अद्वितीय योध्दा संन्यासी… स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. लहानपणी त्यांचे नाव नरेंद्रनाथ असे ठेवण्यात आले होते. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकात्याच्या हायकोर्टात एक प्रसिद्ध वकील म्हणून कार्यरत होते. ते पाश्चात्य सभ्यतेवर विश्वास ठेवणारे होते. मात्र नरेंद्रची आई भुवनेश्वरीदेवी या धार्मिक विचाराने वागणाऱ्या गृहिणी होत्या. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा भगवान शिवजी यांच्या भक्तीमध्ये जात होता.

लहानपणापासूनच विवेकानंद खूप हुशार आणि खोडकर होते. ते आपल्या सोबतच्या मुलांबरोबर चेष्टा मस्करी करायचे आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा ते आपल्या शिक्षकांसोबत देखील चेष्टा करण्यास मागे-पुढे बघत नव्हते. त्यांच्या घरात नियमित पूजा करण्याची प्रथा होती. धार्मिक प्रवृत्तीमुळे भुवनेश्वरीदेवीला पुराण, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथातील कथा ऐकण्याची फार आवड होती. कथालेखक रोज त्यांच्या घरी यायचे. घरी नियमितपणे भजन-कीर्तनही केले जायचे.

कुटुंबाच्या धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरणाच्या प्रभावामुळे लहानपणापासून धर्म आणि अध्यात्माची मूल्ये बाल नरेंद्र यांच्या मनावर खोलवर रूजली गेली. आई-वडिलांचे संस्कार आणि धार्मिक वातावरणामुळे, देवाला जाणून घेण्याची आणि त्याला मिळवण्याची इच्छा लहानपणापासूनच विवेकानंदांच्या मनात दिसून येत होती. कधीकधी ते असे प्रश्न विचारत असत की भगवंताबद्दल जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी पालक आणि पंडितजींनाही ते गोंधळात टाकत असत.
स्वामी विवेकानंद यांची बुद्धी अगदी लहानपणापासून अत्यंत तीव्र होती. त्यांना ईश्वराप्रती जाणून घेण्याची कमालीची जिज्ञासा देखील होती. त्यासाठी ते प्रथम ‘ब्रह्मसमाजा’कडे गेले, परंतु तेथे त्यांचे मन समाधानी नव्हते. काही दिवसांनी त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. दृष्टादृष्ट होताच दोघांनी एकमेकांना मनाने स्वीकारले. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्यांचे आयुष्य आपले गुरुदेव श्रीरामकृष्णांना समर्पित केले. गुरुदेवांंच्या अखेरच्या दिवसांत त्यांनी स्वतःची, आपल्या घरच्या आणि कुटूंबाच्या नाजूक परिस्थितीची चिंता न करता गुरुसेवेत व्यग्र राहिले. कारण त्यावेळी त्यांच्या वडिलांचे, विश्वनाथ दत्त यांचे निधन झाले होते आणि घराचा भार विवेकानंदांवर पडला होता. घरची अवस्था अत्यंत बिकट होती.

स्वामी विवेकानंद हे एक महान स्वप्न पाहणारे आणि ते सर्वसामान्यांना दाखवणारे व्यक्ती होते. त्यांनी एका अशा नवीन समाजाची कल्पना केली, ज्या समाजात धर्म किंवा जातीच्या आधारे माणसामाणसात भेद होणार नाही. त्यांनी वेदांताची, हिंदू संस्कृतीची तत्त्वे या नव्या रूपात ठेवली. समानतेच्या तत्त्वाचा आधार घेऊन एक नवीन आदर्श समाज घडवणे हे त्यांचे मुख्य ध्येय होते. भौतिकतावादाच्या वादात न पडता विवेकानंदांनी त्याकाळच्या बुरसटलेल्या समाजाला एक नवीन दिशा दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना तरूणांकडून मोठ्या आशा होत्या. समाजातील सर्वच स्तरावरील युवा शक्तीवर त्यांचा प्रभाव पडला आणि ती त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागली. नंतर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या मिशनमार्फत योग्य दिशा दाखवण्याचे अलौकिक कार्य सुरू झाले.

