचा आवाज ऐकून दुसरंही ओरडलं पण आताही एकदाच! अर्थात टीम सदस्यांना दुसर्‍या पिल्लाचा आढळ कळायला तेवढं ओरडणं पुरेसं होतं. दुसरं पिल्लू जवळपासच कुठेतरी आहे, हे आता नक्की झालं होतं. कदाचित ते सहज नजरेला पडणार नाही अशा रितीने कॅमॅफ्लॉज झालेलं असावं. आता सगळी टीम आल्यावर पुन्हा एकदा रानमोडीच्या जंगलाचा परिसर पिंजायचा असं ठरलं.

एकतर आवाज येणारं पिल्लू मिळायला हवं होतं किंवा सध्या टीमच्या सोबत असलेल्या पिल्लाला मादी बिबट्याने येऊन घेऊन जाणं आवश्यक होतं. तासाभराने पुन्हा टीम एकत्र जमली. सर्वांनी जेवण केलं आणि तीन वाजताच्या सुमारास पुन्हा शोधाशोध सुरु झाली. सायंकाळी चारच्या सुमारास माडाच्या झाडाखाली दगडांच्या दरीसदृश्य कपारीत गर्द झावळ्यांमध्ये दुसरं पिल्लू अंग चोरून खूप आत दडून बसलेल्या अवस्थेत आढळलं. ते पिल्लू नर जातीचं होतं. ज्या ठिकाणी हे पिल्लू आढळलं त्या ठिकाणी दोघांच्या टीमने पूर्वी दोनदा फेरफटका मारलेला होता पण तेव्हा पिल्लू दिसलेलं नव्हतं. डोळ्यातून प्राण गेल्यावर माणसाचे उघडे डोळे जसे जाणवतात तसं बिबट्याच्या या दुसर्‍या पिल्लाकडे बघून क्षणभर जाणवलं. त्याचं शरीर कॅमॅफ्लॉज झालं होतं. दुपारी बारा वाजेपर्यंत दोनदा कॉल दिल्यानंतर चारेक तासांनी ते दिसलेलं होतं. त्याच्या पोटाची हालचाल जाणवल्यावर टीमच्या जिवात जीव आला. पिल्लाला बाहेर काढलं तेव्हा तर ते गुरगुरत अंगावरच आलं. त्याची तपासणी केली. ते सशक्त होतं. सुरुवातीला एकमेकांवर गुरगुरून झाल्यावर काही वेळांनी दोन्ही पिल्लं एकमेकांत रमली. आता दोन्ही पिल्लांना बॉक्समध्ये एकत्रित पाहिलं तर दुसर मिळालेलं पिल्लू हे पहिल्यापेक्षा दोन-चार दिवसांनी मोठं वाटत होतं पण तसं ते नसावं. खरंतर पहिलं भेटलेलं पिल्लू अधिक सशक्त असावं. म्हणूनच तर ते श्रीविठ्ठलाई ते श्रीविंध्यवासिनी असं डोंगर ओढ्याच्या मार्गाने उतरून मादीसोबत फिरत फिरत खाली आलेलं होतं. पहिलं पिल्लू भेटलं तेव्हा अशक्त होतं कारण ते डी-हायड्रेट झालं असावं. दोन दिवस त्याला काही खायला, आईचं दूध प्यायला मिळालेलं नव्हतं. टीमने दूध पाजलं पण ते दूधही पिल्लू सुरुवातीला पीत नव्हतं. जेवढं पीत होतं ते पोषणाच्या दृष्टीने कमी होतं. अशा विषयात मादी बिबट्यांना काऊंट नसतो. विंध्यवासिनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने अडचण जाणवली असल्याने मादी बिबट्या आल्या पावली परत फिरली असावी आणि येताना तिच्यासोबत आलेलं पिल्लू ती निघून जाताना मात्र खालीच राहिलं. मादीने डोंगरावर श्रीविठ्ठलाई जवळच्या पिल्लाला मात्र दूध पाजलं असावं. नंतर ती इथून निघून गेली असावी. कदाचित म्हणून सापडलेलं दुसरं पिल्लू सशक्त असण्याबरोबर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला की बचावात्मक पवित्र्यात यायचं. नखं बाहेर काढून सर्वांच्या अंगावर यायचं, गुरगुरायचं. यातला योगायोग असा की पहिलं श्रीविंध्यवासिनीजवळ मिळालेलं मादी जातीचं पिल्लूही सायंकाळी चार वाजताच मिळालं होतं. दोन्ही पिल्लं ताब्यात मिळाल्यावर वन खात्याच्या एस.ओ.पी.नुसार अशा प्रसंगात सापडलेल्या वन्यजीवांना हाताळण्याबाबतच्या नियमावलीनुसार काम सुरु झालं. दोन्ही पिल्लांसाठी पुन्हा प्लायवूडचा बॉक्स बनविण्यात आला. श्रीविंध्यवासिनीजवळ सापडलेल्या पिल्लासाठी पहिल्यांदा बनविलेला जाड फळ्यांचा लाकडी बॉक्स मोठा होता. तो डोंगरावर आणणे कठीण होते. म्हणून नवीन बॉक्स बनविण्यात आला. ट्रॅप कॅमेरा झाडाला लावता येईल अशी बिब्बीच्या झाडाजवळची जागा निश्चित करण्यात आली.

मादी बिबट्या आली तर ती बॉक्समधल्या पिल्लांना घेऊन जाईल असा अंदाज होता. वन्यजीवांत बिबट्याची जात धूर्त आणि हुशार मानली जाते. एव्हाना खरंतर बिबट्याचा जंगलात सक्रीय होण्याचा वेळ सुरु झाला होता. म्हणून सायंकाळी अंधार पडेपर्यंत सारी टीम सुरक्षित अंतरावर थांबली होती परंतु मादी बिबट्या आली नाही. शेवटी पिल्लांना बॉक्समध्ये ठेवून त्यावर ट्रॅप कॅमेरा लावून सारे चिपळूणला निघून आले. रात्री जेवणानंतर पुन्हा टीमने अख्या धामणवणे गावालाएक फेरफटका मारला. गावातल्या कोणाची गाय, कुत्रं (कॅटलकेस) मारलं गेलं आहे का? याचा शोध घेतला. मात्र संपूर्ण गावात असं काहीही घडलेलं नव्हतं. कोणाला मादी बिबट्या दिसलेलीही नव्हती. पंधरा दिवस आधी मात्र गावातल्या अनेकांनी बिबट्याला पाहिलेले होते. पाहणार्‍यांना बिबट्या जातीने नर की मादी हे सांगता येत नव्हते. रात्रीचा फेरफटका मारून परतताना, पाणवठ्यावरून श्रीगणपती मंदिराच्या परिसराकडे येणार्‍या मार्गावर, ‘कोणाचा आवाज येतोय का?’ हे ऐकायला टीम थांबली तेव्हा त्यांना मादी बिबट्याने एका मातीच्या ढिगार्‍यावर उभ्या असलेल्या अवस्थेत दर्शन दिलं पण तेव्हा ना मादी, ना ही मंडळी पिल्लांजवळ होती.

चौथ्या दिवशी पहाटे, चौदा तारखेला टीमने सात-सव्वासातच्या सुमारास जाऊन ट्रॅप कॅमेर्‍यात पाहिलं. व्ह्यू फाईंडरचं बटन दाबताक्षणी सारेजण शहारले कारण 6 वाजून 57 मिनिटांनी मादी बिबट्या खोक्याच्या शेजारी बसलेली असल्याचा शेवटचा फोटो अचानक डोळ्यासमोर आला. अर्थात टीमच्या आगमनाची चाहूल लागताच दोन-चार मिनिटात मादी बिबट्या निघून गेली होती. हे लक्षात आल्याने आणि मादी बिबट्या जवळपास कुठेतरी असू शकते या जाणीवेने टीम आल्यापावली मागे फिरली. खोक्यापासून दूर सुरक्षित अंतरावर गेली. गडबडीत कॅमेर्‍याचं शटर बंद करायचं राहिलं. व्ह्यू फाईंडरचं बटन दाबून शेवटचा फोटो चेक केल्यावर कॅमेरा पूर्वस्थितीत आणायचाही राहून गेला होता. सकाळी अकरा वाजता कॅमेरा पुन्हा सुरु करण्यात आला. पहिल्या तीन दिवसात पिल्लांकडे मादी बिबट्या न फिरकल्याने, एवढ्या मोठ्या कालखंडात, पिल्लांच्या हाताळणीत एकदाही टीमला कोणत्याही प्रकारचा त्रास न देणारी, ‘मादी बिबट्या अशी का वागतेय?’ असा प्रश्न निर्माण झाला होता. पिल्लांच्या असण्याच्या काळातलं मादी बिबट्याचं हे वर्तन थोडं अचंबित करणारं होतं. तत्पूर्वीपर्यंत, ‘मादी बिबट्या मेलेली असावी!’ असाच कयास टीमने बांधला होता. वन्यजीव नियमावलीनुसार अशाप्रसंगी पिल्लांच्या आईच्या येण्याची किमान सहा दिवस वाट पाहायची असते. त्यानंतरच पिल्लांना देखभाल केंद्रात दाखल करायचे असते. या प्रक्रियेसाठी अजून दोन दिवसांचा अवकाश होता. बिबट्याच्या दोन्ही पिल्लांना दूध पाजून (फिडिंग), तपासणी करून खोक्यात ठेवलं गेलं. चौथा दिवस सरताना रात्री उशीराच्या फेरफटक्यात गावातल्या एस.आर. रेडिज जंगल रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर मादी बिबट्या दिसली. रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे रस्त्यावर असलेल्या पाणवठ्याच्या ठिकाणी हे पाणी वाहत जात असलेल्या शेतातही नंतर ती दिसली.

पाचव्या दिवशी, 15 तारखेला सकाळी येऊन ट्रॅप कॅमेर्‍यात पाहिलं तेव्हा मादी बिबट्या बॉक्समधील पिल्लांना चाटत असलेलं दिसलं. मादीची पिल्लांप्रती असलेली वत्सलभावना ट्रॅप कॅमेर्‍याने बरोबर टिपलेली होती. खरंतर तेव्हा ती पिल्लांना बॉक्समधून बाहेर काढू शकत होती पण तिने तसं करणं टाळलेलं होतं. इतकंच काय? स्वतःचं दूध पाजलं नव्हतं की पिल्लांना आपल्यासोबत नेलं नव्हतं. ‘कोणीतरी हा ट्रॅप तर लावलेला नसेल ना? मी बॉक्सच्या आत गेले तर अडकेन?’ अशा विचाराने मादी बिबट्या खोक्यात गेलेली नसावी. बॉक्सची सध्याची जागा असलेल्या आजूबाजूला अनेकांच्या आंबा-काजूच्या बागा आहेत. काही जागा नुसत्या कुंपण घातलेल्या आहेत. सकाळी अनेकजण इथल्या जवळच्या मार्गावरून मॉर्निंग वॉक करत असतात. त्यामुळे दुसरा तर्क असा होता की मादी बिबट्याच्या दृष्टीने सध्याची पिल्लांची जागा हीच सर्वाधिक सुरक्षित होती. पिल्लांना घेऊन जाण्यासाठी दुसरी सुरक्षित जागा तिला तोवर सापडली नसावी किंवा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसावा. दिवसभरात चिपळूण शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या कचरा डेपो परिसरातल्या छोट्याशा पाणवठ्यावर एका जेसीबी ऑपरेटरलाही आज बिबट्या दिसला होता.

सहाव्या दिवशी, 16 तारखेला ट्रॅप कॅमेर्‍यात पाहिलं असता आदल्या रात्री एक ते तीन वाजेपर्यंत मादी बिबट्या पिल्लं असलेल्या बॉक्सजवळ बसून राहिली असल्याचे दिसले. तेव्हा ती अधूनमधून इकडे-तिकडे आजूबाजूला न्याहाळत राहिली होती. काहीवेळ बॉक्सच्या भोवती गोल-गोल फिरत होती. मध्येच खोक्यात डोकावून पिल्लांकडे पाहत होती पण एवढं होऊनही पिल्लांना खोक्याबाहेर काढायचं तिने टाळलं होतं पण यामुळे मादी बिबट्या रात्रीची पिल्लांजवळ येत असल्याचं स्पष्ट झालं होतं. म्हणजे जागेसाठी कुठेतरी तिची पाहणी सुरु असणार हे निश्चित झालं. फक्त तिची ही जागेची पाहणी कोणाच्या निदर्शनास येत नव्हती. सलग दोन दिवस पिल्लं एकाच ठिकाणी असल्याने ती सुरक्षित असावीत हेही तिनं मान्य केलं असावं. स्वतः जागा शोधण्याच्या निमित्ताने पिल्लांपासून लांब गेल्यावर तीही सुरक्षित आणि पिल्लंही सुरक्षित असं तिचं काहीसं वेगळं, दुर्मीळ वर्तन सध्या जाणवत होतं. टीमने सध्याच्या बॉक्सला आतून आणि वरून गोणपाट लावलेले होते. त्याला वरती एका ठिकाणी थोडी उघडीक ठेवलेली होती. जेणेकरून गोणपाट फाडून मादी बिबट्या सहज पिल्लांना बाहेर काढू शकेल पण मागच्या दोन-तीन रात्रीतील अनुभवामुळे तेही तिला अवघड ठरत असावं असं वाटल्याने आज टीमने अशा मोहिमांत उपयुक्त ठरणारे भाजीपाल्यासाठी वापरले जाणारे दोन क्रेट आणले. क्रेट धुतले. मादीला जवळपास कुठेही मनुष्यसदृश्य वास येऊ नये यासाठी क्रेटना माती लावली. पिल्लांची हाताळणी करताना हँडग्लोव्हज वापरण्यात आले. एका क्रेटमध्ये तळाला पिल्लं ठेवण्यात आली. दुसरा रिकामा क्रेट पहिल्यावर उपडा ठेवण्यात आला. त्यावर मादी बिबट्या वरचा क्रेट सहज ढकलू शकेल एवढ्या वजनाचा दगड सुरक्षितेसाठी ठेवण्यात आला. सगळाच अभ्यास सुरु होता. चिपळूण वन्यजीव अभ्यासक टीम यासंदर्भात राज्यातल्या तज्ज्ञांशी बोलत होती. त्यातून या नवनव्या क्लृप्त्या लढवल्या जात होत्या. आज दिवसभरात सकाळी बैल घेऊन शेतात जाणार्‍या मंडळींना एक-दोनदा तर एकदा एक-दोन मुलांनी बिबट्याला पाहिलं होतं.

एवढे प्रयत्न करूनही सातव्या दिवशी, 17 तारखेला सकाळी येऊन पाहिलं तेव्हा आदल्या रात्रीही मादी बिबट्या स्वतः पिल्लांजवळ येऊनही त्यांना सोबत घेऊन गेली नव्हती. तेव्हाही ती क्रेटच्या आजूबाजूला फिरत राहिली. काहीवेळ क्रेटजवळ बसून राहिली. आता दिवसभर पिल्लांजवळ न थांबता सायंकाळी मावळतीच्या वेळेस पाहाणीसाठी यायचं टीमचं सर्वानुमते ठरलं. सायंकाळी टीम पोहोचण्यापूर्वी मादी बिबट्या क्रेटजवळ बसलेली असल्याचे ट्रॅप कॅमेर्‍यात दिसले. मादी बिबट्याच्या निघून जाण्याच्या आणि टीमच्या पोहोचण्याच्या वेळेत पाचेक मिनिटांचं अंतर होतं. हे असं दुसर्‍यांदा घडत होतं. मादी बिबट्याच्या वावरावरून ती सुरक्षित जागा शोधत असल्याच्या निर्णयाप्रत सारे आले. मादी बिबट्या पिल्लांना नक्की नेईल असा विश्वास वाटू लागला. पिल्लांना पुन्हा दूध पाजण्यात आलं. त्यांची तपासणी करण्यात आली. टीमने पिल्लांची जागा आणि क्रेट बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी रोजच्या जागेपासून साधारणपणे दहा फूट अंतरावर जाणवलेल्या विणीच्या जागेवर एकावर एक रचलेल्या विटांचे पेटीसदृश्य आकाराचे कच्चे बांधकाम करण्यात आले. त्यात दोन्ही पिल्लांना ठेवण्यात आले. विटांच्या बांधकामाचा वरचा भाग मोकळा आणि जवळपास नैसर्गिक वाटेल असा साकारलेला होता. नव्याने दोन ट्रॅप कॅमेरे सेट करण्यात आले. रात्री काहीवेळ सुरक्षित अंतरावरून पाहणी करण्यात आली.

आठव्या दिवशी, 18 तारखेला सकाळी येऊन पाहिलं तेव्हा दोन्ही पिल्ले विटांच्या कच्च्या बांधकामात आढळून आली नाहीत. ट्रॅप कॅमेरा बंद पडलेला होता. मादी बिबट्या आपल्या दोन्ही पिल्लांना घेऊन सुरक्षित अधिवासात रवाना झाली होती. दोन्ही पिल्लं चालणारी असल्याने तोंडातून नेण्याची आवश्यकता नव्हती. विषयाची खात्री करण्यासाठी पुढील दोन-तीन दिवस टीमने निरीक्षण केले. मादी बिबट्या, तिची पिल्लं दिसली नाहीत. मादीने आपल्या पिल्लांना सुरक्षित सोबत नेल्यावर शिक्कामोर्तब झाले. चिपळूणला वन विभागात दोन ट्रॅप कॅमेरे उपलब्ध होते. रत्नागिरीतूनही आणखी कॅमेरे मागविण्यात आले होते. शेवटी-शेवटी भौगोलिक स्थितीनुसार प्रत्यक्ष जागेवर तीन कॅमेरे लावण्यात आले. प्रत्यक्षात दोन कॅमेरे अचानक बंद पडले. एक जो कॅमेरा चालू होता. त्यात कोणताही क्लिक मिळाला नाही, अर्थात तोही कॅमेरा खराब झाला होता. शेवटच्या क्षणी ट्रॅप कॅमेरा बंद पडल्याने शेवटच्या क्षणाचे डिटेल्स टीमला मिळवता आले नाहीत. नवीन जागी पिल्लांसह आल्यावर वन्यजीव शक्यतो जागेवरून हलत नसतात. मागच्या पाचेक दिवसात मादी बिबट्या काहीतरी व्यवस्थित खाऊन आलेली असावी. अशात पुढचे सलग दोन-तीन दिवस एका ठिकाणी थांबण्याची क्षमता या वन्यजीवात असते. दोन पिल्लांना दुधाशिवाय अन्य काही खायला देऊन चालणारं नव्हतं. त्यामुळेच मादी बिबट्या दिसली नसावी.

एसआर. रेडिज जंगल रिसॉर्टमधील हेलिकॉप्टरच्या रनवेवर 5 फेब्रुवारीच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास जोरजोरात डरकाळ्यांचा आवाज ऐकू आल्याने मादी बिबट्या तिथून चालत गेली असावी अशी माहिती एका कर्मचार्‍याने दिली होती. ‘मादी बिबट्या पिल्लांना घेऊन फिरते आहे का?’ हे पाहाणे वन्यजीव अभ्यासकांसाठी महत्त्वाचे होते. अर्थात ‘दिसणारी मादी बिबट्या ही तीच!’ असं लगेच म्हणणंही धाडसाचं ठरणारं होतं पण तरीही मादी बिबट्याच्या सोबतीला तिची दोन्ही पिल्लं असतील तर कदाचित ओळखणं सोपं जाईल असं टीमला वाटतं होतं. मादीने आपल्या बछड्यांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर जवळपास दोनेक आठवडे ही मंडळी, मादी-पिल्लांना जगण्यात पुन्हा काही अडचण तर आलेली नाही ना? या कारणाने त्यांच्या शोधात राहिली पण मादी दिसली नाही. काही ठिकाणी पाऊलखुणा मात्र सापडल्या पण त्या तिच्याच कशावरून? हाही प्रश्न होता. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात सकाळच्या वेळेत श्रीविठ्ठलाई मंदिरापलीकडे असलेल्या कचरा डेपोदरम्यानच्या जागेत पहिल्यांदा मादी बिबट्या आणि पाठोपाठ एक पिल्लू पाहण्यात आलं. मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात शेंबेकर यांच्या बागेच्या खालच्या बाजूला असलेल्या जंगलसदृश्य गवताळ जमिनीवर कोणीतरी लोळलेलं निदर्शनास आलं. तेव्हा त्या परिसराची पाहणी केली असता अर्ध्या तासाने बिबट्या मादी आपल्या दोन पिल्लांसह कचरा डेपोच्या दिशेने चालत जाताना दिसली. या दोन्ही नोंदी प्रत्यक्षदर्शी निलेश बापट यांनी केल्या. शेंबेकर यांचे बागेतील कामगार कांबळी यांनीही मे महिन्याच्या अखेरपर्यंत तीन वेळा मादी बिबट्याला पिल्लांसह पाहिल्याचे सांगितले. मादी बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर धामणवणे गावातून माहिती घेतली असता गावातील 3/4 कुत्रे गायब असल्याचे समोर आले. या भागातील लोकांची पावसाळापूर्व शेती वगैरेची कामे नियमित सुरु होती. मात्र बिबट्याने कुणाची गाय वगैरे मारल्याची नोंद झालेली नव्हती. मादी बिबट्या ही कदाचित या भागातल्या चिपळूण कचरा डेपोवर पोसलेली कुत्री आणि क्वचित प्रसंगी मिळणारं भेकर मारत असावी, असे अनुमान काढण्यात आले.

मादी बिबट्या आणि तिच्या पिल्लांची ही भेट घडवण्यासाठी कोल्हापूरचे मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमंट बेन, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, उपविभागीय वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील, कोळकेवाडीचे वनरक्षक राजाराम शिंदे, चिपळूणचे वनपाल किशोर पत्की, रामपूरचे वनरक्षक दत्ताराम सुर्वे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद खेडकर, रत्नागिरीचे मानद वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, ओंकार बापट, अ‍ॅड. चिन्मय दीक्षित, रोहन शेंबेकर आदिंनी परिश्रम घेतले. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून आत आलेल्या चिपळूण नजिकच्या डोंगररांगेत असा प्रयत्न पहिल्यांदाच होत असल्याने विशेष काळजी घेण्यात आली होती. जुन्नरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर, प्रसिद्ध वन्यजीव संशोधक आणि बिबट्याच्या अभ्यासक डॉ. विद्या अत्रेय यांचेही यासाठी मार्गदर्शन घेण्यात आले.

बिबट्या अंगावर आला तर माणसाच्या मांडीला चावा घेऊ शकतो कारण आपली मांडी ही चालताना त्याच्या तोंडाजवळ येत असते. तो मांडी बाद करू शकतो, पंजा मारू शकतो. म्हणून अशा वेळी हाता-पायावर क्रिकेटसारखे पॅड, मानेला कॉलर, डोक्यावर हेल्मेट असलेला विशिष्ट पेहेराव करून वावरावे लागते. टीममधल्या एक-दोघांनी तो ड्रेस परिधान केलेला होता. या ड्रेसवर असताना बिबट्याने हल्ला केला तर माणूस दगावण्याचा धोका कमी होतो. यातल्या पॉवरपॅक हेल्मेटमुळे बाहेरचा आवाज येत नसतो. ड्रेसमुळे हातापायाच्या हालचालीवर परिणाम होत असतो. त्यामुळे टीममधले सगळेजण तो ड्रेस घालत नसतात. वन्यजीवाने हल्ला केला तर त्याला हाकलणे हे पहिले काम असते. म्हणून इतरांच्या हातात, जमावाला रोखण्यासाठी पोलिसांकडून वापरली जाणारी फेसशिल्ड आणि काठ्या असतात, त्या यावेळी वापरण्यात आल्या. टीममधला एकजण दूर उंचीवर उभा राहून ‘वॉचटॉवर’सारखा कक्षेतल्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवून होता. धामणवणेतील मादी बिबट्याचा हा विषय खूप गुप्त ठेवण्यात आला होता. गावातल्या विचारणार्‍या माणसांना नीटसं सांगितलं गेलं नव्हतं. अन्यथा विषय जिकडे-तिकडे पसरून लोकांची गर्दी वाढली असती. प्रत्यक्ष काम करताना त्रास झाला असता. चार-पाच वर्षांपूर्वी चिपळूण गुहागर मार्गावरील उक्ताडला भेकर आणि नंतर एकदा बिबट्याचं पिल्लू मिळालेलं होतं. तेव्हा शेकडोंचा जनसमुदाय जमा झालेला होता. आपल्याकडे एखादा साप किंवा अजगर मिळाला तरी अशीच अवस्था असते. पिल्लं सोबत असताना कोणतीही वन्यजीव मादी आक्रमक असते. ती इतरांना त्रास देऊ शकते. या निकषाचा विचार करता प्रस्तुत घटनेतील मादीच्या घरादारात आठवडाभर टीमची सारी मंडळी वावरत राहिली. तरीही मादी बिबट्याने यांच्यातल्या कोणालाही त्रास दिला नाही. स्वतःलाही त्रास करून घेतला नाही. पिल्लांना दूध पाजलं नाही. ज्या पट्टयात हे घडलं त्या धामणवणे भागात क्वचित प्रसंग वगळता अनेकांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिलेला नव्हता. दोन वर्षांपूर्वी थंडीच्या दिवसात धामणवण्यात मादी बिबट्या फासकीत अडकलेली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात बिबट्या कोणालाही दिसलेला नव्हता किंवा बिबट्याची माणसासमोर यायची वेळ जुळलेली नव्हती. बिबट्या काय किंवा जंगलातले अन्य वन्यजीव काय? ते माणसांच्या हालचाली दुरून पाहत असतात. माणसाची चाहूल लागताच सावध होतात. सुरक्षित ठिकाणी कॅमॅफ्लॉज होतात. जो वन्यजीव माणसासमोर येत नाही किंवा अनेक दिवसात आलेला नाही तो प्रस्तुतच्या घटनेप्रमाणे स्वतःच्या बचावाच्या दृष्टीने मनुष्यासमोर येणं टाळतो असं मत निलेश बापट यांनी नोंदवलं.

संपूर्ण कोकणाला जैवविविधतेतील विविध परिसंस्थांची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. पट्टेरी वाघासह बिबट्या, रानडुक्कर, माकड, उदमांजर, खवले मांजर, रानगवा, सांबर आदी सस्तन प्राणी, विविध प्रकारचे पक्षी, कीटक, फुलपाखरे, मगरीसारखे उभयचर प्राणी, सरीसृप वर्गातील प्राण्यांचा येथे आढळ आहे. इथल्या अति वनाच्छादित क्षेत्रात आव्हानात्मक सेवा बजावणे हे नेहमीच शासन प्रतिनिधी आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमतांची कसोटी पाहणारे ठरते. कोकणातले वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे सामुदायिक समन्वयाच्या माध्यमातून स्थानिक वन्यजीव अभ्यासकांच्या साहाय्याने अनेकदा आव्हानात्मक जबाबदार्‍या पार पाडतात. यातला बिबट्या हा प्राणी भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत प्रवेश करतो आणि मानव-वन्यजीवांच्या संघर्षाला तोंड फुटते. हे आपण नेहमी वाचतो, दूरचित्रवाहिन्यांवर पाहतो. खरंतर हा संघर्ष घडावा असं कोणाच्याही मनात नसताना ते घडतं पण याच निसर्गात ‘वन्यजीव संवर्धन मोहीम’ही यशस्वी होत असतात. समाज म्हणून आपण सर्वांनी त्याकडेही डोळसपणे पाहायला, शिकायला हवंय. विशेषत शासकीय वन्यजीव संवर्धन मार्गदर्शक तत्त्वप्रणालीस अधीन राहून, कमालीची गुप्तता पाळून एखादी मोहिम यशस्वी केली जाते तेव्हा ती मानव आणि वन्यजीव यांमधले सकारात्मक नात्याचे नवे दोर विणण्याचा प्रयत्न करत असते. धामणवणे येथील घटनेतील मादी बिबट्याच्या वर्तणुकीतील अनोख्या वत्सलभावनेच्या नोंदीने हेच काम केले आहे. ते समाजाने आणि सजग निसर्गप्रेमींनी आवर्जून समजून घ्यायला हवे आहे.


अशा कामांचं यश हे टीमच्या संयमावर अवलंबून असतं. एखादी टीम दुसर्‍याच दिवशी कंटाळली आणि त्यांनी ‘फिमेल मेलेय!’ असं रिपोर्टिंग वन खात्याच्या वरिष्ठांना केलं तर हा सगळा विषय संपू शकला असता. पिल्लांची रवानगी कधीच बाहेर न पडण्याकरिता जुन्नर किंवा बोरिवली अनाथालयात झाली असती पण या टीमच्या सक्रियतेमुळे असं चुकीचं काही घडलं नाही. दुसरं असं की श्रीविठ्ठलाई मंदिराकडचं पिल्लू प्रकाशात आलं नसतं तर कदाचित सारी टीम श्रीविंध्यवासिनी मंदिराजवळ नियमानुसार आठवडाभर बसून राहिली असती. सरतेशेवटी कदाचित काहीही हाती लागलं नसतं. सुरवातीला चार-पाच दिवस होऊनही मादी बिबट्या पिल्लांना नेत नव्हती. अशा स्थितीत शासनाचे आठवडाभराचे असलेले एस.ओ.पी.चे नियम खूप चांगले आहेत. निसर्गात कार्यरत सर्वांनी ते न थकता संयमपूर्वक पाळायला हवेत हे या घटनेतून सिद्ध झालं.

प्रस्तुतची मादी बिबट्या सुरक्षित जागेसाठी धडपडत होती. ती पिल्लांजवळ यायची, त्यांना बघायची. काही काळ थांबायची आणि परत फिरायची. पिल्लांजवळ एखादा कुत्रा किंवा गाय गेली असती तर तिने नक्की हल्ला केला असता पण माणूस म्हटल्यावर तिलाही काहीशी भीती वाटली असावी. अर्थात हाही तर्क आहे कारण मादी बिबट्याचं असं वर्तन आजवर कोठेही आढळून आलेलं नाही. पिल्लं असताना मनुष्यासह कोणीही मादीच्या कक्षेत जाण्याचा प्रयत्न केला तर मादी आक्रमक होते असाच वन्यजीव शास्त्राचा अनुभव सांगतो. त्यामुळे मादी बिबट्याने असं दुर्मीळ वर्तन का केलं असावं? याबाबतचे अनेक तर्क आपण समजून घेतलेत. तरीही या मागचं निश्चित कारण ती मादी बिबट्याच आपल्याला सांगू शकेल.

-धीरज वाटेकर
9860360948
.

(धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली 24 वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021’, पृष्ठ क्र. 187
‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

2 Comments

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!