याजसाठी केला होता अट्टहास

याजसाठी केला होता अट्टहास


– डॉ. रामचंद्र देखणे

9503263046

‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021


आपल्या
भूतकाळात जरा अंतर्मुख होऊन डोकावले की घडलेल्या प्रसंगांमधून आपल्याच जीवनातील एका जाणिवेची सृजनता सहजपणे उभी राहात असल्याचे जाणवते. त्यातील काही प्रसंग हे प्रेरणा देणारे असतात, काही स्वाभिमान जागवणारे, काही आवेश आणि उत्साह निर्माण करणारे, काही दिशादर्शी, काही कृतज्ञतेचे पथदर्शी, शांती, सुचित्व, आर्जव, स्थैर्य आणि अनहंकाराचे अनुदर्शन घडविणारे तर काही अहंकार जागविणारे, आत्मविश्वास गमावणारे, भविष्याच्या अंधार्‍या वाटेवर चाचपडायला लावणारे तर काही वैफल्य आणि उदासीनतेच्या गर्द छायेत लोटणारे! खरोखरीच जीवन म्हणजे अशा भिन्नभावदर्शी अनेकविध घटना आणि प्रसंगांचे एक संमेलनच असते. अशाच काही प्रसंगांमधून जगण्यातलेही चैतन्य फुलतं एखाद्या बहरलेल्या वसंतासारखं तर काही वेळा ‘गणगोत’मध्ये पुलंनी म्हटल्याप्रमाणे क्षणार्धात जीवन विस्कटलं जातं दारातल्या रांगोळीसारखं. खरं तर अशा कोणत्याही प्रसंगाची आसक्तीही नसावी आणि अनासक्तीही. अनेक प्रसंग हे जगण्यातली जणू कसोटीच पहायला अवतरलेले असतात. अशा प्रसंगात आपली आत्मनिर्भरता हरवणं हेच मोठं मरण असतं, तर अशा प्रसंगावर मात करीत ध्येयपूर्तीचा झेंडा रोवणं हेच जगणं असतं. अशा मरणासन्न भयंकर पुरातही टिकाव धरणं आणि टिकणं हे मात्र मरणातलंही जगणं असतं. आपत्तीचा पूर येत असतो पण सुख-दुःख, अनुकूलता-प्रतिकूलता, आसक्ती-अनासक्ती, वेदना-संवेदना, स्मृती-विस्मृती या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन या आपत्तीच्या महापुरातही जो स्थिर राहतो तोच आपल्या अस्तित्वाची आणि स्वत्वाची मान उंचावून एक प्रकारची स्थितप्रज्ञता जागवीत असतो आणि आपत्तीलाच इष्टापत्ती समजून, एका वेगळ्या अभिव्यक्तीचे दर्शन घडवत असतो! पण त्यासाठी अशा आपत्तीकडे आपण कोणत्या भूमिकेतून पाहतो हे महत्त्वाचे!

अंदाजे चार-पाच दशकांपूर्वी माझ्याच जीवनात घडलेला हा एक प्रसंग. माझे प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगावी झाले. माध्यमिक शिक्षणासाठी मी तालुक्याच्या गावी शिरूर येथे गेलो. आमच्या वेळी अकरावी मॅट्रिक होती. माझ्या नंतर एक-दोन वर्षातच दहावी मॅट्रिकची पद्धत सुरू झाली. हायस्कूलला शाळेत असताना चारही वर्षे मी हुशार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये असायचो. बर्‍याच वेळा सर्व तुकड्यांमध्ये सर्वप्रथम असायचो. काही वेळा हा क्रमांक पुढे-मागे व्हायचा. मॅट्रिकच्या वर्षात असताना गणितामध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवणारे जे तीन-चार विद्यार्थी होते त्यात मीही होतो. घरी संतसाहित्याची परंपरा आणि माझे वडील हे साहित्यरसिक असल्याने मराठी आणि संस्कृतची आवड आपोआपच निर्माण झाली. मला मराठी आणि संस्कृत शिकवायला एक शिक्षिका होत्या. त्या खूप व्यासंगी होत्या. त्यांच्या उत्तम शिकवण्याने आणि घरी वडिलांच्या व्यासंगामुळे मराठी आणि संस्कृतची खूपच गोडी लागली. त्याचा परिणाम म्हणून या दोन्ही विषयात बोर्डात खूप चांगले मार्क्स मिळाले तर दुसरीकडे गणित आणि सायन्स या विषयातही खूपच चांगले गुण मिळाले. त्यामुळे शिक्षकांपुढे आणि घरच्यांपुढे एक प्रश्न निर्माण झाला की याला मॅट्रिकनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ‘आर्टस्’ला घालायचे की ‘सायन्स’ला? अनेकांशी चर्चा होऊन माझ्या भवितव्याचा विचार करताना सर्वानुमते मला ‘सायन्स’ला प्रवेश घ्यायचे ठरले. त्यावेळी शिरूरला नुकतेच महाविद्यालय सुरू झाले होते पण तिथे फक्त ‘वाणिज्य’ आणि ‘कला’ या दोनच शाखा होत्या. विज्ञान शाखा नव्हती. म्हणून मला पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात यावे लागले आणि पुण्याच्या स.प. महाविद्यालयात विज्ञान शाखेमध्ये मी प्रवेश घेतला. त्यावेळी ‘प्री डिग्री’ आणि ‘पी.डी.’ अशी पहिली दोन वर्षे असायची. प्री डिग्री हे प्रथम वर्ष तर पी.डी. हे दुसरे वर्ष. पीडीच्या वर्षात विषयानुसार विभागणी होऊन ‘ए’ आणि ‘बी’ असे दोन ग्रुप पडायचे. ‘ए’ ग्रुपमध्ये गणित, पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र हे अभियांत्रिकीसाठी आवश्यक असणारे विषय असायचे, तर ‘बी’ ग्रुपमध्ये ‘मेडिकल’साठी आवश्यक असणारे पूर्ण विषय असायचे. गणित उत्तम असल्याने आपोआपच ‘ए’ ग्रुपला जायचे आणि पुढे अभियांत्रिकीला प्रवेश घेऊन उत्तम अभियंता व्हायचे स्वप्न मी रंगवत होतो. त्याप्रमाणे माझा अभ्यास सुरू झाला. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी आल्यापासून माझा रोजचा जेवणाचा डबा कारेगावहून एसटीने येत असे. शिवाजीनगर एसटी स्टँडवर गाडीच्या वेळेत जाऊन डबा उतरून घ्यावा लागे आणि परतीचा रिकामा डबा पुन्हा ठेवावा लागे. रोज पहाटे उठून डबा तयार करून तो वेळेत कारेगावच्या एसटी स्टँडवर गाडीच्या वेळेत आणून पुण्याला पाठवायचा आणि संध्याकाळी रिकामा डबा पुन्हा एसटी स्टँडवर येऊन घेऊन जायचा ही रोजची कसरत आणि परिश्रम आईवडील करत होते. मुलगा इंजिनिअर होणार हे स्वप्न तेही पाहत होते. कित्येक वेळा आमचा जेवणाचा डबा मध्येच कुणीतरी पळवायचा. बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यासाठी पैसे नाहीत. अशावेळी काय करायचे? माझ्यासारखेच खेड्यातून आलेल्या तीन-चार मुलांची मैत्री जमली. आम्ही अशावेळी एकमेकांचे डबे एकमेकांना देऊन वेळ भागवू लागलो आणि काहीच उरले नाही तर रात्री मंडईमध्ये झुणका भाकर केंद्रावर जायचो. तिथे फक्त आठ आण्यात एक मोठी भाकरी आणि त्याबरोबर मोठा झुणका मिळायचा. रात्री झुणका भाकर केंद्र संपण्याच्या वेळी गेलो की आम्ही विद्यार्थी आहोत हे पाहून तिथली माणसं आठ आण्यातच उरलेल्या भाकरी आणि उरलेले पिठलेही आम्हालाच देऊन टाकायचे. तिथेच मंडईतल्या कुठल्यातरी गाळ्यात बसून झुणका भाकर खाऊन मग प्रत्येक जण आपापल्या खोलीवर जायचे.

‘ए’ ग्रुपच्या सार्‍याच विषयांचा अभ्यास तसा खूप कठीण होता. आणि पहिल्यापासून सांगितले होते की भरपूर अभ्यास करा कारण ‘ए’ ग्रुपचा निकाल फक्त 12 ते 15 टक्केच लागतो. त्यात जो टिकेल त्यातून गुणवत्ता यादी तयार होईल आणि मग ‘इंजिनिअरिंगला’ प्रवेश मिळेल.

त्याच कालावधीत महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडला. गेल्या वर्षभरापासून दुष्काळाचे सावट उभे राहिले होते आणि दुष्काळाची झळ पोचायला सुरूवात झाली होती. दुष्काळाने उग्र रूप धारण केले. माझा गाव आणि तालुका हा वर्षानुवर्षे दुष्काळी भागातच गणला जात होता. पावसाअभावी दोन्ही पिके गेली. गावचे पाणी आटले. पिण्याच्या पाण्यासाठी सारा गावगाडा दोन-दोन मैल पायपीट करू लागला. शिवारात मिळेल तिथून हंडा दोन हंडे पाणी कसे तरी मिळवू लागला. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तर आणखी मोठी विवंचना. जनावरांना चारा नाही, पाणी नाही. चारापाण्याविना जनावरे मरू लागली. घराघरातले धान्य संपले. ‘अन्नासाठी दाही दिशा’ अशीच अवस्था झाली. दुःखाश्रुंना वाट दाखवत शिवारातल्या पाण्याबरोबर शेतकर्‍याच्या डोळ्यातले पाणीही आटले. दुष्काळाच्या प्रचंड महामारीने खेड्यातलं लोकजीवन होरपळून निघालं. या दुष्काळावर कशी मात करावी आणि कसं जगावं या विचारात आणि संघर्षात शेतकर्‍याची सारी आत्मनिर्भरता हरवली. माझ्या रोज येणार्‍या जेवणाच्या डब्यात वडिलांची चिठ्ठी यायली.

‘आज आपल्या गावची बारव आटली!’

‘दावणीला अन्नपाण्यावाचून जनावरं मरू लागली…’

‘दुष्काळाच्या भीतीने काही लोकं पोट भरण्यासाठी गांव सोडून जाऊ लागली…’

‘पण तू आमची काळजी करू नकोस! अभ्यास कर आणि परीक्षा संपली की लगेच गावी ये.’

रोजचा चिठ्ठीतला हा मजकूर मला खूप अस्वस्थ करू लागला. मला रोज गाव शिवार दिसायचा. गोठा-वावगं-जनावरं दिसायची. रानातली पांदीची वाट डोळ्यासमोर यायची. दुपारच्या वेळी गुरं थोपवून गुराख्यांचा विसावा असणारा आणि विहिरीच्या धावेवर आपल्या भव्यदिव्य शाखा पल्लवांनी नटलेला तो पिंपळाचा भव्य वृक्ष दिसायचा. आता हे सारे चित्र बदलले असेल काय? वाटायचं ‘आत्ताच सारं सोडून गावाकडे जावं!’ पण पुन्हा विचार यायचा, ‘नको, थोडक्यासाठी नको! थोडा धीर धर! आपल्याला अभियंता व्हायचंय’

आणि परीक्षा संपली! पेपर चांगले गेले. इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी गुणांची अडचण पडणार नाही एवढे पेपर चांगले गेले! पण आता ह्या अभियंत्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा गावचे विदारक वास्तव पहायला मी खूप हळवा झालो होतो. शेवटचा पेपर संपला आणि तसाच एसटीगाडीने गावी आलो. घराला कुलूप होते. मी वडिलांना काका म्हणायचो. माझी आई आणि वडील म्हणजे काका कुठे गेले असतील? दुष्काळाची काही व्यवस्था लावायला तर नसतील ना गेले? का शिवारात वणवण भटकत पाणी आणायला गेलेत? एकेक विचार मनात येऊ लागले. तेवढ्यात शेजारची म्हातारी आजी धावतच आली…

‘‘आरं तुझा बाप आणि तुझी आई दुष्काळी कामावर गेलेत. अजून कासराभर दिवस हाये. येतील थोड्या टाइमाने! पण तू आलास. बरं झालं. रोज तुझी वाट पाहत होते…’’

आणि मी क्षणाचाही विचार न करता दुष्काळी कामावर गेलो. माझी आई आणि माझे वडील दोघेही दुष्काळी कामावर मजूर म्हणून काम करत होते. ते पाठमोरे होते. वडिलांनी खोर्‍यानं मातीचं घमेलं भरलं आणि ते आईच्या डोक्यावर ठेवतानाच मी माझं डोकं पुढे केलं. ते घमेलं माझ्या डोक्यावर घेतलं… काकांनी पाहिलं… हातातलं खोरं बाजूला पडलं… आणि ते आईला म्हणाले…

‘‘अगं, हे बघ! आपला राम आलाय…’’

‘‘किती बारीक झाला रे…’’ खरंतर उन्हातानात घाम गाळून कष्ट ते करत होते आणि बारीक मी कसा होणार? आम्ही तिघेही काहीवेळ नुसते एकमेकांकडे पाहत होतो. अशा श्रमनारायणाच्या रूपात त्यांना पाहताना माझ्या डोळ्यातून अश्रु ठिबकले. त्या दुष्काळाच्या मातीवर माझ्या डोळ्यातल्या अश्रुंचे दोन थेंबच जणू आईवडील होऊन उभे होते आणि त्याच क्षणापासून मी देखील त्याच दुष्काळी कामावर मजूर म्हणून हजर झालो. आम्ही घरी आलो आणि मी काही विचारायच्या आत काका म्हणाले,

‘‘हे बाकीचे जाऊ दे पण तुझे पेपर कसे गेले…?’’

‘‘चांगले गेले.’’

‘‘जाणारच… आपल्या रामला इंजिनिअर व्हायचंय ना…’’

इंजिनीयरचे स्वप्न पाहणारा राम दुष्काळी कामावर मजूर झाला होता.

रात्रीची जेवणं झाली आणि मग आम्ही बराच वेळ बोलत बसलो. त्यातच गावच्या दुष्काळाचे भयंकर चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. मी गावाकडे आल्याबद्दल त्यांना खूप आनंद झाला होता. मला पाहताच ते आत्तापर्यंतचे सारे दुःख विसरले होते. परिस्थितीच्या वेदना आता त्यांनीच शमविल्या होत्या. ते दुष्काळाशी एकरूप झाले होते. प्रतिकूलतेलाच अनुकूल समजून ते वाटचाल करत होते. मी रोज त्यांच्याबरोबरच रोजंदारीच्या कामावर जात असे. गाव, शिवार, दुष्काळी काम आणि त्यावर काम करणारी गावातली माणसं, बदललेली परिस्थिती आणि निसर्गाचे नाराजपण हे सारे मी अनुभवत होतो. अशातच तीन महिने होऊन गेले. ज्येष्ठ महिना संपला. आषाढ उगवला. पुन्हा आभाळाकडे डोळे लावून सारा गावगाडा पावसाची वाट पाहू लागला. निम्मा अर्धा आषाढही संपला.

‘‘तू पुण्याला केव्हा जाणार आहेस?’’ अशी सारखी विचारणा काका करू लागले पण अशा भयंकर स्थितीत पुढचे शिक्षण घ्यावे असे मला वाटेना. आता शिक्षण इथेच थांबवावं आणि कुठेतरी एखादी नोकरी पाहून आईवडिलांना हातभार लावावा असेच सारखे वाटायचे. शेवटी एक दिवस वडिल म्हणाले,

‘‘हे बघ, आम्ही इथे कसेही दिवस काढू… पण तुझ्या शिक्षणाला काही कमी पडू देणार नाही… तू शिकावं, इंजिनियर व्हावं म्हणून तर हे सारं चाललंय ना… काही करून तू उद्या पुण्याला जा आणि पुढचे शिक्षण पूर्ण कर… नाहीतर… मला तुझ्याबरोबर पुण्यात यावं लागेल…’’

माझी संभ्रमावस्था झाली होती. एकीकडे आईवडिलांचे प्रचंड कष्ट आणि दुसरीकडे माझ्या शिक्षणाविषयीची त्यांची अपेक्षा. त्यांची इच्छा आणि त्यांचे स्वप्न…

आईने सुद्धा रात्रभर माझी समजूत काढली आणि मी अतिशय जड अंत:करणाने पुण्याला आलो. पुण्यात आल्यावर समजले की मला पुण्यात यायला खूपच विलंब झाला आहे. मध्यंतरीच्या काळात निकाल लागून गेले आणि अभियांत्रिकीच्या प्रवेशाचेही काम पूर्ण होवून प्रवेशासाठी दिलेली तारीखही उलटून गेली. चौकशीअंती असे समजले की पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मला प्रवेश मिळाला नव्हता. थोडी टक्केवारी कमी पडली होती परंतु कराड किंवा तत्सम ठिकाणी मला सहज प्रवेश मिळू शकत होता. ही साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी फक्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयेच अस्तित्वात होती. ‘विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालये’ ही संकल्पना आलेली नव्हती. शासकीय महाविद्यालयातून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना अभियंता म्हणून सहज नोकरी उपलब्ध होत होती आणि पगार व पदही चांगले मिळत होते. आणखी बारकाईने चौकशी केली तेव्हा समजले की कराड किंवा तत्सम ठिकाणी प्रवेश घेतला तरी कॉलेजची फी, साहित्य, हॉस्टेलचा खर्च, जेवणाचा खर्च हे सारे पाहता महिन्याला अंदाजे दीडशे ते 160 रुपये एवढा खर्च येऊ शकत होता. हा खर्च इतरांच्या दृष्टीने कदाचित फार नसेल पण तो खर्च पाहता माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले कारण त्या वेळी माझा वर्षाचाही खर्च एवढा होत नसे. प्रत्येक महिन्याला एवढा खर्च वडिलांना कधीच शक्य झाला नसता. एक मोठी आपत्ती उभी राहिली. खूप विचार केला की ही आपत्ती नाही, इष्टापत्ती असेल. कदाचित नियतीला कुठल्या तरी दुसर्‍या क्षेत्रात मला न्यायचे असेल. माझे भवितव्य आणखी काही वेगळे असेल. यावर फार खल नको आणि कुणाशीही चर्चा न करता; कुणाचाही सल्ला न विचारता आणि वडिलांनाही न सांगता या प्राप्त स्थितीचा, एका विवेकबुद्धिने विचार करून मी सरळ बी.एससीला अ‍ॅडमिशन घेतली आणि अभियंता होण्याच्या स्वप्नाला पूर्णविराम दिला.

आता अभ्यासाचा पूर्वीइतका ताण तणाव नव्हता. आठवड्यातील काहीच दिवस ‘प्रॅक्टिकल’ असायचे. मला वेळ मिळायचा. याच काळात मी पुण्यातील विविध विचारवंतांची व्याख्याने ऐकायला जायचो. व्याख्याने, चर्चासत्रे, साहित्य संमेलने, कविसंमेलने, पुस्तक प्रकाशन, विविध कीर्तनकारांची कीर्तने, संगीत सभा, भजने, लोककलेचे कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमात मी आवर्जून जात असे. त्यातून साहित्याची, कलेची गोडी लागली. पुणे हे विद्येचे माहेरघर तसेच कला-संस्कृतीचेही माहेरघर. आपण जर पुण्यात राहून सांस्कृतिक पुण्याचा अनुभव घेतला नाही तर करंटे ठरू! वेगवेगळ्या साहित्यिकांना मी भेटत असे. कलावंतांना भेटत असे. काही वृत्तपत्रांमध्ये युवकांसाठी असणार्‍या सदरात मी लिहित असे. एकांकिका स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथालेखन स्पर्धा यात आवर्जून भाग घेत असे. त्याच काळात आकाशवाणीच्या ‘युववाणी’साठी मी अनेक संहिता लिहिल्या. युवकांसाठी कार्यक्रम केले. चित्रकला आणि रांगोळी कला मला अवगत असल्याने काही दिवाळी अंकांची मुखपृष्ठे रंगविली. तर माझ्या रंगावलीची काही लहान-मोठी प्रदर्शनेही भरवली. याच काळात नटवर्य बापूराव माने यांची भेट झाली आणि त्यांनी दर गुरुवारी भजनाचे कार्यक्रम सुरू केले. त्यात मी भजने गाऊ लागलो. भारूडे म्हणू लागलो. थोडक्यात पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाशी एकरूप झालो आणि माझ्या जीवनात खरोखरीच एक आनंदाचे पर्व उभे राहिले. पुढे बीएस्सी झाल्यावर शासनाची नोकरी लागली. त्याच काळात मी एम.ए. ची परीक्षा दिली आणि विद्यापीठात पहिला आलो. संत साहित्याची पार्श्वभूमी आणि वारकरी परंपरा यातून संत साहित्यावर काहीतरी संशोधन करावे असे वाटू लागले आणि ‘नाथांच्या भारूडातील तत्त्वज्ञान’ या प्रबंधास पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विषयाची ‘पीएचडी’ मला 1985 साली प्राप्त झाली. त्याच काळात बहुरूपी भारूडांचेही कार्यक्रम करू लागलो. ते कार्यक्रम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर परदेशातही गाजले आणि ‘बहुरूपी भारूडकार’ म्हणून मलाही मान्यता मिळाली. पुढे ‘पिंपरी चिंचवड प्राधिकरण’ या महाराष्ट्र शासनाच्या प्राधिकरणात ‘जनसंपर्क व प्रसिद्धी अधिकारी’ म्हणून मी रूजू झालो. प्राधिकरणाच्या अनेक विभागांचा विभागप्रमुख म्हणून मी काम केले. प्रशासकीय काम करताना पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक जीवनाशी एकरूप झालो. सांस्कृतिकतेची आवड असल्याने मी स्वतःही पिंपरी-चिंचवडच्या विकासाबरोबरच सांस्कृतिक अंगाने घडत गेलो. सर्व पक्षाचे नगरसेवक, महापौर, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक मंडळींशी मी अगदी स्नेहाच्या धाग्याने बांधला गेलो. त्या सर्वांनी आपला माणूस म्हणून मला स्वीकारले. मला घडविले. मला प्रेरित केले आणि मला सन्मानाचे स्थानही दिले. पिंपरी-चिंचवडची महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, नाट्य परिषद, व्याख्यानमाला समन्वय समिती, कीर्तन कुल, विविध साहित्य मंडळे, संगीत सभा या सर्वांशी मी जोडला गेलो आणि त्यातूनच माझे साहित्यिक, सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व घडले गेले. खरे तर माझ्या जडणघडणीत या सर्वांचे खूप मोठे ऋण माझ्यावर आहेत. प्रशासकीय सेवेत राहून कोणत्याही द्वैताला, भेदाला, किंवा अकारण विरोधाला स्थान न देता सामंजस्याने आणि संवादाने प्रशासनाला लोकाभिमुख करता येते याची मी अनुभूती घेत होतो. माझे उगाचच मोठेपण सांगण्यासाठी मी हे सांगत नाही. तो मोठा अहंकार ठरेल पण मोठेपण कसं येऊ शकतं याची अनुभूती हे मात्र एक वास्तव ठरेल.

मी कधीकधी माझ्या मनालाच विचारतो की कदाचित मी अभियंता झालो असतो तर… आणि याचे उत्तर माझ्या निवृत्तीच्या वेळी झालेल्या निरोप समारंभातील प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भाषणात दडले आहे. त्या भाषणात ते म्हणाले…

‘‘डॉ. देखणे यांना खरे तर अभियंता व्हायचे होते पण ते अभियंता झाले नाहीत हे फार बरे झाले. आज समाजात अभियंता खूप आहेत. समाजाला अभियंत्याची गरज आहे पण त्याहीपेक्षा सर्वात मोठी गरज आहे ती आपल्या विचारांनी समाजाची जडणघडण करणार्‍या विचारवंतांची, प्रतिभावंतांची आणि मूल्यांची जागृती घडविणार्‍या डॉ. देखण्यांसारख्या संत साहित्याच्या अभ्यासकांची…’’

आपल्या विषयीचे गौरवोद्गार ऐकून कुणाला आनंद होणार नाही? पण मला आणखी एका वेगळ्या गोष्टीसाठी आनंद वाटत होता की परिस्थितीमुळे मला अभियंता होता आले नाही ही आपत्ती आज वेगळ्या भूमिकेतून इष्टापत्ती होऊन माझ्या जीवनाचे एक वेगळे मूल्यांकन घडवीत होती. शासकीय सेवेच्या ह्या शेवटच्या क्षणीही, कृतार्थतेचा आनंद घेऊन मी बाहेर पडत होतो आणि संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग आठवत होतो.

याजसाठी केला होता अट्टहास।
शेवटचा दिस गोड व्हावा॥


– डॉ. रामचंद्र देखणे

9503263046
‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021, पृष्ठ – 168

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा