गीता धर्मग्रंथ नाही!

गीता धर्मग्रंथ नाही!

Share this post on:

– कमलाकर देसले
9421507434

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021

॥ 1 ॥
श्रीमद्भगवतगीता हा ग्रंथ भगव्या कपड्यात गुंडाळण्याचा धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथ आहे, असा सर्वसाधारण समज समाजात आहे. अर्थातच हा समज ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आणि एकूणच संतसाहित्याच्या बाबतीतही आहे. हे भारतीय समाजाचे भयंकर दुर्दैव आहे. त्यामुळे हे ग्रंथ वृद्धांनी किंवा प्रौढांनी वाचण्याचे ग्रंथ आहेत अशी एक चुकीची मान्यता समाजात रूढ झाली आहे. ते ही अतिशय चुकीचे आहे.
गीता हा ग्रंथ समुपदेशनाची नितांत गरज असणार्‍या तरुणांसाठी आणि सर्वांसाठी आहे.

मी गीतेकडे धार्मिक ग्रंथ म्हणून न पाहता मनोविज्ञानाची विधायक उकल करणारा जीवनग्रंथ म्हणून पाहतो आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने गीता समजावून सांगणार्‍या ज्ञानेश्वर माउलींकडे मी भावसाक्षर असलेला सहृदय, रसिक आणि ‘विवेकी माणूस’ म्हणून पाहतो. आध्यात्मिकच नव्हे तर प्रापंचिक मानसिकतेचे स्वच्छ, निर्मळ, नितळ असे अंतस्थ आकलन असलेला सहृदय मनोविश्लेषक म्हणून मी ज्ञानदेवांकडे पाहतो.

॥ 2 ॥
पसायदानातील ‘दृष्टादृष्टविजयो’ म्हणजे तरी काय आहे? साधकाने त्याचे प्रापंचिक जगणे – ज्याला माउली ‘दृष्ट’ जगणे, म्हणजे रोजचे जगणे म्हणतात – ते सुखकर, समृद्ध जगावे. प्रारब्धाने येणार्‍या मनोशारीरिक स्वरूपाच्या अनुकूल-प्रतिकूल अनुभवांचा सकारात्मक अर्थ लावत, अन्वय लावत त्यांना धीराने स्वीकारत, सामोरे जायला हवे आणि आनंदाच्या अवस्थेत रहायला हवे. समत्वाच्या भूमिकेत राहता यायला यावे. हे असे करता येणे म्हणजे माउलींच्या मते ‘दृष्टावर विजय मिळवणे’ असते. थेट दिखाऊ साधू होण्याची, संत होण्याची, आध्यात्मिक होण्याची गरज नसतेच.

॥ 3 ॥
आपले प्रापंचिक, व्यावसायिक, ऐहिक असे रोजचे अनुकूल-प्रतिकूलतेचे जगणे धैर्याने, स्थैर्याने, शांतीने, आनंदाने, मजेने जगणे आवश्यक नाही का? तर आहेच! पण आपण या सर्व गुणवत्तेसह खरच आपले दैनंदिन जगणे जगतो का? तर नाही. का? तर आपल्याकडे अशी जीवनकौशल्ये नाहीत आणि आपण अशा कुठल्या खास जीवनकौशल्याचे प्रशिक्षणही घेत नाही. असे काहीतरी करायला हवे हेच आपल्याला माहीत नाही. आपण जिवंत असतो आणि आपल्या मते जिवंत असणे हेच केवळ जगणे असते. दुर्दैवाने निरक्षरांसह साक्षरांचे सुद्धा जगण्याचे बस इतकेच आकलन असते.

॥ 4 ॥
जोपर्यंत आपले जगणे सहज, निर्धोक असते, त्यात कुठलेच विक्षेप, अडथळे, क्लेश नसतात तोपर्यंत सगळे छान असते. या सहज सुखमय काळात आपल्याला निर्णयक्षमतेची, धैर्याची, सहनशीलतेची, सोशिकतेची गरज फार नसते. अर्थात निर्धोक काळात धैर्याची गरज नसली म्हणजे कधीच गरज नसेल असे नाही. अचानक, अकल्पित, अनपेक्षित अशा पद्धतीने जेव्हा व्यक्तिच्या आयुष्यात मनाविरुद्ध प्रतिकूल काही घडते तेव्हा वरच्या सर्व गुणवत्ता आवश्यक ठरतात. नेमक्या आपल्याकडे त्या नसतात. मग आपण गांगरून जातो. आपले अवसान गळून पडते. स्वतःला हिंमतवान समजणारे आपण अक्षरशः चोळामोळा होऊन जातो. कोरोना काळात हे आपण रोज उघड्या डोळ्यांनी बघतो आहोत. आपल्यातला तथाकथित सिंह अचानक ससा होऊन भयग्रस्त होतो. आपल्याला योग्य-अयोग्य कळेनासे होते. आपली निर्णयक्षमता नसल्यात जमा होते. आपल्या तथाकथित धैर्याचा मनोरा जमीनदोस्त होतो. हे असे सामान्यांचे होते असे नाही तर हे भल्याभल्यांचे होते. डोंगरासारखी माणसे मुरमुर्‍यासारखी उडायला लागतात. आपले अक्षरशः हाल होतात. आपल्यापुढे आपल्या डोळ्यासमोर आपले पतन उभे असते. हे असे का होते? याचे उत्तर हेच, की वरच्या धैर्यादी जीवनकौशल्यांचे आपण प्रशिक्षण घेतले नसते.

॥ 5 ॥
‘प्रशिक्षणात प्राविण्यं’ असे आपले शास्त्र सांगतात.
कुठल्याही क्षेत्रातील प्रवीण माणसांच्या सफलतेचा जर आपण धांडोळा घेतला तर आपल्याला कळेल की या लोकांनी वेळोवेळी त्या त्या गोष्टींचे प्रशिक्षण घेतलेले सापडेल. संयम, धैर्य, सहनशीलता, समज, निर्णयक्षमता, विवेक यासारख्या जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण घेतलेले सापडेल. हे प्रशिक्षण जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने गुरूकडून, ग्रंथांकडून किंवा स्वतःच्या अनुभवांकडून घेत असतील. सर्वांचे हे प्रशिक्षण एकाच संस्थेत, एकाच गुरूकडून नसेल होत. ज्याला जो योग्य गुरू वाटेल, जो ग्रंथ योग्य वाटेल त्याच्याकडून ही माणसे मार्गदर्शन घेत असतील पण आपला मुद्दा हा नाही.

॥ 6 ॥
आपला मुद्दा आहे, यशस्वी लोक जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण घेतात म्हणून ते जगण्याच्या लढाईत प्रवीण असतात. खुद्द अर्जुनाने हे प्रशिक्षण घेतले नव्हते म्हणून तर कधीतरी साक्षात भगवान शंकराला हरवणारा अर्जुन महाभारत युद्धात आप्तेष्टांच्या, गुरूंच्या विरुद्ध लढावे लागते आहे हे पाहून मोहाच्या फासात अडकून अक्षरशः मलूल झाला. निर्णयक्षमता हरवून बसला. दरदरून आलेल्या घामाने अर्जुनाची बोबडी वळली. अर्जुनाचा कर्तव्याचा विवेक हा कापूर उडावा तसा उडून गेला. हे जर महान धनुर्धर अर्जुनाच्या बाबतीत होत असेल तर आपण खरंच सामान्य जीव. आपले असे होणार नाही याची काय खात्री?

॥ 7 ॥

आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर प्रत्येकाची परीक्षा ठरलेली असते. या परीक्षेत ज्यांनी जीवनकौशल्यांचा अभ्यास केला आहे आणि प्रशिक्षण घेतले आहे ते लोक विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण होतात. अर्जुनाला सुदैवाने कृष्णासारखा मार्गदर्शक मित्र लाभला आणि ऐन युद्धाच्या धामधुमीत कृष्णाने अर्जुनाचे समुपदेशन केले. चक्क युद्धभूमीवर अर्जुनाला सर्व जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण दिले. जेव्हा अर्जुनाचा समुपदेशनाचा क्लास संपला म्हणजे जेव्हा गीता सांगून संपली तेव्हा चक्क ‘नष्टो मोह: स्मृतीलब्धा’ असे अर्जुन म्हटला. म्हणजे , कृष्णा, माझा मोह संपला. मी आता कर्तव्यासाठी असलेल्या युद्धाला तयार आहे.

॥ 8 ॥

अर्जुनाला जीवनकौशल्यांचे हे जे प्रशिक्षण आणि समुपदेशन कृष्णाकडून मिळाले ते आपल्याला मिळाले तर? कारण आपलाही खूपदा अर्जुन होतो. आपली निर्णयक्षमता लुळी पडते. आपण ‘टू बी ऑर नॉट टू बी’च्या गुंत्यात अडकतो. तेव्हा अर्जुनाला अशा परिस्थितीत लाभलेले समुपदेशन आपल्याला लाभले तर किती छान होईल! त्या समुपदेशनाची लिखित संहिता म्हणजे ‘श्रीमद्भगवतगीता’!
जी गीता किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला कर्तव्यशील बनवते, उत्साही आणि ऊर्जावान बनवते. ध्येयाविषयी सुस्पष्ट बनवते ती गीता मला सांगा वाचणार्‍याला, समजून घेणार्‍याला निष्क्रिय साधू, संत बनवेल का? आध्यात्मिकता हे खरेतर गीतेचे बायप्रॉडक्ट् आहे. गीता सर्वात आधी साधकाचे दैनंदिन असे सामान्य जगणे सुंदर करते, यशस्वी करते, धन्य करते, कृतार्थ करते. एकदा का माणसाचे रोजचे जगणे सुंदर झाले, समाधानी झाले तर आध्यात्मिक जीवनही सुंदर झालेच म्हणून समजा. तेव्हा गीता हा धार्मिक ग्रंथ आहे या मान्यतेपेक्षा गीता हा जीवनग्रंथ आहे हे नीट समजून घेतले तरच भारतीय मानसिकता महान गोंधळापासून वाचून लख्ख विवेकसंपन्न होईल यात शंका नाही.

॥ 9 ॥

अर्जुन तरुण आहे. कर्तव्याच्या बाबतीत गोंधळलेला आहे. ‘हे’ करू की ‘ते’? हा त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याला सुचत नाही. तो त्याच्या मित्राला म्हणजे भगवान कृष्णाला विचारतो, ‘‘देवा, यार मी गोंधळलो आहे. कृपया मला हितकारक काय आहे ते सांग.’’
अर्जुनाचे जे कुरुक्षेत्रावर झाले ते तर कर्मक्षेत्रावर आपले रोजच होते आणि असेच आपलेही होत असेल तर मग, गीता आपल्याचसाठी नाही का?
अर्थातच गीता आपल्यासाठीच आहे. अर्जुन आपलेच बिंब आहे, आपण सर्व लोक अर्जुनाची प्रतिबिंबे आहोत.

॥ 10 ॥

गोंधळ होण्याच्या मानसिकतेचा, आपण कुठल्या धर्माचे आहोत याच्याशी काहीच संबंध नाही. निर्णयाच्या बाबतीत किंवा कर्तव्याच्या बाबतीत गोंधळ होणे हे कुठल्याही माणसाच्या बाबतीत घडणे स्वाभाविक आहे. संभ्रम ही मनाची अवस्था आहे. आपण कोणत्या धर्माचे आहोत किंवा नाही आहोत याने मानसिक संभ्रम होणे, न होणे घडत नाही. संभ्रम हा कुठल्याही देशातील, कुठल्याही धर्मातील, कुठल्याही जातीतील, कुठल्याही आर्थिक गटातील, कुठल्याही वयातील माणसाचा होतो, होऊ शकतो. संभ्रम आणि संमोह या गोष्टी मानसिक आहेत. ज्याला ज्याला मन आहे त्याचा हा प्रश्न आहे. मग तो कुठल्याही देशातील, धर्मातील माणूस असो.

॥ 11 ॥

निर्णय घेता न येणे, हित न कळणे, कर्तव्याचा कंटाळा येणे, संमोहित होणे, संभ्रमित होणे ही केव्हा न केव्हा सर्वांच्या बाबतीत घडणारी सर्वसामान्य गोष्ट आहे. अशा वेळी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असते. तब्येत बिघडल्यावर जितकी गरज वैद्याची, तितकीच गरज मानसिक दुर्बलतेत योग्य मार्गदर्शक समुपदेशकाची असते. शरीराच्या आजारासाठी जितकी डॉक्टरांची गरज असते तितकीच मानसिक गरज अधिकारी आणि अनुभवी समुपदेशकाची असते. गीता कुणाही गोंधळलेल्या अर्जुनाचे समुपदेशन करते.

॥ 12 ॥

अर्जुन हिंदुच असला पाहिजे असे नाही किंवा अर्जुन हिंदुच असतो असे नाही. अर्जुन कुठल्याही जातीधर्माचा, कुठल्याही देशाचा नागरिक असू शकतो. खरे तर अर्जुन माणूस असतो. तो जॉन असू शकतो, जॉनी असू शकतो किंवा तो जनार्दनही असू शकतो. जॉन, जॉनी, जनार्दन ह्या लौकिक नावांच्या आत असलेले देह हे माणसांचे असतात. त्यांची मनोशारीरिक लक्षणे, गरजा, भूक, आवश्यकता जवळपास सारख्या असतात. त्यामुळे त्यांचे हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन असणे दुय्यम असते. रुग्णता आणि उपचार मुख्य असतात. रुग्णाची जात, धर्म हा उपचाराचा निकष नसतो. गीता या अर्थाने सर्वांसाठी आहे. गीतेत मनोशारीरिक जगणे संतुलित करणारी तत्त्वे (उपचार) आणि पथ्ये (विवेक) सांगितली आहेत.

॥ 13 ॥

आधी आपण माणूस असतो. या अर्थाने गीतेचा अर्जुन हा धर्माने कुणीही असला तरी तो मानसिक प्रश्न गंभीर पातळीवर पोहोचलेला माणूस असतो आणि गीता ही जर विशुद्ध माणूस बनवणारे, स्वस्थ माणूस बनवणारे समुपदेशन असेल तर गीतेला आधी आपल्याला तिच्या धार्मिक चौकटीतून बाहेर आणावे लागेल किंवा ज्याला कुणाला गीतेचे समुपदेशन हवे आहे त्याला आपल्या लौकिक धर्म, जातीच्या चौकटीतून स्वतःला बाहेर यावे लागेल.
रुग्णाला आणि वैद्याला जात-धर्म नसतो. असलाच तर रुग्णता ही रुग्णाची जात तर करुणा आणि सेवा हा वैद्याचा धर्म असतो.

॥ 14 ॥

जर आपण पेशंट असू तर आपण हिंदू आहोत की मुस्लिम, की ख्रिश्चन आहोत? आपण लहान मूल आहोत, युवक की वृद्ध आहोत? आपण श्रीमंत आहोत, गरीब आहोत? आपण बुद्धिमान आहोत की सामान्य? आपण शास्त्रज्ञ आहोत, शिपाई आहोत, की शिक्षक? आपण राजकारणी आहोत की शेतकरी? आपण ब्राह्मण आहोत, वैश्य आहोत, क्षत्रिय आहोत, की शूद्र आहोत? हे विसरून जातो. तब्येत बिघडली की आपल्याला एकच बोध होतो, तो म्हणजे ‘आपण रुग्ण आहोत.’ ही सुस्पष्टता आपल्याला योग्य त्या डॉक्टरांकडे नेते. गंमत म्हणजे कुठलाही रुग्ण वैद्याची जात-धर्म पाहत नाही. गीतेकडेही याच निकोप दृष्टीने पाहायला हवे. गीतेचा धर्मच मुळी मानसिक स्वास्थ्य प्रदान करणे हाच आहे.
‘आपण रुग्ण आहोत’ या सुस्पष्टतेने डॉक्टरांकडे गेल्याने योग्य उपचारानंतर आपण स्वास्थ्य मिळवतो. हेच मनालाही लागू होते पण आपल्याला मनही आजारी पडते ही कल्पनाच करवत नाही. म्हणून आपण आयुष्यभर मनाच्या आजारासह जगत असतो आणि रुग्ण म्हणून मरत असतो. फक्त आपल्याला हे कळत नसते किंवा कळले तरी मान्य नसते.

॥ 15 ॥
खुलेपणाने सांगायचे तर आपण मनाच्या दुखण्याविषयी फार सजग नसतो आणि सहमतही नसतो. अगदी नाराजी, निराशा, संमोहन, निर्णयाच्या बाबतीत होणारे गोंधळ, पूर्वग्रह, स्वतःच्या असण्याविषयीच्या चुकीच्या मान्यता, विपरित अहंकार अशी कितीतरी लक्षणे मनाच्या आजारपणाची असतात. आपण शरीराने आजारी आहोत हे ही जिथे आपल्याला कबूल करणे जिवावर जाते तिथे आपण मनाने आजारी आहोत हे मान्य करणे तर महाकठीण! आणि जिथे आपण मनाने आजारी आहोत हेच माहीत नसेल, माहीत असले तरी कबूल नसेल तिथे अशा रुग्णाच्या (आपोआप) बर्‍या होण्याच्या शक्यता संपल्याच म्हणायच्या.

॥ 16 ॥

काही आजारात शरीर आपोआप बरे होण्याची एक अंतर्गत व्यवस्था निसर्गाने शरीरात अंतर्भूत केली आहे पण मन आपोआप बरे होण्याची कुठलीच व्यवस्था शरीरात नाही. रुग्णचित्त मनासाठी योग्य मार्गदर्शनाला पर्याय नसतो. काही मर्यादेपर्यंत सहनशील मन सहन करते पण नंतर मात्र मन धक्के देत राहते. माणूस वर्तनाने सामान्य राहत नाही. रुग्णचित्त माणसाच्या डोळ्यांमधून, बोलण्या-चालण्यातून, व्यवहारातून तो रुग्ण असल्याचे त्यालाही आणि समोरच्यालाही कळत असते. याचा अर्थ मनोशारीरिक रुग्णता ही जगातल्या कुणालाही येऊ शकते. तसे असल्याने असा कुणीही माणूस हा अर्जुन असतो. गीता ही अर्जुन नावाच्या माणसाच्या निमित्ताने जगातील कुण्याही माणसासाठी सर्वोत्तम मानसिक उपचार आहे.

॥ 17 ॥

गीतेचा अर्जुन हा वयाने तरुण आहे. तो कर्तव्याच्या कुरुक्षेत्रावर उभा आहे. कर्तव्याच्या क्षेत्रात युद्ध करण्याचे काम त्याच्या वाट्याला आले आहे. अर्जुनाचा स्वभाव क्षत्रिय असण्याचा आहे. युद्ध ही त्याच्यासाठी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देणारी गोष्ट आहे. एरवी तो कुणाही दुष्टाशी युद्ध करू शकतो, अगदी साक्षात भगवान शंकराशी सुद्धा त्याने युद्ध केले होते आणि त्यात तो जिंकला आहे असे म्हणतात पण महाभारत युद्धात मात्र तो त्याच्या वाट्याला आलेले युद्ध (कर्तव्य) कसे चुकीचे आहे हे गीतेच्या पहिल्या अध्यायात तर्कशुद्धपणे सांगत आहे आणि संन्यास कसा चांगला आहे हेही तो सांगतो. हेच तर आपलेही होत असते. तर्कशुद्धपणे स्वतःच्या चुकीचे, अपराधाचे समर्थन करणे म्हणजे शुद्ध अर्जुन असणे होय.

॥ 18 ॥
आपलाही घडोघडी अर्जुन होत आहे. होत असतो. एरवी कर्तव्याच्या पक्षात तत्पर असणारे आपण, कुठल्यातरी वळणावर आपल्या कर्तव्याला कंटाळतो. नात्यांच्या मोहात पडतो, आपण कर्तव्यबाह्य गोष्टी करतो. ज्या कर्तव्याचे आपल्याला वेतन मिळते त्याच कामाचे आपण वेगळे पैसे घेतो किंवा आपण कायदेशीर कामासाठीही पैसे मोजतो. आपण काम वेळेत करत नाही. दर्जेदार करत नाही. आपल्याला आपल्या कामाऐवजी दुसर्‍याचे काम आवडू लागते. कामातला दर्जा आपण जपत नाही. हे असे काही जर आपल्याबाबतीत घडत असेल तर आपण नक्कीच कर्तव्याच्या बाबतीत स्पष्ट नाही आहोत. कर्तव्याच्या बाबतीत स्पष्ट नसणे म्हणजे अर्जुन असणे असते. आपला अर्जुन होतो आहे.

॥ 19 ॥
अर्जुन म्हणजे गोंधळ. अर्जुन म्हणजे मोहग्रस्तता. अर्जुन म्हणजे कर्तव्यपलायनता. अर्जुन म्हणजे विषाद, अर्जुन म्हणजे वैताग. अर्जुन म्हणजे सोयिस्करपणा. अर्जुनाच्या स्वभावाच्या या काही खास छटा आहेत. खरे सांगा, कुठल्या न कुठल्या वळणावर, काय आपला अर्जुन होत नाही? होतो. होतोच! आपल्याला तो मान्य नसतो. आपले अर्जुन होणे मान्य नसणारा अख्खा समाजच मग अर्जुन होऊन गोंधळलेला असतो.

॥ 20 ॥
बुद्धिवादी लोकांचे गीतेवर काही आक्षेप आहेत. त्यातला मुख्य आक्षेप आहे, ‘गीता युद्धखोर आहे, गीता हिंसेचे समर्थन करते.’ कोवळ्या मानसिकतेला हे तत्काळ पटते. ‘तस्मात युद्धस्व भारत:’ किंवा ‘मामनुस्मर युद्धस्व:’ यासारखी वचने वरचा गैरसमज पक्का करतात, पण असे नाही आहे.
गीता हिंसेचे समर्थन करत नाही. गीता कर्तव्याचे समर्थन करते. गीतेचा नायक क्षत्रिय आहे, तो युद्धभूमीवर उभा आहे. हा केवळ योगायोग आहे. कर्तव्याच्या कुरुक्षेत्रावर आयुष्यभर सत्य आणि शीलाच्या विरुद्ध वर्तन करणार्‍या कौरवांचा निःपात करण्यासाठी अर्जुन उभा आहे. तिथे तो हिंसेसाठी हिंसा करणारा नाहीये. हिंसा हा अर्जुनाच्या मनोरंजनाचा खेळही नाहीये पण तरीही त्याला समाजस्वास्थ्यासाठी हिंसा करणे आवश्यक आहे.
अपरिहार्य परिस्थितीत अख्खे शरीर वाचावे, त्यातून पेशंटचा जीव वाचावा म्हणून डॉक्टरांनी पेशंटला एखादं बोट किंवा पाय कापण्याचा सल्ला द्यावा तशी महाभारतातली हिंसा आहे.
व्यक्तिगत हेतू हा निमित्त होऊ शकतो पण कर्तव्याच्या कुरुक्षेत्रावर व्यक्तिगतता न आणता समाजस्वास्थ्यासाठी दुष्टांचा विनाश केला तर तो हिंसेत मोडत नसतो. अशी हिंसा ही केवळ कर्तव्य असते. त्यात दुष्टता नसते. गीतेच्या नायकापुढे नेमके हिंसेचे कर्तव्य येऊन ठेपले आहे. याचा अर्थ गीता ही हिंसेचे समर्थन करते असा होत नाही.
अर्जुनाच्या जागी आपण आपल्याला उभे करूयात आणि आपण आपले कर्तव्य टाळतो आहोत असे समजून गीतेच्या समुपदेशनाकडे पाहूयात. आता आपल्या लक्षात येईल की गीता ही निष्काम भावनेने केलेल्या कर्तव्याचे समर्थन करते, हिंसेचे नाही. अर्जुन क्षत्रिय असणे आणि युद्ध हे त्याचे कर्तव्य असणे हा गीतेतील केवळ योगायोग आहे.
गीतेला हिंसेशी काही घेणे-देणे नाही. आपण मात्र हिंसेची च्युईंगम चघळत गीतेच्या फार मौलिक उपदेशाला मुकत आलो हे मात्र नक्की आहे. शिक्षकाला शिक्षकाचे, पोलिसाला पोलिसाचे, वैद्याला वैद्याचे, शेतकर्‍याला शेतकर्‍यांचे कर्तव्य सांगणे जितके सहज आणि आवश्यक; तितकेच सैनिकाला सैनिकांचे कर्तव्य सांगणे आवश्यक. गीता म्हणजे सुफल आणि समाधानकारक जगण्यासाठी केलेला विचारांचा जागर आहे. त्यात हिंसेच्या समर्थनाला कुठलाच थारा नाही.
गीता ही कर्तव्यापासून चाललेल्या पळपुटेपणाला ‘चपराक’ आहे. त्यामुळे गीतेकडे म्हातारपणी वाचायचा तथाकथित धार्मिक, आध्यात्मिक ग्रंथ म्हणून पाहण्याने गीतेचे नाही पण आपले अपरिमित नुकसान आहे, हे कळणे खूप आवश्यक आहे. गीता आपल्या जीवनशैलीचा भाग झाली तर अखिल मानवजातीचा अभ्युदय व्हायला वेळ लागणार नाही.

॥ 21 ॥

जेव्हा कृष्णाने गीतेतून केलेले समुपदेशन संपले तेव्हा अर्जुन मोहातून, अज्ञानातून, गोंधळातून संपूर्ण बाहेर आला. आता अर्जुनासाठी युद्ध हे हिंसेसाठी राहिले नाही. सूडासाठी तर नाहीच नाही. मुख्य म्हणजे युद्ध व्यक्तिगत हेतूसाठी राहिले नाही. आता युद्ध करणे हे कर्तव्य म्हणून उरले. गीतेच्या समुपदेशनाने वर्तमान अनुभवांकडे बघण्याची इतकी नितळ, पारदर्शी दृष्टी अर्जुनाला मिळाली की त्यामुळे अर्जुनाचे मोहग्रस्त मन, बुद्धी, भावना सर्व बाजूंनी लख्ख झाले. अर्जुनाच्या अंतःकरणात विवेकाचा सूर्योदय झाला. अर्जुनाच्या अंतःकरणातील उत्साह आणि उदासीनतेचे द्वंद्व संपले. अर्जुन कर्तव्यसन्मुख आणि सक्रिय झाला. अर्जुन खर्‍या अर्थाने गीतेचा नायक झाला.

॥ 22 ॥
पुन्हा पहिलाच मुद्दा. गीता हा जीवनकौशल्य शिकवणारा, त्यांचे प्रशिक्षण देणारा, त्यात प्रावीण्य मिळवून देणारा जीवनग्रंथ आहे. आजच्या भाषेत गीता हे गोंधळलेल्या मनाला निःशंक करणारे सर्वोत्तम समुपदेशन आहे. धार्मिक पूर्वग्रहाशिवाय एकदा गीतेशी मैत्री करूयात. वैफल्य, निराशा, नकारात्मकतेपासून खरोखर वाचू यात.
स्वस्थ समाजाच्या निर्मितीसाठी गीतेचे योगदान समजून घेऊयात. कधी नव्हे इतकी गीता समजून घेण्याची आज गरज आहे. आपले राष्ट्रीय चरित्र दोलायमान झाले आहे. दैवी गुण क्षीण आणि आसुरी गुणांचे प्राबल्य वाढले आहे.

॥ 23 ॥

गीता संस्कृत भाषेत आहे. गीतेवर अनेक भाष्यग्रंथ आहेत पण मराठी माणसासाठी गीता समजावून सांगणारा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची ‘ज्ञानेश्वरी.’ वाचकांच्या मनीमानसी गीतेचे हृदगत निर्दोषपणे जाण्यासाठी ज्ञानोबारायांनी रोजच्या जगण्यातले, निसर्गातले, विज्ञानातले शेकडो दृष्टांत (उदाहरणे) ज्ञानेश्वरीत दिले आहेत. योग्य मार्गदर्शकाच्या सहवासात ज्ञानेश्वरी समजून घेतली तर गीतेची थोरवी कळल्यावाचून राहणार नाही. गीता कृतार्थ जगण्याचा श्वास आहे.
‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021
पृष्ठ क्रमांक – 287

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!