स्वामी विवेकानंदांचे शिक्षण विषयक तत्वज्ञान अतिशय व्यापक होते. त्यांनी त्या काळातील प्रचलित इंग्रजी शिक्षण व्यवस्थेला विरोध केला . कारण त्या शिक्षणाचा उद्देश फक्त इंग्रजांची संख्या वाढविणे हाच होता. त्यांना असे शिक्षण अपेक्षित होते जे शिक्षण मुलांचा सर्वांगीण विकास करू शकेल. मुलांच्या शिक्षणाचा उद्देश त्यांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा असला पाहिजे याविषयी स्वामीजी आग्रही होते. त्यांनी त्या काळच्या प्रचलित शिक्षणास ‘निषिद्ध शिक्षण’ असे संबोधले आणि पुढे म्हटले, “तुम्ही अशा व्यक्तीचा विचार करता ज्याने काही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत आणि ते चांगले भाषण देऊ शकतात, परंतु वास्तविकता अशी आहे की ज्या शिक्षणासाठी सामान्य लोक आयुष्यभर संघर्ष करत आहेत, ते कोणी तयार करत नाही. कोणी चरित्र बनवत नाही. समाजसेवेची भावना जो विकसित करीत नाही आणि जो सिंहासारखे धैर्य जोपासू शकत नाही, अशा शिक्षणाचा काय फायदा?”

स्वामीजींना शिक्षणाद्वारे धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक जीवनाची तयारी करण्याची इच्छा होती. धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनातून शिक्षणासंदर्भात ते म्हणाले होते ‘’आम्हाला अशा शिक्षणाची गरज आहे जे चरित्र बनवते, मनाची शक्ती वाढवते, बुद्धीचा विकास करते आणि व्यक्तीला आत्मनिर्भर बनवते. शिक्षण ही मनुष्याच्या अंतर्निहित परिपूर्णतेची अभिव्यक्ती आहे!’’

स्वामी विवेकानंद यांचे सामाजिक योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या एकोणचाळीस वर्षांच्या संक्षिप्त आयुष्यात जी कामे केली ती पुढील शतके अनेक पिढ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरतील. वयाच्या तिसाव्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेच्या शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले आणि त्याला एक वैश्विक ओळख दिली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर एकदा म्हणाले होते, “तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. त्यांच्यात सर्वकाही सकारात्मक दिसेल, काहीही नकारात्मक नाही!“
तत्त्ववेत्ता रोमन रोलँड विवेकानंदांविषयी म्हणाला होता,“ ते दुसऱ्या क्रमांकावर आहे याची कल्पना करणेही अशक्य आहे. जेथे जेथे गेले तेथे ते पहिले होते. प्रत्येकजण त्यांच्यातला नेता दाखवत असे. ते देवाचे प्रतिनिधी होते आणि सर्व गोष्टींवर त्यांचे प्रभुत्व हे त्यांचे वेगळेपण होते.”

स्वामीजी संत, महान देशभक्त, वक्ते, विचारवंत, लेखक आणि मानवप्रेमीही होते. त्यांचा असा विश्वास होता… की भारत देश हा धर्म आणि तत्वज्ञानाची पवित्र भूमी आहे. येथूनच महान ऋषी-मुनींचा जन्म झाला. ही त्याग व संन्यासाची भूमी आहे. जीवनाचे आणि मुक्तिचे सर्वोच्च आदर्श असलेले दरवाजे इथूनच उघडले गेले आहेत. स्वामी विवेकानंदांचे प्रसिद्ध विधान आहे…
“उठा, जागे व्हा, स्वतःला जागे करा आणि इतरांना जागे करा. आपल्या मानव जन्मास यशस्वी करा आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका!”

स्वामी विवेकानंदांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी संपूर्ण भारतभर पायी प्रवास केला. नंतर १८९३ मध्ये शिकागो (अमेरिका) येथे जागतिक धर्म परिषद झाली. त्यावेळी ते अवघे तीस वर्षांचे होते. स्वामीजी धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. युरोप आणि अमेरिकेच्या लोकांचा त्या वेळी भारतीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन तुच्छ होता. तेथे स्वामी विवेकानंदांना सर्वधर्म परिषदेत बोलण्याची वेळ देऊ नये म्हणून तेथील लोकांनी खूप प्रयत्न केले. नंतर एका सह्रदय अमेरिकन प्राध्यापकाच्या प्रयत्नाने विवेकानंदांना थोडा वेळ देण्यात आला. त्यावेळी त्यांचे विचार ऐकून सर्व विद्वान आश्चर्यचकित झाले. मग अमेरिकेत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तिथे त्यांच्या अनुयायांचा मोठा समुदाय तयार झाला. तीन वर्षे ते अमेरिकेत राहिले आणि तेथील लोकांना स्वामीजींनी भारतीय तत्वज्ञानाचा एक अद्भुत प्रकाश प्रदान केला. त्यांच्या वक्तृत्वशैलीने तेथील लोकांवर चांगलाच प्रभाव पडला.

“अध्यात्मवाद आणि भारतीय तत्वज्ञानाविना जग अनाथ होईल! ” ही स्वामी विवेकानंदांची ठाम श्रद्धा होती. अमेरिकेत त्यांनी रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा स्थापन केल्या. अनेक अमेरिकन विद्वानांना त्यांचे शिष्यत्व प्राप्त झाले. ते नेहमी स्वत:ला गरिबांचे गुलाम म्हणून संबोधायचे. त्यांनी नेहमीच वेगवेगळ्या देशांमधील भारताचा अभिमान वाढवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा स्वामीजी व्याख्याने द्यायला जिथे कुठे जायचे, त्यावेळी लोक त्यांचे अत्यानंदाने स्वागत करायचे. त्यांच्यावर आनंदित होऊन निस्सीम प्रेम करायचे. त्यांची व्याख्याने जगभरात प्रसिद्ध आहेत.

आयुष्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी शुक्ल यजुर्वेदाचे स्पष्टीकरण दिले आणि म्हणाले, “या विवेकानंदाने आतापर्यंत काय केले हे समजण्यासाठी मला आणखी एक विवेकानंद पाहिजे.” प्रतिसादकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आयुष्याच्या शेवटच्या दिवशीसुद्धा त्यांनी आपली ‘ध्यान’ करण्याची पद्धत बदलली नाही आणि सकाळी दोन ते तीन तास त्यांनी ध्यान केले. दमा आणि मधुमेह या व्यतिरिक्त इतर शारीरिक आजारांनी त्यांना घेरले होते! त्यांनी शेवटच्या क्षणी असेही म्हटले होते की, ‘‘हे आजार मला वयाची चाळीशी देखील पार करू देणार नाही!”

४ जुलै, १९०२ रोजी बेलूरच्या रामकृष्ण मठात, महासमाधी घेऊन, ध्यानमय अवस्थेत स्वामी विवेकानंद यांनी या नश्वर जगाचा निरोप घेतला! त्यांच्या अनुयायांनी तेथे त्यांच्या स्मृतीत समाधीमंदिर बांधले आणि जगभरात स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे संदेश पोहोचवण्यासाठी १३० हून अधिक केंद्रे स्थापन केली.

विनोद श्रा.पंचभाई, पुणे
मो.क्र. 9923797725

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “अद्वितीय योध्दा संन्यासी… स्वामी विवेकानंद”

  1. Meghana Joshi

    अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण लेख विनोद साहेब 🙏🙏

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा